"बाळ लागले का तुला? "
आईचे हृदय मागणाऱ्या मुलाची गोष्ट त्याने अनेकदा ऐकली होती . आईचे हृदय मिळालेल्या त्या मुलाचा त्याला हेवा वाटायचा. कारण ते हृदय त्याला विचारायचे "बाळ लागलं का तुला " त्याला असे विचारणारे कुणीच नव्हते असे नाही. पण तरीही ते आईचे हृदय त्याला सापडले नव्हते. त्याने ऐकल्या होत्या आईच्या आणि आईपणाच्या गोष्टी. त्याने पाहिले होते आईचे हसु. तो वाढला होता पोसला होता मातृत्वसुखाच्या स्तनपानावरं पण आईचे काळीजच कसे हरवले होते त्याच्या जगण्यातून
प्रत्येक हृदय असणाऱ्या जीवांमध्ये तो आईचे हृदय शोधु लागला होता. त्याला प्रत्येक हृदयाने कणव दाखवली. दया दाखवली. पण तो विसरु शकला नाही त्याचा आंतरिक शोध. त्याकरिता तो अंतःकरणातून धडपडत राहिला. त्याच्या भावनांची पडझड होत राहिली. आणि झिरपत राहिला एक अदृश्य झरा. त्याच्या इवल्याश्या सावलीत त्याच्या इवल्याशा आयुष्यात कुणी डोकीवून पाहिले असते तर जाणवला असता त्याचा अश्रुंमधील उष्मा. त्याच्या कोवळ्या टाचांना पोळलेली उन्हे. त्याच्या तळहातात घुसलेली काट्यांची फुले दिवसेंदिवस त्याचा शोध वाढवत राहिली. सवयीप्रमाणे श्वास फुंकर घालत राहिले स्पर्शाचे मलम होत राहिले.जखमांवर खपली येत राहिली. पण ती हाक ऐकु आलीच नाही "बाळ तुला लागले का? "
त्याला कुणीसे सांगितले निरव शांततेच्या वेळी माणसांची हृदय नदीकाठी विहरत असतात. तेव्हापासून तो नदीकाठी जायचा. नदीची मऊसुत वाळु कधी पाण्यात तर कधी पाण्याबाहेर करत रहायची. तो ही तसाच मुसमुसत रहायचा. हुंदके द्यायचा .टेकुन उभा राहिलेल्या झाडासारखाच तो ही स्थिर रहायचा .त्याच्या शोधाची मुळेही खोलवर रुजत चालली होती. त्याला आजुबाजूला माणसांची जनावरांची कलेवरं दिसायची पण हृदय सापडत नसायचे. पण त्याची अंतरीची खूण त्याला सांगायची हा शोध कधी ना कधी सापडणारा आहे.
त्याने स्वतं:भोवती एक भावनांचे बेट बांधले होते. या बेटावर तो कितीतरी दिवस कितीतरी वर्षे कदाचित कितीतरी आयुष्य तो घालवत होता. चोहीकडे पाणी असल्यामुळे असेल कदाचित तो खूप तरलं झाला होता. पण बेटावरचा दगड कधी कधी त्यास अडथळा करी. त्याचे अंतरंग विरतच चालले होते पण कधी नियतीच त्यात अडसर होई.हा पाषाण भेदला पाहिजे असे त्याला खूपदा वाटे. पण शस्त्राने किंवा यंत्राने तो फुटणारा नव्हता. तो पाण्यात खडीसाखरे सारखाच विरघळायलाच हवा होता.
एक दिवस एकाएकी दगडाला पाझर फुटला. दगड आतुन जिवंत झाला. दगडाने दगडाचे दगडपण सोडले. आणि हृदय होऊन त्याच्यापुढे ओसंडला. अचेतन अमूर्त असलेला दगड सजीव झालेला त्याने पाहिला. ते त्याचेच काळीज होते हे त्याने ओळखले. अन त्या हृदयातील आईही त्याला दिसली. जी सदैव त्याच्याचसोबत होती. ती त्याच्याच हृदयात होती. तर त्याला कशी ऐकु आली असती हाक " बाळ लागले का तुला?"
-------अनघा देशपांडे
.jpeg)