Pages

Friday, 22 August 2014

मनाचा पारा

मनाचा पारा



तडकला आहे मनाचा पारा
साध्याश्या उठल्या तरंगाने
सांधणारे कुणीच नाही
क्षितीजास दिली हाक
क्षितीज म्हणते
किनाऱ्यावर येऊन भेट
तिथे देईन
वचनांची ग्वाही
विश्वभर पसरले आहे
अरण्य
कुठे शोधू भूमी
कुठे शोधू जल ?


-----कविता

ये सूर्यास्ता

ये सूर्यास्ता


ये सूर्यास्ता ये
घेऊन जा तुझ्या प्रदेशात
सूर्योदयापासून
पाहते आहे तुझी वाट

अर्ध्ये राज्य बक्षीस तुला
अर्ध्यात आहे पूर्ण वाटा
उरलेल्या ओंजळीत
भरेल समुद्र

मी तुला वाढवले
मी तुला सांभाळले
ऐकवू नकोस
या गतजन्मीच्या कहाण्या
तू दे मला नवा जन्म

जिथवर तू चालशील
तिथवर तुझे साम्राज्य
ये सूर्यास्ता ये
घेऊन जा तुझ्या प्रदेशात


----कविता 

दृढ

दृढ

दृढ आकाश दृढ सावली
निजेत निजली झाडे
कुठेसा स्नेह कुठेसा देह
मनात वाजती पाने

ओळख विसरले ऋतू
अबोध झाली शांतता
पावलात दिसे पाऊल
वळणावर नुसत्या लाटा


-----कविता 

फेसबुक अंटार्क्टिका

फेसबुक अंटार्क्टिका

आवडी नावडी संपृक्त झाल्या आहेत 
मी प्रवेश करते आहे दवबिंदूच्या विश्वात 
या विश्वाचे खगोल भूगोल ठाऊक नाही 
इथल्या प्रदेशातून फिरतो आहे बर्फाचा उंट 
उंटावर स्वार आहेत सूर्योदय आणि सूर्यास्त 

मन अंटार्क्टिका क्षण अंटार्क्टिका
श्वास अंटार्क्टिका भास अंटार्क्टिका
युग अंटार्क्टिका फेसबुक अंटार्क्टिका
अंटार्क्टिकाचे गावे वाटतात अभंग
हातात वाजतात चिपळ्या मोबाईलच्या

----कविता 

तुटणे

सहज निखळून पडाव
अस पानही तुटत नाही वहीतले

माझी इच्छा
तारा तुटावा
आणि झोळी भरावी
न भरत्या ओंजळीने

----कविता 

विचारांचे एकटेपण

विचारांचे एकटेपण



विचारांचे एकटेपण मालवावे म्हणून  
तेवत ठेवते कथेतले एकेक पात्र 
जणू तिन्हीसांज कायमची 
येवून ठेपली आहे 
घरभरणी झालेल्या 
नववधू उन्हातून  

या कथेतल्या काचेच्या महालात 
गर्दी आरश्यांची 
आरश्यात आरश्याला निहाळणारी  
मी एकटीच 

समुद्र अनेक दिशांनी विस्तारत जातो 
आणि त्याच्या किनाऱ्याला वाळवंट  
समुद्राशी बोलत राहते 
ऐकू येत नाहीत 
माझेच आवाज मला 

निव्वळ पत्ते बदलले 
म्हणून घर बदललेसे वाटते आहे  
तरीही भिंती त्याच 

विचारांचे एकटेपण मालवावे म्हणून  
तेवत ठेवते कथेतले एकेक पात्र 
या खोलीच्या अवकाशात 
झुंबरातील वितळत्या मेणबत्तीप्रमाणे 



----कविता 

उंच टोकावरून

उंच टोकावरून 

उंच इमारतीच्या टोकावरून 
पाहतात मुंग्या 
सुस्त रस्ते हलत नाहीत 
जागा सोडून 

झाडावरून झडतात पाने  
पानावर बसतात मुंग्या 
पानाला नाही नावाडी 
पोहोचतात जिथे असेल 
जायचे पानाच्या मनात  

मुंग्यांना भासते  
पानाभोवतीचे 
पाणी अदृश्य 
काळ एकाच स्थितीत दृश्य 

उंच इमारतीच्या टोकावरून 
पाहतात मुंग्या 
सुस्त रस्ते हलत नाहीत 
जागा सोडून 


----कविता 

अंगाई

अंगाई


भस्म फासुन बैरागी बसे 
गात चालला काळोख एकटा 
प्रकाशाचे कण कण वेचून 
उष्ट्या पत्रावळ्या खरकट्या 

रडावे वाटले मला ठायीठायी 
रडले होते आठवत नाही 
ओंगळ देखणे शहर निजले
कुणीच गात नव्हते अंगाई

---कविता

प्रतिकांची सृष्टी

कवितेतल्या प्रतिकांची सृष्टी ही एक अजब गोष्ट आहे . प्रतीकांच्या अलीकडे आणि प्रतीकांच्या पलीकडे आणि यामध्ये तयार झालेले विश्व यात अनेक भावतरंग उठतात मावळतात .मला माझ्याच कवितेतल सर्वाधिक आवडलेलं प्रतीक म्हणजे "वेडी म्हातारी " 

तिचे वर्णन करायचे झाल्यास काळे पांढरे तेल न लावलेले रुक्ष केस ,कमरेत वाकलेले तिच वय आणि त्यामुळे तिच्या उंचीएवढी तिच्या हातातली तिच्या उंचीपेक्षा अधिक भासणारी लाकडी काठी ,सतेज डोळे ठसठशीत कुंकू ,निमुळत्या होत आलेल्या केसांना बांधलेली रिबीन ,अडाणीपणाचे आव आणणारे चेहऱ्यावरचे भाव तरीही तर्कास देखील थक्क व्हावेत असे तिच्या तोंडून येणारे तत्वज्ञान म्हणजे तिला वेडी म्हटल खर पण शहाणपणाचे औदार्य तिच्याकडे ,

स्टीफन हॉकिंगच्या brief history of time मध्ये वर्णन केलेल्या एका प्रसंगात एक वयोवृद्ध स्त्री रसेल या शास्त्रज्ञाला उत्तर देते "तुम्ही सांगितलेले पृथ्वी सूर्याभोवती फिरते वगैरे हे बकवास आहे ,खर म्हणजे जग एका प्रचंड कासवाच्या पाठीवर ठेवलेली सपाट तबकडी आहे "
तिच्या या विधानावर रसेल तिला प्रतिप्रश्न करतो
मग ते कासव कशावर उभे आहे ?
ती पुन्हा उत्तरते "तू फार हुशार आहेस हुशार ,एकाखाली एक सगळी कासवचं आहेत ,

प्रतिकात दिसणारी म्हातारी ती देखील अशीच वाटते ,आता ती करुण आहे मला कुशीत ओढून नेते की अंधारात दूर ढकलते हे सांगणे कठीण आहे .मधुमंजिरीच्या म्हातारीसारखी ती चेटकीण असेलही किंवा ज्येष्ठागौर म्हणून गरीब ब्राह्मणाकडे जेवायला येणाऱ्या दयाळू बुद्धीसारखी असेलही . एकूण ही म्हातारी मला प्रतीकातून पाहायला खूप आवडते .तत्वज्ञात वर्णन केलेलं ब्रम्ह आणि माया त्यामधील माया माया हि देखील अशीच असावी बहुधा अर्थात तिला अनेक प्रकारे भिन्नत्व घेता येते पण त्यातही तिचे असे म्हातारे रूपड फार जवळच वाटेल मला !

-----कविता मोकाशी

Friday, 8 August 2014

नेति नेति

नेति नेति 



खोलीतले विश्व निर्माण होण्यापूर्वी 
चैतन्य जडत्व आस्तिक नास्तिक  
अणुवाद रेणुवाद तत्वज्ञानाचे गूढ 
असे काहीच नव्हते अस्तित्वात 
नेति नेति
असलीच तर होती 
"निराशा" 
निराशेची संस्कृती 
संस्कृतीच्या प्राचीनत्वाचे गर्भ 
गूढघ्यात माना खुपसलेले 
उदार उदासीनतेची बाललीला   विश्व 
रडण्याचे नव्हते धैर्य तेव्हाही   तरीही जीव 
इच्छाही नव्हती 
दुखाचे शीर कापून आणले 
त्याचेच वॉलपीस होते शोभून  
शेवाळलेल्या भिंतीवर 

कुणीच नव्हते सखे सोबती 
या प्रदीर्घ आजारपणात 
नात्याची उबळ 
ठसका यायचा जीवघेणा 
गेला नाही जीव तरीही  
हुंदक्यांनी भरलेल्या दरीत 
देहावर लाटा थडकायच्या नुसत्या 
देहही ओंडका होऊन 
मनाच्या वाळवंटात 
मॉडर्न आर्ट म्हणवून घेत 

अखेर देह थकला सुरकुतला 
भिंतीचेही पोफडे निघू लागले 
महतप्रयाण संकेत मिळाला 
ज्या तत्त्वातून जन्मलो 
त्याच तत्वात विलीन 
निराशेने घर बदलले 
खोलीने तिचे जग 
घरमालकानेच घेतली जागा 
वसवणार आता तेथे 
रो हाऊसेस 
एकासारखेच एक दिसणारे 
तेच भिन्नत्व एकत्वाचे  
तेव्हा ओळखता येईल 
निराशेला ?
तिचा गतजन्म 
पुनर्जन्म ?

इडा पिंगला 
आठवतीलही तो जन्म 
स्मृती नुसतीच 
जीर्ण ग्रंथासारखी 
पान पलटाच 
माती क्षणार्धात 

खोलीतले विश्व निर्माण होण्यापूर्वी 
काहीच नव्हते अस्तित्वात नेति नेति  


-----कविता 

Tuesday, 5 August 2014

रथोत्सव

रथोत्सव 

रथ ओढती भक्त जन रथात बैसले देव 
देव करील कृपा नांदेल समत्व बंधु भाव 

रथावर सूर्याची नक्षी रथावर कीर्तिमुख 
रथ चालिला पूर्वेकडे सूर्यास्त पश्चिममुख

रथापुढे अश्व गज रथापुढे मांडला खेळ 
तलवार भाला खड्ग जमला शस्त्रमेळ 

शस्त्रासहित शास्त्रे चालले स्वयं ब्रम्हादिक 
खारकेचा वाटती प्रसाद हेचि सुख हेचि सुख 

दक्ष शंकराचे युद्ध युद्धाची कारंथ करी नाटिका
रचले विश्व नारायणाने तशी रचली नाटिका 

रथ थांबला आमुच्या दारी आले दारी शंकर 
वैराग्य सुमने वाहु या जोडूनी संध्येचे कर 

मात्यापित्यास सौख्य दे सौख्या दे अनुभूती 
लाभू दे प्रज्ञा वाणीला खुंटू दे दीन हीन मती 

रथ पोचला मंदिरी मंदिरात वाट पाहे नंदी 
नाद गजर अनाहत गाऊ लागले शृंगी भृंगी 
 
काळास भासती कष्ट मनामध्ये मन 
काळाची झाली अदृश्य दोरी विसरले भान 
रथ आहे देहअवस्था देहास श्रमविती श्रम 
देव ध्यानस्थ रथात तैसे बोधे मनास मन 


----कविता