Pages

Thursday, 28 March 2013

उग्र व्यथांनी


उग्र व्यथांनी काळीज फुटे
अग्नी तांडव निनादे डमरू
आसूड ओढे पोतराज जसा
देव अंगात लागले थरथरू

अस्थीदंश करे पिंजर वेदना
प्राण बोबडा त्यातून सुटेना
आकाश पाताळ एक झाले
अश्रूंची घळई तरीही भरेना

धपापला उर निघाला धूर
देहात काळीज समाधी बेट
त्याच बेटावर करते मी तप
भंगलेले शिल्प अंतीम भेट

------कविता


Wednesday, 27 March 2013

एकरूप स्वप्न


एकरूपतेच्या भिंगातून
वेगळी झालेली
आपली स्वप्न
शोधत आहेत आपापले सत्य
मी राखेपुरती उरली आहे
तू कागदापुरता निमला आहे
तरीही अंटार्टिकावर
न मावळणाऱ्या सूर्यासारखे
खांद्यावर मान टाकून
मला मिठी मारत आहेत
स्वप्नांच्या आठवणी
ओढू पाहते आहे मी मला
त्या आठवणीतून
मला पोहचायचे आहे
स्वप्न होऊन
तुझ्या स्वप्नापर्येंत
पुन्हा एकरूप स्वप्न
पाहण्यासाठी
-----कविता

जांभळा हट्ट




जांभळा हट्ट कशापायी ? 
टेकशील डोके 
घासशील नाक 
मागशील दान 
लाज तुझ्या स्त्रीत्वाची 
झोळीत पडतील दाणे 

उष्टे म्हणून टाकतील  
तू सुपात पाखडशील 
जायच्या त्याच घरी 
तू जाशील 
जिथ असेल 
तुझ्या अन्नाचा वाटा 
अस्मिता अस्मिता 

का ग बाई  ?
जांभळा हट्ट तुझा 
विषभिक्षेचा 

------कविता   


म्हणती केवळ


म्हणती केवळ


ज्वर आसवांचा कोवळा
निद्रेत लोटले पक्षी
स्वप्न स्तुती बाजेवरती
विणली पाचोळा नक्षी

फुलला तेथे चंद्रकवडसा
जलाशय नभी डहुळले
मातीपेरल्या सुखावरती
अम्रुतडोह जणू गळले

मंजिरी तनु आत स्फुरली
झिजली दारात तुळस
उष्ट्या दुधाच्या घासाने
सोवळे तिच्या मायेस

दुःख वंचना शाप जणू की
विजेत या स्वप्नांच्या गारा
लाडकी न ती कुणाची तेथे
म्हणती केवळ रंभा अप्सरा


-----कविता

Saturday, 23 March 2013

माझे उरलेले प्रतिबिंब


1

पोखरत जाते आहे मी आतल्या आत
माझ्याच खिन्न उदास नजरेने .
आरशाच्या संथ पाण्यातून
उठत आहेत तरंग
आरंभ अंत नसणारे

कुणीतरी तोडली असावी
नजराणा दिलेली मण्याची माळ
राजपुत्राच्या जन्मानंतर
तशी ओघळते आहे मी
आरश्यातल्या धुक्यावरती
धुक्यावर कुणी ओढला ओरखडा
तर उमजेल त्याला
माझे उरलेले प्रतिबिंब

2

मी विहरत आहे
शोधत माझे अवकाश
गर्भातल्या गर्भात
जिवंत नसल्याची जाणीव
फोडलेली आर्त किंचाळी
ऐकू नाही येणार आता
बहिऱ्या दिशांना

संध्याकाळ झालेल्या कठड्यावर
वाट पाहते आहे मी
अनोळखी होऊन जाण्याची
स्तब्ध चाहूल होऊन
जाते आहे त्याच्या गच्चीत 
तो येण्याची नाही शाश्वती
जाण्याची नाही परतखुण
मी कोणताही
शेवट जपण्याआधी
येईल तो
खात्री म्हणून
त्याचे हुंकारवचन



उडत्या पदराची उपमा देऊ
मी माझी मला
कि दिव्यावर जळणाऱ्या पंतगाची
साक्ष कोण घेईल
माझ्या आर्ततेची
ठेवेल कोणता ऋतू माझी आस
मी नदीचे शुष्क वाळवंट
म्हणशील तर त्याच्या
दारचा पारिजात



गाल होऊन ओघळणार्या
आसवांची सुमनकथा
ऐकवली होती मी त्याला
बकुळीचा गजरा विणताना
त्याने मुठ्बंद अश्रू
ठेवले होते ओठावर माझ्या
अनेक जीव्हांनी कोसळणारा
धडपडता पाऊस
घेवून निजले मी
धरणीच्या कुशीत

मी नाही मोजले चांदणे
ना दिपले तशीही
मोगर्याच्या दवावर
रेघ रेघ माळणारया
कोऱ्या कॅनवासवर
कोरी होऊन
निपजला मी अंधार




अर्ध्या सावलीच्या
तुटलेल्या काचावर
त्याची सावली
येण्याची
इंद्रधनुष्य
आठवणीतल्या स्वप्नांचे
पुन्हा गडद अंधार
तो उजाडेपर्येंत
सापडलेल्या
आरश्याच्या धुक्यात
सावळ्या मेघात


------कविता

Wednesday, 20 March 2013

शोध नव्या जाणिवांचा





"अनेक कारणांनी अस्वस्थ आहे ती …. पण जेवढी समजली आहे कविता ती दुःखाची आहे अस्वस्थतेची आहे कल्पनेची आहे एकांताची आहे एकटीची आहे तरी रम्यतेची आहे . तिला मुळात चारचौघात रमणे आवडत नाही . तिचा असण्यापेक्षाही नसण्यावर विश्वास आहे . तिला जाणीवा जखमा खोल असतात हे ठाऊक नाही तिने फक्त डोळ्यातले अश्रु मोजुन ठरवली आहे वेदनेची व्याख्या .नजर पाहुन ठरवली आहे प्रेमाची व्याप्ती. ती आहे सत्यतेपासुन कैक मैल दूर तिला ठाऊक नाहीत उन्हाचे चटके तिला नाही सावलीची माया . तिला नाही माहित आभाळाचे ठिगळ असेलच माहित तर तिला तिचे नसणे ठाऊक आहे . मी विचार करते आहे आजवर लिहलेल्या सगळ्या कविता फाडुन टाकाव्यात आणि मुक्त कराव आता या कवितेला .

ती माझ्या जगण्याचे प्रश्न सोडवत होती की नाही माहित नाही . तिने मला जगायला शिकवले की नाही माहित नाही . पण अभिमानाचे बुरुज आणि अपमानाचे तुरुंग घेऊन ती मिरवणारी नाही

तिची व्यक्तता आहे माझ्यापुरती क्षणिक तरी अमर्याद . प्रत्येक वेळी ती अशाप्रकारे भेटत गेली आहे की तिचे गेल्यावेळचे भेटणे आभास वाटावे . आताही प्रत्येक पान उलटुन पाहिले की आभास वाटतो आहे पण या सारयाला खोट शुन्य तरी कसे ठरवु असा प्रश्नदेखील मला पडलेला नाही कारण माझ्या कवितेची ओळख पटली आहे मला . ती शोधत आहे तिचे नसणे शुन्य होऊन जाणे म्हणुनच मुक्त करत आहे मी तिला माझ्या व्यक्ततेपासुन

कविता लिहणे थांबवित आहे . काही महिने काही वर्ष कदाचित आयुष्यभरासाठी . तिचे नसणे तिला उमजु लागले तर ती येईल मला भेटायला . तोवर हा निरोपाचा प्रवास आनंदाने सुखाने शांततेने .

अर्थातच कविता लिहणे थांबवले म्हणजे जगणे थांबले नाही आता शोध नव्या जाणिवांचा नव्या लेखनाचा नव्या ध्यासाचा नव्या कल्पनांचा ."
______________________________________________________________________________

सुटका

गर्र चाक फिरलं
रहाट गडगडल
उफ्फ दोर निसटला
घागर कलंडली
तळाशी बुडाली
तळ गाठून
पुन्हाशी वर आली
कलई काळवंडली
पोच गेला ........

जगण्याला कसला तडा गेला
अन मरणाचा घडा अर्धाच भरला
गळकी घागर ....
गोल विहरीत फिरते आहे
बुलंद भितीस धडकते आहे
गळक्या छिद्रातूनच तरंगते आहे

कधी डोळे मिचकावून
आकाशाकडे एकटक पाहते आहे
कधी डोळे गच्च मिटून
खोल पाण्यात रमते आहे

नक्की काय हव आहे तिला
जगण कि मरण ?
जगण्याची मुक्तता
कि मरणाची अधीरता ....
आकाशाची उंची
कि गर्भ जमिनीची खोली
का तिला हवी आहे
फक्त सुटका ??

____________________________________________________________________________________

---कविता मोकाशी 

Sunday, 3 March 2013

अजब रसायन अंजली



अजब रसायन अंजली 









आज आमच्या केबलवाल्याने कुछ कुछ होता है पिक्चर लावला होता ,पहात बसले अगदी स्टार्ट टु एन्ड शिवाय केबलचा असल्याने मध्ये मध्ये जाहिरातीची चुळबुळ नाही . तर साधारण मी इयत्ता तिसरीत असताना दिवाळीच्या मोसममध्ये क्लासहुन येताना चकलीच्या भाजाणीच्या वासासोबत ,काही घरांच्या दारातून ,बाजारातल्या काही दुकानातून ,लोकांच्या शिळेतून ,कुछ कुछ होता है मधली गाणी ऐकत घरी यायचे आणि जायचे त्यावेळी एकदम सुपर डुपर हीट असा तो सिनेमा झाला होता .तरीही थेटर जाऊन पाहण्याचे लाड काही आईने चालवुन घेतले नाहीत.

त्यानंतर ठीक दोन वर्षाँनी मात्र आजोळी मामाच्या टी व्हीवर हा चित्रपट पहायला मिळाला अगदी मनापासुन आणि मनभरुन रडले हा चित्रपट पाहुन .आठ वर्षाच्या अंजलीला माँ विषयावर बोलायला सांगितले जाते तिथपासुन अगदी शेवटी काजोलला म्हणजे अंजलीला तिच्या लग्नादिवशी राहुल भेटायला येतो तिथपर्यँत मनसोक्त रडले आणि हसलेसुध्दा बर . मला आमच्या मराठीच्या बाईँनी सांगितले होते तु ययाती कांदबरी वयाच्या तीन टप्प्यांवर वाच तुला नव्याने कांदबरी कळेल त्यापैकी दोनदा वाचुन झाली पण वेगळे काही वाटले नाही .मात्र कुछ कुछ होता है चित्रपट दरवेळी मी पाहत गेले तसा मला वेगवेगळा भावत गेला .

म्हणजे अगदी पहिल्यांदा पाहिला तेव्हा काजोलचे उपेक्षित राहिलेले प्रेम आणि पुन्हा शारुख काजोल यांचे शेवटी मनोमीलन याबद्दल खुप उत्कंठावर्धक प्रेम वाटत राहिले नंतर नंतर त्यातील टीना हे राणी मुखर्जीने साकारलेल व्यक्तीमत्व तिच्यावर अगदी सवत असुयेने द्वेष केला टीना मुळे काही काळ राणी मुखर्जी माझी नावडती नटी बनली होती तिचा तो टिपीकल घोगरा आवाज तिचे कॅट आईज हे खरतर तिच्या प्रसन्न व्यक्तीमत्वाला शोभा आणणारे सौँदर्य आविष्कार आहेत पण चार दिवस सासुचे अवंतिका भाग्यविधाता असल्या काही मालिकांचे तेलबुध्दी संस्कार झाल्याने टीनामुळे राणी मुखर्जीवरही मी जळफळाट केला होता अगदी बोटसुध्दा मोडली .

असो तर सांगत काय होते हा कुछ कुछ होता है मला दरवेळी वेगळा भावतो . यातल्या काजोल हिने साकारलेली अंजली हे व्यक्तीमत्व तस मला अगोदरपासुन भावले आवडले आहे . मुळात नायकावर भरभरुन प्रेम करणारी नायिका तसा माझ्या आकर्षणाचे वेडाचे भाग आहे .म्हणजे जयवंत दळवीच्या महानंदा पासुन एका लग्नाची दुसरी गोष्ट मधल्या राधा पर्यँत . प्रचंड भावभक्तीने प्रेमाबद्दल आदर बाळणारया अशा नायिका मला विलक्षण वाटतात . तशीच कुछ कुछ होता है मधली अंजली मधल्या काही काळात तिने राहुलवर केलेले प्रेम यत्किँचितही विसरलेले नाही हे पाहुन मी खरोखर आतुन हलले होते . तीच गोष्ट टीनाची वर म्हटल्याप्रमाणे हे कॅरटर किँवा हीने राहुलवर केलेले प्रेम हे समजायला मला उशीर लागला .

पण ज्या नायकावर या दोघी प्रेम करत आहेत तो राहुल मात्र या नात्यांच्या बंधनात सॉल्लीड कनफ्युज वाटला मैत्री म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे मैत्री हा त्याच्या वाट्याला असणारा डायलॉग पण तितकाच संभ्रम अवस्थेत त्याला नात हव आहे पण बंधन नको अशी त्याची अवघड भाव अवस्था आहे त्यासाठीच तो अनेक मुलीँमागे धावतो आहे असे दाखवले आहे अर्थात यात फिल्मी मेलोड्रामा पण आहे . तरीही त्याला खरे प्रेम समजले नाही असे शेवटपर्यँत मला वाटत राहिले टीनाच्या मरणानंतर येणारे एकटेपण मग काही कारणाने अंजलीची होणारी पुर्नभेट अस सार काही संमिश्र वाटत पण टीनाने राहुलला पुर्ण ओळखल्याने तिला त्याचे अंजलीवरचे प्रेम कळते लक्षात येते असे वाटते त्यासाठीच हा सगळा खटाटोप आठ वर्षाची अंजली करते . त्यामुळे या चित्रपटाला कधी लव्ह स्टोरी म्हणावेसे वाटले नाही पण कथा मात्र अतिउत्कुष्ट तर एकुण आजही माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी हा चित्रपट आहे .

तर तोच आता पाहून आले ,बाकी पूल म्हणतात ते अगदी खर चित्रपट नेहमी जत्रेत जाणाऱ्या लहान मुलाप्रमाणे पहावे म्हणजे त्यात हरवायला मज्जा येते
असो
लेट चिअर्स
फॉर द मेलोडीअस साँग

तुम पास आए यु मुस्कुराए 

तुमने न जाने क्या सपने दिखाए 

अब तो मेरा दिल जागे न सोता है 

क्या करु हाए कुछ कुछ होता है
 .





------कविता मोकाशी 

"मम आत्मा गमला "

"मम आत्मा गमला "



विस्ताराने बांधली जात आहेत 
गाण्यातली कडवी 
पाहिजे तसा सूर लागत नसल्याचे 
कबूल करत आहे 
खिडकीचे किलकिले दार 
आणि खिडकीबाहेरचा 
जुन्या पुस्तकाचा 
पिवळा प्रकाशाचा झोत 
तरीही तेच 
अभिनयाचे पडलेले स्वप्न 
माझे नसलेले गाणे
"मम आत्मा गमला "

-----कविता

उपकारांचे बांडगुळ

उपकारांचे बांडगुळ 


तु केलेल्या उपकाराची
कॅन्सरची गाठ
माझ्या अंगात

तुझ अस्तित्व नाकारल्याने
तुझ्या हातुन माझा खुन
की माझेच इच्छामरण
सहानुभुतीच्या कोडात

मी स्वावलंबी होण्याइतका
पांगळा आजार
तुझ्या देहात
पसरणारया वाळवीसारखा

मी बाळगुन राहिले बांडगुळ
उपकाराच्या चंदनाचे



----कविता 

स्वप्नांचा माहुत

स्वप्नांचा माहुत



कोणत्यातरी दुर 
अंधार अरण्यात
स्वप्नांचा माहुत
शोधतो आहे
आभाळाचे डोळे

ज्याच्या तळहातावर
पुसटसे ओठ टेकत आहेत
अंदाजाची
बदलणारी कुस

अनोळखी भासाचे स्पर्शतंतु
विणत आहेत त्याच्याभोवती
शुभ्र कागदी देह
आकाश नसणारया मेघासारखा

सावलीच्या पाठीवर
माहुत काढतो आहे
उन्हाची अबीर नक्षी

त्या नक्षीचा देखणा पक्षी
क्षणांच्या दिशापलीकडे
शोधतो आहे
चाहुलीचे घरटे
सावळ्या निळ्या अरण्यात
जिथे हरवला आहे
स्वप्नांचा माहुत



-----कविता 

पन्नाशी गाठलेल्या आईला

पन्नाशी गाठलेल्या आईला


पन्नाशी गाठलेल्या आईला
हळुहळु जमु लागले आहे
डोळ्यांत पाणी न आणता
तिच्या माहेरहुन येणे
उरलेल्या भाताचे 
अंदाज चुकले म्हणुन
न हळहळता
त्याला फोडणी देणे
हळुहळु जमु लागले आहे
पन्नाशी गाठलेल्या आईला

आता आई सांगत नाही गोष्ट
माझ्या आधी जन्मलेल्या मुलीची
तिला आठवतही नाही
तिचे ते अदमुर बाळंतपण
तरी फुटू लागतो पान्हा
आठवू लागतात तिला
दोन वेण्या घातलेल्या दोन मुली
परकराच्या ओच्यात
बकुळ गोळा करणाऱ्या
आता आई सांगत नाही गोष्ट
माझ्या आधी जन्मलेल्या मुलीची

आताशा आई चिडत रागवत
ओरडत नाही कुणावरच
दिसतात तिला घरभर
अस्ताव्यस्त पसारे
सुरुकुतलेले कंटाळलेले निजलेले
अनुक्रमे पंचावन पंचवीस वीस वयाचे
आवरत नाही आई कोणताच पसारा
कुलूपबंद करते
शिस्त तक्रारी काळजी जबाबदारी
ठेवते किल्ली जागेवर
तिघांनाही सापडावी अश्या जागेवर
आताशा आई चिडत रागवत
ओरडत नाही कुणावरच



-----कविता 

अख्ख आयुष्य

आपण एकमेकांना
हवेहवेसे आहोत की नकोसे
पुरते तुला मला ठाऊक नाही

तरीही मोजुयात स्वप्न
चार पावलानी क्षितीज
आणखीन दूर

काचा कवड्यांचा खेळ मांडु
तुझे आठ माझे दहा
तु घरात मी तुरुंगात

अंदाजाची पालवी झुलवु
ज्यातुन दिसेल आकाश
सर्वसाक्षी असणारे
तोलुयात तराजु
होईल न्यायनिवाडा

ठेऊ चंद्रावर पाऊल
जरा ठेँगणे जरा उंच
एकच दिसेल तिथुन देश
तुझा माझा

विसरुन जाऊ क्षणापुरते
वहीतले नियतीचे उन्ह
लिहु समांतर सावली रेघा

युध्द करुन जिँकुन घे मला
किँवा तु तरी ठेव तुझा पण
तरीही नाही मिळत उत्तर

बर चल
समजुन घ्यायला अख्ख आयुष्य आहे



-----कविता 

आत्महत्येच्या मुळाशी

आत्महत्येच्या मुळाशी



आत्महत्येच्या मुळाशी

वाजत असतील
कोणत्या वाद्याचे पडघम ?
की थैमानत असेल
सावल्यांचे तांडव न्रुत्य

कुणी म्हटल्याचे ऐकले
आहे का ?
क्षितीजाच्या दरीत
आकाशाने जीव गमावल्याचे
तेच शोधायचे आहे
इथल्या वाळवंटाला

म्हणुन चालला आहे
हा शोध
अस्तित्वाच्या पाण्यावर चालणारा
असिध्दप्राप्त
तुम्ही नशीब प्रारब्ध भोग
असे काही म्हणा याला
नावाच्या सोयीखातर
किँवा करा चर्चा
मरणाच्या भिन्न अभिन्न काळोखाची

मला मात्र व्हायचे आहे कलाकार
आत्महत्येच्या मुळाशी


---कविता 

शब्दहोलिक

शब्दहोलिक 



शब्दापुरती मी 
शब्दहोलिक 
ही नशा 
देह नसणारया 
जाणीवेपर्यँत 
झरोक्यातुन 
येणारया 
सावलीसारखी 

आत्म्याचे उन्ह 
अखंड 
न दुभंगलेले 
निद्रेच्या स्वप्नात 
न संपणारया 
नशेपर्यँत 
फक्त 
शब्दापुरती मी 
शब्दहोलिक 

मी 

मी 
कविता 
अस्वस्थतेची 

---कविता

पाठवल्यानंतर


पाठवल्यानंतर


तुला लिहलेली कविता
तुला पाठवली नाही
तेव्हा दिसु लागलास
तु त्या कवितेत
उदास तिन्हीसांजेसारखा

म्हणुन
तुझ्या कपाळावर
टेकणारया ओठासारखी
पाठवली तुला कविता

आणि मांडीवर घेतली
तुझी तळमळ
जोजवु लागले तिला
त्याच विचारात
समजेल का तुला कविता

त्याआधीच तू
लिहलेस तुझे ओठ
माझ्या तळहातावर

तिन्हीसांज होऊन
पाठ फिरवली
मी माझ्या कवितेकडे
तुला लिहलेली कविता
तुला पाठवल्यानंतर


----कविता

सीमारेषा

सीमारेषा 


या नर्व्हसनेसला नव्हता

कोणता आकार ऊकार रुकार हुंकार
तेव्हा भरुन रहायचो तो
काळपट जांभळ्या मेघात

तुला भेटल्यापासुन
मनामनात विरघळला आहे
हा नर्व्हसनेसचा पाऊस
भिजला आहे माझ्यात
नखशिखांत

आणि म्हणुनच
खोल दुष्काळाइतकीच 

झिरपते आहे
माझ्यात अद्रुश्य शांतता
जिला नाही ठाऊक
नात्याच्या अंदाजाची 
स्तब्ध सीमारेषा
तुझ्या आणि माझ्यातली


-----कविता 

इथे नको

तसे जास्त बोलायला नको
पाहिजेतर एकमेकांच्या हातावर 
टेकवु एकमेकांचे ओठ

तसे जास्त अंधारायला नको 
या उजेडात
दरवाजे लावुन 
आवळुयात फारतर 
गळफासाचे दोर

डाव्या उजव्या कुशीवर होऊन
बदलुयात एकमेकांची स्वप्न
प्रेम करायला अडवलय कोणी ?
फक्त तसे जास्त नको
इथे नको

----कविता