Pages

Wednesday, 19 November 2014

तात्पर्य हरवलेली गोष्ट

तात्पर्य हरवलेली गोष्ट 





गोष्ट आहे खूप खूप वर्षापुर्वीची किंवा खूप वर्षानंतरची ,खरेतर गोष्टीतला काळ महत्वाचा नाहीच . आशय म्हणाल तर भाबडा आहे म्हणाल तर गहन . गोष्टीतल्या काळाची गरज नाही कारण गोष्टीतल्या प्रमुख पात्रांना ,उपप्रमुख पात्रांना काळ हा अखंड भासतो आहे ,आरंभ अंत मध्य काहीच न सापडलेल्या एखाद्या सुंदर किंवा असुंदर कवितेसारखा . त्यामुळे गोष्टीतल्या पात्रांना ,आता गोष्ट म्हणून त्यांना पात्रे म्हणाले आहे . ती केवळ पात्रे नसून माणसे आहेत . तर अश्या जगण्यातून काळ हरवलेल्या माणसांची गोष्ट . जे बंधन किंवा भरतवाक्य मनावर गोंदवून कथाकार गोष्टीकार गोष्ट सांगतो तेच मी सांगते आहे आणि गोष्टीला सुरुवात करते . तर गोष्टीतील पात्र संवाद स्थळ घटना काल्पनिक आहेत आजूबाजूला कुठे आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा . पण गोष्ट मात्र विसरून जाऊ नये . 

एका अदृशाच्या दोरीवर वाळत पडलेली बिनदेहाची माणसे . नाव गाव यांचा आदिम शोध न लागलेली किंवा इच्छा असूनही शोध लावता न आलेली माणसे दोरीवर वाळत पडलेली असत . कुकरची शिट्टी ,कारखान्याचा भोंगा ,मोबाईलवरचे अलार्म क्लॉक अश्या लयबद्ध गोष्टीनी लय पकडली की दोरीवरची बिनदेहाची माणसे वारा आल्यासारखी उडून जात . स्वतःचे पाय असणारी घरे काहीजण त्यांना मोटार रेल्वे बस अस आपापल्या सोयीने काहीही म्हणत अश्या घरामधून ही माणसे बसल्याजागी उडून जात . पुन्हा दुसऱ्या एका अदृशाच्या दोरीवर वाळत पडत . एक स्थिती कायम राहत नाही असा वैश्विक नियम तेथे अजून जन्माला आला नव्हता किंवा तो नियमच आता काळबाह्य झाला होता . अश्याने जगण्यातले नाट्य देखील हरवले होते .तसे कुणाच्या जन्माचे कुणाच्या मरणाचे कुणी कुणाला तरी भेटल्याचे इवेन्ट साजरे होई तरीही जगण्यात नाट्य नव्हते  . या माणसांच्या बिनदेहातून मनही अदृश्य झालेले असावे . जगण्यात विश्वाचे आदितत्व गवसल्यासारखे "गरजा गरजा " हा एकमेव उच्चार आणि त्याचा जयघोष करत ही ,माणसे जगत होती . कुणाच्याही गरजा कुणावर अवलंबून न राहिल्याने "पराधीन आहे जगती " असे कुणी कुणाला म्हणत नसे . आता हेच पहा ना सिंड्रेलाचे बूट तिथे कधीही हरवत नसत . हरवले तरी सिंड्रेला ते शोधण्यात तिचे मन उर्जा वेळ दवडत नसे . नवीन बूट विकत घेई . कारण तिला ठाऊक होते . हरवलेल्या बुटाचे पाय शोधत राजपुत्राचे दूत येणार नाहीत . राजपुत्राला तोपर्येंत दुसरी सिंड्रेला भेटलेली असेल ,तिचेच हरवलेले बूट आपण खरेदी करत असू . या माणसांना क्षितीज सापडले होते किंवा अंतराळ कारण एकावर एक चढलेल्या अजगराच्या सुस्तपणा सारखे रस्त्यांचे ओव्हरब्रीज यांच्या परिचयाचे होते त्यामुळे आकाश कशाला म्हणावे आणि जमीन कुणाला म्हणावे यांचा गोंधळ तुम्हाला आम्हाला वाटत असला तरी त्या माणसांना जाणवत नव्हता . 

गोष्टी कथांमध्ये कसा सुखी राज्यात दबल्या पावलाने एखादा राक्षस येतो आणि परीला घेऊन जातो एखादा साधा भाबडा तरुण या परीला मुक्त करतो . अगदी तसेच या शहरात झाले . अज्ञाताची भेटवस्तू घेऊन कुणीतरी अज्ञात आला . त्याच्या वस्तूचे नाव वांग भोपळा घड्याळ मूर्ती असे काहीही असले तरी एक शहर उद्धवस्त करणारी घटना त्यावर लिहिली होती . वीजेवर चालणाऱ्या रेल्वेमध्ये तो घुसला . कधीही खंडित न होणारी वीज आज अचानक निघून गेली रेल्वे थांबली रेल्वेतून माणसे उतरली दुसऱ्या रेल्वेचा शोध घेण्यास निघाली अचानक घडत गेलेल्या बदलामुळे तो अज्ञात गडबडून गेला पुढचे काही क्षणातच तो आणि रेल्वे जमिनीखाली गुडूप झाले .विवर भूकंप किंवा अन्य काहीतरी भौगोलिक घटनेंत याला म्हंटले असू शकेल . त्याने उद्धवस्त करण्यासाठी आणलेल्या वस्तूचे काय झाले त्याचे काय झाले कोणाला ठाऊक नाही . दुसरेदिवशी सगळीकडे चर्चा मांडल्या जाऊ लागल्या प्रलय विश्वाचा शेवट जवळ आला आहे का वगैरे वगैरे . काळ आणि मन हरवलेल्या माणसांमध्ये काळ मन परत आला होता की नाही कोणास ठाऊक पण ही गोष्ट इथपर्येंतच याचे तात्पर्य शोधण्याची मुभा गोष्टीकाराने ऐकणार्यांना दिली आहे .


------कविता मोकाशी 

कवी आणि संन्यासी

कवी आणि संन्यासी 





कवीचा जन्म कुणाचे मागणे असू शकणार नाही .त्याचा जन्म त्या सुखी जोडप्याच्या संसाराला आशीर्वाद म्हणून लाभलेला होता .ज्या वंशात कवी जन्मला त्या कुळात काव्य निषिद्ध मानले जाई . या वैरभावाला परस्पर सुयोग्य किंवा अयोग्य कारणही होते . त्या वंशाचा मुळपुरुष मोठ्ठा लढवय्या सेनापती ,त्याच्या युद्ध कसबावर राजाची भारी मर्जी ,या मर्जीपायीच त्याने एका प्रतिभावंत कवीला राजबंदी करून नजरकैदेत ठेवले आणि स्वतःचा जीव गमावला .शत्रूदेशातील प्रगल्भ कवीने राजाच्या स्वार्थपरायणावर दीर्घ काव्य लिहिले होते . हातात कधी चिपळ्या कधी डफ घेऊन कवी दारोदार काव्य गात भिक्षा मागत असे .कवीची कीर्ती दूरवर पसरली .राजाने स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी कवीला बोलावणे धाडले .राजा हुशार साम दाम दंड भेद साऱ्या नीतीकला त्यास अवगत होत्या . राजाने प्रस्ताव मांडला माझ्यावर लिहिलेले काव्य जाळून टाक माझा स्तुतीगौरव करणारे काव्य लिही मी तुला धनाढय करेन तुला भिक्षा मागावी लागणार नाही . कवीने त्यास उत्तर दिले 'तुझ्या धनाच्या भिक्षेपेक्षाही मला अन्नाची भीक प्रिय आहे ,मला ठावूक आहे तू माझ्या उत्तराने मला बंदी करशील पण तुझे राज्य कैद करण्याची ताकद माझ्या काव्यात आहे ,बंदी झालाच तर तुझा तुरुंग होईल पण मी तुझे स्तुतीगौरव करणारे काव्य लिहिणार नाही . 

घटनेचा क्रम कवीला सेनापतीला राजाला किंवा अन्य कुणालाही बदलता आला असता तर भविष्याचे चित्र वेगळे दिसले असते . पण पाण्यात पडलेले निर्जीव चेहरे झाडावरून ओघळणाऱ्या पानांनाही बांधता येत नाहीत . जे घटीत होते ते घडले कवी बंदी झाला सेनापतीने त्याला नजरकैदेत ठेवले . कवी त्याचे काव्य गात राहत असे त्याची शिक्षा त्याच्या पाठीवर चाबकाचे वळ उठवीत असत . अंधाराच्या खोलीत उजळून निघणारे त्याचे अनाथ पोरके शब्द तिच्यातल्या प्रेमाला हाकारत आहेत असे तिला वाटे . सेनापतीची शूर कन्या कवीवर पाळत ठेवण्याच्या आज्ञेला बांधील होती . न्याय वगळता तिला जगात कुणीही प्रिय नव्हते . कवीच्या जीवघेण्या सुरांनी तिचा छळ मांडला होता . याच छळातून सुदैवी कपट जन्माला आले . त्या दिवशी कवीच्या आर्त सुरांनी त्याला कुठल्या प्राचीन काळात ओढून घेतले होते त्याच गर्तात शूरकन्या बुडाली . कवीच्या पायाशी लोभ मिठी घालून रडू लागली . तिने तलवारीच्या धारधार पातीवरून अंगठा फिरवला आणि रक्ताचा टिळा कवीच्या मस्तकास लावला 'तुझी सुटका करेन ". तदनंतर कवीला सोडवून शूरकन्या निघाली कवीच्या पाठीत बाणाचे पूर लोटले शूर कन्येच्या छातीवर नाचरे तलवारीचे वादळ .सेनापतीचा घोडा मरून पडला सेनापतीचे धड कवीच्या तलवारीने शिरावेगळे झाले . ते शीर कवीला उद्देशून बोलत होते "तूझ्या काव्याने तू राज्य कैद करणार होतास पण तलवारीने माझे धड कापलेस ? हा कुठला न्याय ? मी तुझ्या शब्दांचा धनी नसलो तरीही गुलाम होतो . मरणोन्मुख माणूस खरा बोलतो हा कवीचा समज होता . कवीने त्याचे शीर धड एकत्र जोडले आणि कविता गाऊ लागला कवीच्या डोळ्यातले निर्मळ पाणी सेनापतीच्या डोळ्यात पडले . कवीच्या संजीवन शब्दांची राख सेनापतीच्या पुनर्जन्माचे अग्नीकण साधत राहिली . सेनापती जिवंत झाला तो आता कवीला ठार मारणार एवढ्यात शूर कन्येने या युद्ध यज्ञात उडी घेतली शूर कन्या सती गेली त्याचक्षणी सेनापतीही पुन्हा ठार झाला . कवी जोहार करून मरून गेला . 

या पूर्वजन्मीच्या कथा त्याला जो तो ऐकवत असे म्हणून त्या कुळात काव्य निषिद्ध झाले होते . पण चंद्र बिलवर हृदय कडांना या सत्याचे कितीही लेप उगाळले तरी तो कवीच राहिला . घराण्याच्या पूर्ववंशाची गोष्ट तो उकलुन नुकलुन सांगत असे . तो पूर्वजांची गोष्ट प्रत्येकाला समजावून सांगतसे "कवीचे काव्य हे ज्ञानाचे प्रतीक आहे ,सेनापतीचे शौर्य हे कार्याचे तर शूर कन्या हे प्रीतीचे प्रतिक आहे जगण्याच्या या तीन पदरात एक पदर असून अदृश्य राहतो या अदृश्याच्या ध्यासापायीच माणसाला जगणे गवसत जाते हरवत जाते . मी तर मुळातच करुणेने भारलेला आहे . करुणादेवीच्या निद्रेत असताना एक अश्रू ओघळला त्याचा बालक झाला तोच रांगता जन्माला मी आलो .नदीकिनारी एका निपुत्रिक जोडप्याला मी सापडलो आहे .तुम्ही ज्या वंशाची गोष्ट सांगत आहात त्याचाच मी आदिपुरुष आहे माझ्या जन्मा नंतरचे अनेक जन्म मला स्मरत आहेत म्हणूनच मी उमजलेली गोष्ट पुन्हा सांगतो आहे . ज्ञान कर्म भक्ती या तीनही अवस्थापलीकडे असणारे संन्यस्थ क्षितीज मला बोलावते आहे . राजा केवळ सत्ताधीश मी आहे विश्वनियंता म्हणून मला सर्वस्व देणारे स्त्री हृदय तिच्या मधुर भक्तीने मला बोलावते आहे . कवीचे दीर्घ काव्य मला ऐकू येते आहे . इतके बोलून त्याने पूर्ववंश जन्म उलगडणाऱ्या स्वतः रचलेल्या काव्याची सांगता केली आणि तो  वनाकडे चालता झाला . निर्मनुष्य तळ्याजवळ तो पाणी पिऊ लागला . या हालचाली श्वापदाच्या समजून मृगयेसाठी आलेल्या राजाने त्यास बाणाने घायाळ केले तो कवी संन्यासी पूर्वजन्मीचा सेनापती मरून पडला . आपल्याच शवाकडे त्याने करुणेने पाहिले आणि पुन्हा जन्माच्या काळ प्रतीक्षेत राहिला 



--------कविता मोकाशी  

पहिले दुसरे आणि सावत्र

पहिले दुसरे आणि सावत्र 




राजाला होत्या दोन राण्या 
पहिली झाली नावडती 
दुसरी आवडती झाल्यापासून 
पहिली रहायची डोंगरावर 
दुसरी रहायची पायथ्याशी 
पहिलीच्या सावलीस नव्हते उन 
दुसरीच्या उन्हास नव्हती सावली 
पहिलेने वाचवले राजाचे प्राण 
दुसरीने दिले राजास प्राण 
पहिली ऐकवायची कथा 
दुसरी व्हायची स्वतः कथा 
दोघी होत्या राजाच्या राण्या 



दुसरीची व्यथा पाहिलीस 
कळणारी नव्हती 
तरीही दुसरी एकटीच 
पहिली नेहमी पहिलीच 
समुद्र मात्र भोगत रहायचा 
प्रत्येक लाटेचे सावत्रपण 



एक होते धड त्याला होती 
दोन शिरे दोन मन 
दुसरे होते शीर त्याला होते 
दोन धड दोन शरीरे 



सख्ख चुलत सावत्र 
कुणीच नाही तिचे जगात 
तिचा होता एक उगम 
तिचे होते दोन शेवट 
सगळ्या जगासाठी 
ती सावत्र ती पवित्र 
तिच्यासाठी सगळे जग 
सावत्र आणि पवित्र 
ती नदी सनातन 



एका योग्याच्या तपातून 
जन्माला आले ज्ञान 
सांसारिकाच्या मुक्तीसाठी 

दुसऱ्या योग्याच्या शापातून 
जन्माला आले कर्म 
सांसारीकांच्या बद्धतेसाठी 

मुक्त आणि बद्धतेच्या 
चक्रात अडकलेल्या 
सांसारिकाच्या प्रवासातून 
जन्माला आला पुन्हा योगी 

तो असेल पहिल्यासारखा 
की दुसऱ्यासारखा 
उत्तर ठाऊक नाही 
मायेचे सांसारिक सांभाळत आहे 
त्याचे नवजात ब्रम्ह अर्भक 
सावत्र मनाने आपले होऊन 



भरले आभाळाचे शब्द मळवट 
नेसली क्षितिजाचा अस्मानी शालू 
जरतारी भाव भक्ती भावनेचा 
बुडविले कुंकवाक्षरात बोटे 
ल्याली सावत्रपणाचा वसा 
बुडविले तिने तिचे महाकाव्य 
महासागराच्या काव्यात 

तिचे पहिले काव्य ती स्वतः 
दुसरे काव्य तिचा महासागर 



------कविता 

अभाव

अभाव 

देहाची उष्टी मात्रा 
तुझ्या माझ्या मनभर 
दिवा उजळतो अंधारात  
पितळेमध्ये भरीस भर 

तुझे दे दृढ आलिंगन
तुझा ठेव दृढ दृष्टीभाव 
पाठीस माझ्या ना डोळे 
विश्वकणाचा अभाव 


----कविता 

जनाबाई होऊन

जनाबाई होऊन 


चांदण्याच्या शतपावलीत सुरुकुतलेली म्हातारी 
वाट पाहते तिच्या शुभ्र मरण बंगल्याची 
हक्काचे जन्माचे घर कधीचे मागे पडलेले 

द्वैतावर विश्वास असलेली उभी तरुणी तेथेच 
जीवशिव मीलनाची वाट पहात हाती धरून माला 
राजपुत्र घेऊन जाईल राजवाडा किंवा झोपडीमध्ये 

वस्तीगृहा बाहेरच्या अरुंद ट्रेडमील पट्यावर 
तरुणी आणि म्हातारी धावत राहतात दोघीही 
घर अजून येत नाही सापडत नाही दोघींना पत्ता 

तरुणीचे सौंदर्य स्वप्न म्हातारीचे कुरूप मरण 
दोघींचे ध्यासपर्व जाणणारा तो आदिम 'एकटा'
दळत असतो दळण जनाबाईकडे जनाबाई होऊन 




------कविता

शववाहिका

शववाहिका 

माणसे नसलेल्या शहरातून फिरते आहे शववाहिका 
अमाणसांच्या पुंजक्यातला तुटलेला एक माणूस 
चालवत आहे मेलेल्या माणसांची निळी शववाहिका 
चालक त्यांना घेऊन चालला आहे स्मशान तुरुंगात 
दोघांमध्ये तुरुंगाचे उभे गज कोण आत ?कोण बाहेर 
चालकाच्या निर्जीव प्रेतावर रडताहेत माणसांची भुते 
चांगला दांडगा माणूस होता मोठा प्रतिभावंत कवी होता 
तात्पर्य कवीने माणसांचा अमाणसांचा संग्रह करू नये 
कवी मरण्याआधीच अथवा मारण्याआधीच मेलेला बरा 

-----कविता

प्रार्थना

प्रार्थना 


नित्य आनंदाच्या ओवरीत 
बैसोनी वाचली तुझी कथा 
जीवन ध्येय झणी बुडाले 
मी झाले तुझी अम्रूतगाथा 

विकल्प गेलासे ब्रम्हवेळी
विलय झालीसे कल्पना
अलय अंकुरते गोंडस
स्वप्नी माझ्या प्रार्थना



-----कविता 

प्रलय

प्रलय


बंद पडलेल्या घडाळ्याची प्रेते 
दिवस रात्र तिच्या स्वप्नात 

तिच्या स्वप्नात 
तिचे मिटलेले डोळे
बंद घड्याळास बांधलेले 

तिच्या स्वप्नांचे घड्याळ 
तिच्या प्रेताच्या डोळ्यात 

या प्रलयानंतर --
तिच्या डोळ्यात तरऴु दे अश्रु 
ऐकु येऊ दे घड्याळाचे स्पंदन

लयीत ओघळू दे 
विश्वाच्या पानावर 
काळाचे दवबिंदू 

कारण तिच्या प्रेताला 
जाळणारे पुरणारे
स्मशानही उरले नाही
या अ-काळाच्या ओघात 



----कविता

अणूगगन

अणूगगन




नखावरती लागले मधाचे मोहोळ 
चिंचेच्या पानावर बसतात पंगती 

सुईच्या अग्रावर ब्रम्हाचे घरटे 
नेढ्यातून आरपार विष्णु पक्षी

गवताच्या वाड्यात आश्रित हरिण
दिंडी दरवाज्यातुन येतसे हत्ती

अणुगगनाचे गुंतले एकमेकात पाश
पहुडला अज्ञाताचा गर्भ दर्भावरती


------कविता

विदेह कविता

विदेह कविता 


माझ्या जीवाची
विदेह झालेली कविता
तुझ्या सदेहपणात दंग

दुष्यंत राजाप्रमाणे
तुला अनेक जन्मांचे
विस्मरण

जेवता जेवता
ठसका लागला
अश्रुचे भरून आले कढ
तरी कोण काढेल 
माझी आठवण ?

तू मात्र शोधत असशील
मृगयेनंतर तहानून
एखादा पाणवठा

कारण मी बांधला आहे
तुझ्या स्मृतींचा तलाव
माझ्या जीवाच्या
कवितेने

-----कविता

एकटेपण

एकटेपण 


एकटेपण 
तुझ्या माझ्यात 
भिंतीसारखे 
उभे 

तुझ्या घराला नाही शेजार 
माझ्या घरी नाही अंगण 



----कविता 

Thursday, 6 November 2014

तीन कथा

तीन कथा 



आज समुद्राला ऐकवण्यासाठी त्याने तीन कथा आणल्या होत्या ,पहिला कथेतला नायक हा झपाटलेल्या घराचे भूत होता त्याच्या अपूर्ण इच्छानी मरणानंतरही ते घर सोडले नव्हते . दुसऱ्या कथेतला नायक अज्ञात मुलीवर प्रेम करत होता पण त्याला प्रेम व्यक्त करणे जमले नव्हते . तिसरी कथा समुद्राला वाचून दाखवण्याआधी त्याला आदलेदिवशी रात्री कथा लिहिताना संपवलेली सिगारेटची आठवण झाली त्याने सिगारेट हवेत धुरकावली ,तशी समुद्राची एक प्रचंड मोठी लाट त्याच्याजवळ आली . त्याच्या कथांचे काही कागद किनारयाशी राहिले तो समुद्रात बुडाला . गावात अफवा उठली त्या अज्ञात मुलीवर झपाटलेल्या घरातील भुताचे प्रेम होते त्याने लेखकाचा जीव घेतला . तिसरी कथा कुणी ऐकलीच नव्हती . तिसऱ्या कथेतला नायकलेखक  होता त्याने समुद्राला ऐकवण्यासाठी तीन कथा आणल्या होत्या 


------कविता मोकाशी 

दान


दान


शुभ्रभोर मोकळ्या जटा
सुरकुतलेले बर्फाळ शरीर
हातात अग्नीकणाची मशाल
तुझ्या याचकाला दान दे
बर्फाळ शरीर अथवा
अग्नीकणाची मशाल
तू मला दान दिलेस
सात पावलांची जमीन

चढणमाथा चढून यायचे
सांगायचे अंतरीची दुःखे
इवले इवले दिवे तेवायचे
दुःखाला आकार आला
तू अवतरलास पुढ्यात
मागितले दान माझ्याकडे
अस्तित्व अथवा दुःख
मी तुला दान केला
पावलाखालचा अंधार



-----कविता

मोहिनी

मोहिनी 



शिकारी पसरतो शब्द जाळ 
पारावर चालल्या गप्पागोष्टी 
जणू भिंतीवरती घरे बांधतो 
कुटुंबवत्सल निळा कोष्टी 

हातात हात पिटती टाळ्या 
संवादांचे नादते जुने चौंडके 
नवा ध्यास आदिमते तुझा 
काळ विसरला त्याचे घोंगडे 

चहासुवास नकळे अनादिपण 
कवितेचा पारवा करे घुमराव 
वाह वाहचा चालला जयघोष 
सख्य परस्परांचे करे उठाव 

परकर ओच्यात वेचते फुले 
परी रिते नाही झाले अंगण 
सांडला अमृतकलश ग कसा 
गुज अलगुज चांदीचे जे उन 

डोहात पाय पसरुनी बसले 
एकेक जीव झालासे वल्ली 
मोहिनी म्हण वा संजीवनी 
सापडेना कुणा कुलूप किल्ली 



------कविता

आकाश दुध

आकाश दुध 


देहाचा पुल ओलांडून येणारे
तुझे कोवळ्या टाचांचे पाय
मन माझे मातीमय कनवाळू
आकाश दुधावर येतसे साय

----कविता 

मधुप्रिया

प्रिय मधुप्रिया

अस म्हणतात --
माणूस जन्माला आल्यानंतर 
त्याची काही दिवसानंतर 
सतत वाढ होत राहते 
पण त्याचे डोळे जन्मभर 
तसेच राहतात मरेपर्यंत

तुझ्या बाहूलीसारख्या 
पाणीदार डोळ्यातील 
असीम शांतता अनुभवली
की मला नेहमी वाटते
तुझ्या भातुकलीच्या वयातच 
तू दिली आहेस जीवाची हाक
तुझ्या समंजस पोक्त मनाला

शांतता स्वप्न कल्पनांना जन्म देते 
या संवेदनाच्या जन्मवेणा 
तुला उमजल्या आहेत 
तू ऋतुस्नात होण्याआधीच

कारण --
तुझ्या डोळ्याच्या तळ्यात 
दीप नाही चांदणे नाही 
तरंग नाही आभास नाही
आहे केवळ निरस प्रेम 
पाण्याच्या रंगाचे

तुझ्या प्रेमाने निवडलेले 
तुझे अर्थपुर्ण जगणे 
वाट पाहत राहतात 
त्याच्या डोळ्याची 
भातुकलीच्या खेळातच 
तू ज्याला मानले आहेस
जिवलग

मानलेल्या नात्याचे जपलेपण 
किती शाहणे उदासीन करते तुला

तो तळ्याजवळील तरूण कवडसा 
तुझा बालपणीचा सोनेरी मासा
शोधत येईल --
तुझे शांत करूण डोळे

तुझ्या डोळ्यांनी शिकवले मला 
प्रेम आंधळे नसते 
भाबडे असते 
भातुकलीच्या वयाचे

तुझी कविता

मृत्यूची प्रेयसी

मृत्यूची प्रेयसी 


अनवाणी पावलाने अनावृत देहाने 
चालत येते आणि चालत जाते 
मृत्यूची प्रेयसी मृत्यूला शोधण्यास्तव 

तिच्या प्रियकराने तिला दिली आहे भेट 
दोघांच्या दृढ अलिंगनाचे झाड  
ते वचनस्थ झाड मोठे उंचपुरे होईल 
तेव्हा त्याच झाडाखाली भेटणार आहे  
तिला तिचा 'मृत्यू' प्रियकर 

सखी उसवत राहते काजळाच्या डबीतले 
अश्रू ओघळणारे काचमण्याचे प्रेम 
सखा निघून गेला आहे निर्मनुष्य देशात 
संन्यासाचा वेश धारण करून 



तिच्या प्रियकर आहे भोळा 
त्याला चढला आहे विस्मृतीचा ज्वर 
या ज्वराने तो फणफणला आहे 
त्याला पाहिजे आहे भाळावर हात 
त्याच्या भयभीत प्रेयसीचा 

विसरला आहे नाव गाव तिचे 
खुणगाठीशी नाही त्याच्या 
शंकुतलेसारखी एखादी अंगठी 
अश्वत्थाम्यासारखी खोप 

उपरे झाले आहे त्याचे अस्तित्वं 
धूळभरल्या घरात निळ्या मनात  
त्याला पाहिजे आहे वारा फुंकर 
प्राण प्राणाला ओढणारा 
प्रेयसीचे चुंबन 


त्याला सापडला आहे विवस्त्र देह 
तो नाही त्याच्या प्रेयसीचा 
पण जळतो आहे त्याच्यासवे 
जगण उडून गेलेले अत्तर 
त्याच्या मनगटावर 
त्या विवस्त्र देहाचे 
आणि देवापुढे शांत कापूर 


आलिंगनाचे वचनस्थ झाड 
वाढलेच नाही प्रेयसीजवळ 
झाडावर पक्षी आला उडून गेला 
झाडाला गाणे सापडले 
पक्ष्याला त्याचे प्रेम 
झाड गात राहिले पक्ष्याचे गाणे 
झाड जळून गेले पक्षी जळून गेला 
झाड वाढलेच नाही प्रेयसीजवळ 

अनवाणी पावलाने अनावृत देहाने 
चालत येते आणि चालत जाते 
मृत्यूची प्रेयसी मृत्यूला शोधण्यास्तव 




-------कविता 


चांगले आणि वाईट

चांगले आणि वाईट 




मला फार पूर्वी वाटायचे या जगात दोनच गोष्टी आहेत एक तू आणि मी ,हळूहळू उमजू लागले या दोन गोष्टी व्यतिरिक्त आणखीन दोन गोष्टी आहेत जसे की पाप पुण्य ,उजेड अंधार ,एक शून्य ,ज्ञान अज्ञान ,ब्रम्ह माया ,फुल दगड ,नर मादी ,असे अनेक आहेत . मला वाटायचे या जगात दोनच प्रकारची माणसे आहेत चांगली आणि वाईट . पण परवाच कुणी म्हणाले जगात दोनच प्रकारची माणसे आहेत चांगली आणि अधिक चांगली . हे वाक्य म्हणताना काळाचा गारुडी नक्कीच त्याच्यासमोर पुंगी वाजवत असेल आणि तो त्या चांगुलपणाच्या लयीवर डोलत असणार . त्याचे म्हणणे तितकेसे खोटे नाही आणि खरेही नाही . त्या दोन्हीच्या मध्ये आहे . 

रोज उगवणाऱ्या दिवसाची संपूर्ण आयुष्याशी सांगड घालणे मला नेहमी आवडते . म्हणजे पन्नाशी गाठलेल्या आईची निवांत दुपार साठीकडे आलेल्या बाबांची प्राचीन अश्या मुलातानीच्या सुरांची दुपार . माझी पंचविशीची उमर म्हणजे भर माथ्यावर आलेला सूर्य सावली देहाशी मृत्युशिवाय एकरूप होण्याचे तारुण्यात येणारे महत्वाचे ठिकाण . तर नुकत्याच रांगायला सुरुवात केलेल्या प्रणवची कोवळी पहाट त्याच्या कोवळ्या जावळासारखी नाजूक स्पर्श करणारी तर हे सारे सांगायचा उद्देश हा की .बाबांच्या साठीच्या चष्म्यातून त्यांना जाणवते घरभर पसरलेले दुपारचे उन . मग सगळे घरच दुपारचे होऊन जाते त्यांच्यासाठी ,मिडास राजाप्रमाणे ज्याला स्पर्श करतील ते दुपार होऊन जाते . या वेळेत भूतकाळातील माणसे आणि त्यांच्या सावल्या ये जा करत राहतात ती सुद्धा दुपार होवून जातात .  बाबांच्या साठीत सगळीच माणसे त्यांना चांगली दिसू लागतात . कित्येक क्षण त्यांच्यासमोर हात जोडून उभे असतात . तर काही क्षणाची त्यांनी प्रार्थना केलेली असते . माफ केलेले असते स्वतःला आणि कित्येक स्वतःला मग दिसू लागतात सगळीच चांगली माणसे . एकासारखी एक तरीही अनेक शिल्प साकारणाऱ्या शिल्पकाराप्रमाणे 

मला बाबांसारखी दृष्टी नाही पण मी जेव्हा जेव्हा तुझ्या प्रेमात पडत राहते . तितक्या अधिकवेळा तू आवडू लागतोस त्या क्षणी जे फुलपाखरू माझ्या मनामध्ये शिरते त्यालाही जग सगळे सुंदर दिसू लागते . सगळी माणसे चांगली वाटू लागतात . बोधकथेतले तात्पर्य सगळ्याच मनाला समजल्याप्रमाणे सगळी मन सुंदर दिसू लागतात . त्याच दिवशी नाही का हातात थाळी आणि थाळीत देव ठेवलेली एक झिपरी मुलगी तुझ्यामाझ्या भोवती फिरताना मी तिला हटकले तर तू तिला जवळचाच वडा पाव आणून दिलास तिच्या डोळ्यात पाणी होते आणि तुझ्या डोळ्यात हसू . तुझ हसू मी ओंजळीत पकडलं आणि ओंजळीतून पाहू लागले माझ्याचकडे सांग दर्पणा सांग या जगात सर्वात चांगले कोण ? उत्तर होते सर्व जगच . पण काही क्षणापूर्वी त्या मुलीला हटकून वागणारी मी अतिशय कुरूप वाईट वाटू लागले . मग मला पुन्हा तेच वाटत राहते या जगात दोनच प्रकारची माणसे चांगली आणि वाईट . माझे दुःख तुला उमजलेले असते की काय ठाऊक तू दाखवतोस असे क्षितीज जे सुरुवात की शेवट कळत नाही . फार पूर्वी वाटणारी गोष्ट मला पुन्हा वाटू लागते या जगात गोष्टी दोनच एक तू आणि मी 



--------कविता मोकाशी  

फुल आणि प्रतिमा

फुल आणि प्रतिमा 


रस रूप गंध स्पर्श शब्द 
साकारत आहेत फुल 

फुलातून फुल 
देहातुन देह 
जन्म घेत आहेत 
आकाशामध्ये
अनंत फुलांचे देह

मला उमजत नाही 
आकाश देहपण 
देहाचे फुलपण 

मला नाहीत पंचके 
मी झाले आहे   
अ-प्रतीमेच्या 
भुमीमध्ये लुप्त
सीतेसारखी

रजक त्याच्या कल्पनेने 
साकारत राहिल 
विटंबलेले प्रतीमेचे फुल

------कविता 

फुलातीत

फुलातीत 


फुले झाडावर असतात 
तेव्हा झाड होतात 
देवाला वाहिली जातात 
तेव्हा देव होतात 

फुले निर्माल्य होतात 
धूळ होतात ,कचरा होतात 
कोण शिकवते फुलांना  
काळाच्या कल्पनेसोबत
फुलातीत होउन जाणे 

फुले आंधळी आहेत ?
की हजार डोळ्यांच्या 
इंद्राप्रमाणे भोगतात 
द्रुष्टीने ऐश्वर्य 


------कविता