Pages

Wednesday, 9 January 2013

तळ्याकाठी एक झोपडी


तळ्याकाठी एक झोपडी



तळ्याकाठी एक झोपडी
पिँजुन बैसे तिचे केस
मावळतीच्या सुर्य ढगावर
म्हातारीचा कापुस वेश

टेकविता गगनाने माथा
दिसते एक झाड वाकडे
म्हातारी ओरडुन सांगे
सरणाची ओली लाकडे

वाहते तळ्यात मौनगंगा
विस्कटते ना तरंग घडी
सुरकुतलेला देह अखंड
म्हातारी पोचते पैलथडी

वारयाने उडतो पाचोळा
परतती पाखरांचे थवे
म्हातारी अनाथ एकटी
तिला दुपार उन्ह सोसवे

ओल्या तांबुस वाळुमध्ये
शिँपला चांदण्याचा सडा
भुकेजल्या पोटांस तिच्या
दिसतो अर्धा भाकरतुकडा

दगडावर टाके उघडे अंग
वाळत पडे नदीचा घाट
म्हातारीला आले शैशव
शोधे अंधार नागवी वाट

आंबाच्या झाडावर रात्री
लटकली जातसे कोल्हेकुई
दबल्या पायी मांजर हुंदके
तिला जोजवे तिचीच अंगाई

शोधु लागली माकडे घरे
चालु लागले पहाड तिकडे
म्हातारीच्या हातात काठी
हुसकुन लावे सुर्यांचे कोँबडे

उसवते क्षितीजाची वीण
मोकळा होई आभाळ वारा
सोडुनी हळु कमरेची चंची
म्हातारी कोंबतसे तोबरा

आकाश जमवे एकेक फांदी
वरी तो सुर्याचा तप्त गोळा
म्हातारीच्या चुली सरपण
काट्याकुटे वाळळेला पाचोळा

कसा सरेल दिवस आजचा
विचारात राघु मैना जोडी
शिकारयाने ऐकली कुजबुज
म्हातारीचा एक डोळा फोडी

घायाळ वेडी म्हातारी शापली
पिसेल तुला आठवणींचे भुत
वेदना दुःख काही न उमजे
पिँजारशील तू तुझेच सुत

मरुन गेली म्हातारी तेथेच
सुटला भुतकाळाचा तिढा
वर्तमान हेच भविष्य आता
शिकारा झाला वेडा बावडा

----कविता

Monday, 7 January 2013

संकल्प



संकल्प 



घराच्या खिडक्या दारे
बंद करुन 
कडेकोट भिँती बांधेन
संपुर्ण घराला
आणि
छताला नवा दरवाजा 
बसवावा म्हणते

आले जर कोणी शत्रु
चाल वैगरे करुन
तर दरवाज्यातुन उडी टाकुन
आकाशमार्गाने 
जाणारा रस्ता शोधता येईल
त्यावेळी

आता रस्त्याने चालणेच नको
काचा इजा
दुखापती मलम
सांत्वन
पुन्हा तेच पाय घट्ट जमिनीत

कितीदा फिरणार 
तीच ती ऋतुचक्र
आणि तरीही स्वागत नववर्षाचे
कुठेतरी भेदलेच पाहिजे वर्तुळ
किँवा पुर्ण केली पाहिजे अर्धवर्तुळाची प्रदक्षिणा

आता भिती भुकंपाची नाही
जगबुडीची नाही
माझ्या वेदनेच्या 
साधनेचे वारुळ
उभा राहिल 
माझ्याभोवती
पोखरतील मुंग्या माझे शरीर
दंश करतील सर्प 
त्यांच्या विष मुखांनी
मी गाडले गेलेच तर
इतिहासाच्या उत्खननात
येईल माझे निःशेष झालेले नाव

पण
कुठेतरी असेलच एखादे 
असे अंतराळ
जिथे असेल सांकव
आकाश आणि मला जोडणारा
म्हणुनच
छताला बांधेन दरवाजे
हाच संकल्प 
नववर्षाच्या स्मरणांचा

-----कविता

रूप ,अरूप आणि कैवल्य


रूप ,अरूप आणि कैवल्य



आठवणी चार अक्षरी शब्द कुठेही ऐकला ,पाहिला कि पहिल्यांदा आठवते ते माझे आजोळ . दूर डोंगर वस्ती सोडून एका पठारावर छोट्याश्या तळ्याकाठी वसलेलं एक पिटुकले आणि धीटूकले खेडे . हे खेडे पिटुकले तर होतेच ,अंदाजे २०० घरांचे पण धीटूकले का म्हणाले याची गोष्ट पुढे ओघाने येतेच आहे . तर या गावाला वस्ती विशेष नव्हती तशीच तुरळक तुरळक झाडे अगदी माणसासारखी . पण माझ्या आजोळच्या परसूदारी मात्र खूप सारी बकुळ सोनटक्का जास्वंद स्वस्तिक कर्दळ गुलाब तगारी अशी फुलझाडे होती शिवाय जाईचा मांडव ,मोगऱ्याचा ताटवा देखील होता .या फुलांना देखण्या स्त्रियांना शोभावे तशी काही उंच झाडे होती ,नारळाचे जांभळाचे पेरूचे आवळ्याचे गोरख चिंचेचे . यापैकी जांभळाचे झाड आजोबांच्या वयाचे होते . आजोबा जन्माला आल्यावर त्यांच्या आईने ते झाड लावले असल्याची गोष्ट ते नेहमी सांगत . जांभूळ आवळा चिंच असली झाडे परसात अजिबात असू नयेत त्याने आमवाताचा त्रास वाढतो असे आजीचे बौद्धिक आजोबासोबत चालायचे पण या पैकी एकही झाड तोडायचे नाही अशा विजयी वाक्याने आजोबा आजीची वाक्ये परतवून लावायचे . ही सगळी झाडे म्हणजे माणसे असल्याचा ठाम विश्वास आजोबांना असायचा ते त्यांना पाठीराखे म्हणायचे  . आजीच्या या परसूत अजून दोन लळा लावणाऱ्या गोष्टी होत्या पहिली म्हणजे तुळस आणि दुसरी म्हणजे काळ्या डगल्याचा कोट घातलेली म्हैस . आजोबांचा जितका झाडावर जीव आजीचा तितका या म्हशीवर .तिची रोज न चुकता तिन्हीसांजेच्या आत आजी धार काढायची आणि ती पट्ठी देखील तशीच आज्जीशिवाय कोणाकडून धार काढून घेत नसे . या दोघींनी एकमेकींवर फार फार लळा लावला होता . एका वसुबारस सणाला मी आजोळी होते तेव्हा भल्या पहाटे आज्जीने तिला आरतीने ओवाळलेले आठवते . मी तेव्हा म्हणाले  होते अग आजी आज गायीला आणि वासराला ओवाळतात तू हिला का म्हणून ओवाळते . आजी म्हणाली असू दे गुणाची आहे माझी पोर ती . त्या म्हशीच्या मोठ्या डोळ्याकडे पाहून आजीने तिला मनभर कुरवाळले .तर हि झाली परसूदाराची कथा

.....परसूदारापुढे स्वैपाकघर त्याच्यावर जोथा माजघर मग सोपा तिथे कर कर आवाज करणारा लाकडी झोपाळा त्यापुढे पडवी आणि पुन्हा अंगण अशी भली घराची आगगाडी होती . या वाड्याच्या तटबंदीला मोठा बुरुज होता . तो शिवकालीन असल्याचे आजोबा सांगत त्यामुळे असे ते पिटुकले असणारे माझे आजोळ धीटूकले देखील होते . आणि आजोबांचा वाडा जुन्या बांधणीचा हाळ मातीचा होता .
या घरात लंपडाव खेळायला खूप मज्जा यायची . जिन्याखाली जोथ्याखाली वरच्या माडीत पडवीत एक ना अनेक ठिकाणे आम्ही सारे नातवंड मिळून इथे खेळायचो . दुपारच्यावेळी आजीच्या कापूसवेळा व्हायच्या ती तीच्या वाती फुलवाती करत करत आमच्या खेळात यायची मग बैठे खेळ सुरु व्हायचे काचाकवडी ,पगडीपट्ट , पत्ते ,आमचे पत्यातले खेळ आम्ही आजीला शिकवायचो आजी पगडीपट्ट कसा खेळायचा ते शिकवायची मग त्यातूनच शंकर पार्वती हा डाव खेळताना पार्वती हरते आणि रुसून जाते हि गोष्ट आख्यायिका आजी पुन्हा पुन्हा सांगायची . यावेळी आजोबा मात्र शेतातून आलेल्या शेंगाचे पोते सोडवून त्यातला शेंगा सोलत . त्यांनी सोललेल्या शेंगात खाण्यासाठी हात घातला कि आधी आजोबांचा मार खावा लागे मग हळूच पोत्यातल्या शेंगा काढून देत आणि म्हणत "हं आपल आपण सोलुन घ्या आणि खावा वाटेल तेवढ "

आजोळची पहाट घरापुढे असणाऱ्या सिद्धेश्वरच्या मंदिरातल्या आरतीच्या सुंदर कवनाने व्हायची . चढ्या आवाजातील सूर ब्रम्हावर ध्यानस्थ असणारा देवळातला औदुंबर वृक्ष त्याच्यावर येणाऱ्या सोनेरी किरणामुळे जटा असणाऱ्या एखाद्या हटयोगी वाटायचा . त्याच्या आजूबाजूला पडलेली उंबर रुद्राक्षासारखी वाटायची . मग आजोबा आणि आम्ही सारे नातवंडे मिळून या देवदर्शनाला दररोज पहाटे जायचो. मग तिथले एखादे वयस्कर जुने गृहस्थ  आमच्यापैकी एकाच नाक कान धरून चिंगीची लेक काय तू आणि हा पिंकीचा वाटत ....तुमची आई तुमच्यापेक्षा लहान होती तेव्हापासून यायची या मंदिरात अशा सुराचे काही धाकाचे अधिकाराचे संवाद व्हायचे . त्यापूर्वी पाणी भरणे हा एक रोजचा उद्योग तिथे करावा लागे . तांब्या पितळेच्या जड जड घागरी घेऊन अर्धा किलोमीटर जावे आणि यावे लागे . घरापुढे आणि पाठीमागे अशा दोन विहरी होत्या पण दोन्ही विहरी ओस ...इतकेच काय आजूबाजूच्या कोणत्याच वाड्यात विहीर असून पाणी न्हवते साऱ्या कोरड्या ठणठणीत . आजी म्हण्याची चार दिवस चार रात्र अखंड पाऊस पडला तर या दोन्ही विहरीना पाणी येईल . अशा प्रकारे रोज पाणी भरायचा व्याप आजीला व्यापून असायचा . आम्ही सारी नातवंडे मिळून छोट्या किटल्या छोट्या बरण्या घेऊन जाऊन आजीला मदत करायचो .पहाटे सहावाजता हा कार्यक्रम सुरु होई आणि सात वाजता संपे या साऱ्याला सोबत आजोबांचा रेडीओ असे महिषासुरमर्दिनी स्त्रोत्राचे रेडिओचे सूर ऐकून बाहेर पडू तोवर बाहेर मंदिरातली कवने ऐकू येत . या शांत वातावरणात कुणीच कोणाशी फारसे बोलत नसे . हा सारा सात वाजता कार्यक्रम संपला कि आजी न्हाहारीच्या तयारीला लागे आणि आजोबा देवपूजेसाठी परसातून फुले घेवून येत . न्हाहारीला गरम गरम धिरडी आणि सोलकढी बहुतेकवेळा आजीचा ठरलेला मेनू असायचा . आजीच्या स्वैपाकघरातल्या शिंकाळ्याचे मला आणि शेजारच्या मनी माऊला दोघांना आकर्षण वाटायचे . मनीला त्यावरच्या दुधाचे असायचे मला मात्र ते शिंकाळे आवडायचे .स्टूलवर चढून त्याला लोंबकळाचे आणि आजीच्या हातचा एक धपाटा खावा लागे . इतक सारे असले तरी सुट्टी सुट्टी सारखी नसायची . न्हाहारीनंतर आजोबांच्या सोप्यात पाखरांची शाळा भरायची . पाढे शुद्धलेखन बारा महिने सात वार सहा ऋतू सत्तावीस नक्षत्रे सारे म्हणाल्याशिवाय आजोबाच्या शाळेची घंटा वाजायची नाही . आणि हा वर्ग संपला कि आजीचा होम सायन्स तास सुरु व्हायचा एकीला ताक घुसळायला लावायची ,एकीला तांदूळ निवडायला द्यायची ,आम्हीं लहान आहोत ना आज्जी किती काम लावतेस आम्हाला असे तक्रारीचे सूर आम्ही लावले कि तुमच्या आयांना या सगळा स्वैपाक शिकावला होता मी ....पोरीच्या जातीला स्वैय्पाक आलाच पाहीजे असे म्हणत तिचे भाकरीचे पीठ मळणे चालू रहायचे . सोप्यातून आजोबा आत येत आणि गाण्यातल्या सुरात आम्हा सगळ्या मुलींना म्हणत "आजीच्या कामाला मदत करा ....ताक घुसळून लोणी काढा " आणि मग हळूच शब्दकोडे सोडवलेल्या पेपरमध्ये कुठेही आमच्यापैकी आमच्या गावांपैकी कुणाचे नावं आले असेल तर त्याला निळ्या पेनाने कंस करून ठेवत आणि आम्हाला दाखवत ....जसे कि मिरज येथे कविता वाचनाचा कार्यक्रम संपन्न अशी बातमी असेल तर कविता आणि मिरज अशा दोन्ही शब्दांना निळे कंस ....त्यांना याची भारी गंमत वाटे आणि आम्हाला आनंद .....त्यांना याची भारी गंमत वाटे आणि आम्हाला आनंद ....आलेली पत्र त्यातील आवडलेले मजकूर ...आवडत्या पुस्तकातील आवडते वाक्य ...उखाणे कोडी सुविचार सार काही आजोबांनी एका डायरीत जपून ठेवले होते ...आम्हा छोट्या मुलांना ती वाचायला देखील देत भारी मज्जा वाटत असे .....आजी चेष्टेने म्हणे तुमच्या आजोबांची प्रोप्रटी म्हणजे कागद आणि पेन ....


यानंतर मात्र आजीच्या सुग्रास जेवणाची घाई होई . तिचे फुलपात्र वाटका असे गमतीशीर शब्द ऐकून हसायला येई तेव्हा . भरलेले वांग ,भरलेली मिरची दहीभात खमंग पिटले ,ताक मट्टा रसभरीत जेवणाने आमची पंगत बसे सगळ्यात शेवटी एकटी आजी बसे तिला आजोबा आम्ही सगळे मिळून वाढत . जेवल्यावर सारे खरकटे उष्टे सावडून घेवून शेणाने रोज जमीन सारवायची ....ई आज्जी शेणाचा किती वास येतो ...कसा हात लावतीस तू ...वात्रट कार्ट्या मेल्या म्हणून आम्हा सगळ्या पोरीना हुसकून लावत . मग आजीकडे भांडी धुणी करायला एक वयस्कर "फुला आजी " यायची ....राखेने एकेक भांडी लखलख उजळून टाकायची ...आजी तिच्याशी गप्पा मारत परसात बसून रहायची ...आम्ही पण आजीच्या मागे मागे ...इतक्यात रोज एक मोर अंगणात यायचा ...आजी म्हणायची वरच्या माडीत कांदे वाळत टाकलेत त्याच्या वासाने येतात म्हणे मोर ....अचानक असा मोराला पाहून भीती आनंद कुतुहूल सारे सारे एकवटून यायचे तो मोर थोडया वेळाने निघून जायचा त्याची पडलेली पीस आजी गोळा करायची आणि सगळ्यांना एकेक वाटायची . हि पीस तुमच्या वहीत जपून ठेवा याचा डोळा नंतर मोठा होतो बर . बकुळीची जुईची पडलेली फुल आणि तशात हि मखमली मोरपीस सार वातावरण कस आजोबांच्या डायरीतल्या कवितासारखे काव्यात्मक वाटू लागायचे .आजी दुपारी जेवण आटोपली कि जात्यावर दळायची कोणत्या ओव्या वैगरे गायची नाही पण तो जात्याचा दगडी षडज हुंकार तो देखील एखाद्या ओवीपेक्षा कमी नव्हता . मग तिन्हीसांजेपर्येंत पुन्हा तिच्या फुलवाती आमचे खेळ सुरु व्हायचे . या खेळानंतर लाकडी झोपाळ्यावर बसून जोरजोरात हिंदी चित्रपटातली गाणी सुरु होत ....आमची गाणी ऐकून आजोबा म्हणत यां घरातल्या तुळई कडेपाट कौल साऱ्यांना गाण येत ....तुमच्या आया पण तशाच तुम्ही पोर पण तशीच ....एवढ्यात एक सोंगवाला ,माकड मदारी किंवा अस्वलवाला यायचा ...त्यांना पाहून पटकन आम्ही आजोबांच्या मागे लपायचो ...आजोबा सांगायचे अरे घाबरू नका ...ते बघा पैसे टाकल्यावर माकड कसे नाचते .....भीती कुठल्या कुठे पळून जायची ....

संध्याकाळी मात्र खूप उदास उदास वाटायला लागायचे . जमिनीवर आकाशात दोन्हीकडे नुसती लाल धूळ दिसायची ...ट्यूबलाईटचा शुभ्र उजेड तिथे नसायचा ....पिवळ्या जड बल्बच्या उजेडात फार उदास उदास वाटू लागे कधी कधी आईची आठवण येते आहे असे वाटायचे ...असे काही आजीच्या कानावर घातले ...उदास वाटते आहे वैगरे ती चटकन मीठ मोहरीची दृष्ट ओवाळून टाकत असे आणि साऱ्या एका सुरात रामरक्षा म्हणायला बसवे ....त्याचवेळी मस्त कुरडया पापड सांडगे याच्या वासाचा सुगावा लागल्याने राम रक्षेचा वेग वाढत वाढत जाई ...   आणि रात्रीच्या चांदणी भोजनाची तयारी चालू होई ....कोण चोर घास खाताना पकडेल तो राजा होई आणि त्याच्या आज्ञेने गाण्याच्या गावाच्या नावाच्या भेंड्या सुरु होत ....चांदण्याच्या मंद उजेडासारखा अख्खा दिवस मंद होवून जाई .....आणि चांदण्यानच मोगऱ्याचा सुगंध आल्यासारखा भास होई ....दिवसभर पळून पळून दमलेले हात पाय हळूच अंथरुणाची रजई ओढत ....मग आजोबा त्यांच्या आवाजात दोन अंगाई गीत ...."पत्र लिहितो तुजला ...पत्ता तुझा ठाऊक नाही ग ...." आणि "गुणी बाळ असा" ही अंगाई गात थोपटत प्रत्येकाला निजवत ,.....यातून कुणी अंथरुणातून उठली की म्हणत "ते बघा त्या बाहुलीला स्प्रिंग बसवली आहे ...झोपवल कि उठून बसते ...खूप वेळ हशा पिकायचा ...आणि हसत हसतच आम्ही सगळे निजून जायचो .....पहाटे रोज येणारा वासुदेव कानाशी पावा वाजवत रहायचा ....

हाळ मातीच्या घरातल्या भिंतीवर शिंतोडे उडवावेत आणि मातीचा गंध मनभर पसरत जावा ....तसे काहीसे आजोळच्या बालपणीच्या आठवणीने होते ...आणि मग मी वहीत दडवलेली मोरपीस मोठी झाली आहेत का ? ते पहात राहते ....मग कधी मन सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन बसते ...कधी सोप्यातल्या लाकडी झोपाळ्यावर बसते ...अंगण माडी सोपा अंधारी माजघर सार साऱ्यात मन गुंतत राहते ...सोप्यात आजीने भरतकाम केलेला ध्यानस्थ बुद्ध दिसतो   ....मग आजी आजोबा या जगात नसल्याची उणीव खंत भरू येऊ पाहते .....आणि पुन्हा पुन्हा आठवणींच्या दिशेने मन वेगाने धावू लागते .....या साऱ्याच गोष्टीना रूप अरूप या पलीकडे कैवल्याचे तेज असल्याची साक्ष ....आठवणीत विरघळले अश्रुंचे चांदणे देत राहते ....आठवणी म्हंटल कि फक्त आजोळ हा शब्द आठवतो



--------कविता मोकाशी

शिल्पाक्रुती


शिल्पाक्रुती



फुंकर मारुन उडून जाव
अशी कोणतीच हाक येथे पोहचत नाही
उलटले जात नाही
अर्ध्या कथेचे पान

थकलेली दुपार
पुस्तकात निजुन जाते
निम्म्या कच्च्या
कवडश्यांसह
आणि जाळीदार होते
पिँपळाचे पान
आत्मअनुभुतीच्या
साक्षात्कारासह
वाळवी लागलेल्या पुस्तकाच्या
चिरनिद्रेच्या गुहेत
.
.
.
.
.
अं
काय म्हणता ?
निर्मीतीच्या क्षणांची
अचुक शिल्पाक्रुती
कशी घडत असावी ?



-----कविता

हुंदका


हुंदका



मी त्याच्या खांद्यावर
ठेवले ओठांचे शिँपले
त्याने माझ्या खांद्यावर
ठेवले फुलपाखरांचे झुले

मी त्याच्या ओँजळीत
ठेवले स्पर्शाचे सात खडे
त्याने माझ्या ओँजळीत
ठेवले गळके ओँजळीँचे घडे

मी त्याच्या देहावर
ठेवले स्वप्नांचे क्षितीज
त्याने माझ्या वेणीवर
ठेवली फुलांची वीज

मी त्याच्या डोळ्यात
ठेवले आरशाचे नागवेपण
त्याने माझ्या डोळ्यात
ठेवले आंधळे आभाळ अंगण

मी त्याच्या आकांक्षेत
ठेवले माझे अचंचल मौन
त्याने माझ्या भितीत
ठेवले गुढतेचे अबोल ऋण
.
.
.
.
.
मी त्याच्या शरीरात
ठेवला जाणीवेचा हुंदका
त्याने माझ्या प्रेतावर
ठेवला नेणीवेचा हुंदका


-----कविता



"स्लो पॉयझेनिंग"


"स्लो पॉयझेनिंग" 



मी कुठेतरी 
तुझे जग जगते आहे 
वेचते आहे 
काळोखाचे तुकडे 
काळ्या शाईसारखे 

तुझ्या 
पुस्तकाचे 
न उलगणारे अंतरंग 
तरंगते आहे 
अधांतरी
मी न लिहिलेल्या 
तुझ्या कवितेत 

तुझी कविता 
बांधते आहे 
सांकव 
तुला मला जोडणारा 
तुला ओलांडून जाणारा 
आणि 
मला सोडून फेसाळणारया 
किनाऱ्यासारखा 

तू केलेल्या माझ्या कुटील 
आत्महत्येनंतर 
वाऱ्यावर भरकट आहेत 
माझ्या कवितांचे 
अतृप्त आत्मे 
आणि सुरु आहे 
.
.
.
"स्लो पॉयझेनिंग" 

------कविता

उत्कट


उत्कट


उत्कट संवादाच्या
उंच दरीवरुन कोसळताना
खळकन तुटतात
बंधनाचे आरसे
धबधब्यांसारखे

आणि
पुन्हा पुन्हा जन्म घेत राहते
आपल्यातले कोरेपणाचे नाते
नाव नसणारया
तान्ह्या बाळासारखे



-----कविता

विचारांचा झोका


विचारांचा झोका



मेँदुच्या पेशीत झुलत रहावा
तसा डुलत राहतो
अर्धवट विचारांचा झोका
ना जमीन ना आकाश त्याचे
अंतराळाचा गर्भ
खेळवत हालवीत राहतो
त्याचे हात पाय

शंभर वर्षांनी येणारया
त्याच्या म्रुत्युचा जन्म होतो
नचिकेतासारखा
आणि सुरु होतो
उलटा प्रवास
मरणापासुन जन्माकडे
त्या अर्धवट विचारांचा
मेंदुच्या अंतराळी झोक्यात



-----कविता

पणती


पणती




थकलेल्या विचारांचे
जड पाऊल थांबते
कुलुपबंद दरवाज्याच्या बाहेर

अंधारलेल्या घरात
पुन्हा एक अंधार होऊन
ओलांडते राहते रोजच
उंबरयावरचे सुखाचे माप

निजलेल्या सोफ्यावरच
निजुन जातात
तिच्या आश्वासक जबाबदारया
तिचे व्यक्तीस्वातंत्र्य
तिचा लढा
तिची शक्ती

उतु गेलेल्या दुधाचे कड
उतरवित
विव्हळत राहतात
तिच्या पायातल्या रुतलेल्या काचा
कोसळु लागते
तिचे हिमतीचे जग

दाराशी ओरडत येते
एक भिकारीण
तिच्या बाळाला पोटाशी बांधुन
"वाढ ग माय वाढ
तुझ्या पोरा बाळांच
कल्याण होईल "

अंधारलेल्या खोलीतुन
पुन्हा पणती होऊन
उजळू लागते ती
उंबरयावर


-----कविता

एकतर्फी


एकतर्फी



वठलेल्या झाडाच्या वीस्तीर्ण फांदीवर
टोक कोरणारा सुतारपक्षी
आळवत राहतो त्याचे वर्ज्य सुर

बळी पडणारया इच्छांचा पाचोळा
दिसत नाही त्याच्या नजरेला
फक्त दिसु लागते
झाडाच्या मुर्तीतले करुण हास्य

पण
अपेक्षांच्या क्षणांनी कोमेजणारे फुल
कुणी निर्माल्य म्हणुन
पाण्यात सोडते का ?
केवळ हसत राहते
फाडलेल्या कागदांचे
तुटलेल्या काचांचे जग
तुझ्या एकतर्फी प्रेमाला

------कविता

सापेक्ष


सापेक्ष



रेल्वेच्या वेगाशी शर्यत करणारी
दुर्तफा झाडे मागे पडत आहेत
तु आणि मी
तेवढेच स्थिर
सापेक्षतेच्या नियमानुसार

ना कोणती तुला मला
ससा कासवाची रुपक
ना कोणती तुझ्या माझ्यात
जिँकण्याची हारण्याची शर्यत
ना आपल्यात
शत्रुत्वापलीकडचे मैत्र

तु आणि मी पांथस्थ
युगायुगाचे
मी अळवावरचे पाणी
तू तुटता तरी
तरीही सहवासाची ओढ मागतो आहेस ?
कशासाठी ?

तर जरुर पहा
चांदण्याच्या कळ्यांनी भेटलेली
सापेक्षतेच्या नियमाचे उल्लंघन करणारी
ती दोन पिँजरयातील फुले
जी भोगत आहेत
पारतंत्र्याची स्वतंत्रपणे शिक्षा

सापेक्षतेच्या नियमात
पुर्वीच ती फुले भोगत होती
तीच शिक्षा
कठोर न्यायदानापुर्वीच
समांतराचा तुरुंग
आणि तुरुंगवास

एका डोळ्याला दुसरया
डोळ्याचे अश्रु कळतात
दिसत नाहीत
इतकी समजुत घालुन घे मनाची
आणि तसाच स्थिर हो
माझ्या आणि रेल्वेच्या वेगाशी



------कविता

अश्मयुगीन क्रांती



अश्मयुगीन क्रांती





तुटलेल्या संवादाची घरे
ज्या वस्तीत उभी राहतात
तिथे सुरु होते पुन्हा अश्मयुग
दगडाची माणस
दगडाचे काळीज
दगडाचे अश्रु
दगडाचे रक्त
पुन्हा सुरु होतो उत्क्रांतीवाद
समाजप्रियतेचा
समुहप्रेमाचा
पुन्हा शिवले जाते
संवादाचे चामडे
नाद घुमत राहतो
माहित नसणारया शब्दांचा
.
.
.
.
.
तु बोलत नाहीस माझ्याशी
म्हणुन करत राहते
उगाचच
सारयांना फोन
जाणवते प्रत्येकाला
माझी संवेदनशीलता
माझी समाजप्रियता
पण उमजत नाही कोणाला
माझी अश्मयुगीन क्रांती



-----कविता

क्षितीजदिवा


क्षितीजदिवा


स्वप्नामागून येणाऱ्या सावल्या कुठेतरी हृदयाच्या आडोशाला उभ्या झाल्या सारख्या वाटत आहेत . अन मग वाटत तो दाराआड लपला आहे किंवा माझ्याच पाठमोरी आकृतीकडे निहाळत आहे .त्याचे डोळे नेहमी माझ्या बंद डोळ्यानाही जाणवतात जणू त्याचा श्वास अलगद जपून येतो आहे मोरपिसासारखा .विस्मृतीला चिन्ह नसत हे अधिक कटू सत्य .आज अमावस्या आहे चंद्र आभाळात येणार नाही आणि पापणीच्या अर्धरेषेत तो लपणारही नाही . दर अमावास्येला क्षितिजाचा अर्धचंद्र पाहून सुखावते . दूरवर हक्काने जळणारा दिवा दिसला कि काळजावर आलेली काजळी देखील अलगद बाजूला सरकते . पण रात्र थोडी निष्ठुर होवूनच येते . जगवत नाही मारत नाही . मंगळसूत्राचे काळे मणी हिरावून घेईल इतक्या भीतीचा फक्त कडेलोट करत राहते . मी देखील तिच्यापुढे हार मानणारी नाही . तिच्या सर्वंकष अनुभूतीचा साक्षात्कार मला ठावूक आहे . ती खिडकीबाहेरच्या समुद्राला देखील असाच ओढण्याचा प्रयत्न करते निर्जीव किनारा त्याला जाऊ देत नाही . मी देखील मंगळसूत्र तिला घाबरून काढणार नाही . उलटपक्षी आज मी तिला आव्हानच केलंय माझ्याशी लढण्याच . वेणीमोकळे केस आणि गंधमोकळे फुल मी चढवले आहे . भांगेत कुंकू भरणारा रेशीम किरण आल्याखेरीच मी द्रौपदीचे केस बांधणारही नाही . रात्र माझी वैरीण आहे अस नाही पण काळाच्या बदलत्या अंतराने तिला माझ्यापासून दूर केल आहे . मी आजही तिची क्षमा मागायला तयार आहे पण ती आहे आंधळी अन बहिरी . तिच्या काळोखाचे दुख तिला ठावूक आणि माझ्या उन्हाचे दुख मला ठावूक . टेबलावरची कवितांच्या कागदाची राख त्याच उन्हाने जळून गेली . त्याच्याशिवाय नखशिखांत आज नटले त्याच्याच आठवणीत त्याच्याशिवाय रमणार तरी कसे ?अन चांदण्याची आरास करून आरशापुढे जाऊन उभी राहिले . विज्ञानाचे नियम विसरलेच माझ्या कवितांचे कागद आणि त्याचा आरसा यावर मी धरलेलं विराणीच उन्ह कागद जळत राहील त्याचीच ती राख टेबलावर . एक फुंकर मारली तर उडून जाईल . मी ती जपणार आहे . तिचे मी काय करेन मला नाही माहित आजच्या दिवशी तरी मला ती टाकून द्यावीशी नाही वाटत . कारण त्या कागदावर लिहिलेल्या स्पष्ट ओळी आठवत आहेत

पाऊस झडतो पाचोळा उडतो
मोत्याच्या दिवा पाण्यात जळतो
तडकते सावली तडकते बिंब
उन आले घरी पाऊस दारात चिंब

पाऊस दारातच आहे तसे ठीकच . मागे एकदा अत्तरथेंब चुरगाळनारा स्पर्श मी अनुभवला होता अन कापऱ्या देहात निळे काजवे उतरले होते . जणू कात टाकलेल्या सर्पिणीला तिच्याच विषाने तिला हलके हलके मरण देत जावे . तो ओलेता स्पर्श ओला गंध त्याचा न संपणारा हृदय प्रवास तरीही ओढ लावणारा त्याचा दुरावलेला सहवास नकोच पाऊस दारात आहे तसे ठीकच . पण त्याचा संदेश मला ऐकायला हवा तो आज कोणती गोष्ट सांगेल कि अनवट राग गाईल ते ऐकायला हवे . कारण तो आवाज फक्त पाण्याचा नाही पावसाचा आहे . हळव्या मिठीत येणाऱ्या भांबावल्या क्षणाचा आहे .पण आज पाऊस मोठा गंभीर वाटतो आहे .वठलेल्या झाडासारखा गंभीर तितकाच एकटा .कदाचित तो दुखी आहे असेच सांगतो आहे  हा पाऊस कि माझ्याच मनाचे हे खेळ . नाही नाही हा खेळ नाही . वारयाचे अबोल आवाज थांबले आहेत . झाडा पानावर निथळनारी जाणीव ते ओलेपण ते रितेपण काहीच साठत नाही सार काही पुरात वाहून जाते आहे . तो दुखी आहे . मी मघाशीपासून अनुभवते आहे ते केवळ त्याच्याच दुखाचे प्रतिबिंब .प्रतिमा आभासही असते माझे दुख या चांदण्यासोबत आभाळात विरून जाईल त्याचे दुख काय सांगते आहे . मला ऐकायला हवा पावसाचा आवाज त्याचा खर्जातला षडज. तानप्रवाही वीजीची गती झेप घेते आहे . त्या मागे उरणारा सूर तसाच घुमत राहील कितीतरी वेळ . पाऊस एकटाच बोलतो आहे त्याला माझा आवाज ऐकू नाही येत . माझे हुंदके उसासे त्याला नाही कळत . मी वाट पाहते आहे पावसाच्या खांद्यावर धीराचा हात ठेवण्याची .आता पाण्यात पडणारे माझे स्वप्न मी पुसून टाकले आहे तसेच त्याचे दुख इथूनच मला पुसायचे आहे .पावसा माझ्या कवितेच्या पानाची कागदी होडी वल्हव आणि जा जाऊन सांग त्याला .....

फिरून वेदनांना अंती
जगणे मरणे तुझ्यात
विरले आहेत सूर मागे
विरले चांदणे नभात

आजची काजळपाणी गोठवणारी रात्र त्याचीही आहे आणि माझीही . म्हणून संदेश पावसाकडून पाठवला अन्यथा त्याला मी फोन केला असता लगेच . त्याच्या ठायी वाळवंट आहे पण चंद्रभागा नाही पताका आहे पण वीणा नाही जयघोष आहे पण टाळ नाही त्याच्या हाती आहे ती बंदूक आणि सरहद्द .देशा देशाने आखलेल्या सीमारेषा पार करून मी त्याच्या माझ्या नात्यासाठी एखाद नव क्षितीज शोधण्याच स्वप्न तरी कस पाहू ? रक्षण करणाऱ्या किनार्यानेच ठरवलं समुद्र जीवानिशी ओढून आणायचा तर प्रलयाचे दुसरे नाव आणखीन काय असेल . आज मी तुझ्या कर्तव्याचे अधिष्ठान बाजूला सारून फक्त मला पाहत राहिले तुरुंगाच्या दोन दिसणार्या सळ्या फक्त मला दिसल्या अन वाटले मीच भोगते आहे कारावास त्यापलीकडचा तुझा चेहरा दिसलाच नाही असावे भरून गेली डोळ्यात . जे तुझ आहे ते माझ विसरून गेले . आपल्या जन्मखुणा  वेगळ्या असल्या तरी मरणखुणा एकाच आहेत हि मी घेतलेली शपथ देखील विसरले .तुझी खूप मोठी गुन्हेगार ठरेन मी या गुन्हाचे धागेदोरे सकाळच्या रेशीम किरणा आधीच पुसले पाहिजेत  कारण गुन्हा मी कबूल केला तरी गुन्हेगार तू स्वतःला ठरवशील . न्याय आंधळा असतो हे हि तितकेच खरे .नदीबदलाच्या प्रवाहाने बदलेली गावे आता स्थिर दिसत आहेत .तुझ्या नावाची ठुशी नथ जोडावी एखाद्या पवित्र मंदिरासारखी वाटते आहे . अन माझ्या नावापुढे तुझे जोडलेले नाव म्हणजे माझी न संपणारी उदंड आयुष्याची संपती वाटते आहे . कारण का ठावूक आहे प्रेमाचेच दुसरे नाव समर्पण आहे हे तुझ्यातल्या सैनिकानेच मला शिकवले आहे . विजयाचे प्रतिक घेवून पूर्व रथावर स्वार झालेला अरुण देखील मला हेच सांगत आहे . अमावास्येच्या अंधारानंतर आलेली प्रकाशाची वाट मला दैदिप्यमान तेजाकडे नेत आहे . तुझ्या ध्येयाकडे तुझ्या आकांक्षांकडे  ......

गर्भाळले तेज
प्रकाश चाहूल
आत्म्यास भूल
माझी असे




-----कविता मोकाशी

दलदलीतले कमळ


दलदलीतले कमळ



जड वेदनेने भरलेला
तिचा स्थूल देह
देत राहतो कारुण्याची झालर
तिच्या कुरूपतेला
ती उसवत राहते
तिची किंचाळी
सोवळे होत जाते तिचे
तारुण्य
अस्पर्श झालेले
देह किनारे शोधतात
अस्पृश्याचे वाळवंट
उपेक्षा होत राहते
तिच्या वेदनांची
कुंतीच्या मंत्रात देखील
बांधल जात नाही
तीच दायित्व
क्षय झालेल्या तिच्या स्वप्नांचा
राहतो तसाच जन्म घेत
अधिक मास म्हणून
सुखाच्या नकाराच्या
अज्ञात भिंती
बांधू लागतात तुरुंग
आणि रचू लागतात
सुटकेचे सापळे
आणि ती पाहत राहते
दलदलीतले कमळ
झडणाऱ्या दवबिंदूतून
तरीही निरसी
झालेली हिरवी पाने



-------कविता

घडायचं होत खूप काही


घडायचं होत खूप काही



घडायचं होत खूप काही बिघडलं काहीच नाही
दोघाच होत आयुष्य ते आता कोणाचेच नाही
आभाळ बिभाळ स्वप्न अस काही ना खास
दोघेही आपापला मुक्त घेत श्वासावरचा श्वास
तरीही दोघांच एक होत दूर पल्याड आभाळ
ती म्हणायची क्षितीज तो म्हणे लाट फेसाळ
दोघांनाही लागायची झोप बीप वैगरेशी छान
कुणावाचून कुणाची कधी अडली नाही तहान
तरी हमखास दोघांना दिसायचे चंद्राचे चांदणे
तो म्हणायचं स्वप्न ती म्हणे भास हे दिवाणे
यायची एकमेकांना अधूनमधून जरा आठवण
टाळणाऱ्या भेटीत शोधायचे निघण्याचे कारण
तरी निघताना दोघ पुन्हा भेटूया म्हणायची
कुठल्याशा वेदनेने डोळ्यात पाणी जमवायची
अगदीच प्रेम नाही अशातलाही नव्हता भाग
एकाला दुसऱ्याचा इतका येत नव्हताही राग
रस्ते होते वेगळे तरी काहीतरी ते अडायचं
दोघांना वाटे पडलो प्रेमात एवढच ते घडायचं
प्रश्न याला ना तिला कधीच असा पडला नाही
शून्य उत्तर अपेक्षित गणितात या काहीबाही
एक होता परीघ पण वेगळा होता केंद्रबिंदू
स्वतःला फसवून व्हायचे थोडेसे भाबडे भोंदू
फसवाफसवीच नाटक चालू होत सुरळीत
कधी कधी फुल सिनेमा विदआउट तिकीट
कधीतरी वाटायचं दोघांना जाव दूर सोडून
एकटेपणाच्या भीतीने येत जवळ आपणहून
साल काय असत प्रेम एवढ आपणही करू
थोड थोडस झरू आणि थोड थोडस मरू
एक दिवस दगडावर कोसळून पडली वीज
भंगला दगड तसा तिचंही भंगल काळीज
दगडाला भेटली वीज मातीला थेंबाची सर
थाटला वेगळा संसार अन थाटले वेगळे घर
दोन वेगळ्या नदीचे होते दोन वेगळे किनारे
क्षितिजावर होते झाले दोघांना भास सारे
घडायचं होत खूप काही बिघडलं काहीच नाही
दोघाच होत आयुष्य ते आता कोणाचेच नाही



---कविता

कस आभाळ आभाळ


कस आभाळ आभाळ


कस आभाळ आभाळ
तुझ्या माझ्यात दाटलं
धुक धूसर ढगाच
माझ्या उरात फाटलं

कस आभाळ आभाळ
पानापानाला टांगलं
हिरव्याकंच चुड्यात
तुझ नाव मंतरल

कस आभाळ आभाळ
चार भिंतीत कोंडल
जन्मभरीच सौभाग्य
माझ्या कपाळी गोंदल

कस आभाळ आभाळ
इंद्रधनून माखल
दव प्रेमाचं माझ्या
तू र रंगान चाखल

कस आभाळ आभाळ
वाऱ्यापाऱ्यात गुंजल
मातीच्या गंधात फुल
तुझ्या भेटीच रुंजल

कस आभाळ आभाळ
उन्हान अस लिंपल
छत तुझ्या सावलीच
माझ्या पायात पिंजल

कस आभाळ आभाळ
मोतियान र जुंपल
चांद आला पौर्णिमेचा
तुझ्या जीवात खुंटल

कस आभाळ आभाळ
अंधातरीच थांबल
ओस काळजात माझ्या
नाव तुझच उरल



----कविता

लिहायची केली घाई


लिहायची केली घाई

वाचायचं होत खूप काही
अर्ध्या ओल्या डोळ्यावरच
कोऱ्या कोऱ्या काळजावरच
निसटून गेली हातातून शाई
आता वाटते लिहायची केली घाई

वाचायचं होत खूप काही
आभाळभरल्या कागदावरल
मेघावरच्या रेघांमधल
पाण्याच्या तरंगावर विरून गेली शाई
आता वाटते लिहायची केली घाई

वाचायचं होत खूप काही
मातीवरल्या रेघोट्यामधल
रेघोट्यावरल्या नावामधल
ओठावर झाली अनोळखी सही
आता वाटते लिहायची केली घाई

वाचायचं होत खूप काही
बोथट बोथट शब्दामधल
धारेदार धार अक्षरामधल
लिहिण्याआधीच आटून गेली शाई
आता वाटते लिहायची केली घाई

वाचायचं होत खूप काही
रिकाम्या सोडलेल्या समासामधल
कोपऱ्यात मुडदलेल्या कागदावरल
पण नव्हता कागद नव्हती शाई
आता वाटते लिहायची केली घाई



----कविता

आत्मशोध


आत्मशोध



तीच अंधारी खोली ....खोलीतून येणारा धुरकट वास ....
जमिनीवर अंथरलेली फक्त जमीन .....
गडद काळोखाच छप्पर डोक्यावर
आणि उजेडाने विणलेल अस्पष्ट कवडश्यांचे जाळे
सार घरच अस झाल असत तर किती बरे झाले असते
उजेडाचा सोपा नको सोप्यात हलणारा झोका नको
तिन्हीसांजेची ओसरी नको दुपारची पडवी नको .....
देवघरारातून मंद दरवळणारा दीप असतो
तसा श्वासाचा दीप मंद तरळत राहावा अंतरंगात
आणि अक्ख शरीर होवून जाव .....
या अंधारलेल्या खोलीसारख ....निस्तेज .....
फक्त खोलीच्या पुढ्यात फक्त एक अंगण हव
निर्विकार मनाच....तरीही जाईजुईच्या वेलीने
आणि प्राजक्ताच्या गंधाने शहारून गेलेल
सार जगणही असंच व्हावं वाटत आहे .....
अंधारलेल्या खोलीसारख ....असंच अगदी अस




कदाचित मला माझा
आत्मशोध लागेल लवकरच......!!
तीच वेळ आली आहे असेच वाटते आहे



-----कविता

दुधाचा पान्हा


दुधाचा पान्हा

भोगलेल्या गर्द वाटा
रांगते माझे तान्हे सुख
भर दुपारच्या उन्हात
खडकात रुजे ओले दुख

माळरानावरी दिसे उभे
एकटे शांत निरस अंबर
सुर्यास्ताच्या तटावरी
जसा देवाचा औँदुंबर

आर्त व्याकुळ सांजेचा दे
मला गर्भरेशमी वार
आहुतीत माझ्या मीच मी
तुपा धुपाची संततधार

बेगडी ही उजाड दुनिया
नको जन्म मरण पुन्हा
गर्भातच मला उकलु दे
तुझा दुधाचा पान्हा

---कविता

सावळा


सावळा

तु माळलेस नभातले कवडसे
अन फुलारुन घेतलास देह सारा
मी तुझ्या चांदण्यात नव्हतो

तु टिपलेस कुंतल्यातले मोती
अन ओघळले तुषार गाली
मी तुझ्या अंबरात नव्हतो

तु पाहिलेस वळुन मागे
झालीस एकाएकी चोरटी
दुर मी तसाच उभा तुझ्यात भेटी
मी तुझा पैलतीर नव्हतो

सावलीत तुझ्या उभारुन झालो जरासा सावळा
जशी तु काजळली आहेस ऐकुनी माझा पावा

---कविता

दुखाचे गोँदण


दुखाचे गोँदण




दुखाचे गोँदण
दुखाचे गोँदण
भाळावरी माझ्या
सुनेसुने अंगण

आसवांचे कळण
आसवांचे कळण
भांबावला हुंदका
स्मरतो साजण

विरह गुंफण
विरह गुंफण
हातात रेघात
संध्येचा किरण

उदास बंधन
उदास बंधन
डोहात काळीज
अंधारले वळण

झरला श्रावण
झरला श्रावण
म्रुगजळ पाणी
वाळले उन

पश्चिम तोरण
पश्चिम तोरण
विझला दिवा
विझले मन

चांदण कंकण
चांदण कंकण
तुटली माळ
काजळ शिँपण

जगण्याचे जळण
जगण्याचे जळण
केवळ आशा
मरणास सरण

तुझ्यावाचुन मलीन
तुझ्यावाचुन मलीन
कुंकवाचा केशर
सखी साजणात विलीन

*.
दुखाचे गोंदण
दुखाचे गोंदण
भाळावरी माझ्या
सुनेसुने अंगण
*

---कविता

जोगीण वनवासी



जोगीण वनवासी



अस इतक्या वेड्यापरी नको वागू काही
तुला घर आहे तुझे मला आसराही नाही
अंधार भिंत माझी अंधार माझी कोठडी
जखडल्या वेदना आसवांची फोडते खडी
तुझे घर तुला बरे माझे दुःख मलाच खरे
अंधारावर सावलीचे उमटतात कधी चरे ?
नको समजू उपरी मला ना समजू परकी
वनवासी वाटेवर चालणारी तुझी जानकी
आजन्म वाहीन मी भार तुझ्या चरणांचा
सोसेन वेदना मी पायी रुतल्या काचांच्या
नव्हते माझी मी कधी आहे तुझीच दासी
एक रानफुल मी अखेर जोगीण वनवासी
का हृदयाच्या प्रीतीपायी जग सोडतो सारे
हे आभाळ नाही माझे नाहीत माझे वारे
अस इतक्या वेड्यापरी नको वागू काही
तुला घर आहे तुझे मला आसराही नाही



----कविता


लाटणे पुराण


लाटणे पुराण


लाटण्याने मारताना घ्यावी कोणती काळजी
सांगते सख्यांनो आज गोष्ट तुम्हा ताजी ताजी

लाटण्याने मारताना फक्त मारावेच त्याला
तदनंतर कराव्या लाटून भाजून पोळ्या

लाटण्याने मारताना नसावी इतकी घाई
बाजारात धाडुनीया द्यावी आधी सासूबाई

लाटण्याने मारताना मारूच नये फेकून
चुकून तो पकडेल झेल त्याचाच झेलून

लाटण्याने मारताना पोळपाट न्या जपून
नाहीतर नवरोबा त्याने मारेल चुकून

लाटण्याने मारताना अचूक असावा नेम
घ्या मलिंगाचेच नाम सारेच होईल क्षेम

लाटण्याने मारताना आधीच घ्यावी कबुली
नेवून आण हॉटेली नकोत चणे काबुली

लाटण्याने मारताना मध्येच घ्यावा आराम
सांगा त्यासी पाणी आण भरला रे मला दम

लाटण्याने मारताना करेल तो लाडीगोडी
मागावी लगेच तेव्हा बनारसी शालू जोडी

लाटण्याने मारताना जी हे करे स्त्रोत्रपठण
अधिका अधिक तिज येईल शक्ती अजून


----कविता

गझल .......


गझल .......



वितभर त्या ओळीची ओळख घेवून
मी (कविता)ओघळत निघाले ....
प्रवाही दिशेने आवेगाने वाहू लागले
येणाऱ्या प्रत्येक पोकळीत ...
माझे अस्तित्व मी
मी शोधू लागले होते ....

माझी ओळख शोधू लागले
जमिनीत दिसणाऱ्या....
प्रत्येक जखमेच्या गर्तेत .....
तर कधी आनंदाच्या विशाल
सागरातून पोहून आलेल्या ....
उल्कापातेच्या खाचखळग्यात ...
तरी कधी .....
क्रोधाच्या अग्नीतून आवेशाने
आलेल्या धरणी कंपांच्या खड्ड्यात

अखेरीस त्या ओळीचा ....
काही पुसटसा अर्थ घेवून येणाऱ्या
शब्दाशी तिचा परिचय झाला ....
रदीफ काफिया असे काहीसे
पुटपुटत.....ती पुन्हा चालू लागली .....
घाटातल येणार प्रत्येक वळण
वळसा घालून ....
मृत्यूला झुंज देत होत ...
पण तितकंच जगण्याला स्वीकारत होत
पण ती ओळ फक्त बडबडत राहिली ....
रदीफ काफिया .......

प्रत्येक वळणावर ओळखीची नजर
होती फक्त त्या मृत्यूची ....
नाही नाही ...रदीफ काफिया ....
पण त्याच्या प्रत्येक ओळखीवर
मी विजयाचा पताका रोवला होता ....
तो विजय ....
माझ्या भावनेनी खुडलेल्या अश्रुफुलांचा
आणि दगडाची देवमूर्ती झालेल्या शब्दांचा ....
विवश होवून कोसळणाऱ्या माझ्या
भावनांचा .....आणि
वीज होवून कडाडून उठणाऱ्या
मौनस्थ शब्दांचा ......
माझ्या सुखाचा आणि दुखाचा ...
कागदाच्या पानावर दोन रेघोट्या
ओढणारया माझ्या दुबळ्या मनाचा
तो विजय जयजयकार करीत होता
"शेर बराए शेर "

मृत्यूने अजूनही प्रत्येक वळणावर
तितकाच मजबूत तळ ठोकला होता ....
तो मृत्यू त्या प्रत्येक शब्दात ...
साचला होता .....रदीफ काफिया ....
असे कितीतरी काफिया आणि
रदीफ त्या पुढ्यात मांडले होते ...
पण सारेच काफिये माझे न्हवते ...
अखेरीस ते उरलेले काफिये
निरर्थक झाले ....

दैवाने माझ्या वाट्याला
पाठवलेली सारी वळण संपली होती .....
प्रत्येक वळणाशी ....दुसऱ्या वळणाला
विसंगती दाखवेल अशी वळणे
सरून गेली .....माझी गझल
बहुदा पूर्ण झाली असावी
आणि घाटाचा रस्ता उतारू दिशेने
चालू लागला .....

आता तो सरळ सरळ चालणारा
मार्ग देखील माझी ओळख विचारू लागला
मक्त्यावर लिहिण्यासाठी नाव पुसू लागला
पण मी किती निरुत्तर होते ??
अस्तित्वाच्या शोधात काढलेला
माझा प्रवास किती निष्प्रभ होता ...
मी कोण ?

मृत्यू नावाच्या रदीफ काफिया वर
विजय मिळवणारी विजयी ...कि
शब्दांना छंद बद्धत करणारी
त्यांची शिकारी ....कि
माझी सोबती मानणाऱ्या
भावनेची सखी ....कि
कागदावर दोन थेंब
ओघळणाऱ्या शाईतील अश्रू ....कि
लेखणीच्या अग्रभागी असलेला
एक जिव्हाळा .....कि

नुसताच मूर्तिमंत दगड ....
देवत्वाचे अस्तित्व दगडात
चाचपणारी .....कि ....
मक्तयाने जोखमीने वर्षाषुनवर्षे
सांभाळाव अस एक नाव
एक फक्त ....नाम ......
स्वताच गंध रूप नसलेलं
अस्तित्व नसलेलं.... नाम....
कोण मी ?

मक्त्याने तर ते निर्जीव नाम
आता धारणही केले होते .....
पण माझी गझल .....शीर्षक ...मागत होती ...
स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्याकरिता
मार्गक्रमण करणाऱ्या गझलेला
शीर्षकच न्हवत ....
मागे टाकलेल्या मिणमिणत्या प्रकाशाला
आणि पुढ्यात आलेल्या अंधाराला
उचलून धरणारे मन
विचारात गुरफटून गेले
माझ्या गझलेचा शीर्षक काय
गझल हसून खिदळली आणि बोलली
"आयुष्य ..........."


------कविता

तत्व


तत्व 

प्रत्येक तत्वाला 
आपलंस वाटावं
इतक सुंदर निर्मळ
तत्व मला दीधल आहे 

अंबरच्या छत्राने 
माझ्यासाठी झुकाव 
धरणीने विधात्याला 
माझ्यासाठी विनवाव 
इतक सुंदर निर्मळ
तत्व मला दीधल आहे 

अग्नीच्या ज्वालेने 
सहज आपल कराव 
वाऱ्याने न झुंजता 
फक्त बहरत रहाव 
इतक सुंदर निर्मळ
तत्व मला दीधल आहे 

कुणी मिरवाव अस 
माझ स्वरूप नाही 
विश्वात अथांगात 
आकाराव अस 
कोणतच ध्येय नाही 
इतक सुंदर निर्मळ
तत्व मला दीधल आहे 

स्निग्धात भेसळत नाही 
मातीस विसळत नाही 
सूर्याच्या चार किरणेही 
मायेने इथेच विसाव 
दगडाने पण कधीतरी 
भूसभुसून मृदेस लेण द्याव 
इतक सुंदर निर्मळ
तत्व मला दीधल आहे 

तुझ्या सहृदय हृदयात 
सदैव झिरपत रहाव 
आईच्या ओटीत 
हळूच निजून जाव 
इतक सुंदर निर्मळ
तत्व मला दीधल आहे 

कधी विशाल मनाचा सागर 
कधी हळवासा नाजूक तुषार 
कधी आकाशाच्या 
उंचीतून जमिनीत उतरणार 
कधी जमिनीतून 
उमलून आभाळास भिडणार 
इतक सुंदर निर्मळ
तत्व मला दीधल आहे 

तुझ्या जगण्याचा आधार 
या तत्वाने व्हाव ...
जिव्हाळाच्या अग्रावर 
या तत्वाने रहाव 
इतक सुंदर निर्मळ
तत्व मला दीधल आहे 

कुणी या तत्वास 
प्रेम ममता म्हणते 
कुणी ब्रम्ह माया म्हणते 
ज्याला मी 
'कविता ' म्हणते 

------कविता