Pages

Sunday, 10 November 2013

तत

तत 


आरंभ नाही अंत नाही 
या जाणीव भिन्नतेला 
काळ 
दगडी कोरीव पाषाणात 
स्थितप्रज्ञ 

सुख नाही दुःख नाही 
या स्मित हास्याला 
मन 
शांतीच्या वनवासात 
आजन्म मुक्त


---कविता 

रविवारची संध्याकाळ

रविवारची संध्याकाळ मराठी चित्रपट के नाम अशी असायची . जुने प्रभातचे मराठी चित्रपट मधल्या काळातील ग्रामीण बाज असणारे लावणीपट ते अगदी लहान मुलांचा आवडता लक्ष्याचे विनोदी चित्रपट अशी चंगळ असायची . माझ्यासाठी तर आई आणि आज्जी यांच्यासोबत हे चित्रपट पाहणे म्हणजे एक आगळा वेगळा उत्सव असायचा . आजूबाजूला असणाऱ्या दहा बारा घरात अगदी हेच चित्र असायचे satellite वर फिक्स केलेल्या मल्टीप्राईड सारखे असो 

आज सहज आठवण आली ती अशाच एका रविवारी पाहिलेलेया चित्रपटातल्या एका प्रसंगाची . तो चित्रपट "देव बाप्पा की हा माझा मार्ग एकला हे नीटस आठवत नाही " पण प्रसंग असा आहे 
त्या लहान मुलाला /मुलीला कुणी सांगितले असते देवाघरी तुझी आई गेली आहे म्हणून तो लहान मुलगा /मुलगी देवाला पत्रे लिहतो "देवबाप्पा तू माझ्या आईला माझ्या घरी लवकर पाठव मला तिची आठवण येते " अशी बरीच पत्रे तो /ती देवाला लिहतो त्यानंतर एक दिवस घरातले कुणी ज्येष्ठ व्यक्ती टेलिफोन exchange ला अमुक अमुक व्यक्तीचा फोन जोडून द्यायला सांगते तेव्हा या गोष्टीकडे त्या मुलीचे /मुलाचे लक्ष जाते आणि अगदी लक्षात ठेवून तो फोन करतो आणि बोलू लागतो "माझी आई देवाघरी आहे मी देवबाप्पाला खूप पत्रे लिहिली मला माझ्या आईशी बोलायचे आहे देवबाप्पाला फोन जोडून द्या " त्याचे हे बोलणे ऐकून telephone operator असणाऱ्या बाईचे डोळे पाणावतात आणि ती मग त्याची आई आहे अस समजूनच बोलते . हे सार पाहताना मी सुद्धा अगदी रडत होते मी माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्या आई आणि आज्जी दोघीपण पण लपून लपून डोळ्यातले पाणी पुसत होत्या मी आज्जीला विचारले "आजी तू रडतेस ?" आजीचे बोलणे शिव्याप्रधान असायचे त्यामुळे लगेच ती ओरडली "हट मेल्या रांडीच्या ,चल तिकड " जुन्या रूढी परंपरा मानणारी ती असल्याने भावना व्यक्त न करणे हे तिच्या शिस्तीत बाणले होते त्यामुळे साहजिकच माझ्या प्रश्नावर तिची अशी तिखट प्रतिक्रिया पाहायला आणि ऐकायला मिळाली

असाच आणखी एक प्रसंग मला आठवतो तो सह्याद्री मालिकेवरील . नुकतच नवीन लग्न झालेलं जोडप पुढे काही दिवसात त्यांचेघरी बाळ जन्माला येते . बाळाला जन्म देवून आई जाते . बाळाचा बाबा दुःखी निराश हतबल झालेला . अचानक बाळ रडायला लागते तेव्हा तो भानावर येतो . बाळाला भूक लागली असेल असे समजून वाटी चमच्याने दुध बाळाला दुध पाजवतो तरी रडणे थांबत नाही . त्याला काही वेळ खेळवतो तरीही बाळ तसेच रडत राहते . अचानक त्याला काही आठवते तो बाळाला पाळण्यात निजवतो आणि ट्रंकेकडे जातो त्यातील त्याच्या पत्नीच्या एकेक साड्या उचलतो त्यांना कुरवाळतो आणि लगेचच एक साडी नेसून आपल्या पत्नीसारखा अंबाडा त्यावर गजरा कपाळावर कुंकू आणि तिचेच अलंकार स्वतः परिधान करतो . पाळण्यापुढे जातो तस बाळ त्याच्याकडे पाहून खुदकन हसते .

मालगुडी डेज मधिलहि काही अश्याच कथा मनाचा ठाव घेणाऱ्या फार तरल आहेत अगदी ओंजळीत प्राजक्त गळावा अश्या हे सार nostalgic किंवा भावनाप्रधान भावविवश करणारे असते तरीही मी पुन्हा पुन्हा आठवते वाचते काही संवेदना जाग्या आणि शिल्लक राहाव्यात त्या कधीच कुठेही संपू नयेत वाटत अगदी श्यामची आई हे पुस्तकही शाळा संपल्यावरही मी खुपदा वाचले आहे . असो रविवारची संध्याकाळ अशीच काहीशी "ग्रेसफुल-भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते "  

-----कविता मोकाशीA

Monday, 28 October 2013

अस्तित्वाला चिरा

समाधीच्या पायथ्याशी सुरा 
एकूणच अस्तित्वाला चिरा 

घुमट सोनेरी घुसमट सोनेरी  
देवाची फोडली फुटली तिजोरी 

भेदले शुन्य गगन उडाले
शाप हेच पक्षी अश्रूत बुडाले

नागाशी खेळते शिकार मुंगुस
आईच्या माघारी बाळा न मागमूस

कुणी भोगिले दुःख 
कुणी साधला डाव 

ऐक ! धुवून टाक नदीत पाप
ए चल येडपट एक खून माफ
.
.
.
.
समाधीच्या पायथ्याशी सुरा
एकूणच अस्तित्वाला चिरा 




------कविता

Saturday, 19 October 2013

सूर्याचे पठार

सूर्याचे पठार 



गबाळग्रंथी उनाड माया 
जीव जन्म उन्हात वाया 

रौरव काळीज विखार डोंगर 
अश्रुंचे ठिगळ असेही सुंदर 

तीर तवंग जुना पाठलाग 
मृगजळाचे अनंत भाग 

पोकळ पारंबी कोरडे हुंकार 
फुटके वादय तुटका संचार   

आळोखेपिळोखे वेटोळा गुंफण 
पोटाशी भूक बांधते भिल्लीण  

सावलीत सावली करुण कोप 
रामास वनवास धाडीला निरोप 

नाचती म्हणे परिस्थितीचे दैत्य 
पृथ्वीवर पुन्हा अवतरते सत्य 

ठणकते सत्य शुष्क प्रहार 
तेजाचे वाळवंट सूर्याचे पठार 
.
.
.
.
गबाळग्रंथी उनाड माया 
जीव जन्म उन्हात वाया 


-----कविता 

Friday, 18 October 2013

मनातीत

मनातीत  


एक एकट्याच मनात
गुणगुणावे पाऊस गीत
कधी गवसावे कधी हरवावे
अशी जडते त्याची प्रीत  

उदास साचल्या मनास  
कळतो मग आकाश डोह
फार दुरून येती पक्षी
आळवीत संथ अवरोह

दिसतो गहन मनास 
शांत भीतीचा सुन्न उजेड
काळे कवडसे उजवीता 
जन्मते वेदनेचे खोड 

दूर डोंगराएवढी मातते 
दर्याची खोल जमीन 
दव व्याकुळ अर्थ कोवळे 
शब्द पांघरते उन उन 

एक एकट्याच मनात 
गुणगुणावे पाऊस गीत 
गावा दोहा किंवा अभंग 
मन मनापुढे मनातीत 

-----कविता 

Saturday, 5 October 2013

जत्रा अभिनय आणि प्रवास

जत्रा अभिनय आणि प्रवास 




काहीतरी हरवाव म्हणून भरलेल्या जत्रेत 
भेटते मला एक मुलगी 
बर्फाच्या गोळ्यात बुडालेल्या 
तिच्या रंगबिरंगी फ्रॉकला 
जोडलेली असतात 
तशीच रंगबेरंगी ठिगळ 
ती विचारते मला 
"आभाळात इंद्रधनुष्य कधी येते ?"

सुटलेल्या तिच्या एका वेणीत 
माळते जमिनीवर पडलेलं फुल 
तेव्हा ती वळून पहात नाही मागे  
चित्रविचित्र असणाऱ्या  
आरश्यांच्या जगात 
हसत राहते स्वतःच्या जुळेपणाला 

मी शोधत राहते तिला 
भरलेल्या जत्रेत 



ती खूप एकटी असते तेव्हा 

नटत थटत राहते उगाच 
आरश्यामागे उभे कुणी नाही 
गुडघ्यात मान खूपसलेली 
भास हसणाऱ्या आवाजाचे 

गात राहते असच 
गाणे न झालेली कविता 
न पोचणाऱ्या श्वासात 
स्वप्नाच्या पानगळतीत 

बोलत राहते काहीबाही 
खिडकीपाशी उन्ह येत नाही
अंधार चार युगांचा 
तिच्या ओंजळीला लाभलेला 

ती खूप एकटी असते तेव्हा 
स्पॉटलाईट पडतो तिच्यावर  
ती करत राहते
जिवंत अभिनय



अथांगतेचा प्रवास करणारी 
अतृप्त मृगजळाची तृषा 

आयुष्याने गाठलेला किनारा 
निर्जीव वाळवंटाचा 

खळत नाही डोळ्यातून पाणी 
लिहिल्या जात नाहीत कविता 

सूर्यास्ताचे शिखर 
अंटार्टिकाच्या घुमटात कोंदलेले 



 ------कविता 










Wednesday, 2 October 2013

ग्रेसफुल

ग्रेसफुल 


करुणा वेदना यातना या साऱ्याच भावनांचे आवेग सांभाळता न येणारे अश्रू 
आरश्यात खोलपणे उसवित राहतात ऐकू न येणाऱ्या हुंदक्यांचे श्वास 
कोरडे उधळता न आलेले रंग फसत जातात या मृगजळाच्या प्रतिबिंबात 

"ग्रेस "सर कोणती आहे ही अनोळखी पडझड बहरत्या शिशिराची  
निमिषात परतलेले वादळ कसे सांधते आहे निमित्त सावरण्याचे 
गुढतेला भेटता न आल्याची ही तरंगखुण कुठे हरवून जाईल ? 

कारण मी आळवते आहे आरोह अवरोह संथा न घेतलेल्या मंत्राचे 
शापित आहेत माझ्या सावल्या काजव्यांच्या अंश उल्लेखांनी 
पण मी घेतली आहे गिरकी तल्लीनतेच्या विषप्राशनाने 

अपूर्ण शब्दजलाचे पैंजण बांधले आहे मी माझ्या पायात 
वाळूवर उमटणारे वाऱ्याचे नाद गाठत आहेत किनारा 
त्याचे ते ऐलपैल तीर नाही हे जाणतात समेवर येणारे ऋतू 

विराट पर्वताच्या शापित कंपित दुभंगलेल्या पाषाणावर 
घडली आहे एक मूर्ती देवत्वाच्या निष्ठेची अज्ञात ज्ञाताने 
जणू एकलव्याने केला आहे सन्मान गुरु दक्षिणेचा 

माझ्या भावविश्वाचे एकांताचे शिखर गाठते आहे अंतरंग 
निद्रिस्थ कैफात बुडाले आहेत श्वास सहवास आणि ध्यास 
पाण्यावर कोरले आहेत असंख्य अभंग असंख्य धृवांच्या अढळपदांनी

सांगा सर
या उगम नसणाऱ्या अंताचा आरंभ 


-------कविता 

Friday, 27 September 2013

कवडसे



मनात कोणतेही
स्वप्न उरले नसताना
चांदणे बिलगावे तसे
ओँजळीत भरुन जातात
कवडसे



आकाशाइतकेच उंच वाटावे
आणि तितकेच पोकळही
असे काहीतरी 
मनात घर करून राहते 
जसे घराला नसाव्यात 
दारे खिडक्या भिंती उंबरा 
असलाच तर एक 
कोपरा आहे 
फाडता न आलेल्या 
निखळून न गेलेल्या 
कवितेच्या कागदासारखा 
अनादिपणाचे गोंदण मिरवणारा 
रिता रिता कवडसा  



शब्दांचे खूप ओझे नाही
वाहते आहे निरर्थक त्राण
प्राणाच्या मंद आडोश्यात

पणतीचे उन्ह काजळी धरते
तुझ्या क्षितिजापासून
माझ्या क्षितीजापर्येंत

रिकामा आहे विषाचा प्याला
बहरले आहेत आश्वासक डोळे
वचनाच्या आंधळेपणात



चतकोर उन्हाचा तुकडा
वाट्याला आला तेव्हा
विस्तवावर जळणारे हात
सावलीचे झाले होते

माघारी फिरता न आल्याचे कळले
तेव्हा पावलांना
दगडही होता आले नव्हते
राकट झालेली जाणीव
मातीभर पाऊस सोसत राहिली

आता तोच उन्हाचा तुकडा 
जपत राहते 
या वाळवंटात 
पाउस येण्याआधी 
आणि सावल्या झडल्यानंतर   


विसरताना
सहज निसटुन जावे
हाताच्या ओँजळीतुन

तुटताना
सहज मिटुन जावे
डोळ्याच्या खळग्यातुन

संपताना
सहज उमजुन जावे
ह्रुदयाच्या कोपरयातुन

आताशा जमतय मला
हे सारच 
कवडसे ओवताना 



कळत नकळत दुखावल्या गेलेल्या सावल्यांना
डाग देते रहाते अंधाराची धग
दुपारच्या निर्जीव वेळात
दिसत राहतो हा स्पेक्ट्रम
भिंतीवरच्या जाड्याभरड्या रंगामध्ये

पण स्पर्श ?
न मावणारया ओँजळीच्या
खोल खळग्यात भरुन राहतो
अगदी निर्मळ गंधहीन



ओळखु न येणारे हसु
भिंतीवर भिंतीपल्याड 
दिसु न येणारे स्वप्न
काचेवर काचेपल्याड
विरघळू न देणारे अश्रु
खडकावर खडकापल्याड
भळभळु न येणारी जखम
शेवाळावर शेवाळापल्याड

नुसतच भयाण रेताड
शब्दाचे वाळवंट
आणि कविता ?
छे पुन्हा नाटकच
असताना नसल्याच


------कविता 

Wednesday, 25 September 2013

अज्ञात द्रव्य

अज्ञात द्रव्य 


जुन्या पुसट शंका 
मनात ओल धरु लागतात 
जुन्या जखमा चिखळतात 
आतल्या आत 
तरीही 
थुंकी ओलाडत 
नाही खपलीची 

बेजबाबदार अश्रु 
घरट बांधु लागतात 
काळजात 
पैलपार लागत नाही 
अर्ध्या उष्ट्या वेदनांचा 

जळतात लाकडे 
मरणही बेचिराख होत 
अस्थी म्हणुन 
सांभाळलेल दैवत 
बेमालुमपणे 
तेवढ हातात उरत 

असाही आणि तसाही 
देत राहते कुणीतरी आधार 
ढासळत कुणीच नाही 
कोसळत कुणीच नाही 
तोल सांधायला 
सांत्वनाचा टेकु लागत नाही 

बर्फाचे जंगल 
दिसु लागते मग तिमिरात 
आणि पुन्हा अडगळ 
म्हणुन उरतात तेच प्रश्न 
अज्ञात द्रव्यासारखी 
मात्र सांभाळली जातात 
उत्तर 


---कविता

Sunday, 22 September 2013

सफर आवडत्या गाण्याची --- नाट्यगीते (बालगंधर्व पूर्वार्ध )

सफर आवडत्या गाण्याची --- नाट्यगीते (बालगंधर्व पूर्वार्ध )


शंभर वर्षाहूनही अधिक मराठी मनावर साम्राज्य गाजवणारे संगीत म्हणजे नाट्यसंगीत या ओळखीतच नाट्य संगीताची जादू आहे .नाटक आणि नाट्यगीते म्हंटल्यावर डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात ते म्हणजे बालगंधर्व त्यामुळे या सफरच्या गप्पा गंधर्वकालीन नाट्यगीते आणि गंधर्व उत्तरकालीन नाट्यगीते अशी करू . भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार नाट्य (अभिनय ) साहित्य (लेखन ) गायन वादन आणि नृत्य आदि पाच कलांचा महासंगम म्हणजे नाटक . विष्णूदास भावे यांनी स्थापन केलेल्या मराठी रंगभूमीची सुरुवात अशाच काही समृद्ध इतिहासाने झाली . काकासाहेब खाडीलकर जे की टिळकाच्या विचारांचे समर्थक म्हणून ओळखले जात तसेच राम गणेश गडकरी यांसारखे श्रेष्ठ कवी साहित्यिक आणि रंगकर्मी स्वतः गोविंद बल्लाळ देवल यांसारखे थोर नाटककार लाभले . गोविंदराव टेंबे ,मास्तर कृष्णराव खुद्द भास्करबुवा बखले यांसारखे संगीतकार तर बालगंधर्व, दिनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले ,बापूसाहेब पेंढारकर , असे एकाहूनही एक दिग्गज गायक आणि नट . एकूण तो काळ संगीताचा सुवर्णकाळ म्हणून वर्णन करता येण्यासारखा . तर अशा सत्तर दशकाहूनही जुनी असणारी गाणी ऐकण्याचे वेड अर्थातच वडिलोपार्जित . याचे कारण पु ल च्या भाषेत सांगायचे तर "माझ्या वडिलांनी बालगंधर्व ऐकले मी ऐकले आणि आजची तरुण पिढी देखील ऐकते तेव्हा कौतुक वाटते पण हा चमत्कार बालगंधर्वांच्या सुरांच्या कैवल्य स्वरूपाचाच " हे अगदी तंतोतंत खरे . मला नाट्यगीत ऐकण्याची सवय आवड वर म्हटल्याप्रमाणे माझ्या बाबांमुळे लागली ते स्वतः अनेकवेळा नाटकातील पद गाऊन बंदिशीची पद कशी होतात मग बंदिशीवरून राग कसा ओळखायचा त्या रागाचा अनुभव मूड अस सार काही ते सांगत अजूनही हि तालीम चालूच असते ,जसे की स्वयंवर नाटकातील अनृतचि गोपाला हे मल्हार रागातील पद मग मल्हार म्हणजे दुपारचा मालकंस अशा त्याला दिलेल्या सुंदर उपमेपासून तानसेन याने मल्हाराचा मिया मल्हार कसा केला अशा सुरांच्या देखण्या कथा वर्णन करून सांगताना या पदातील 'गोपाला ' म्हणताना बालगंधर्वांनी सुरांची गोलाई  कशी आणली याची अगदी शास्त्रशुद्ध चिकित्सा अर्थातच माझ्या आवडत्या नाट्यगीतापैकी हे अधिक आवडते पद आहे 


अनृतचि गोपाला मृत्यू आला, यश ना शिशुपाला ॥
कटु वार्ता ती ऐकता, हृदयी बोले सखा मज 'तुजला वरियले' ॥


या पदाला संगीत दिले आहे भास्करबुवा बखले यांनी , जुन्या बंदिशी मोडून तिला नाट्यपदाचे स्वरूप देऊन संस्थानिक राजे महाराजे यांच्या महालात शिक्षा भोगणाऱ्या या रागदारींना बखले गुरुजींनी मुक्त केले ,सामान्य लोकांपर्येंत अभिजात संगीत म्हणून ओळखले जाणारे शास्त्रीय संगीत पोहोचले पाहिजे त्यासाठी आधी मोठा श्रोतृवर्ग निर्माण होणे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि नाट्यसंगीतांच्या माध्यमातून त्यांनी मोठी सांगीतिक चळवळ उभारली . आता या पदाच्या गीतलेखनाबद्दल हे गीत कृष्णाजी खाडीलकर यांनी लिहिले आहे . काहीशी किचकट म्हणता येईल अशी शब्दांची मांडणी त्यांच्या अनेक गीत लेखनातून आढळून येते पण त्या वेळेच्या नाट्यगीतांची 'डिमांड' शब्दांची नसून सुरांची होती आणि बंदिशीचे मराठीकरण हा देखील मुद्दा होताच त्यामुळे हि क्लिष्ट शब्दांची गुंफण हाच या लेखनाचा स्थायीभाव असावा  . आणि या गाण्याला आवाज दिला आहे तो बालगंधर्वांच्या रुक्मिणीने बालगंधर्व यांच्यानंतरही अनेकांनी त्यांची पदे गायली त्यापैकी माणिक वर्मा यांच्या आवाजातही हे पद खुलून दिसते . वर म्हंटल्याप्रमाणे यातील शब्दांकडे लक्ष फारसे न जाता सुरांकडे मन ओढले जाते ,याच नाटकातील जोगीया थाटातील 'मम मनी कृष्ण सखा रमला ' आणि भीमपलासातील 'स्वकुलतारक सुता ' अशी दोन पदे आवडतातच पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात त्यापैकी स्वकुलतारक सुता पाहू 


स्वकुल तारक सुता, सुवरा वरुनि वाढवी वंश वनिता ॥
सुखविला नच जनक, न माता, ऐशी कांता नरकरता ॥


स्वगृही जी मुलगी तिच्या मात्यापित्यांना सुखी ठेवत नाही ती सासरी तरी कशी गृहकृत्यदक्ष स्त्री म्हणून ओळखली जाईल अशा प्रकारचा प्रश्न रुक्मिणी तिच्या वडील भावाला अर्थात रुक्मिला विचारते आहे 

बालगंधर्वांच्या प्रसिद्ध आणि गाजलेल्या भामिनी सुभद्रा सिंधू रुक्मिणी कान्होपात्रा या भूमिकांपैकी सर्वाधिक लोकांच्या मनावर ठसा उमटवणारी संयमी समंजस प्रेमळ आणि मृदू स्वभावाची रुक्मिणी अधिकाअधिक लोकप्रिय झाली होती . कित्येकवेळा एकच प्याला नाटकातली सिंधूची भूमिका पार पडल्यावर त्यांना त्याच गावी त्या प्रेक्षकांसमोर रुक्मिणीचे स्वयंवर देखील रचावे लागे . पुण्याच्या बालगंधर्व नाट्यमंदिरात याच भूमिकेतील मोठे तैलचित्र लावलेले दिसून येते . अर्थात थोर कलावंताच्या भूमिकांमध्ये असे फरक करणे योग्य नाही . तरीही रुक्मिणी आणि सिंधू या सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या हे तितकेच खरे . आता या पदाच्या रागाबद्दल थोडेसे भीमपलास म्हणजे बालगंधर्वांच्या आवाजाला चढलेला साज बहुतेक रागांची सुरुवात षड्जापासून होते तर भीमपलासाची निषादपासून ,मैफिल फारशी रंगत नाही हे गायकाच्या लक्षात आले की तो भीमपलास गातो अशी या रागाची ओळख आहे , एकूण मोठा जादुई राग आहे आणि अशा रागाला पुन्हा आपल्या आवाजाने मोहित केले आणि प्रेमात पाडले ते गंधर्वांनी .  नी सा ग म प नी सा या सरगममधील निशादाला गंधर्व पोहोचतात तेव्हा आपण खरच काही अलौकिक ऐकत आहोत हे हृदयाला कळाल्यावाचून राहत नाही इतके मधुर सुरांचे चांदणे मनावर अभिषेक करत राहते . उस्ताद अल्लाहदिया खान जे कि भास्करबुवा बखले यांचे गुरुवर्य हे एकदा गंधर्वांचे स्वयंवर नाटक पाहण्यास आले होते तेव्हा याच गंधर्वांच्या पदाने ते भारावून गेले आणि त्याच भारावलेल्या अवस्थेत त्यांनी रंगमंचावर येऊन गंधर्वांची गळाभेट घेतली मग पुन्हा सारे भानावर आले आणि नाटक पुढे गेले स्वतः अल्लाहदिया खान त्यांच्या एका मुलाखतीत म्हणतात परमेश्वराशी अनुसंधान साधण्याचे सामर्थ्य गंधर्वांच्या गाण्यात आहे आणि मला वेळोवेळी याचा प्रत्यय आला आहे त्यांच्या भीमपलासातील एका पदाने अक्षरशः मला सुरांनी नाहू घातले आणि तेव्हापासून मी त्यांचा चाहता आहे . अशीच गंधर्वांच्या सुरांची मोहिनी पडलेली सौभद्र मानापमान शारदा एकच प्याला संत कान्होपात्रा नाटकातली अनेक रसातील पदे आहेत ती आता एकेक करून पाहू 


खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ॥

नभि जनहितरत भास्कर तापत
विकसत पहा नलिनी ॥

पिडित जन देखता, स्वसुखा त्यागी दया ।
जनभयहरण हेचि सुख, सदया देवराया ।
दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेमलहरी
गुणरसपान हेचि सुख, प्रेम तया नाव जनी ॥

स्त्रियांचे सौंदर्य श्रेष्ठ कि पुरुषाचे कर्तुत्व हा तसा सनातन चालत आलेला वाद आहे . सौंदर्य तसे शास्त्र कि कला हा प्रश्न मलाही नेहमीचा पडणारा प्रश्न तरीही सौंदर्य हे प्रासादिक असल्यास ते हृदयाला अधिक भावते त्यामुळे सौंदर्य ही कलाच होय असे म्हणणे इष्ट ठरेल . तर असे हे सौंदर्य आणि या अशा सौंदर्याला सहज जिंकून घेणारे धैर्यधर याचे कर्तुत्व अशा पार्श्वभूमीवर असणारे हे नाटक यातील नायिका भामिनी हे पद गाते आहे सौंदर्य असो वा कर्तुत्व जर अधिष्ठान प्रेमाचे असेल तर या दोन्हीची काय कथा हेच भामिनी तिच्या सुरातून सांगते आहे . 'खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ' खरे प्रेम कशाचीच अपेक्षा लोभ धरत नाही . पिडीत दुःखी लोक पाहून जे स्वसुखाचा त्याग करते ते प्रेम अगदी प्रेमाची विश्वात्मक व्याख्या सांगणारे हे पद मला आता या क्षणी वि स खांडेकर यांच्या लघुकथेतील एक वाक्य स्मरते आहे . "प्रेम म्हणजे मोह नव्हे प्रेम म्हणजे भोग नव्हे प्रेम म्हणजे योग तारुण्यपणी रामाने राज्याचा आणि पत्नीचा त्याग केला तो काही उगाच नाही " अर्थात या पदाला भामिनीचा तसा जिव्हाळ्याचा सूरदेखील लाभला आहे  . मघाशीच म्हटल्याप्रमाणे गंधर्वाच्यानंतर माणिक वर्मा हिराबाई बडोदेकर जयमाला शिलेदार कुमार गंधर्व भीमसेन जोशी अनेकांनी त्यांची पद पुन्हा गायली त्यापैकी अलीकडील आवाज म्हणजे आनंद भाटे यांचा गोड गळ्याची तान आणि मधुर आवाज यामुळे गंधर्वशैलीची ते त्यांच्या आवाजातून नेहमीच आठवण आणि त्याचे यथार्थ दर्शन घडवून आणतात पैकी त्यांचे ठायीमधील 'धनराशी जाता ' आणि 'जोहार मायबाप जोहार तसेच वरील पद खरा तो प्रेमा मी पुन्हापुन्हा ऐकत राहते 

मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली ।
वाटतें दुजा सुदाम मज दिसेल त्या स्थळीं ।

गंधर्वांनी त्यांच्या अल्पवयात नव्याने साकारलेली भूमिका असे शारदेचे वर्णन करता येईल संगीत गीत आणि दिग्दर्शन असे त्रयींचे सूत्रधार असणारे देवल मास्तर यांच्या संगीत शारदा नाटकातील भीमपलास रागातील हे पद बलसागर तुम्ही वीर शिरोमणी ,मूर्तिमंत भीती उभी यासारखी अनेक पदे निव्वळ गंधर्व यांच्यासाठी लिहिली आणि संगीतबद्ध केली आणि त्यांच्या नावे ती अजराअमर झाली . भीमपलास बागेश्री मल्हार जोगिया  तोडी या रागातील गंधर्वाची पदे ऐकणे म्हणजे मोठी पर्वणीच . सदरचे पद मूर्तिमंत भीती उभी गंधर्व गाताना अक्षरश भीती समोर उभी रहायची असे प्रेक्षक आणि नाटकाचे वादकही सांगत असत . पैश्याच्या हव्यासा पोटी सोळावयीन मुलीचे लग्न तिच्या वयाहून दुप्पट तिप्पट असणाऱ्या जरठ म्हातारयाशी लावून दिले जाते  ,तेव्हा तिच्या मनाची होणारी घालमेल तिच्या किशोरवयीन स्वप्नांचा होणारा चुराडा अशी तिच्या भावनाची प्रत्यक्षदर्शी भूमिका शारदा नाटकात लिहिली गेली आहे साकारली गेली आहे . स्वातंत्रपूर्व काळात भारतात अनेक सामाजिक सुधारणा घडून आल्या घडवून आणल्या त्याचेच चित्रण करणारे एक सामाजिक नाटक म्हणून याची नोंद घेता येईल ( सांगलीचे सरकार चिंतामणराव पटवर्धन यांच्यावर हे नाटक लिहिले गेल्याचे सांगितले जाते म्हणून सांगलीत या नाटकावर बंदी उठवण्यात आली होती असे ऐकिवात आहे ) . हे नाटक प्रथम मिरजेच्या नाट्यगृहात सादर झाले या भूमिकेतून नटी म्हणून रंगभूमीवर पहिल्यांदाच पदार्पण करून  बालगंधर्व गायले ते पद असे होते

अजुनि खुळा हा नाद पुरेसा कैसा होइना ।
नाटक झालें जन्माचें मनिं कां हो येइना ॥

व्यसनें जडली नवीं नवीं, कुणि तिकडे पाहिना ।
नांव बुडविलें वडिलांचे कीर्ति जगीं माइना ॥ 

प्रोपर्टी विकून त्या काळात लोकांनी नाटक पाहिल्याचे सांगितले जाते ,त्यामुळे नाटक पाहणे हे व्यसन आणि निषिद्ध देखील मानले जाऊ लागले अर्थात यात गोऱ्या साहेबाला आवडत नाही म्हणून आपणही पाहायचे नाही असा भाग होताच पण या व्यसनाच्या पुढेही या कलेची महनियता दडली आहे . गंधर्वांनी गायलेले हे पहिले पद त्यांच्या आयुष्याचे गाणेच होऊन राहिले "नाटक झाले जन्माचे " हा सुदैवी म्हणावा कि दुर्दैवी म्हणावा पण योगायोग खरा ठरला . सदर लेखात बालगंधर्वाच्या रुक्मिणी भामिनी आणि शारदेबद्दल लिहिले पुढील लेखात कान्होपात्रा सिंधू सुभद्रा आणि सयुंक्त मानापमान याबद्दल बोलूया . त्याव्यतिरिक्त दिनानाथ मंगेशकर तात्या लोंढे बापूसाहेब पेंढारकर मास्तर कृष्णराव यांच्याही नाट्यपदाविषयी स्वतंत्र लेखनाचा विचार आहे आणि तो मनात तसाच रुजवते गंधर्वांच्या गाण्याचा पूर्वार्ध संगीत विद्याहरण नाटकातील देवयानी भूमिकेसाठी गंधर्वांनी गायलेल्या बागेश्रीच्या पदाने करते  .बागेश्री नेहमीच चांदण्यात आरंभ करून उत्तरोउत्तर रंगत जाते रंगवत जाते तशीच ही सफर घडत जावो अशी नटराजच्या चरणी प्रार्थना तर "आता राग देई मना "

आतां, राग देई मना शांततेला, वीर हा असुरसंहार झाला ॥
कोप दुर्गचि खरा दुर्बला जाहला, विजयदायक मला, बंदी याला ॥ 


-----कविता मोकाशी 

Saturday, 21 September 2013

ओर्कुटवासी ते फेसबुकबासी

ओर्कुटवासी  ते फेसबुकबासी 

फार फार वर्षापुर्वी एक ऑरकुट नावाचा ग्रह होता तिथे अनेक वर्षाँची मानवाची वस्ती होती जीमेल हॉटमेल याहु मेसेजर रेडीफबोल आणि स्वतः ऑरकुट असे ग्रह गुगल या सुर्याभोवती फिरायचे सार काही आनंदात सुरु होते पण हळु हळु मानवात असणारया अमानवी व्रतीमुळे अपारंपारिक उर्जेचा अर्थात त्याच्या संवादाचा स्त्रोत अधिक वापरल्याने टंचाई निर्माण झाली लोक न बोलता एकमेकांसोबत बोलु लागली ,एका निराश झालेल्या ऑरकुटच्या व्हर्च्युअल नातुला नातीला मी कसे त्यातुन बाहेर काढले याच्या गोष्टी आजी झोपताना सांगु लागली .तर आजोबा एका समुहाच्या विद्वान मालकाच्या घोड्याला आपण कशी पेँड खायला घातली ते फिरायला जाताना त्यांच्या मित्रांना सांगु लागले .सकाळच्या नाष्ट्याला टेबलावर काय मेनु करायचा याऐवजी आई केलेल्या पदार्थाचे फोटो काढु लागली बाबा नाटकाला जाऊन आलेल्या तिकीटाचे फोटो काढु लागले . पोर पोरी फक्त ऑरकुटवर फोटोवर येणारया कमेँटसाठी लोणावला माथेरान फिरु लागले . 

अचानक एके दिवशी ऑरकुट बुडणार अशी बातमी ट्विटर वरची चिमणी एका परग्रहवासीँयाकडून घेऊन आली . ही बातमी सर्वात आधी ह्रुतिक रोशनचे प्रोफाईल पिक्चर लावलेल्यांना मिळाली असे इतिहासकार म्हणतात . आणि या बातमीने घाबरुन गेलेले ऑरकुटवासी चिँतित झाले . तेव्हा मुंगेरीलालच्या स्वप्नात येऊन देवाने सांगितले परग्रहवासियांची मदत घेऊन तुम्ही फेसबुक जलाशयाकडे प्रस्थान करावे तिथे पुन्हा नवी जीवस्रुष्टी मी स्थापन करेन . तर अशाप्रकारे ऑरकुटवासी फेसबुकवर आले पुढे त्यांनी फार्मव्हिलेवर शेतीचा शोध लावला नंतर सिटीव्हीलेवर घराचा शोध लावला अशाप्रकारे पुन्हा आपल्या प्रगतीचे दगड भिँती या फेसबुकवर रचायला सुरुवात केली पण काही संशोधकाच्यामते फेसबुकदेखील ऑरकुटप्रमाणे बुडणारे आहे त्यासाठी त्यांनी आत्तापासुनच सुपर अर्थफेसबुकच्या शोधात आहेत त्यासाठी त्यांनी कितीतरी छोटे मोठे निम्बस बझ व्हॉटस अप्पं यासारखे मानवनिर्मित उपग्रह मायाजालाच्या अवकाशात सोडले आहेत . तेव्हा अधिक चिँता करु नये ,आपल्या विश्वात रममाण असावे 

-----कविता मोकाशी

अनारकली

अनारकली 

नीतीच्या चौकटीनुसार 
चौकट आणि भिंत राजमहालासही होती
नव्हता तो फक्त उंबरा
पायधुळीच्या बंधनाने
ओलांडला जाणारा
पण माझ्या पायात होती
घुंगराची बेडी
महालाच्या नीतीमत्तेनुसार 

तरीही वेगळेच होते
त्या राजमहालात
उंबरयाच्या आतले जग
आणि बाहेरचे जग
न्यायाच्या कायद्यात
जखडलेल्या तुरुंगात
मी कारावासी झाले तिथे 
कारण
देहापासुन आत्म्यापर्यँत
मुक्त करणारया प्रेमाने
बांधल होत मी मला
प्रेमगाथेचा गौरव
फक्त मृत्यूच करतो
हे ठाऊक होते मला
दार नसलेल्या भिंतीवर 
ठोठावत राहिले
अंधाराला अंत नसतो

न्यायदानाच्या पुण्याने 
भिंतीत गाडले 
ते फक्त त्याचे आंधळेपण 
अनारकली ओलांडते आहे
या काळोखापल्याडच्या 
शापाच्या उजेडाला 
राजमहालाचा नसलेला 
उंबरा होऊन 

कविता

मिसरे (गझल )

मिसरे (गझल )


तुझ्यासारखे दिसती मिसरे
कपट नितीने हसती मिसरे

रंक राव ना भेद कुठेही
इथे जुगारी पिसती मिसरे

हातामधुनी सुटला हात
आठवणीने फसती मिसरे

प्यादे नाही वजीर नाही 
फकीर वेडे असती मिसरे

आसपास ना कोणी माझ्या
इथे तिथे मग डसती मिसरे

कविता

सती

सती 

मालवुनी सांजवेळा 
बैसली मोगरा मालती 
पश्चिमेच्या पिठावरी 
गेली होती कुणी सती 

कंकणवेळा तशा बांधुनी 
पानातुनी जळला मोहर 
स्पंद स्पंद जोगियाचा 
आर्त कुणी लाविला स्वर 

क्षय झाला क्षय झाला 
मावळतीचा सुर्य किनारा 
मधुन उठल्या दोन ज्वाला 
तरीही ना विझला वारा 

या धरणीचे त्या धरणीला 
नव्हता इतकाही मागमुस 
ब्रम्हांडाच्या हजारकडातुन 
अस्ताचा तो दिव्यपुरुष 

अंधाराचे जग आता सारे 
अस्तित्वाने झाले नागडे 
दुरदुर निघुन गेली सती 
घेऊनी हेच माझे साकडे 

----कविता

Wednesday, 18 September 2013

'प्रश्न'

प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी करुन प्रश्नापासुन दुर पळण्याची माझी सवय . 
उथळ वाटणारी उत्तर देखील कधी शोधावी वाटली नाहीत . 
त्यामागची कारण काय असावीत हे मला ठाऊक ना त्याला . 
तो म्हणजे दारात येऊन थांबणारा ,गाडीला किक मारणारा ,खिडकीतुन बोलवणारा तो नाही . 
तो माझा जन्मदाता नाही तो माझा भाऊ मित्र कुणी नाही .तो म्हणजे  निव्वळ 'प्रश्न' 

या  प्रश्नाला उंबरा समजुन ओलांडता येईल पण चौकटीची बंधन त्याला असतीलच  की 
जुन्या वाड्यात शोभेसाठी ठेवले जातात ओँडके तसा नेऊन ठेऊ याला . 
तस करता काहीही येईल पण उत्तर शोधल पाहिजे .ते उत्तर खर खोट याची न्याय साक्ष होईलच , 
तरीही इथे अडतेच आहे कारण उत्तरापासुन पळण्याची सवय माझी चुकलेली नाही . 
मला जी सवय वाटते ती खरच सवय असावी का ? 
की शेवाळाचे अस्तर लावलेले पाणी असावे………  त्याखाली शांत खोल पुन्हा पाणी  .कोणास ठाऊक ? 

किती किती उपमा दिल्या मी प्रश्न उत्तरांना कधी कधी हा माझा ठार वेडेपणा वाटतो . 
माझ्याच वहीत या असल्या त्रासदायक शिल्पांचे नंतर नंतर बुजगावणे होऊन जाते . 
तरी हा प्रश्न दिसत राहतो . कधी त्याच्या गुढतेचे सौँदर्य मला मोहात पाडते 
पण त्याला नाद किँवा हुंकार नाही . पान गळणारया ऋतुत त्याचे हक्काचे ओझे सांभाळणारे क्षीण देवदूत आहेत . 

हा प्रश्न त्याची चौकट त्याची भिँत .भिँतीवरचे खिळे आणि त्यावर असणारी पौर्टेट 
काचेची गुलाबदाणी त्यावर साचलेली धुळ 
असे भरूनच राहतात प्रश्न कधीही न बदलण्यासाठी ,
जिथे माझा वावर आहे तिथपर्यँत मी शोधली आहेत या प्रश्नांचे अवशेष 
त्यांची पछाडलेले उध्वस्त घर देखील पाहिले आहेत  
जिथे एक जख्ख उन्हाळी म्हातारा आणि म्हातारी राहते 
त्यांच्या पुढे अंगणात खेळतात झिपरया पोरी .अंगास मास नाही एकाच्याही 
फक्त किलकिले हाडांचे सापळे . 

स्मशान तर नसावे ना या कल्पनेने दचकुन मी जागी राहिले 
त्यानंतर निजवले जोजवले नाही या प्रश्नांनी .
भुकेने व्याकुळलेले जीव झोपतात तेव्हा असेच काही घडत असावे .
तरीही शोधते आहे या प्रश्नांची जातकुळी 

नाती मैत्री प्रेम व्यव्हार इथेच संपत नाहीत त्यांच्या खाणाखुणा .
हे न मानवणारया डोळ्याच्या प्रतिबिँबाला चष्म्यासारखे दिसु लागतात प्रश्न ,
पण ते संन्यस्थ आणि अढळ ध्रुवपदासारखे .
पण उत्तर पारदर्शी लख्ख या भिँतीपल्याड आरशामागे जिथे एक ना एक दिवस पोचेल मी . 
सिँड्रेलाचे सापडलेले दुसरे बुट घालुन . बाराचे ठोके पडायच्या आत . 
पण तेव्हाही प्रश्न संपले नसतील 
जे दोन डोळ्यांनी पाहिले ते हजार डोळ्यांचे दिसतील काळाच्या विराट रुपासारखे .

----कविता मोकाशी"

तत्वज्ञान आणि मूळपुरुष

तत्वज्ञान आणि मूळपुरुष

तत्वज्ञानाचे वडील सांगतात

पुढील सात पिढ्यांना पुरेल
इतके अमाप धन मी कमावले

तु करु काहीच नको
जपुन ठेव माझा ठेवा
किडा मुंगी वाळवी 
लागु देऊ नको

किँवा 
याच साठवलेल्या
अमाप राशीवर चढ पहा
तुला तेच दिसेल
जे मला दिसले

पण तत्वज्ञानाला 
चढायचे नाही त्या शिखरावर
वा जपायचे देखील नाही 
तो ठेवा
त्याला शोधायची आहे
अनुभवाची यात्रा

सिध्द तेच होईल
असे वाटते 
तत्वज्ञानांच्या वडिलांना
विज्ञानाइतके आयुष्य 
वस्तुनिष्ठ का नाही ?
प्रत्येक आयुष्याच्या शोधानंतर
जुना सिध्दांत नव्याने सिध्द
काळाच्या ओघाला
असावे का एखादे छिद्र ?
जिथे ऋणातच भागले जातात
अवशेष इतिहासाचे

तत्वज्ञानाच्या मुळपुरुषाकडे
असतील यांची उत्तरे ?
नसतील
तत्वज्ञानाला एकच पिढी असते
जन्मोजन्मी
त्याला नाही शरीर आणि मन 
पुन्हा जन्म घेणारे"



-----कविता 

Sunday, 15 September 2013

सफर गाण्याची --- भाग एक

सफर गाण्याची


गाणी संगीत नाटक कला हा मराठी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय ,चार मराठी माणसे एकत्र आली तर त्याचे नाटकच होते असा एक म्हणण्याचा प्रघात ,पण केवळ मराठीच कशाला संपूर्ण भारतीय संस्कृतीत कलाजीवन हे समृद्ध आहे ,साध्यासुध्या सण परंपरेत पूर्वीच्या जुन्या स्त्रिया बायकांनी ओवी गाणी पाळणे अभंग भजन भोंडला यामधून हा ठेवा अधिकच अनमोल करून ठेवला आहे . महाकाव्य म्हणून वर्णन केले जाणारे वाल्मिकी रामायण हे देखील अयोध्या दरबारी अनेक श्रुती राग ताल लय यात गुंफून गायले गेले असे सांगितले जाते .तर सांगण्याचा मतितार्थ इतकाच की गाणी गायन हा आपल्या सार्यांच्याच जगण्यातल्या अविभाज्य घटक आहे , मी तर खूप तर्हेतर्हेची गाणी ऐकत असते लोकगीतापासून ते अगदी आरती कविता कीर्तने आणि चित्रपटगीतापासून ते अगदी अल्बम पर्येंत . बडबडगीतापासून ते शकिराच्या गाण्यापयेंत ,तशी मी खूप छंदीष्ट नादीष्ट असल्याने मग अश्याच काही दुर्मिळ आणि मनापासून भावलेल्या गाण्याची गुंफण मोबाईलच्या music player मध्ये केली जाते . मग शफल बटन प्रेस करून कानात हेडफोन घालून सुरु होते सफर गाण्याची . नुकताच गणपती उत्सव पार पडला ,यात रोज नवनव्या आरत्या गायल्या जातात त्यापैकी श्री पंचायतनची आरती मला म्हणायला खरोखरच खूप आवडते . पंचायतन म्हणजे गणपती शिव हरी भास्कर आणि अंबा आदि देवतांचे अधिष्ठान या आरतीतील प्रत्येक कडव्यात या देवतांची स्तुती वर्णन केले आहे

जय देव जय देव सुखकरमूर्ती ।
गणपति शिव हरि भास्कर अंबा सुखमूर्ती ॥ ध्रु० ॥
अघसंकट भयनाशन सुखदा विघ्नेशा ।
आद्या सुरवरवंद्या नरवारणवेषा ॥
पाशांकुशधर सुंदर पुरविसी आशा ।
निजपद देउनि हरिसी भ्रांतीच्या पाशा ॥ जय० ॥ १ ॥
नंदीवाहना गहना पार्वतिच्या रमणा ।
मन्मथदहना शंभो वातात्मजनयना ॥
सर्वोपायविवर्जित तापत्रयशमना ।
कैलासाचलवासा करिती सुर नमना ॥ जय० ॥ २ ॥
पयसागरजाकांता धरणीधरशयना ।
करुणालय वारिसी भव वारिंजदलनयना ॥
गरुडध्वज भजनप्रिय पीतप्रभवसना ।
अनुदिनिं तव कीर्तनरस चाखो हे रसना ॥ जय० ॥ ३ ॥
पद्मप्रबोधकरणा नेत्रभ्रमहरणा ।
गोधनबंधनहर्ता दोतक आचरणा ।
किरणस्पर्शें वारिसि या तमआवरणा ।
शरणागतभयनाशन सुखवर्धनकरणा ॥ जय० ॥ ४ ॥
त्रिभुवनौत्पत्तिपालन करिसी तूं माया ।
नाहीं तुझिया रूपा दुसरी उपमा या ।
तूझा गूणगनमहिमा न कळे निगमा या ।
करुणा करिसी अंबे मनविश्रामा या ॥ जय० ॥ ५ ॥

सामासिक आणि संधीयुक्त शब्द संस्कृतप्रचुरता आणि सुरस चाल यामुळे अगदी एखाद्या वेदोक्त पुराणोक्त वाटाव्या अश्या सुक्तांची आठवण या आरतीमुळे झाल्यावाचून राहत नाही . तसा संस्कृत भाषेचा आणि माझा घरोबा फारसा नाही त्यामुळे संस्कृत भजन किंवा गाणी असे फारसे मुद्दामहून ऐकण्यास मिळाले नसले तरी सुब्बालक्ष्मि यांनी गायलेले अन्नपूर्णाष्टक जे की आद्य शंकराचार्य रचित आहे ते नेहमी ऐकत राहावे असे

नित्यानन्दकरी वराभयकरी सौन्दर्य रत्नाकरी
निर्धूताखिल घोर पावनकरी प्रत्यक्ष माहेश्वरी ।
प्रालेयाचल वंश पावनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥ 1 ॥

नाना रत्न विचित्र भूषणकरि हेमाम्बराडम्बरी
मुक्ताहार विलम्बमान विलसत्-वक्षोज कुम्भान्तरी ।
काश्मीरागरु वासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥ 2 ॥

योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मैक्य निष्ठाकरी
चन्द्रार्कानल भासमान लहरी त्रैलोक्य रक्षाकरी ।
सर्वैश्वर्यकरी तपः फलकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥ 3 ॥

कैलासाचल कन्दरालयकरी गौरी-ह्युमाशाङ्करी
कौमारी निगमार्थ-गोचरकरी-ह्योङ्कार-बीजाक्षरी ।
मोक्षद्वार-कवाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥ 4 ॥

दृश्यादृश्य-विभूति-वाहनकरी ब्रह्माण्ड-भाण्डोदरी
लीला-नाटक-सूत्र-खेलनकरी विज्ञान-दीपाङ्कुरी ।
श्रीविश्वेशमनः-प्रसादनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥ 5 ॥

उर्वीसर्वजयेश्वरी जयकरी माता कृपासागरी
वेणी-नीलसमान-कुन्तलधरी नित्यान्न-दानेश्वरी ।
साक्षान्मोक्षकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥ 6 ॥

आदिक्षान्त-समस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी
काश्मीरा त्रिपुरेश्वरी त्रिनयनि विश्वेश्वरी शर्वरी ।
स्वर्गद्वार-कपाट-पाटनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥ 7 ॥

देवी सर्वविचित्र-रत्नरुचिता दाक्षायिणी सुन्दरी
वामा-स्वादुपयोधरा प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी ।
भक्ताभीष्टकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥ 8 ॥

चन्द्रार्कानल-कोटिकोटि-सदृशी चन्द्रांशु-बिम्बाधरी
चन्द्रार्काग्नि-समान-कुण्डल-धरी चन्द्रार्क-वर्णेश्वरी
माला-पुस्तक-पाशसाङ्कुशधरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥ 9 ॥

क्षत्रत्राणकरी महाभयकरी माता कृपासागरी
सर्वानन्दकरी सदा शिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी ।
दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥ 10 ॥

अन्नपूर्णे सादापूर्णे शङ्कर-प्राणवल्लभे ।
ज्ञान-वैराग्य-सिद्धयर्थं बिक्बिं देहि च पार्वती |
माता च पार्वतीदेवी पितादेवो महेश्वरः ।
बान्धवा: शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥ 11 ||


सुब्बालक्ष्मी यांनी भजे गोविंदम ,व्यकंटेशसुप्रभात ,दासअवतारस्त्रोत्र ,पंचायतन स्त्रोत्र ,अशा अनेक संस्कृत स्तोत्रांनी कर्नाटकी संगीताला एक नवा चेहरा दिला त्यापैकीच त्यांनी गायलेले मधुराअष्टक जे की वल्लभाचार्यानी लिहिले आहे  त्यातील नादमधुरतेमुळेचे केवळ सहज वाचतानाही गुणगुणत रहावे असे आहे

अधरं मधुरं वदनं मधुरं
नयनं मधुरं हसितं मधुरम् ।
हृदयं मधुरं गमनं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ 1 ॥

वचनं मधुरं चरितं मधुरं
वसनं मधुरं वलितं मधुरम् ।
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ 2 ॥

वेणु-र्मधुरो रेणु-र्मधुरः
पाणि-र्मधुरः पादौ मधुरौ ।
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ 3 ॥

गीतं मधुरं पीतं मधुरं
भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् ।
रूपं मधुरं तिलकं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ 4 ॥

करणं मधुरं तरणं मधुरं
हरणं मधुरं स्मरणं मधुरम् ।
वमितं मधुरं शमितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ 5 ॥

गुञ्जा मधुरा माला मधुरा
यमुना मधुरा वीची मधुरा ।
सलिलं मधुरं कमलं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ 6 ॥

गोपी मधुरा लीला मधुरा
युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ 7 ॥

गोपा मधुरा गावो मधुरा
यष्टि र्मधुरा सृष्टि र्मधुरा ।
दलितं मधुरं फलितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ 8 ॥


अगदी याच मधुराष्टकाच्या धर्तीवर काहीसे लोकगीतासारखे म्हणजे कोकणातील स्त्रिया तांदूळ सडताना गाणी म्हणत आपापली काम करीत राहताना त्यांच्या इष्ट देवतेचेहि त्यातून स्मरण करतात या पार्श्वभूमीवर मी लिहिण्याचा प्रयत्न केला होता ते असे

चांदुल्या चांदुल्या कपाळी गोँदुल्या
गोँदुल्या गोँदुल्या आभाळी टिकुल्या
टिकुल्या टिकुल्या अंगणात रांगुल्या
रांगुल्या रांगुल्या जणु ग तांदुल्या
तांदुल्या तांदुल्या तांदळाच्या चकुल्या
चकुल्या चकुल्या डुलडुल भिँगुल्या
भिँगुल्या भिँगुल्या फुलफुल रंगुल्या
रंगुल्या रंगुल्या सावळा कान्हुल्या
कान्हुल्या कान्हुल्या काळा विठुल्या
विठुल्या विठुल्या पंढरीचा विठुल्या
विठुल्या विठुल्या माहेरीचा विठुल्या
विठुल्या विठुल्या !!!


तर हि होती सफर आवडत्या स्त्रोत्र मंत्र जप आरती यांची पण या सफरीचा शेवट माझ्या आवडत्या नांदीने करते, खरतर नांदी म्हणजे सुरुवात मग शेवट कसा बरे  ? अर्थातच पुढची सफर नाट्यगीतांची आहे काहीसे विश्लेषणात्मक लिहिण्याचाही त्यात प्रयत्न असेल . काही दीड दोन वर्षापूर्वीच बालगंधर्व यांच्या जीवनपटावर साकारलेल्या चित्रपटात हि नांदी पुन्हा एकदा गायली गेली ,जोपर्येंत हि नांदी आहे तोपर्येन्त मराठी नाट्यसृष्टीला मरण नाही या शब्दात राम गणेश गडकरींनी तिचे कौतुक केले आहे ते यथार्थच आहे म्हणा ना 

पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितो ।
विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥

कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितो ।
जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥

ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्‍न शेवटिं जातो ।
या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥


(नाट्यगीते पुढील भागात )