Pages

Sunday, 16 March 2014

किनारा

किनारा


तुझी अद्भुत वाणी ऐकताना डोहात पाय हरवून जायचे ,
जणू तळ नव्हता या अबोध निश्चल गुंफणाला  . 
तुझ्या दिठीत तुझ्या मिठीत श्रावणाची संध्या 
तुझ्या स्नेहात तुझ्या विरहात आषाढाची ओढ 
सारे सारेच ऋतू तुझ्या अंगणातल्या चाफ्याचे 

तू उदास हरवलेला शब्दावर पानावर एकाकी 
मौनातले संदेश उमटायचे माझ्या तळहातावर 
कधी भिजल्या पापण्यांनी कधी निजल्या ओठांनी 
कुण्या दूरदेशीचा होतास तू राजपुत्र 
मी तुझ्या वाटेवर उमललेल फुल 

सूर्यास्ताचे कळस गाठणारे भग्न मंदिर 
तुझ्या परतीचे वाट पाहणारे दूत 
हळव्या साक्ष वचनांना जागणारा तू 
हळूहळू ओंजळ रिती व्हायची 
वाळूने भरलेली पाण्याने थरलेली 
"तुझा माझा किनारा "पैलतीर गाठायचा 


------कविता 

Saturday, 15 March 2014

मुक्त संदेश

मुक्त संदेश


चुंबिलेस अधर तू भोग की भाग्य माझे
नदीकिनारी दूर वाजती नुपूर चांदण्यांचे
हाकारितो तुजला पुनःपुन्हा माझा देश
तुझी मी माझा तू गा कोकिळे मुक्त संदेश

पाण्यातले चेहरे नभापरी उदास उदास
वल्हव नाव सखया पैलतीरी सावकाश
भेटीत जाहली रे वचन अबोल विस्मृता
कळली परी अडखळली उंबरयावर कविता


-----कविता

Friday, 7 March 2014

'मिडास'



रिकाम्या घरात वावरणारी रिकामी उन्ह
लोभ धरतात पोकळ व्यथांचा
स्पर्श करत जातात या चाहुलीना
एकेक ऋतू एकेक मास
एकेक अनुभव एकेक प्रवास
'मिडास' राजाप्रमाणे
भोगू लागतात ऐश्वर्य
दुःखाच्या मनातल



रेघोट्याच अंगण
पावसाची गाणी
श्रावणाच्या कथा
उमजत नाहीत या उनाड उन्हाला
फुल आणि पारिजात
सारखेच त्याच्या मनाला



पावसासारखा पाऊस
उन्हासारख उन्ह
तान्ह्या झोळीत नांदू दे

कढवलेले दुख
निवळलेले सुख
डोळाभर वाहू दे



------कविता