Pages

Sunday, 2 December 2012

डोळे नसणारे स्वप्न


डोळे नसणारे स्वप्न 



कितीतरी स्पर्शाँचे हुंकार
त्या नेणीवेतच आहेत 
तुझे डोळे दिसतात फक्त
अंधाराला डोळे नाहीत
हे तस ठीकच

स्वप्नांची उत्तर मागितली देखील नसताना
तू उत्तर पहाट दाखवलीस
जेवढी भिती काळोखाची नाही
त्याहुन अधिक 
जांभळ विष सुखाच आकाश
कोणता पर्याय होता मला?
भितीच्या अंगदेहावरचे फुल झाले

आता तू दूर जाशील 
मोठ्या धैर्याने योध्दयासारखा
जणु जे घडल ते स्वप्न अन मी भास
मला मात्र आंधळ व्हाव लागेल
डोळे नसणारया स्वप्नांसारख




-----कविता

आत्मसुख


आत्मसुख

किती अंधार चांदणे
कवडसे नभावर
पखरण सावल्यांची
उन्ह स्वप्नकाठावर

विहरते मेघ नभी
शहारते आतूर मन
गंध हलका उरात
तेच माझे त्याचे धन

बाबर हलके आसु
सावर जरा हुंदका
प्राणवादळा पल्याड
साद निनादतो सखा

हाय माझे कसे मरण
त्याच्या श्रुंगार वेदना
दाह अंगार स्पर्शात
निव्वळ त्याची कल्पना

आत्मसुखात तल्लीन
रेशीम वीणाचे बंध
देह त्याग करे मुर्ती
जसा फुलात सुंगंध


-----कविता

अक्षयचंद्र


अक्षयचंद्र 



नभी दर्पणी कुंकमतिलक
पश्चिमचंद्र भाळावरी
दिशाहीन चांदणे तिमिरज्योत
अधोमुखीचंद्र नयनावरी

स्वरतेज कंठ माधुर्यधुन
आरक्तचंद्र अधरावरी
कैवल्यधार वदन सुकुमार
वदनचंद्र करावरी

पापणी क्षितीज काजळघन
रजनीचंद्र अश्रु गालावरी
रेशीम श्यामल कुंतलफुल
अबोलचंद्र कैफ बटांवरी

मौक्तिक कंठा गळाहार
सुहास्यचंद्र वदनावरी
सौभाग्यभुषण मंगलबंधन
अक्षयचंद्र रुळे वक्षावरी

-----कविता

पाचोळा गीत


पाचोळा गीत


इथे एकलीच मी उरली कशी
जिथे फुल एकटे फुलत नाही
रानथवा नाचे आगीच्या धगीत
पाचोळ्यास गीत स्मरत नाही

भितीपल्याड ते उदास चांदणे
दिव्यात दिसतो तसा उजेड
मावळतीचे झाले आकाश सारे
नका म्हणु मला लागले वेड

फिरणे ना माघारी इथुन माझे
वाटेत आहे लागते स्मशान
संध्यातनुवरी काळोख अंगार
मावळ क्षितीज पुर्वेस दान

-----कविता

राधा


राधा

खेद नाही मला अन ना खंतही
जगा वाटे भोगते मी दुःख वाण
मी तर निर्जीव साक्षात मुर्ती
उरी ल्याले फक्त त्याचे प्राण

कशास उगा खोटे आनंदसोहळे
अन स्वप्नवंचनाची बाधा
आले ओलांडुन केव्हाच पानगळ
मी तर एकरुप त्याची राधा

-----कविता

तो गेला



तो गेला

शब्दनिर्मिती ठरली गौण
तो गेला निमिषात पुढे
मी केला आर्तभक्ती नाद
वाजवुनी कवितेचे चामडे

रक्तअश्रु ना कसला ओघळ
ओठात फक्त दीनगाणी
पाऊस झाला अंगणापुरता
घरात जमली भिक्षानाणी

आता वाटले निजेत उठावे
भेटुन घ्यावे अलिप्त अंबर
शापवंचना अभिमुख माझे
चंद्रडागाचे स्मरले अत्तर

तो गेला तो गेला तसाच
आल्या पावसातून नाहुन
निळी निळी शाई नभाची
मेघ होड्या त्यात वाहुन


-----कविता


हळद उष्टी


हळद उष्टी 



थरथरणारे मोरपीस अन गाल गुलाबी कुसुमसडे
रानथवे नाचती कधीचे हळद उष्टी उन्ह पडे

मंदमंद ओठावर येते नाव त्याचेही अचुकवेळी
गुणगुणते मीच मला की तोच गातो कातरवेळी

पाहूनी मग नभआरसा लाजेत खुलते मी आपसुक
श्शुक कुणा ना सांगायचे झाली आहे त्याची चूक

स्मरुनी सये अता साजण भेटला ग मला श्रावण
प्राजक्ताची थेँबसर चांदणअंगण मोतीशिँपण

हळूहळू उलगडेल मजला त्याची माझी अतूट प्रीत
बंदबंद पापण्यास आहे सुचले स्वप्नगीत स्वप्नप्रीत 




-------कविता 

अखंड


अखंड



मीच मी माझ्यात राहते मग्न
कवितेचा यज्ञ चालला अखंड आहे
तेवते ज्योत पेटला गगनधूर
समिधेत माझ्या मीच उदंड आहे

जरी जगा वाटला धिक्कार माझा
मला सर्वस्वी आहे स्वीकार माझा
मौनगंगेतले असे जरी विश्व माझे
या त्रिखंडात गाजतो अधिकार माझा

कुणा वाटेल वंचना कुणा वाटेल 
अपराजित अहंकार माझा
ध्येयवाटेत आहे गवसला मला
हाच तो जगण्याचा अलंकार माझा

कुठे कापरासम न उरली मी आता
विजेसारखी मी ही लख्ख झाले
कितीदा जळु मी फुलासारखी
दिले दान जगण्याचे मुक्त झाले

मीच मी माझ्यात राहते मग्न
कवितेचा यज्ञ चालला अखंड आहे


-----कविता

जन्म कवितेचा


जन्म कवितेचा


माझ जगण असह्य करणार
त्याच्या मस्तकावरच रागीट शिरांच बांडगूळ
माझ्या कपाळाला एकदाच लावून घेतल की
तो त्याच्या ओँजळीत हुंदक्याच दान मागायचा
विविधरंगी आसवांनी मग
श्वास हुंदक्याची प्रेमकहाणी रंगायची
अन मग
त्याच्या निळ्या जांभळ्या ओठावरची शाई
माझ्या तळहातावरल्या रेघात कोरत
पुन्हा एका कवितेला जन्म द्यायचा

त्याच मला वाचण अखंड चालू असायच
कधी स्वप्नकथेच्या माझ्या बंद पापण्या 
त्याच्या डोळ्याखालून घालायचा
कधी त्याचा चष्मा हलकेच नाकावर चढवून
केसातल्या बटेने गालावर उधळलेली 
वारयाची लेणी वाचायचा
श्वासांची ऋतूचित्रे रेखाटून माझ्या
काळजाच्या वेणाही कवळायचा

त्याने वाचण सोडून दिल
तस मी लिहणही सोडलय
कागद फडफडतो
शाई निसटते
काळीजही गलबलत
पण कवितेचा जन्म होत नाही


-----कविता

तिची दुपार होते


तिची दुपार होते


तिची दूपार होते
ओल्या सांजवेळी
दिवाउजेडात काटते
लाकडाची मोळी

तिच्या काच कुंपणी
येतो रोज वनमाळी
वेचतो वैराग्य कमळे
क्षितीज भरल्या भाळी

तिच्या मंद गालावरी 
पडते एक नक्षत्रफुल
कुणी म्हणे चांदवा
ती म्हणे माझे मूल

तिच्या दारात निजे
खोड वेलीचा मांडव
पानाफुलात ना वारा
रक्ताने भिजले दव

तिच्या मनात नाचे
वांझ पिसारी लांडोर
दुख तिचे एकतारी
गाते चंद्राची कोर

तिची दूपार होते
ओल्या सांजवेळी
दिवाउजेडात काटते
लाकडाची मोळी

-----कविता

Tuesday, 27 November 2012

भक्ती माहेर



भक्ती माहेर

 

दिवा उजेड ओसरी 
माया मंदीर नगरी 
आई लावे निरांजन 
तुळस ग माझ्या दारी 

चंद्र चांदणे चकोर 
पान्हा दुध माहेर 
हाती अम्रुत ओँजळ 
प्राजक्त ग मनोहर 

लागली ग आस आस 
भक्ती माहेराची दास 
करु नमन वंदन 
आर्त जाहला ग श्वास 

कंठ मधूर बासरी 
क्रुष्ण ऐलपैल तीरी 
क्रुष्ण क्रुष्ण राधा राधा 
एकतानता जिव्हारी 

शबरीचा राम राम 
तळ्याकाठी नाम नाम 
उष्टी बोरे चाखितो ग 
विश्वरुपी राम श्याम 

वाळंवटी देशातला 
तिचा एकला शिंपला 
पुजते ग मिराबाई 
घेऊनिया विष प्याला 

कुरुप ती कुबडापरी 
गंध लावे त्याच्या शिरी 
अरुप ते स्वरुप रे 
कुब्जेपरी भक्ती खरी 

अग्नीरुपी ग निर्मळ 
पाण्यापरी ग सजळ 
तिचे रामाचे स्मरण 
अखंड चाले निश्चल 

जोडिले मी दोन्ही कर 
मंत्र स्त्रोत्राते उच्चार 
भाव माझ्या भोळ्यापरी 
उगवली चंद्रकोर 

सांजवेळी स्मरणाते 
चंद्र चांद दव पाते 
आई तुझ्या चरणाशी 
गुंफते मी हेच नाते 


-----कविता


सय तुझ्या काजळाची


सय तुझ्या काजळाची 


सय तुझ्या काजळाची लाव गालावर बोट 
नको लाडिक रुसवे नको ओठावर बोट

रंग कोरडा घनाचा उधळ तू हातावर 
बंद पापणी मिटून पाऊस घे नभावर 

ओढ श्यामल नवल घेते पांघरून वेड 
झाडाची घालून मिठी प्रीती अबोल गाढ 

मंद श्वासात झुलते हळूहळू मखमल 
जळते दूर समई जळे शेवंतीचे फुल 

आता ठेव ओंजळीत फुलपाखराचे रंग 
ओठ हलके स्मरून दे तू ओठाचेच रंग

शून्यात ऐकू दे तुझे माझे भास आवाज 
एकटा तू एकटी मी अहं निव्वळ अंदाज 

बघ मातीवर आले दूर उगवून आकाश 
तू मी क्षितीज स्वप्न झुकले सावकाश 

सय तुझ्या काजळाची लाव गालावर बोट 
नको लाडिक रुसवे नको ओठावर बोट




---------कविता

दगड आणि गिधाड


दगड आणि गिधाड 




कुठेतरी दूर तू ही एकटा आहेस अन मी ही 
पण तुझ एकटेपण तुला पसंत आहे 
मी मात्र विरहाच्या एकेक 
गाठी उकलून जगते आहे 
उसवते आहे 
माझच निर्जीव शरीर 
आणि निर्जीव आत्मा 
एखाद्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे 
शिकारीनंतर कुरतरडणारया मांसाप्रमाणं 

प्रेमाशिवाय माणस निष्ठूर होतात 
माहीत नाही का तुला ? 
कुणी दगडं होतात 
तर कुणी गिधाडं 
फरक इतकाच 
असण्या नसण्याचा 
जो तुझ्या माझ्या एकटेपणात आहे 





-----कविता

धबधबा आणि पाऊस


धबधबा आणि पाऊस 




सारच कस टोकांच ?
मला उंचावरून कोसळणारा धबधबा आवडतो 
आणि तुला उंचवर उचंबळणारा समुद्र 
तरीही तुला पाऊस आवडायचा .......
हल्ली मी मात्र पावसाला टाळते 
दूरच्या अंगणात कोसळताना दिसतो ....
आवाज न करता .....
तुझ्या चिखल ओल्या मातीतल्या पावलांना 
खूप मोलाच वचन दिल होत मी 
तुझ्या वाटेवरून न चालण्याच 
जिथे फक्त आणि फक्त काळोख आहे 
अस तू म्हणाला होतास ....
मला काळोख खूप आवडतो अस नाही पण 
काळोखाच मला आवडण मी तितक टाळूही शकत नाही .
तरीही रंग नसणाऱ्या खिडकीच्या काचा लावून 
काळ्या मेघांचा अंधार पाऊस टाळते आहे .....
माझ्या घरात उजेड नाही आणि काळोख नाही 
फक्त भिंतीवर ओल चढली आहे 
तिचाच एकटीचा काय तो हेवा 
जुन्या लाकडी कपाटात कोंडून 
श्वास गुदमरूनही जात नाहीत 
कसे जातील ?वचन दिलंय मी 
तुझ्या वाटेवर न फिरकण्याच 
तसंही पारिजातकाच फुल समजून 
काच गोळ्या करणाया हाताला 
पाऊस तरी समजेल कसा ?
सांगितलं ना मी 
तो दूरच्या अंगणात कोसळतो आहे 
आवाज न करता ......




------कविता

प्राण


प्राण 


उगा व्यर्थ होते जीणेच माझे
कळा आसवांच्या इथे निँद्य होत्या
दिवा वेदना दीप शमतो कुठे
वारा वीजा नभी वंद्य होत्या

रिक्त श्वास रित्या या घरात
अन हुंदके लागले सुरात
जळाले विस्तवात गाणेच माझे
व्यथांचे काळीज तसेच उरात

दिव्यत्वाची त्यागुन मुर्ती
पाषाण बनले पुन्हा पाषाण आता
अंती माझ्याच वेदनांना 
जसे मुकले माझेच प्राण आता



-----कविता

तो म्हणायचा.......


तो म्हणायचा.......


तो म्हणायचा
चांदण उन्हात सावलीची स्वप्न पाहताना 
डोळे गच्च मिटुन घ्यावेत
मेघ खिडकीवर सरकताना
पडदे हळुच बाजुला सारावेत
काजळवेलीच्या झुकलेल्या
कमानीवरुन
कंकणाचा किणकिण नाद मोहरला की
मग कुंकवाच्या ओठांचा गुलाबछंद आपोआप जडतो राणी
तो म्हणायचा

तो म्हणायचा
विजेची धुन छेडायची तर
आलापीचा सुर झंकार 
कोमल वाजणारया पैँजणातुन झंकारला पाहिजे
आरशावर उमटणारया अस्पष्ट चरयाइतका कोमल
मग आळवायची रागधुनी
चंचल सुंगधी मोगरयासारखी
दोरा नसणारया गजरयासारखी
अन अलगद जवळ येते श्याम भैरवी
तुझ्या अंधारभरल्या डोळ्यांसारखी
तो म्हणायचा

तो म्हणायचा.......


-----कविता

थोडा उशीर झाला


थोडा उशीर झाला 


थोडा उशीरच झाला 
शंकेचे प्रत्येक वारूळ ठेचत आले 
डंख मारणारे विंचू कि सर्प 
कोणास ठावूक 
विषाला कोणती जात असते ?
मी रक्तबंबाळ झाले लढाईत 
हाच काय तो पुरावा 
आजन्मभर तुझी राहिल्याचा 
वेळेत आले असते तर 
नसतेच स्वीकारले तू मला 
थोडा उशीरच झाला 

तू मात्र भुकेने मरून गेलास 
माझी वाट पाहिली नाहीस 
पाण्यात माती मिसळून 
गिळलस व्यर्थ अन्न 
माझ्या वाटणीला नसणार 
भूकेलाही जात नसते 
विसरलेच मी 
उशीरच झाला 
थोडा यायला उशीरच झाला 

तू तुझ्याच घरात रहा 
मी राहते अंगणात 
ना आपली ना परकी म्हणून 
थोडा यायला उशीरच झाला 

------कविता

सरणावरच्या वेली


सरणावरच्या वेली



सरणावरच्या वेलीँनी मरण मागायच असत की
कातड सोलुन निघालेल्या
वळचणीच्या जखमांचे व्रत मागायचे असत ?
उत्तर काहीही असो
स्वतंत्र मरणाचा अधिकार वेलीँचा नाही
आत्महत्येचे फुल होऊन कोणत्याही चाफ्याच्या झाडावर त्यांचा जीव
लटकवला जात नाही
रक्ताचे ओघळ
ओघळाची गाणी
त्यांची नाहीत
ती सरणाच्या लाकडांची
वाळलेल्या लाकडांची
आगीत ठीणगी त्यांना होत येत नाही
त्या जळतात लाकडासोबतच
गुणगुणत नाहीत
स्फुंदत नाहीत
मरणाला सुचत गेल्यासारख्या मुक्त होतात
सरणावरच्या वेली

-----कविता

उत्खनन


उत्खनन



अनादी बीजकोषातून 
मुक्तीचा जन्म घेणारा 
त्याचा अग्नीजन्म
उत्पतीचाही कोळसा व्हावा
एवढी जगण्याच्या निश्चितेने
पाण्याला जाळत राहतो
निखारयाच्या राखेतून
रौद्रतांडवाच्या लाटेवर
स्थापन होते
पार्वतीच्या हातातले त्रिशुळ
आणि मिटतो शंकराचा
उघडलेला तिसरा डोळा
दिसु लागते 
बर्फाचे शरीर धारण केलेला
अग्नीचा आत्मा
.
.
.
.
माझ्या कवितेतले
निर्जीव बर्फाळ विचार
वाचले आहेस कधी ?
पाहिले नाहीस ?
निळे स्थिर झालेले  
शब्दांचे  विषआकाश
जाणवला कधी ?
अक्षरातला निखारयाचा चटका ?
लेखणी फक्त टेकली आहे कागदावर
पार्वतीच्या त्रिशुळासारखी
.
.
.
.
विनाशाच्या उत्पतीचे
माझे विनाकारण उत्खनन
सारया माझ्याच कविता


-----कविता

एकांत


एकांत 


कविता लिहतेस ?
कोणत्या विषयाआशयावर लिहतेस ?
आईवर लेकरावर
मैत्रीवर नात्यावर ?
प्रेमावर भांडणावर?
समाजावर तुझ्यावर ?
सांग ना कशावर लिहतेस ?
मी म्हणाले
फक्त कोरेपणावर लिहते

कोठे लिहतेस
खिडकीपाशी ? कोपरयात
अंधारात ? उजेडात ?
गच्चीत ? झाडापाशी ?
की मनातल्या मनात
मी म्हणाले
फक्त हक्काच्या स्वप्नात

तरीही विश्वास आहे
तुला तुझ्या एकांतावर
मी म्हणाले
अहं 
कवितेवर आहे


-------कविता 

दुष्काळ


दुष्काळ



दुपारच्या भुकेच्यावेळी
ओँजळीच्या तुकड्यात पाणी नाही
फुले नाहीत
सहज हाताळला जातो आहे कवडसा

भेगाळत नाही भुक
साखळत नाही रक्त
उष्ण होत नाहीत पापण्यांचे कड
पडू देत नाहीत
वांझोटीची सावली
कोवळ्या उन्हावर

इंद्रधनुष्य दिसले की
तिच्या गर्भातच 
निजुन जातो पाऊस 

बसत नाहीत कायद्यात
त्याच्या तुझे
दत्तक वारसे
फक्त जाहीर होतो 
दुष्काळ
वांझोटीच्या सवाष्ण मरणासारखा

---कविता

विजयाची प्रतिमा


 विजयाची प्रतिमा



आकाशाला आरसा म्हणाले
आणि पताकांनी दुभंगणारी
माझी विजयाची प्रतिमा
पुन्हा एकदा धुळीत मिळाली

क्षितीजावर इंद्रधनुष्य दिसले
त्याचा विजयाच्या पताका
त्यादेखील 
जमिनीतुन जन्म घेऊन
जमिनीत संपणारया

धुळीत पडणारया पतांकाना
नव्हती लांबी रुंदी उंची
त्याना होते ओझे सावलीचे
तेव्हा मीच झाले माझे उन
मी चेतवुन घेतले आकाश
आणि गोंदवुन घेतला पाऊस 
मी इंद्रधनुष्य झाले .
ध्रुवबाळा ऐकतो आहेस ना माझी कहाणी ?


-----कविता

बंदिवान


बंदिवान 



तुझ्या डोळ्याच्या 
अश्रूकडांनी 
माझ्या डोळ्यात 
ओसंडणार्या वात्सल्य अमृताने 
अमर केले आहे मला 
तुझ्या चरणाशी 

दाही दिशांनी व्यापलेल्या 
तुझ्या क्षितीजपाश हातानी 
वेढले आहे माझ्या 
मेघस्वप्नांना आणिक केली 
आजन्म माझी 
मुक्तता 
तुझ्या हृदयापाशी 

आता 
मरण देखील असेल 
माझ्यासाठी 
मृत आणि बंदिवान 



-----कविता

व्रतस्थ


व्रतस्थ


तू लहान असतास
तान्ह्या बाळासारखा
किती बरे झाले असते
रांगताना चालताना
धडपडला असता
रडला असता
आधाराचा हात
मागितला असतास
घेतला असतात

तू आहेस तत्वज्ञानी
मौनस्थ व्रतस्थ
त्रयस्थासारखा
पोरक आयुष्यदेखील
परक्या नजरेने पाहणारा

मी वाट पाहते आहे
तुझ्या वाट चुकण्याची
दिशा हरवण्याची
खरतर फक्त तुझ्या येण्याची
तू येणार नाहीस
माहित आहे मला

---कविता

अज्ञात झरे


अज्ञात झरे



शब्द बहिरे बहिरे
शब्द भाबडे भोळे
ओठावर फुल तुझ्या
कानातले डुल झुले

शब्द आंधळे आंधळे
शब्द गहिरे कापरे
स्पर्शात तुझ्या अंगार
श्वासाचे अज्ञात झरे


----कविता

कल्पनेचं भिंग


कल्पनेचं भिंग 


अस खरच काही असत ?
अज्ञात अनोळखी अगम्य
आपल्याला न समजण्यापलीकडचे
जिथे शब्द म्हणजे म्रुगजळ होतात
जे मौनातही उलगडत नाही
की सारा मनाचा देखावा 
जिथे नाटक मीच 
प्रेक्षक मीच

मलाच होत आहेत द्रुष्टीभ्रम
कल्पनेच्या भिंगातुन पाहताना
मोठ्या झालेल्या स्वप्नासारखे
वास्तवाची उंची खुजी वाटते
सत्याची खोली उमजणारही नाही 



----कविता 

बोनस लाईफ


बोनस लाईफ



देहावर सोललेले संचिताचे पोफडे
अंगभर दागिन्यांनी झाकुन घ्यायचे
आणि लावायचे तरीही
नजरबंदीचे काजळ
भरुन येता उन उन पाणी
आणि पहात राहायच
आरश्यामागच्या रिकाम्या जागा
मी नव्हतेच कधी अशी
उधारीच कपाळ मागितल
माझ्या कपाळवरच्या कुंकवासाठी
तेथेच सार बदलल
पुन्हा कधी न बदलण्यासाठी

आता भरुन येतील जखमांचे टाक
विसळली जातील कलई केलेली भांडी
पण सलत राहिल दिलेला डाग
हेवा वाटेल 
स्वतःच्या स्पर्शाने 
आपोआप चिरत गेलेल्या भांड्याचा
ब्रेडवर चढलेल्या बुरशीचा
सुरकतलेल्या खुणांचा
वाढत राहिल काळजी
खाचेत अडकलेल्या डोळ्यांची
जिथे अश्रु परक्यासारखे तरंगतात

कळते आहे मला
माझ अनोळखीपण
माझ देहावेगळ होण
मीठ देखील विरघळत पाण्यात
पण 
छळते आहे मला
माझ काचेच जगण
तडा गेलेल्या प्रत्येक रेषेवर
पहारा देणारी बंधन
आणि मृत झालेली नाती

नव्हता मागितला मी चंद्र
नव्हता मागितली झोपडी
फक्त मागितला होता अंधार 
विझुन जाण्यासाठी
तुला व्यव्हार जमला नाही
मला हिशोब मांडता आला नाही
सारे सारेच उधार
बोनस लाईफ




-----कविता

जन्म की मृत्यू


जन्म की मृत्यू 



काळ्या अंधारातही साद घालत राहतात 
डोळ्यांना न दिसणारे काळे मेघ ....
एका अपूर्ण क्षितिजावर 
तुझ्या जीवाची ओढ साकारत राहते 
एक निर्मितीशिल्प 
नाव रंग रूप नसलेलं 
चांदण्याच्या घरापल्याड
आभाळाच्या उंबर्याअल्याड 
तेव्हा माझा जन्म होतो 
कि मृत्यू कोणास ठावूक ?
पण सारच काही होत राहत अनाम 
तुझ्या माझ्या नात्यासारख




-----कविता

चिरंजीव शांतता


चिरंजीव शांतता



आकाशाचे तळे
तळ्यात आकाश
मेघाची होडी
होडीत मेघ
चांदण्याचा तरंग
तरंगात चांदणे
जळाचा स्पर्श
स्पर्शाचे जल
श्वासाचे प्रतीबिंब 
प्रतिबिंबाचे श्वास
भोगाचे कमळ
कमळाचा भोग
पैलतीराचा देह
देहाचे पैलतीर
चिरंजीव शांतता
शांततेत चिरंजीव
मनरुप आत्मा
आत्मरुपी मन

-----कविता

आठवणी


आठवणी 


चमचमणारे दिवे डोळ्यात अश्रू 
दोन धृवांशी मी नाते काय सांगू 
भिजल्या ओठावर येतात तुझीच गाणी 
मातीत पसरल्या आकाशाला 
ठावूक असतात तुझ्या आठवणी 

तुझ्या घरात मी माझ्या घरात तू 
लंपडावाचे मुळात नाहीत हेतू 
स्वप्नांच्या सावलीला आभास तरंग 
तुझ्या विरहाच्या आगीत 
राख आणिक मी अक्षय अभंग 


------कविता

व्याख्या


व्याख्या



भीतीला वय नसत 
शरीर नसत 
पण सावली असते 
तिचा तोच आत्मा 
तेच काळीज 

प्रेमाला वय नसत 
शरीर नसते 
पण सावली असते 
"आत्मदहनाची "
त्याचा तोच आत्मा 

प्रेम आणि भीती 
उन पावसाचा खेळ 
कि माझ्या 
रंग आंधळ्या स्वप्नांचे 
"इंद्रधनू "

वाट पाहते आहे 
श्रावण संपण्याची
खेळ संपणारा नाहीच 
प्रेम आणि भीतीचा 
पण कदाचित 
व्याख्या बदलतील 
ऋतुचक्राच्या 
सवयीनुसार 

------कविता

तरंग


तरंग


मी फुल
मी भुल
तुझ्या मौनात मी चाहुल

मी चांदण
मी आंदण
तुझ्या मिठीत मी अंगण

मी सुवास
मी निवास 
तुझ्या श्वासात मी अभ्यास

मी रेघ
मी भेग
तुझ्या कैफात मी वेग

मी वीज
मी नीज
तुझ्या डोळ्यात मी काबीज

मी ओठ
मी बेट
तुझ्या कळ्यात मी देठ

मी ऐल
मी पैल
तुझ्या पाण्यात मी चंचल

मी अनंग
मी अभंग
तुझ्या तुझ्यात मी तरंग

मी तुझ्यात
मी माझ्यात
तुझ्या अंतरी मी आत्म्यात

---कविता

कवडसा


कवडसा 


ढगाआड बदलुनी कुस
निजते हळु आईची दुपार
कवडसा पाऊल माझे
थिरकते मग अंगणात फार

पानाआडचा सोनचाफा
तशी म्रुगजळ त्याची हाक
सोनसुंगध ओलांडे उंबरा
नको नको आईचा रे धाक

त्याचे उदास फितूर डोळे
कोरडे ओठ अश्रुंचा गळा
मी उभी पाठमोरी सावली
तो झडतो आडवा पाचोळा

तरी वळुन वळुन पाहते
कुंपणातली गोल अबोली
तो दिशातुन बोलला फक्त
उद्या येईन याच वेळी



----कविता

निर्जीव आत्मा


निर्जीव आत्मा


शब्दांनी शिवलेले ओठ
कविता लिहायच्याच कशाला ?
जुन्या वहीची निखळलेली पान
कविता खोडायच्या कशा ?
जवळचे दूर दूरचे जवळ
कवितेचे अस्तित्व काय ?

काळाच्या आघात स्पर्शांनी केलेला श्रुंगार
कविता एक अपघात
जखमांचे शरीर आकाशाच्या कप्प्यात
कवितेच्या रक्तात विझणारी निळी शाई
कविता एक म्रुत्यु
म्रुत्युनंतरचा प्रवास
कविता एक शरीर
मी निर्जीव आत्मा


------कविता

इंद्रधनुष्य


इंद्रधनुष्य 

 

घेवूनी फिरंगी तलवार आले पहा सात मावळे 
हर एकाचा रंग ढंग न्यारा रचती ढगांचे सापळे 
चालून मागून पुढती झालेत कसे रक्तबंबाळ
सांभाळ रे क्षितिजा तुझा लाडकासा सूर्यबाळ
लावूनी प्रत्यंचा नभाची ओढतात निळा चाप
रापलेल्या उन्हाचा ते सातजण भोगतात शाप  
दग्ध होई लाल जरासा नारंगी होई जरतारी 
दोन वेडे शूर तपस्वी आहेत मौनस्थ शिकारी 
हिरवे पिवळे बाप लेक दोघे विरुद्ध करती चाल 
पिवळा म्हणे तिरकस उंट हिरवा घेई घोडा भाल
निळा म्हणे एकटा मी राजा अंबराचा मी रंग 
युद्धनीती विश्वाची जाणतो एकटा तो श्रीरंग
पारवे जांभळे एकाच घराचे आहेत दोन भेदी 
एक जन्माचा नजरबंदी दुसरा मरणास कैदी 
करुनी म्यान तलवार सागरी थेंब अज्ञातवासी 
पहा इंद्रधनू हे सप्तरंगी दिसते कसे श्रावणमासी 

 

 

 

----कविता    

सरोगेट मदर


सरोगेट मदर

 

 

सुखात जळते अपुर्ण इच्छा तेवते माजघरात फुल
तुळशीतले मंदमंद चांदणे पणतीची ग माझी चुल

 

माध्यान्हाला तुटे सावली एकाएकी फुटतो पान्हा
कवडश्यांचा झुले पाळणा परी या आईस नाही मुल

 

ओटी भरली प्राजक्ताने चाफ्याने हिरवा खण सजला
ओलांडून ये मोगरा सायली वाजते सवतीचे पाऊल

 

---कविता

प्रिय आभाळा


प्रिय आभाळा 

 

तुझे नाव गाव मला मुळीच ठावूक नाही .
तू माहित असूनही तुझा पत्ता  मला माहित नाही .
तरीही जीवाला तुझी लागणारी आदिम ओढ 
सुखाच्या शोधात फिरते आहे 
कि दुखाला गुणगुणते आहे ठावूक नाही . 

संध्याकाळच्या मंद तळाशी 
तुझ्याशी संवाद साधणारे ओंजळीतले निळे सोनेरी पाणी 
तुझी खुशाली मला नेहमी सांगते 
पण मी मेघाच्या कागदावरून लिहिलेल्या 
तरंगणाऱ्या ओळी तुला मिळतात का ? 
चांदण्याची अक्षर जमवून कधी वाचतोस का ? 
क्षितिजाच्या रेघेवर मी टेकलेले माझे ओठ 
तुला स्मरतात का ? 

असे किती किती सारे प्रश्न तुझ्यापुढ्यात टाकून 
मी उत्तरामागे धावते आहे . 
वाऱ्याची अलवार फुंकर 
तुझा गहिरा डोह हलवीत आहे .
सारे सारे तुला कळते आहे 
बासरीच्या सुरावर श्वासाचे संगीत व्हावे 

तसे तू दुरून चित्र काढतो आहेस 
सात सुराच्या लहरीमधून 
सात रंगाचे तरंग लहरत आहेत 
या क्षितिजापासून त्या क्षितीजापर्येंत .

तुझ्या आभाळहातानी तू दररोज हि संध्याकाळ 
जशी काल होती तशीच आज देतोस 
ओंजळीतून पाणी निसटावे 
तशी रोजच हि हुरहूर तू देतो आहेस 
त्याच ओंजळीत माझे अश्रू आले कि 
त्यावर चांदण्याची फुले ठेवून 
तू पांथस्थ होतो आहेस 

अश्रू पुसणारे हात तुझेच व्हावेत 
म्हणून जळत्या संध्याकाळच्या दिव्याशी 
माझेच हात धरते आहे 
सारे तुला उमजूनही न उमजाल्यासारखे 
कोणास ठावूक ?

मी देखील आता असेच आंधळे होवून 
ठेचकाळत राहायचे ठरवले आहे 
जिथवर तू जाशील तिथवर 


-------तुझी आभाळ सावली  (कविता )

Thursday, 22 November 2012

श्रावण


 श्रावण 


संथ संथ दुपार
विरजणाला ठेवलेल दही
तिच्याच हातावर 
दूर होणार आता तिचा प्रवास
यशस्वी हो ग बाई
आणि तिच्या स्पर्शाच्या 
कवडसा माझ्या हातावर
पण पावसाचा आरसा लागला हाती तिच्या
निहाळत बसली ती
आपलेच रुप
रंग रेषा आकार नसलेल
तेव्हापासुन श्रावण तसाच आहे
आजतागयात
ती देखील भुलली
क्षितीजावरच्या इंद्रधनुष्याला
आपलेच सौँदर्य समजुन

------कविता

प्रवेश


पैलतीरावर मंद होत जाताना
दिसत आहेत
नदीच्या पाण्यावर उठणारी वलय 
फेकते आहे कुणी
जड झालेल्या निराशेचे दगड

झडत आहेत नवी नवेली पान
तरंगत आहे
झाडावर सुकलेल्या पानाचे ओघळ
सावरते आहे कुणी
निर्जीव अश्रुंचा पाचोळा

पाण्यावर अंतराळी
उडतो आहे एक दुःखपक्षी
हाताचे घरटे 
बांधते आहे कुणी सुगरण
लपवते आहे तिचाच
चेहरा तिच्यापासुन

मी पाहते आहे
माझ्या कथेचे झालेल नाटक
आणि 
दगडांने
पाचोळ्याने
सुगरणीने
साकारलेले माझे प्रवेश

-कविता

Monday, 16 July 2012

कावळा उडुन जातो


आकाशाची ओँजळ करणारा
तुझ्या मनातला पक्षी
कोणते गीत गात असेल
असा नेहमी मी विचार करते
तेव्हा गच्चीच्या कठठ्यावर
कावळा ओरडताना ऐकु येतो
कावळे निधनाची वार्ता सांगतात
अस कुणीतरी कुजबुजलेल वाक्य
मनात शिरत
तुझ्या मनातल्या गीताचा विसर पडतो
मी कोकीळ होऊन गात बसते
माझच गीत
कावळा उडुन जातो
गाणे न ऐकताच



 ----कविता

पुरे झाल आता


पुरे झाल आता 




कामाची वर्दी साहेबाची मर्जी 

उचल पाऊल घे चाहूल 
कमरेत वाक मुठीत नाक 
ठोक सलाम तू गुलाम 
घे सलाम तू बदनाम 
पोटाची अडी तोंडाला कडी 
फोडावी वाचा घुसल्यात काचा 
जगाची भीती मरणाची प्रीती 
....बास की पुरे झाल आता 


विकायचं शेत पैशाच बेट 
आज्याचा गाव चुलत्याचा डाव 
हक्क हक्क न्याय न्याय
फाटक्या झोळीत घाल पाय 
घ्यायला चाळण द्यायची गाळण 
कोर्टाची तारीख जन्माची भीक
संपला व्यवहार संपली नाती 
भरली आहेत सगळी खाती 
....बास की पुरे झाल आता 


याच सलतंय त्याच फुलतंय 
यांची सुख त्यांची दुःख 
जुना कट्टा नवीन थट्टा 
मार तू थाप मोज तू माप 
जगाची लढाई आमची कल्हई
भरा सारण शिजतंय राजकारण 
लाचार गप्पा हाताचा कप्पा 
आम्ही शून्य आम्ही भिन्न 
....बास की पुरे झाल आता 


वाईनचा घोट वेदना कडेलोट 
टाक एक नोट घाल दोन बोट 
पायात पोट पोटात दात ओठ 
जगण म्हणजेच एक खोट 
रोजचा व्याप रोजचा ताप 
माझा बाप तुझा बाप 
शिव्या शाप ओढ चाप 
जगण म्हणजेच एक पाप 
....बास कि पुरे झाल आता 


------कविता