Pages

Monday, 30 June 2014

तुझी कथा

तुझी कथा 



नीज ग बाळाची आई 
बाळ झोपे पाळण्यात 
कोणती अंगाई गाऊ ?
दुखभय दाटे चांदण्यात  

उन्ह पावलाचे दिवे 
तिन्हीसांजेच्या घरात 
काळाचे गडपले भुयार 
सावलांच्या अंधारात 

कल्पित ना भाकित 
बोलाविते तुला सुख 
मंदिराच्या कळसाला 
जणू सोन्याचांदीचे रूप 

ऐकू येतो गाज मला 
कळतात मज करुणव्यथा  
जात्यात ओवीत ऐकली 
जन्मजन्मांची तुझी कथा 
 

----कविता 

यक्ष

यक्ष 


कधी जुळलीच नाहीत 
जन्मांची नाती 
वाळूत पाऊले 
उमटत राहिली फक्त 
तहानेने व्याकूळलेले 
शापित जलाशय 
अजूनही उभा तिथे यक्ष 
मागत उत्तरांची भिक्षा 
तो भुकेला मी तहानलेली 

कधी जुळलीच नाहीत 
जन्मांची नाती 

----कविता 

बद्ध आणि मुक्त

बद्ध आणि मुक्त



तिच्या 
डाव्या हातात पिंजरा 
पिंजऱ्यात प्राणाचे पाखरू 

ती 
वठलेले जुने झाड 
झाडाच्या पारावर पारंब्या 
तेथे देवाचा खेळ 
(जणू 
प्रीतीत प्रीती  
भीतीत भीती 
तसा
देवाच्या खेळात 
देवाचा खेळ )

ती 
चालते झपाझप 
आकार घेते काळोखाचा 
आभासाची जडेल सृष्टी 
तिच्या बंद डोळ्याआड 
 
ती 
पाषाण यूगायुगांचा 
तिचे आकाश पाषाण 
तिचे अस्तित्व पाषाण 
ती होते तेव्हा अहल्या 
बद्ध आणि मुक्तही 


-----कविता 

ये..... !

ये



ये
दूर लोटलेल्या आसमंतातून
चांदण्याच्या शृंखला तोडून
काळाचे अवयव
पोटात दडवून
गर्भात फुलाचे तेज लेवून
ये
तुला तुझ्या दुखाची शपथ

ये
कुशीत माझ्या
बैस मांडीवर
नाहू माखू घालतो
तुला तुझा ईश्वर

तू ऐक माझ्याकडून
विश्व उत्पतीची कथा
प्रलयाची जांभई निद्रा  
ऐक सतीचे वाण
तुझ्या ओटीत तिचे पुण्य

तू
ये
तुला तुझ्या दुखाची शपथ


-----कविता

आभास

आभास

काजळ उपमा
अधीर डोळे
पलीकडे जग
नागवे अंधारबुडे

देहावरी लाटा  
विधिलिखित
महिमान
भरती ओहोटी 
क्षण हे विधान 

अधांतरी रंग
आकाश कल्लोळ
ध्वनी प्रतीध्वनी
स्पर्शाचे आभास


----कविता 

अव्याहत

अव्याहत


तुझी कथा पाऊस ऐकतो
तू झोपडीतला मंद दिवा

दर्पणात दिसतो वनवास
दर्पणामागे उभी सीता 

हृदयाचे फुल अश्रूमधले
अश्रूरहित सुमने डोळाभर

तान्हेपण माजघरी झोपते
आईपण नाही जन्मापासून

धुळीत प्रकाश ओतते माती
सांद्र गर्भवास अव्याहत

 
----कविता

संवाद

संवाद 



तू बोलतो आहेस 
मी ऐकते आहे 
तू दीर्घ उंचीचा स्वर 
मी मखमली काळोख 

शांततेला स्वप्नांचे भय 
डोळ्यातून डोळ्यात 
भरलं जात आहे विष 

काठावर तरंगणारी 
प्रेमाची वाळवंट 
अथांग दूर पसरलेला 
सूर्यास्ताचा फेस 

तू पोहोचतो आहेस 
माझ्यापार्येंत 
तुला ओळखीचे 
न पाहिलेले देश 

मला पोहोचल पाहिजे 
तुझ्यापर्येंत 
संवादाच्या 
असीम वणव्यात 

आता ना मध्य आरंभ 
ना शेवट 
तू बोलतो आहेस 
मी ऐकते आहे

----कविता 

स्वप्नातले स्वप्न

स्वप्नातले स्वप्न


दुखाचे फुल जागवीत रात्र
उसवितो गंध मनामनात

पणतीपुढे आकाश निजे
व्यापक चांदणे अंगणात

सुज्ञ अज्ञान चाहूल घेते
स्म्रुतींच्या पोटीचे होउन बाळ

घडी दो घडी बोलते अवस्था
अस्वस्था अबोल ह्रुदयात

स्वप्नातले स्वप्न
कळसाविना राऊळ
वेदनेची समाधी
डोलते मौनात



----कविता 

उदास चिंतन

उदास चिंतन


संथ जलाशय
पैलतीरी पोहचले
झडलेले पान

माजघरात
किणकिणतो
हिरवा चुडा

स्वप्नामागे
निमुठ दुखे
पापणीखाली
सावल्यांचा वावर

आपुलेच
आपल्याला अलिंगन
अद्वैताचे
उदास चिंतन

----कविता 

तिन्हीसांजेची प्रेममयी

तिन्हीसांजेची प्रेममयी 



सखीला नव्हते नाव गाव घर दार
जशा असतात स्वप्न आणि आठवणी
सखी भेटायची -
जुन्या वाड्यात ,न पाहिलेल्या बर्फाळ शहरात
संथ जलाशयात पाय टाकून बसलेली
मला नव्हते ठाऊक तिचा स्पर्श तिची भाषा
मी ऐकलय तिचे मौन 
झाडाखाली ओघळनाऱ्या फुलासारखी
तिन्हीसांजेची व्हायची प्रेममयी
वितळायची त्याच्या नजरबंद सहवासात
रहस्यमय कथात त्याच्या अबोल वचनात 
तो परक्या देशाचा दूत समुद्र ओलांडणारा 
सखीच्या पायात चांदीचे तोडे 
जशी असते वेदना ,सुख दुखापलीकडे
तसेच सखीचे होते 'प्रेम''

सखीचे नव्हते जगात कोणी
शिवाय तिची जख्ख म्हातारी
म्हातारी माळायची गुलाब
पिकल्या पांढऱ्या केसांमध्ये
म्हातारीला अवगत कर्णपिशाच्च
उच्चारायची शापवाणी
ओवाळायची जीव उतरवायची नजरा
आल्या गेल्याच्या कोल्हया कावळ्याच्या
जसे निरागसतेला लाभते सौंदर्य
सखी कुरूप स्थूल जाडी भरडी

सखीला आवडायचा एकांत
भग्न मंदिरात कोसळलेल्या शिल्पांचा
झरोक्यातून लांबल्या जाणाऱ्या कवडश्यांचा
सखीला उमजायची
एकट्या उभ्या झाडांची भाषा
ती लिहायची आभाळाला पत्रे
शुभ्र पांढरे पीस तिच्या हातात रखडलेले

सखी रडली नाही हसली नाही
फुलून यायची आंतरिक जाणीवांनी
तिन्हीसांजेची प्रेममयी 


------कविता 

चांदणे माऊली

चांदणे माऊली

दृष्टीचा जडला भास
श्वास धूप सहज अंतरी

शुभ्र पीस धुके साजरे
जणू एकांत मंदिरी

भुलले वचन भुलल्या वाटा 
तुटले पैंजण तरंग लाटा 

शपथ सुखाची नदी पारखी 
ओढ जुनी तरी सारखी 

काळ दूरस्थ उब मनाची 
चांदणे माऊली नभ थव्याची 


----कविता 

सोबत

सोबत


आपलीच आपल्याला असावी सोबत
उलटत रहावे कथेचे पान
काचेच्या गुलाबदाणीत प्लास्टिकची फुल
तसेच उमलत रहावेत सूर आणि खरखर
ग्रामोफोनच्या रेकोर्डमधले
उष्टावलेले कॉफीचे काळे मग
निवांत शांत एकांतात हरवलेले
खिडकीबाहेरुन परतणारे तिन्हीसांजेचे उन
वितळावे या उन्हात उन्ह होऊन

क्लिक क्लिक क्लिक
सेपिया टोन

----कविता

तुझ्यासारखा सखा

तुझ्यासारखा सखा


श्रावणातल्या उन्हा पाहिजे तुझ्यासारखा सखा 
भोळा भोबडा तरीही हट्टी 
आल्हाळ पाल्हाळ त्याच्याच गोष्टी 
तुझ्याइतका नजीक तुझ्याइतका समीप 
जणू अंगणात तेवावा प्राजक्ताचा मंद दीप 
मातीत पाऊल भिजताच 
पावसाची ना ओलांडेल मीट 
पैंजणात अडखळेल त्याची सावळी प्रीत 
विसरेल चाहुली क्षणाच्या युगाच्या 
तरी भासेल तो ब्रम्हदिठी   
मी होईन त्याचीच सावली 
देईल उपाधी मला अमृत गोरटी 
त्याच्या पाऊली निजेल वारा 
त्याच्याच अंतरी गुंजतील तारा 
ओळखीआधीच त्याची आहे ओळख 
मृगजळापरी भुलविते हे गूढ सुख  
श्रावणातल्या उन्हा पाहिजे तुझ्यासारखा सखा 


----कविता