Pages

Wednesday, 29 January 2014

अंधाराचे घरटे

अंधाराचे घरटे


जुनी जीर्ण असतात मुळे
पोटात दडलेला असतो खजिना
काळाचे वैभव गिळंकृत करणारा सर्प
डंख वीख करीत नाही या चाहुलीला
तुटतात फांदीवरील मंद सूर्यझोके 
विव्हळतात पानगळ आणि कवडसे 
दूरून ऐकू येतात सावल्याचे पडघम
दिपू लागतात सूर्यास्ताची पाने
झाड होऊन जाते अंधाराचे घरटे


----कविता 

Tuesday, 28 January 2014

दुःखाची प्रीती

दुःखाची प्रीती 


दुःखाच्या तप्त मुद्रांनी 
सांभाळलेले तुझे अश्रू 
माझ्या डोळ्यातून वाहू दे 
तुझे साखळलेले अपूर्ण श्वास 
माझ्या हृदयात तेवत राहू दे 
वेदनेच्या गाभाऱ्यात 
उमललेली ज्योतफुले 
माझ्या रुक्ष केसात माळू दे 
तू पुजलेले स्वप्नांचे दगड 
नक्षत्रांच्या खुणा म्हणून 
देहात माझ्या मला मिरवू दे 
पाहू दे प्रतिबिंब तुझे माझ्यात 
मृगजळाच्या उदास काठी 

तुझे दुःख 
चांदण्याचा मोहोर 
अश्रापाने जळल्याचे 
.
.
.
.
जोगी 
मला प्रीती तुझ्या दुःखाची !!!


------कविता 

Sunday, 26 January 2014

आकाश शोधताना

आकाश शोधताना


आकाश शोधताना पांगुळले स्वप्नांचे घोडे
नाचले सुखाचे थवे कुजबुजले काजव्याचे कोडे
थेंब टपट्पले मनाचे सुन्न मनात अंधारावरती
पाऊस वेंधळा ओघळला निराशेची ओंजळमाती
फुटले काहूर आतुन तुटला सोहंकोहं नाद
परी ढोलके चौंडके वादले जन्मा आला नवा वाद
नव्या वादात घुमला घुसमटला अंतराळी जीव
हाच उपाय की मरण शेवटी ना जाणीव ना नेणीव
*
आकाश शोधताना पांगुळले स्वप्नांचे घोडे
नाचले थवे सुखाचे कुजबुजले काजव्याचे कोडे


-----कविता