Pages

Sunday, 28 April 2013

तुकडे आणि कविता

---------------------------------------------------------------------------


सभ्य असभ्यतेच्या मर्यादा ओलांडून

घुटमळत राहते एक मांजर तुझ्या पायाशी
शकुन अपशकुनाचे दोष
पचवत राहते एक मांजर माझ्या उराशी
अभिमान स्वाभिमान
नैतिकता अनैतिकता
निष्ठा श्रेष्ठा
गोँजारत राहते
या मांजराला

मांजराला काहीच कळत नाही
घुटमळत राहते तुझ्या पायाशी
मांजराला कळते सारेच
कवटाळत राहते मला ह्रुदयाशी

---------------------------------------------------------------------------

मुळातुनच चिडत जायच
मुळातुनच तुटत जायच
मुळासहित मुळासकट
नात्याच्या मातीवर
नात्याचे आकाश
नात्याच्या क्षितिजावर
पुन्हा जन्म घेत रहायचे
खोडासहित खोडासकट
पान पान उलटत रहायचे
झाड निष्पर्ण होईपर्यँत
मुळातुनच चिडायच
मुळातुनच तुटायच
मुळासहित मुळासकट

--------------------------------------------------------------------

डोळाभरून येते पाणी 
अंगाई कुणी गात नाही 
आशीर्वाद देते वेदना 
हाक कुणी गोंजारत नाही 
पालथे पडते उभे आयुष्य 
ओलांडत नाही लक्ष्मणरेघ 
आणि जीव होत जातो 
उदास एकटा संन्यासी 

--------------------------------------------------------------------------

दरवेळी हसायच दरवेळी हसायच
आपण नाही कुणी कुणाचे
समजुतीचे वाक्य रिवांईड फॉरवर्ड
एका हातात ठेवायचा निखारा
एका हातात ठेवायचे फुल
दरवेळी हसायच दरवेळी हसायच
कधी ओठांनी कधी डोळ्यांनी
हसायच फक्त 
कारण
आपण नाही कुणी कुणाचे


---------------------------------------------------------

कविता 

Thursday, 25 April 2013

लाडक्या मैत्रिणीस पत्र

लाडक्या मैत्रिणीस पत्र 



हाय कशी आहेस ? हं कपाळावरची आलेली बट उजव्या बाजूने सरकत डाव्या बाजूला तु किंचित कलणार मग ओठाचा कोपरा नाराज असशील तर डावा खुश असशील तर उजवा उचलून अर्धवट हसून म्हणणार ,मी मजेत आहे ग . कोणास ठावूक मजेतच असते कि नाही पण मी खूप खोलवर डोकावून पाहिलं आहे तुझ्यात जितक तू हि पाहिलं नाहीस स्वतःला  .हो खरच नाही पाहिलंस ,तू ओझरत निहाळलेस स्वतःला आणि तू तुझ्या प्रेमात पडलीस ,पण प्रेम करण खरच जमत का ग तुला ? माझ्या या प्रश्नावर तुझ ते पुन्हा खिडकीतल आभाळभरून हसू ,आणि गळाभर मिठी वेडी आहेस ग तू राणी म्हणत पुन्हा पुन्हा तुझ्या त्याच उबीच्या कुशीत , तू नुसते असे प्रेमाचे घोंगडे पांघरतेस आपल्या मैत्रीवर, तुला कोणतीच झळ पोहचत नाही प्रेमाची तुला लालसा देखील नाही दोन क्षणामधल्या अंतरात हसण्याची ,हसशील ती देखील खोटी मुखवट्यावरच्या चेहऱ्यासारखी . तू नेहमीच वावरतेस कलाकार असल्यासारखी आणि त्रयस्थसारखे पाहत राहतेस माझ तुझ्याबद्दलच वाटण ,माझे अश्रू माझे हसू आणि तुझे काय ? तू रडतेस कधी ? कि ती देखील खोटीच रडतेस आणि देत राहतेस दाद तुझ्या हुंद्क्याना ? तुझ सगळ जगणंच खोट . स्वप्नात जगतेस अस नाही म्हणार मुळात तुला भीती वाटते डोळे झाकण्याची . कारण कधीतरी तुझ अस्तित्व देखील झिडकारणारा अंधार  तू गाठला आहेस ,तू पूजले आहेस त्याचे डोळे ,भागवली आहेस त्याच्या डोळ्यांची तहान ,घेतली आहेस गिरकी वेदनेची म्हणून तू तशीच आहेस ,मोनालिसा . तुला खूप आवडते ना ? मी तुला मोनालिसा म्हणते ते पण कधी विचारलेस मला ? मी तुला मोनालिसा का म्हणते तेव्हाही तू अशीच गूढ गंभीर हसलीस आणि पुन्हा स्वतःच्या प्रेमात 'मी तिच्यासारखी दिसते ना ,माझी आईदेखील अशीच म्हणते ' वेडे ते संबोधण तुझ्या दिसण्याबद्दल नव्हत तुझ्या असण्याबद्दल होत . 

तशी तू दिसायला गोरी उंच नाकेली घाऱ्या डोळ्यांची ,ओघळभरून वाहणाऱ्या देवघरातल्या दिव्याच्या मंद वातीसारखी शांत सखोल विनम्र ,पण कुठून लागला आहे ग तुला हा छंद नाटकाचा ,तू नाती हिशोब व्यवहार सारेच नाटकात जमा करून टाकले आहेस ,कधी कधी असा राग येतो ना तुझा तू चुकलेल्या वाटेत गोळा करणारे जे आरसे आणले आहेस ते सारे एखादा स्वप्नाचा दगड टाकून फोडून टाकावेत आणि खूप खूप रडू द्याव तुला खूप मागे कुठेतरी विसरली आहेस तू रडण . हं रडण वाईट असत तब्बेतीसाठी ,मुलीनी रडू नये ऐकवशील असेच मोठे तत्वज्ञान जे जगून म्हणून ठावूक नाही तुला ,चित्रपटातल्या अभिनेत्रीसारखी . तुला आठवतंय भाषणाच्या स्पर्धेत तुझ्या माझ्यात टाय झाला आणि बक्षीस विभागून देण्याऐवजी तू ते बक्षीस मला द्या म्हणून विनंती केलीस . तशी तू उदार चांगल्या मनमिळाऊ मनाची . पण तुझ्या अश्या खोट्या आविर्भावामुळे मला तुझा विनयहि खोटा वाटतो . छत नसलेल्या एखाद्या घरात जाऊन हसत बसत असशील ना आमच्यासाऱ्यावर हा कसला ग आनंद आयुष्य जगण्याचा ?

भूतकाळाची मानगूट सैल ठेवावी ग माणसाने जगण्यात आनंद आहे फसण्यात आणि फसविण्यात कसला , हं थांब माझ्या या वाक्यावर 'अग आई ग्ग म्हणत खोटी अंतकरणातली कळ  तू चेहऱ्यावर भूलाव्यासाठी दाखवणार असशील तर मला बोलायचे नाही . स्थितप्रज्ञासारखी बसून राहिलीस तरी चालेल मला पण कायम तुझ कलाकार होण मी कायम प्रेक्षक होण अशी मैत्री आवडत नाही मला . तुझ्यासारख्याच मलाही माझ अस्तित्व वेदना भय आहेत बघ विचार करून जगण्याचा आणि हो जर उत्तर मिळाले तर तू मला भेटायला येशील कविते ,नेहमीसारखे शब्दाची पत्रे मला पाठवणार नाहीस . आणि ते ओठभरहसू तहानलेला भूक पान्हा असे काही नकोय . उत्तर हवय मला माझ्या प्रश्नाचे 



तुझी लाडकी मैत्रीण कविता 




 


Wednesday, 17 April 2013

आठवांचा अंश

आठवांचा अंश




१ 
नाद पखवाजात घुमतो आहे 
तुझ्या आठवांचा अंश
तू तूझ्या असण्याच्या
तू तूझ्या नसण्याच्या
शब्द परीघावर
मी ओलांडली आहे वेस
दीर्घ शांततेच्या स्वरांची


अद्वैताचे अधीर अंतर
घालते आहे साकडे तुझ्याकडे 
मनातल्या मनात मी उकलते आहे
पाप पुण्याचे विधान
शबरीच्या उष्ट्या बोरासारखी
वाहते आहे मी माझेच प्राण
तुला वाहण्यापुर्वी


तु भासतो आहे कष्टी 
दिशादिशात
भ्रमण करतो आहेस 
कोणत्या व्यथा ?
तु काळीच दवाचे ऋण
पांघरतो आहेस माझ्या कथा
माझ्या अश्रुबंद डोळ्यांना 
स्मरते आहे
तुझ्या वेदनामय मुर्तीचे 
'कारुण्य'


मी पुर्वैहुनही आता 
पश्चिम होत नाही
मावळत नाही
अर्ध्यदानाच्या ओँजळीत 
निमिषात काहीच घडणारे नाही
पण भिती 
प्रलयाआधीच्या संदिग्धतेची
तुझा एकाकीसंपन्न डोह
खोल तळाशी बुडवत नाही
माझ्यातली तुझी अपुर्णता
नाद पखवाजात घुमत राहतो
तुझ्या आठवांचा अंश


----कविता 

Tuesday, 16 April 2013

आकर्षण फेज :D :D


चष्मा ही एक आकर्षण फेज वस्तु आहे . साधारणतः शाळेतुन आठवी नववी दहावी कडुन कॉलेजकडे प्रवास करणारया डोळ्यांना यांचे विशेष आकर्षण वाटते . मला देखील शाळेत असताना चष्मा ही गोष्ट प्रचंड आवडत असे तो लागावा यासाठी टिव्ही जवळुन पाहु लागले अंधारात वाचु लागले .कॉम्प्युटरच्या किबोर्ड वर बटण नाचवुन डेव्ह मारिओला पळवु लागले .मनापासुन अभ्यास करु लागले .तरीही कधीच मला चष्मा लागला नाही . पण ज्या क्षणाची मी वाट पहात होते तो अखेर जवळ आला . एकेदिवशी पुस्तक वाचता वाचता डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहु लागले ते कितीजरी तापदायक असले तरी माझ्यासाठी आनंदअश्रु होते . मी धावत धावत आईकडे गेले आईला म्हणाले वाचता येईनासे झाले आहे माझ्या डोळ्यातुन पाणी येते आहे . आईने कपाळाला हात लावला म्हणाली ताप आला आहे जा जाऊन झोप .पण मला ताप नको होतो चष्मा हवा होता हे मी तिला कसे सांगणार . त्या तापामुळे चार दिवस उगाचच अंथरुणात पडुन रहाव लागल शिवाय चष्मा लागावा यासाठी चाललेले प्रयत्न आपोआपच थंड पडले . ना वाचन ना टीव्ही ना अभ्यास शुन्य नजर पंख्याकडे लावुन झोपुन टाकले . इतक्यात झोपेत एक गंमत आठवली म्हणटल देवाला साकडे घालु मला चष्मा लागु दे रोज न चुकता स्त्रोत वाचेन . यासाठी अंथरुणात बसुन ध्यान धारणा करु लागले . पण दुसरे दिवशी पेपरच्या शेवटच्या पानावर लक्ष गेले ध्यान धारणेने एकाग्रता वाढते आणि नजर सुक्ष्म होते . मग देवाला बोललेला नवस माघारी घेतला . तापही गेला होता त्यामुळे पुन्हा चष्मानामक ग्रहण लागण्याचे वेध सुरु झाले . पुन्हा पुन्हा ती वेळ येत राहिली जात राहिली . आणि एकेदिवशी मात्र स्टॅटिकस्टिकसच्या तासाला सगळे आकडे फेर धरुन नाचु लागले .चष्म्याच्या सुर्याचे हजार डोळे दिपु लागले आणि घेरी येऊ लागली .माझी दुरावस्था पाहुन मला त्या तासातुन रजा मिळाली .आणि त्या दिवशीच संध्याकाळी माझी रवानगी डोळ्याच्या डॉक्टरकडे झाली . तरी गड अजुन विजयी नव्हता आई बाबा तिथे असणारे शिकाऊ डॉक्टर मुख्य डॉक्टर यांच्या खिँडी लढवत चष्म्याचा राजमुकुट मला डोळ्यांवर चढवायचा होता . इथे असणारा प्रत्येक जण माझा शत्रु होता आणि मला चष्म्याचा परमोआनंद न घेऊन देण्याचा कुटील डाव रचला होता . पण मी देखील डोळ्यांना आंधळेपणाचे चिलखत घालुन प्रत्येक वार हाणुन पाडत होते . आणि आता मेन डॉक्टरांची तपासणी सुरु झाली . मी मुद्दामच दिलेले शब्द चुकीचे वाचले भोपाल चे गोपाल आणि नजर चे जहर वाचले . वाह वाह का हुबेहुब अभिनय वठवला होता . आणि डोळ्यांची सगळी तपासणी करुन डॉक्टरांनी सांगितले तुला चष्मा लागला आहे . माझ्या उत्साहाच्या भरताचे वांगे भरुन पावले . डॉक्टरांना म्हणटल चालेल मला नं लिहुन द्या मी आज आत्ता ताबडतोब चष्मा बनवुन घेते . डॉक्टर म्हणाले अग हो ऐकुन घे तुला चष्मा लागला असला तरी त्याचा नं खुपच छोटा आहे तो घालायलाच हवा असे नाही . मी लिक्वीड ड्रॉप देतो घाल डोळ्यात फार स्वच्छ नजर आहे तुझी चष्मा बिष्म्याची गरज नाही . त्यांचे तो थंड सल्ला ऐकुन जीवाची आगआग झाली आणि त्यातच तीळपापड भाजुन करपुन गेला . अजुनही मी हार मानली नव्हती मी पांखड्यासारखी डोळ्यातुन घळाघळा पाणी काढुन रडु लागले माझ्या डोळ्यात अस वेळीअवेळी पाणी येत चष्मा नाही असे कसे म्हणता . पण हा हल्ला पण बुमरँग डॉकटर म्हणाले टीव्ही पाहण्याऐवजी थोडा वेळ हिरवा रंग पाहत जा . अखेर त्यांच्यापुढे शरणागती पत्करुन आम्ही आमच्या बालेकिल्लावर परतलो . त्यानंतर मात्र चष्मा लागावा अशी इच्छा सुध्दा मनाला स्पर्श करत नाही . त्यामुळे चष्मा असणारया लोकांबद्दल मला आजही नितांत आदर वाटतो . शेवटी कुणीतरी म्हणटल आहेच आपली स्वप्न पुर्ण होत नाहीत तेव्हा इतरांची स्वप्ने साकार होताना पहात जा अगदी बिन चष्म्याचे होऊन

-----कविता मोकाशी