Pages

Wednesday, 24 December 2014

नेणीव

नेणीव 


ती गायची तिच्या बोलीभाषेतील गाणी 
अर्थ उमजायचा नाही कोणालाही 
तिच्या गाण्यावर होता त्याचा प्रभाव
तो बहुचर्चित फरारी असणारा कैदी 

तिच्या प्रासादिक रचनांचा आशय
उमजला सैनिकी गणवेशांतील मनांना
तिच्या घरात आले शस्त्रधारी
तिला नव्हता माहीत त्याचा पत्ता
ती निव्वळ साकारतसे अभिव्यक्ती

कल्पनांची रोपटे आली होती दारात
तिच्या वेणीचे झाले होते त्याने सर्प
म्हणुन तळमळीने गातसे ती गाणे
कुठलीच दुःख वेदना नव्हती मनात

तिला ना परिचित त्याच्या नजरेचा दंश
ना संवेद त्याच्या वासनांचे नाचरे मोर
त्याच्या पाठीवरचा ना वेचला होता वारा
त्याच्या छातीवर ना टेकले होते कपाळ

कधी एकदाच गेली होती त्याच्या दारा
खेळायला आणले होते सागरगोटे
दगडाचे बीज झाले तिच्या स्पर्शाने
आले वात्सल्य तिच्या ह्रुदयामध्ये
तिने सांभाळली रोपटी नाकळतेपणे

दिला तिने सैनिकांना त्याचा पत्ता
उडी मारली दारामागच्या विहरीत
कुणी सांगितलेली त्याची मरण वार्ता
खोटीच वाटायची इतके दिवस तिला

------कविता

सौंदर्याची महती

सौंदर्याची महती



तिच्या सौंदर्याची महती सर्वदूर 
पण डोळ्यास द्रुष्टी नाही जन्मापासुन 
शाहणा किंवा वेडा रसिक गाई गुणगान 
बक्षीसी म्हणून ती देई सोन्याच्या मोहरा
क्षणार्धात माती होतसे मोहरांची 

जादुई मोहरांच्या मातीने 
रसिकाच्या मनात चेतवला द्वेष 
राजवाडा जळून गेला त्या धगीत
आता ती झोपडीत राहू लागली 

तेथेही पसरली सौंदर्याची किर्ती 
गुणगान गाऊ लागले भाबडे लोक 
बक्षीसी म्हणुन सवयीप्रमाणे
प्रत्येकाच्या हातात ठेवला दगड
त्याचे कोळसे झाले शाप झाले

दैववादाच्या पुरात वस्ती बुडाली 
तिची झोपडी पाण्याखाली 
म्रुत्युच्या प्रदेशातुन पोहोचली 
जन्मलेल्या देखण्या शहरात 
तिची द्रुष्टी तिला मिळाली 

सौंदर्याहून अधिक सुंदर नगर 
ती वर्णु लागली प्रत्येकाचे वैभव 
तिला बक्षीसी मिळाली कधी मोहरा 
कधी माती कधी दगड कोळसा 
कधी वंचनेचा आंधळेपणाचा आरोप

-----कविता

न केलेले प्रेम

न केलेले प्रेम


तिन्हीसांजेच्यावेळी सापडतो मला काचेचा लोलक
तेव्हापासुन तिन्हीसांज कायमची माझ्या घरी येते
काचेच्या लोलकावर माझे वेड्यासारखे प्रेम जडते
काळाच्या अवस्था मांडून स्वप्न पाहते लोलकाचे
एक दिवस लोलक तुटतो ; तिन्हीसांज संपते
न केलेले प्रेम स्वप्नातुन दूरदूर निघून जाते !!


----कविता 

अभिव्यक्ती गोंदण

अभिव्यक्ती गोंदण


अकाव्य झालेल्या जगण्याला
व्यापत नाहीत मुलभुत प्रश्न
उत्तरांची दिशा शोधणारे
मन अंतराळी दिव्याचे

अभिव्यक्तीचे हिरवे गोंदण
पडझड झाली पानांची
किंवा आले वैधव्य तरी
पुनर्जन्माचे भाकीत

दूरदूर दिसतात चिंचोळे रस्ते
काळाच्याही पडझडीतही न बदलेले
आकाशाकडे मार्गस्थ होणारे

---कविता

फुलांचे चित्र

फुलाच्या चित्रांवर जमली आहेत फुलपाखरे
मध गोळा करण्यासाठी
फुले जिवंत नाहीत ठाऊक नाही चित्राला
फुलपाखरांच्या प्रेतांनाही हाकारते बिचारे
या चित्राला कुणी केले आहे सजीव ?
माझ्या डोळ्यांची कधीच झाली आहेत फुलपाखरे
हे फुलांचे चित्र मला आंधळीला का दिसते !

-----कविता 

दुःखाच्या कल्पनेत

दुःखाच्या कल्पनेत 




दुःखाच्या कल्पनेत गढून जाते 
तरंगत येतात अज्ञात ठिकाणाहून कलेवरे 
मी काठावर पोहोचत नाही 
दूर काचेच्या खिडकीतून पाहते द्रुश्य 

तरंगणारी प्रेते जिंवत होतात 
धाव घेतात माझ्या घराशी 
दारासमोरचा जुना प्रौढ व्रुक्ष
रक्षक होऊन अडवु पाहतो त्यांना

वारा होऊन मनामध्ये वास करणारा
निकटवर्ती काळ ; स्नेह जडतो त्याच्याशी
जिवंत झालेल्या प्रेतांची दुःखे मला जडतात
काळोखाच्या असंख्य बिंदुचा जणु मध्य




---कविता

वनवास प्रीतीचा

वनवास प्रीतीचा


मातीमय अंधार झालेले अरण्य 
जणु धारण केले आहे अंधाराचे कवच 
अशा अरण्यातील झाडांवर 
गळा आवळणारे दोर्याचे फास 
फासांवर अडकलेले जीव अद्रुश्य 

घनीरूप होऊन काळ
स्वप्नांत वावरणारा 
भविष्य वर्तवणारा आरसा 
निजलेल्या सावलीच्या हातात
अक्षितीज आकाशाच्या ठायी मन 

पंख छाटलेली जिवंत सखीमय वेदना 
या वेदनेचा उगम माग घेणारे
काळोखात वाट चाचपडणारे यक्ष 
सहज जीवन प्रवाह खंडित करणारी 
पुन्हा पुन्हा जन्मणारी स्वयंभु स्थिती

अरण्याच्या वर्णनात गुंफलेल्या पाऊलखुणा 
पाऊलावर चालणारे पाऊल आणि कथा
वचन किंवा शाप या अचल बंधनाला 

आयुष्य स्पर्शाची विणुन वल्कले 
सांडिले आहे कुणीतरी घरदार
सोयरेपणात अनुभवत वनवास प्रीतीचा

------कविता

शुन्य आणि अंधार

शुन्य आणि अंधार



बाहेर शून्य आत शून्य
दोही शून्याला जोडणाऱ्या रेषेवरून
चालत जातात बुटकी माणसे
पोकळ होणाऱ्या अंधाराकडे

पोकळ अंधार भरीव अंधार
दोही अंधारास जोडणारया क्षितीजावरून
चालत जातात आडदांड माणसे
नसलेल्या स्वतःच्या घराकडे

बुटकी माणसे आडदांड माणसे
दोघे भेटतात एकमेकांना
नियतीच्या हेतुपूर्वक खेळामध्ये
एकदाच आणि शेवटचे

बुटक्या माणसांची विरते स्मृती
आडदांड माणूस मरतो दूर कुठेतरी
शून्यातून अंधार अंधारातून शून्य

म्रुत नदीकाठी जळतात प्रेते
मेलेल्या डोंगरावर उगवतात झाडे
वठलेल्या झाडावर घरटे बांधतो पक्षी
सूर्य झडलेल्या पानात उगवतो दिवस

आडदांड माणसे होतात जिवंत
बुटक्या माणसाची जागृत होते स्मृती
पुन्हा घडणाऱ्या त्याच कथेसाठी
मात्र यावेळी कथेत बदल घटनेचा
अंतिमतेतून आदिमतेकडे जाण्याचा

बुटकी माणसे चालत जातात शून्याकडे
आडदांड माणसे जाऊ लागतात अंधाराकडे

-----कविता

अचेतन

अचेतन


शुद्ध एकटेपण ना हेतू ना बीज
सापडत नाही कोणता खडक
उन्हाला माथा टेकवण्यासाठी
हातातले दैन्याचे दंड आपटीत
वस्त्रावर वस्त्र परिधान करीत
झोळी भरते फकीर दिशांची
सृष्टी तोलून धरते समत्व
उन्हाचे तान्हे उनपण
उदास भाबड्या वैराग्यात
डोळ्यांना सहन होत नाही
परकायेने अंतरी रोपवलेला
माझा अचेतन आत्मयज्ञ


-----कविता 

मन आणि नदी

१

मन आणि नदी
एकमेकांच्या उपस्थितीत
एकमेक अनुपस्थित

रडणारे मन नदीकाठी
नदीला दुःख नाही कशाचे
नदीला प्रवाह दुःखाचा

मनाला नाही जन्म मृत्यु
मन दृश्य किंवा अदृश्य

२

नदीच्या पाण्यात पडलेले
आकाश
पाण्यातल्या आकाशाला
साद देणारे मनाचे चेहरे
नदीच्या पाण्यात

३

नदीवर चालणारे अनवाणी उन
मनाच्या रुक्ष वाळवंटी

मनाच्या रुक्षतेतच उगवते झाड
वाढते अथांग त्यातील रुक्षता

संन्यस्थ होऊन त्याज्य करते
स्वगृहाचा
माधुकरी मागत भटकत जाते
नदीच्या पाण्यावरून

४

कोसळणारा नागवा पाऊस
नदी आणि मनामध्ये अंधार
येथे कधीच उगवणार नाही
न मावळणारा ध्रुवीय सूर्य

मन पालथे पडले आहे
नदीच्या पाण्यात
नदी उलथली आहे दुस्तर

कृष्णाची कोवळी टाच
नदीला स्पर्श करती होईल
तेव्हा नदी मन शांत स्थिर
अहल्याच्या शिळेसमान

५

नदी आणि मनाला
जोडणारा अज्ञाताचा पूल
पुलावरून चालत जातो योगी
पुलापलीकडे आहे मंदिर
मंदिरात मूर्ती त्याच्या गर्भाची
त्याच्या जन्माआधीपासून
त्याच्या जन्मानंतरही तो गर्भ
शिवशंभू साक्ष त्याच्या गर्भाला

६

विश्वाच्या काळनदीत पोहणारे
असंख्य देहाची असंख्य मने
कुठल्या पैलतीराला पोहचतात ?

काळाच्या न संपणाऱ्या वर्तुळाच्या
मध्यभागी केंद्रस्थ बसलेले असते
असंख्य मनाचे प्रातिनिधिक मन
तेथे पोहोचतात मन असणारी शरीरे

विश्वाची काळनदी सोबत नेते
शरीराचे गर्त तिच्या भोवऱ्यामध्ये
मन उरते मागे ऐलपैल तीरापाशी

७

चाफ्याच्या झाडावरून
भावनांचे सर्प मरून गेले
मनाचा उगम तिथे झाला

मनाने मनाला जाणले
ऐकली भस्मासुर मोहिनी कथा
उष्ण मनाच्या मस्तकावर
पडला मोहत्या मनाचा हात
मनाचा तिथे शेवट झाला

मनाच्या शेवटी नदीचा उगम
काळाच्या शिरोभागी नदीचे मुख
नदी विस्तारली काळाच्या प्रवाहात
अतीत पतीत काळ लुप्त नदीमध्ये
तोच पुढे मन म्हणून जन्मला


८

नदीला देह नाही
वैश्विक सत्य तिच्या मनात

तिच्या मनापर्येंत पोहोचण्याच्या
देहाच्या अनंत वाटा
अनंत वाटांनी अनंत वाटेकरी
मागणारे हक्क तिच्या मनाचा

तिला मन नाही
या गृहीतकाचे सत्य
केवळ ठाऊक नदीला

९

मनामध्ये अगणित मन
मनाला जन्म देणारी मन
स्थलांतरित होणारी मन
शिरतात नदीच्या अंतरंगात
नदीकाठी उदय अस्त पावतात
प्राचीन अर्वाचीन संस्कृती
संस्कृतीचे वृक्ष आणि पाचोळा
झाकते नदीचे उघडे नेत्र
नेत्राआड नदीचे अंतरंग
अंतरंगात अगणित मन
मनाला जन्म देणारी मन
स्थलांतरित होणारी मन

१०

नदीकाठी वसले आहेत पाले
पाल्यात राहणाऱ्या स्त्रिया
नदीवरून भरतात पाण्याचे घट
एक गाव ओलांडून
दुसऱ्या गावात वसतात पाले
दुसऱ्या गावातील नदीवरून
स्त्रिया भरतात पाण्याचे घट
या स्त्रियांचे मन भासू लागते
अ-मन किंवा न-मन
समुद्र होणाऱ्या नदीसारखे

--------कविता मोकाशी

Tuesday, 2 December 2014

अतीत

अतीत 



दुःखाचे काळोख पाणी 
वर लखलख चंद्रबिब मनाचे 
नीज ना येते तरूणीला 
गाते समुद्रास अंगाई 

काळाचे औषध शोधणारा वैद्य 
त्यासही ना झाले निदान 
तिच्या अमूर्त स्वयंभू दुःखाचे

ओघळणारी मन शिशिरपर्णे 
कुठल्याश्या भोळ्या आत्म्याची 
वाढलेली छाया शरीरे 
तिच्या वेदनेच्या गाण्यामधली 

तिने घेतली विष गिरकी 
तल्लीन मंत्र सुखाशी 
नीज आली तरूणीला 
समुद्र गातो अंगाई 

काळातीत मन मनातीत काळ 
दुःखाच्या करूण निद्रेत ती पाषाण 


----कविता

संवत्सर

संवत्सर 


लाखो प्राचीन सूर्य 
जमले दिक मध्यभागी
कल्पना प्रार्थना अंती 
परी झाले अस्तमुखी 

समिधेतुनी प्रगटले 
समिधेत मिसळले 
जीवजीवन एक हेतु 
परस्परिले विश्वरूची 

हिमयुग प्रपातात 
मोहिली अनादि स्रुष्टी 
लुप्त झाली भाकिते 
काळ उच्चार वैखरी 

जन्मा ये संवत्सर 
जन्मा येतसे दिनमास 
लाखो प्राचीन चंद्र 
समुद्र मंथनाचा नाग

---कविता

मनोदेवते

मनोदेवते



मनोदेवते ---
होकार नकाराच्या अन्वयात 
उत्खननात सापडते मला तुझी मूर्ती 
तुझे एक अंग सोन्याचे एक मातीचे 

मूर्तीला माहित नाहीत नकाराचे घुमट 
जिथून एकदा साद दिली की 
सातदा तीच ऐकू येते जन्मभर 
शुभ्र चुना लावल्या पडक्या मंदिरात 
मूर्तीला ठाऊक होकाराचे कळस 
कळसावर येऊन बसतात 
निरर्थक प्रश्न व्यथांचे कावळे 

गावाबाहेरचा पुजारी कौल लावतो 
होकाराचे ध्वज फडकतात अंबरात 
कळसावरचे कावळे उडून जातात 
शोधत होकाराची कळसहीन दिशा 

मनोदेवते --
तुझे एक अंग सोन्याचे एक मातीचे 
कळत नाही तुझा अन्वयार्थ मला


------कविता

अंत

अंत 


ह्रुदयाची जमीन होते तेव्हा 
करुणेने भारलेले रिकामे आकाश 
उदय अस्त मावळलेल्या 
क्षितीजावर जन्म घेते 
तुझ्या श्वासांची पावले 
अशावेळी चालत यावीत 
ह्लुदय झालेल्या जमीनीवरून 

सतेज वाळवंटात रखरखणारे सत्य 
बोचर्या जीवाला आधार देणारे 
तुझे वनवासाचे विशाल रोपटे 
म्रुगजळाच्या धगीत खुरटून जावे 
माझ्या सावलीचा उंट तहानतो
या वेड्या स्वप्नांच्या अधेमधे 

मातीचे मरण जीवानिशी कुरवाळले 
तिच्या व्यथातुन माझा दुःखाचा जन्म 
तिच्यानंतर माझे शब्द अवकाश होऊन 
नक्षत्रांचा युगाचा प्रवास पाहणारे
माझे अ-मन मातीच्याच अंतात 

---कविता

चरित्रकथा

चरित्रकथा

गर्दीचे धुक्यासारखे झालेले विश्वप्राण 
दिशांत मातीसारखे तुझे एकटेपण

नव्या चैत्र पालवीला येणारे युगादिपण 
मन गोंदणाचे नित्य शाश्वत अनादिपण 

चैतन्य मुरडलेले चिन्ह पाठी पोटामध्ये
खुणा नसणारे संचित पुनःजन्म घेणारे 

आरंभ अंतापासुन चाललेली चरित्रकथा 
ग्रंथाच्या पानावरचे संदर्भ तुझे संन्यस्था

---कविता

भस्म

भस्म 

उजेडात माझ्या दिशा लोपल्या का,
जळाला कुठे पंख दीपावरी 
तुझ्या दिव्य प्रीतीतुनी जन्मले मी
कुणी जाणिले दैव माझे परी 

पुन्हा शांत डोळ्यात दाटे करुणा 
तुझ्या काळ डोहात ना चांदणे 
मनी आर्त माझ्या तुझ्या कल्पना का ,
नसे कोणते हेतु ना मागणे 

फिरोनी घरी जातसे भाव माझा ,
किती दीन तृष्णा तुझ्यावाचुनी 
नदीकाठ भरला तये एकवेळी ,
चिता भस्म देहास लागे झणी 


-----कविता

दरवाजे

दरवाजे 

मनाचे सत्तर किंवा अंदाजे शंभर दरवाजे 
प्रत्येक दरवाज्याबाहेर उभा रक्षक 
रक्षक दरवाजा तोडून घरात घुसतात 
घर रिकामे धुळीच्या गजबजाटाने भरलेले 
भूकंप झाला तेव्हा गाडली गेलेली संस्कृती 
तुटलेले तांबे पितळेचे घुंगर विलय नर्तन 
चांदीच्या तामणात ओवाळणीच्या कथा 
अशा घरातून रांगत येते मुल आईला शोधत 
प्रत्येक रक्षकाचा चेहरा त्याच्या आईसारखा
मनाचे सत्तर किंवा अंदाजे शंभर दरवाजे 

-------कविता