Pages

Tuesday, 28 October 2014

गुळ साखर

गुळ साखर 

पहिली दुसरी तिसरी चौथी 
कुठल्या लाटेला संपतो समुद्र 
माणसांच्या अलोट झुंडीच्या झुंडी 
किती पक्ष्यांचे थवे उडतात आकाशी 
गोंगाटाला का आहे करुणेचा स्वर 
कुठे निघाली आहे भावनेची दिंडी
किती अथांग आहे मुंग्यांची रांग
मला आठवेनासे झाले आहे
कुठे ठेवली मी गुळ -साखर !



----कविता 

कंदिल

कंदिल


ती आधी बाई होती 
नंतर कामाठी झाली 
तिच्याकडे आले आहेत दोन पुरुष 
तिने एकाला दिले आहेत प्राण 
एकाला दिली आहे शेज


ज्याला प्राण दिले आहेत 
तो तिच्या हातात देतो कंदील 
ज्याला शेज दिली आहे 
तो तिला देतो कंदिलाची वात 
कंदिलातली वात जळून जाते 
कंदील मागे उरतो


तिला दिलेला कंदील 
परतून नेण्यासाठी 
माघारी तो फिरतो 
आता ती कामाठी नसते 
तिचा कंदील झालेला असतो


----कविता

निर्मितीचे ओझे

निर्मितीचे ओझे 


निर्मितीच्या ओझ्याने 
जाळीदार झालेले 
माझे दुपार उन-मन 
निर्मिकाच्या ग्रंथात कोरते 
अभिवचनाचे गोंदण

नववधू होऊन 
मी ओलांडते राहते 
क्षितीजाच्या चौकटी 
प्रवेशते नेणत्या जाणीवात

तेव्हा--
आकाश जन्म घेते 
शब्द जन्म घेतात 
माझ्या गर्भात उदरात 
आणि उदासीन निर्मिकाच्या 
जीर्ण प्राचीन ग्रंथात

*निर्मितीच्या ओझ्याने 
जाळीदार झालेले 
माझे दुपार उन-मन


------कविता 

सुतक आणि सोयर

सुतक आणि सोयर


गेल्या अनेक पिढ्यांचे दुष्काळ 
पाहिले आहेत अज्ञाताच्या विहरीने 
त्या विहरीसमोर बसून आहे 'ती' अखंड


पिंगळ्याने वर्तवली आहे भविष्यवाणी 
दहा दिवस दहा रात्र अखंड अविरत 
संततधार पावसाने भरेल विहीर


ती आजन्म रखडली आहे विहिरीसमोर 
ती' रडली नाही जन्म क्षणापासून  
आश्रित आहे अपार नेणत्या दुःखाची 
जगण्याची एकमात्र तीच भोळी आशा


वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरली
दहा दिवस दहा रात्र पाऊस कोसळला 
विहीर भरली ,ती धाय मोकलून रडली


वेदने --
तू कुणाचे सुतक पाळत होतीस 
म्हणून तुझ सोयर केल नव्हतेस मला ?


----कविता

कर्मकहाणी

कर्मकहाणी


तिच्या विचारांच्या साम्राज्यात
आला आहे पारधी
पारध्याच्या हातात आहेत पिंजरे
पिंजरयात आहेत
त्याने पकडलेली सावज ,
हरेक सावजाच्या आहेत
कर्मकहाण्या

प्रतिभेच्या कोकिळेला
ठाऊक नाही तिचे घरदार
म्हणूनच की काय ठाऊक
सुराला दैवीपणाचे
'कोंदण आकाश'  
तिच्या अस्तित्वाचा असतो
अज्ञात प्रवास
ती प्रतिभेला पोहोचते
तेव्हा होते 'कोकिळा '

कल्पनेच्या गरुडाला
जुना आकाशदेह विटंबला आहे
त्याला पाहिजे आहे
निर्वात करणारे नवे वादळ
नव्या वादळाआधी त्याला विस्मृती
जेथ जेथ विस्मृती तेथ नवा जन्म

आठवणींच्या घारीला
सापडते राहते नेहमी नवे आकाश
पोटीची नवजात अर्भके
जन्म घेऊ देत नाहीत तिला
जन्मभर घार हिंडत राहते
आठवणींच्या संसारात
संसाराच्या आकाशात

स्वप्नांचा मोर फुलतो
नाचत राहतो दिशांच्या अंगणात
काळाची लय देखील
बांधू शकत नाही त्याचे नर्तन
स्वप्नांचे उन सुरेख सुंदर असते
स्वप्नांच्या सावल्या कुरूप असतात
उन सावल्याच्या खेळात रडतो मोर  
पण नाचत राहतो स्वप्नांचा मोर
जोपर्येत त्याला दिसणार नाही  
त्याचे दृष्टीचे आंधळेपण  

इच्छांची फुलपाखरे
उडतात जगतात आणि मरतात
त्यांचा आहे पुनर्जन्मावर विश्वास
ब्रम्हदेवाकडे मागतात जन्मवेणा
त्यांची सूरवंटे होतात कोशातून

सुखदुखाची कबुतरे
समागम करत राहतात
जन्मणारे कुणीच नाही
विश्वमौनाच्या यज्ञात
दोघांच्या होतात समिधा
उग्र शिळारसाच्या वाफेने

बुद्धीचा ससाणा विवेकाचा हंस
सारेच रमले आहेत
सहा महिने दिवस सहा महिने रात्र
असणाऱ्या शुभ्र निळ्या
काजवेपणात प्रदेशात
अस्वस्थतेचे घुबड पाहते  
रात्ररात्र यांच्या जगण्याला
घुत्कार करते घुं घुं ऐकू जात नाही
अरण्यातल्या बहिऱ्या कानांना
पेटत जातो झाडातून वणवा
हंस ससाण्याचे सांगाडे सापडतात
त्यांचे देह जमिनीखाली खोल
शोध घेत सनातन शुभ्रपणाचा  
सहा महिने दिवस सहा महिने रात्र

ती ऐकते पारध्याकडून
प्रत्येकाच्या कर्मकहाण्या
तिला विकत घ्यायचे आहे
पिंजर्यातील पक्षांना
पारध्याच्या मनात काही वेगळेच
तो शिकवतो तिला
देहरुपांतरणाच्या कला
आता कधी ती गरुड होते
कधी मोर कधी घार

आता पारधी ऐकवतो
तिची कर्म कहाणी  
ती आहे फिनिक्स पक्षी
जन्मते जगते मरते जन्मते
पारधीच्या कहाणी पिंजऱ्यात
अखंड अविरत चालू आहे
तिची कर्मकहाणी
तिच्या विचारांच्या साम्राज्यात


------कविता

आपकी पसंद

आपकी पसंद 





हातात क्रोशाची सुई घेऊन ती विणत बसली होती .दिवाळीनंतर येणाऱ्या ख्रीसमसला तिची नात परदेशाहून येणार होती . त्यादिवशी नातीला सांता भेटवस्तू देणार होता . त्यासाठी सांताला मोजे विणण्याचा आजचा बेत तिने आखला होता . रेडीओ वर आपकी पसंद गाण्याचा कार्यक्रम रंगत चालला होता . त्यावर विशीतला एक मुलगा त्याच्या प्रेमासाठी "एक लडकी को देखा तो " गाण्याची फर्माईश करत होता . निवेदक आलटून पालटून त्याच्या प्रेमाची गोड रहस्य उघडू पाहत होता तर तो मुलगा आढेवेढे घेत शेवटी त्या "एक लडकी"चे नाव सांगून गेला . या चाललेल्या गंमतीने ,ती मोठी मिश्किल हसू लागली होती . तिच हसण खोलीतल्या कपाटावरचा मोठ्ठा टेडी पाहत होता . अचानक तिच्या कानावर तिचे नाव आले . काहीसे विस्मयाने तिने रेडीओकडे पाहून volume मोठा केला तिचे नाव घेणारा आवाज तिच्या परिचयाचा . इतक्या वर्षानंतरही तोच आवाजातला खर्ज जाडा भरडा आवाज ,प्रत्येक शब्दावर भार देऊन बोलण्याची त्या आवाजाची लकब आणि कुणालाही संपूर्ण नावाने हाक मारण्याची या आवाजाची खासियत तिला आवडत असे . तिचे नाव अनघालक्ष्मी ,नवरा लक्ष्मी म्हणे सासू अनघा म्हणे इतर पाहुणे मंडळी अनु म्हणत . 'अनघालक्ष्मी' संपूर्ण नावाने तिला हाक देणारी ती एकटीच होती 'कृष्णा" . निकट परिचयानंतरही विध्यर्थी वाक्यरचना कृष्णा बोलत रहायची जस की अनघालक्ष्मीला तिला सांगायचे असेल कपाळावर टिकली तिरकी लागली आहे ती सरळ कर . कृष्णाचे सांगणे साधारण असे असायचे "अनघालक्ष्मी टिकली तिरकी झाली आहे सरळ करतेस का पहा ?" तिच्या या बोलण्यात परकेपणा नसायचा . एक स्थिर मनाची अवगुंठी तिच्या विचारांशी बांधलेली होती . कृष्णा निवेदकाला आपकी पसंद अनघालक्ष्मीसाठी असल्याचे सांगत होती . निवेदक या अनघालक्ष्मी कोण विचारत होता . कृष्णा सांगू लागली 

"माझ्या नवऱ्याची नोकरी ही बँकेची, स्थिरस्थावर असे जगणेच त्यामुळे जमले नाही . सतत बदल्या कधी कधी राज्याबाहेर तर कधी निसर्ग प्रतीकुल होईल अशा ठिकाणी . बँकेकडून रहायला जागा ,क्वार्टरस नेहमी मिळत . नवऱ्याने मात्र खाजगी जागा घेऊन राहणेच पसंत केले . त्यामुळे अशा किती घरात संसार थाटले आणि कित्येक वास्तूशी सुख दुःख जोडली गेली . जशी घरं असतात तशी माणस . काही घरांत मुळातच आपूलकीचा धूप दरवळत असतो . आजूबाजूच्या भिंती खिडक्या या धूप दरवळीमध्ये अदृश्य होत जातात आणि या घराशी आपसूक नाते जोडले जाते .नवऱ्याच्या या फिरत्या पेशामुळे अनेकविध माणस भेटली ,अनेक भाषा संस्कृती मी पहिल्या पण "अनघालक्ष्मीला " मी कधीच विसरले नाही .मला आठवणीमध्ये रमणे आवडत नाही हे अनघालक्ष्मीला मी अनेकदा म्हणत असे . पण तिच्या आठवणी काळाचे इतके तंतू उसवत राहतात मी भूतकाळाचा हात धरून अनघालक्ष्मीच्या घरात जाऊ लागते . मी तिची एवढी आठवण काढते आहे ,हे बिलकुल तिला पटणार देखील नाही . पण अनघालक्ष्मी माझ्या बोलण्यातला शब्द आणि शब्द खरा आहे .तू जेथे कुठे आहेस मला ऐकते आहेस मला ठावूक आहे . अनघालक्ष्मी बद्दल सांगाव अशी विशेष गोष्ट कोणती नाही . याच कारण अनघालक्ष्मीला साधेपणाची भोळी आवड होती . तिच्या वागण्यात बोलण्यात विचारात कमालीचा साधेपणा होता . तिचे नाव इतके खानदानी तीच्या नावाला शोभेल अशीच तिची वागणूक स्वतःसाठी आणि इतरासाठीही . मला अनघालक्ष्मीसाठी वक्त सिनेमातले आगे भी जाने न तू पसंद म्हणून कळवायचे आहे . 


आगे भी जाने ना तू ,पीछे भी जाने ना तू
जो भी है बस यही एक पल है

अनघाबद्दल भरभरून बोलाणारी कृष्णा आणि अनघासाठी तिने पसंद म्हणून कळवलेले गाणे ,त्या गाण्याचा आशा भोसलेंचा सूर याचा एकत्रित परिणाम असा झाला . रेडीओचा volume वाढवण्यासाठी आलेली अनघा तिच्या सगळा शरीराचा भार अंगठ्यावर टाकून उभी राहिली अनघा विचार करू लागली आठवू लागली . गाण्याच्या भेंड्यामध्ये क्रमांक अग्रेसर असणारे माझे आणि कृष्णाचे आवडते गाणे . आयुष्य हे क्षणभंगुर आहे या वाक्यापेक्षाही ,प्रत्येक क्षण आयुष्य जगल्यासारखा जगावा हि कृष्णाची फिलोसोफी . भावना आणि विचार यांचा अतिशय सुंदर समतोल तिच्या जगण्यात होता . तितकेच काळ या गोष्टीला महत्व तिच्या जगण्यात होते . काळ हा अखंडच असतो त्याला सुरुवात मध्य अंत नाही एखाद्या कवितेसारखा मला काळ असा भासायचा . त्याला माझ दैनदिन जगणेही होतेच काळाने ठरवून दिलेले . माझ्या परिवलन परिभ्रमणाच्या कक्षा ठरलेल्या देवापुढे तेवता नंदादीप लावावा . चार ते चार ठिपक्याची रांगोळी काढावी . चार शिट्याचा कुकर लावावा . दोन पोळ्या नवऱ्याच्या डब्यात दोन जेवायला उरलेल्या आठ घरात ठेवाव्या ,रोजचे अडीच लिटर दुध मांडावे . किराणामालाचा हिशोब मांडावा . सार काही तोलून मोजून मापून होत माझ्या जगण्यात पण काळ अखंडच भासायचा किंवा जवळपास तो नव्हताच माझ्या जगण्यात . कृष्णाला मात्र काळाचा दीर्घ परिचय असावा त्याचे तिला खंड पाडता यायचे . काळाच्या चौकटीबाहेर येवून तटस्थपणे तिला नाती माणस सुख दुख कळायची . म्हणूनच एक हा आयुष्य जगल्यासारखा जगता आला पाहिजे हे तिला समजले होते .


अनजाने सायो का राहो मे डेरा है
अनदेखी बाहो मे हम सब को घेरा है
ये पल उजाला है बाकी अंधेरा है
ये पल गवना ना ,ये पल ही तेरा है
जीने वाले सोच ले ,यही वक्त है कर ले पुरी आरजू

सासर घरच्या घर शेत जमिनी साऱ्याच्या वाटण्या झाल्या होत्या . घर मोठ्या दिराला दिले आणि जमीन माझ्या नवऱ्याला . मोठे दीर परदेशी राहायचे साहजिक जमिनीची जबाबदारी नवऱ्यावर आली . ते परदेशातून येतील तेव्हा घर त्यांच्यानावे करायचे पण माझ मन या साऱ्याला तयार होईना . या घरातल्या प्रत्येक कोपरा भिंत प्रत्येक दगड ,खांबाशी नाते जोडले होते . कितीतरी उत्सवाची सणाची उब आणि कितीतरी दुःख अज्ञाताच्या अंधारात विसरून जाण्याची ताकद या घराने मला दिली होती . ते घर माझ असावं हि सहज भावना माझी होती . या वाटणीला अगदी कडाडून नसला तरी माझा विरोध होता . तेव्हा कृष्णा या घरात आमची भाडेकरू म्हणून रहात होती .  माझ्या या प्रश्नावर कृष्णाची फिलोसोफी तयार होती . "अनघालक्ष्मी हा काळ अनंताच्या पटीत वाढणारा आहे त्याला आकार नाही कल्पना नाही या काळासोबत आपण घडत जातो . काळ हा एखादे सुंदर शिल्प करण्यात रममाण असणारा कलाकार आहे तुझ्या जन्माआधी असणाऱ्या तुझ्या वडिलांची आजोबांची पणजीची खापरीची पिढ्या त्याने घडवल्या आणि पुन्हा त्याच लयीत नाचत राहतो आहे कितीतरी माणसांच्या जगण्याचे चिखलगोळे तुडवत आहे . तुला हवेहवेसे वाटणारे घर नष्टही होऊन जाईल या काळाच्या मनोराज्यात . कृष्णाचे बोलणे मला फारसे आवडले नव्हते . काळ वगैरे मला समजले नव्हते पण तिच्या बोलण्याचे तात्पर्य मी घराला विसरावे असे होते . माझी उदास झालेली चेहर्यावरची रेघ तिला उमजली ती चटकन म्हणाली "जीने वाले सोच ले ,यही वक्त है कर ले पुरी आरजू " तिच्या या सुरेल ओळीमुळे दिर भावजयीला घराची वाटणी शेतातच घ्या असे माझे आणि नवर्याचे सांगायचे ठरले . कृष्णाने या एकाच प्रसंगामध्ये साथ केली असे नाही माझे भरकटलेले मार्ग पुन्हा आपले आयुष्याचे ध्येय गाठू लागले होते ते केवळ त्या दिवशी कृष्णा माझ्या सोबत होती म्हणून .


इस पल के जलवो ने ,महफ़िल सवारी है
इस पल की गर्मी ने धडकन उभारी है
इस पल से होने से ,दुनिया हमारी है 
ये पल जो देखो तो सदियो पे भारी है
जीने वाले सोच ले ,यही वक्त है कर ले पुरी आरजू

प्रियाचे माझ्या मुलीचे पत्र हातात पडले . तिने परस्पर एका ख्रिश्चन मुलाशी लग्न केले होते . तिच्या पत्रातील एकेक अक्षर वाचून माझे अवयव गोळा होऊ लागले कृष्णाने प्रियाला पाहिले नव्हते . कृष्णा भाडेकरू म्हणून गेली तीन साडे तीन वर्ष राहत होती आणि प्रिया पाचच वर्षापूर्वी तिच्या काकांच्या सल्ल्यानुसार  उच्च शिक्षणासाठी परदेशी गेली होती . कृष्णाला माझी घनदाट मैत्री खूप कमी वेळात झाली होती याला उत्तर तिच्या भाषेत म्हणजे तिच्या काळानेच ती गोष्ट योजली होती . मला काळ वगैरे कधीच समजला नाही . मला कृष्णाचे आणि कृष्णाला माझे मन उमजत होते . माझी कातर झालेली अवस्था तिच्या लक्षात आली पण तिच्या स्थिरबुद्धीने माझ्यावरचे हे दुःख ओवाळून टाकले कृष्णा म्हणत होती "अनघालक्ष्मी हे बघ एक गोष्ट पक्की कर तू प्रियाला जन्म दिलास वाढवलंलेस ते तिचे आयुष्य म्हणून तिच्या बाळबोध सावल्यांना तुझ्यासारख्या परिपक्व उन्हाची गरज होती . तिचे रुजणे सुरु आहे तिच्या आयुष्यात त्या सावल्यातून तू आता वेळीच वेगळे झाले पाहिजेस कारण तुलाही तुझे आयुष्य आहे तुझा रस्ता आहे या वळणावर झाड होऊन रहायचे आहे . आणि दुसरे असे ख्रिश्चन लोक माणूस नसतात का ? प्रियाच्या आयुष्याचा निर्णय तिने घेतला आहे . तिच्या निर्णयाचे स्वागत कर . आज उदास होशील बोलणे टाकशील तिच्याशी नाते तोडशील एखादे दिवशी काळ त्याची कल्पनेची कुपी उघडेल . तुला प्रियाला भेटावेसे वाटेल पण प्रिया तुझा निर्णय तेव्हा स्वीकारेल का ? अनघालक्ष्मी अग अनघालक्ष्मी " माझे दोन्ही दंड धरून कृष्णा मला गदागदा हलवत होती मी तिच्या कुशीत कितीतरीवेळ रडत राहिले . प्रियाचा निर्णय चुकला म्हणून नाही प्रियाचे मन मला ओळखता आले नाही . आमच्या मैत्रीच्या समेवर तेच गाण वाजत होते  "जीने वाले सोच ले ,यही वक्त है कर ले पुरी आरजू

इस पल के साये मे अपना ठिकाना है
इस पल के आगे फिर हर शय फसाना है
कल किस ने देखा है ,कल किस ने जाना है
इस पल से पायेगा ,जो तुज को पाना है
जीने वाले सोच ले ,यही वक्त है कर ले पुरी आरजू 

पुन्हा आता कृष्णाच्या नवऱ्याची बदली झाली होती . कृष्णा आमच घर गाव सोडून जाणार होती . मी माझ्या स्वतःच्या हाताने तिची bag भरली होती . मला कृष्णाची आठवण पुन्हा पुन्हा येणार होती कारण काळाची पेन्सील धरून कुठलेही चित्र काढणे कृष्णासारखे मला जमणारे नव्हते . कृष्णाला मात्र आठवणी का येतात आल्या तरी काळाच्या डोहात त्या आपले प्रतिबिंब कसे निरखून पाहतात एखादा वर्तमानाचा तरंग त्यावर उठला तर आठवणीचे बिंब कसे तडकते या साऱ्या प्रतिकात्मक गोष्टी तिला ठाऊक होत्या . मी माझी भेट म्हणून तिला सुंदर झोपाळ्यावर बसणाऱ्या दोन मुलीचे पेंटिंग दिले . तिने मात्र एक गंमतीशीर अट घालून चंदनाची भेटवस्तू दिली आणि म्हणाली जोपर्येंत ही चंदनाची वस्तू तुझ्याकडे आहे तोपर्येन्त आपले मैत्र टिकून आहे . पण तुझ्या आयुष्यात जेव्हा एखादा मोठा क्षण येईल ज्याला तुला कवेत घेता येणे शक्य नाही त्यादिवशी हे चंदन उगाळून घे . जर मी चंदन उगाळले तर आपली मैत्री ?मी प्रश्न केला कृष्णाला . तशी कृष्णा मला कडकडून मिठी मारून हळवी झाली . कदाचित कृष्णाला ठावूक होत तिने मला क्षणात आयुष्य जगणे शिकवले होते . तिला खात्री होती यापुढचा असणारा प्रत्येक क्षण मी माझ्या चिमटीत फुलासारखा पकडणार आहे "इस पल से पायेगा ,जो तुज को पाना है जीने वाले सोच ले ,यही वक्त है कर ले पुरी आरजू" गाण्यातली शेवटची ओळ संपली होती . कृष्णाच्या आठवणीने मात्र मुग्यांच्या रांगा लागल्या होत्या आणि मला दूर दूर कुठेतरी ओढून नेत होत्या . कृष्णाच्या भाषेत म्हणायचे तर काळ माझ्या मनाशी फुगडी घालत होता आणि मी त्याच्याबरोबरीने माझ्या भोवती फिरत होते .


-----कविता मोकाशी 

काव्य लाघव

काव्य लाघव 

अंगणात दिव्याची सृष्टी
सोपे सुलभ तुझे अक्षर
वाचणे ना उमजते मला
अश्रूमधुनी काव्य लाघव 

भाजलेले ओष्ठ माझे 
मंद उष्ण तुझा अबोला 
दिठीतून बोल नच काही 
मौन वाहिले आहे तुला 


----कविता 

मेघमय

मेघमय 


स्नेह पालवी दिठी कोवळी 
ऋतू शाहणे वेडे वाकुडे   
नभ फांदीवरती झुलतात   

वाऱ्यास नाही तन्मय छत्र 
अंतराळी शुभ्र पक्षी स्वतंत्र 
उड उडाला स्थलांतरित   

चांदीचा ब्रम्ह कल्प सुमनी 
फुलांचे दिवे काळ डोहात
तलम रेशमी गात्ररात्र

रुणु झुण पल्लव पापणी 
रुणु झुण जीवाचा मोती 
धवलधुके चांदणे सुखांत   

देह नागवा पाठ उघडी 
जांभळा कोळी घर बांधतो  
मायाजाल वनिता एकांत 

अपूर्व शांतीचा खोल गर्त 
देह विदेह मेघमय अवघे 
जळतो कापूर निळेपणात 



------कविता 

जोगवा

जोगवा 


कविते 
माझ्या पारंपारिक मनातील 
चौर्याऐंशी लक्ष वृत्तीत  
कुठे तुला सापडली आहे  ?
जटीलतेची 'जट'

म्हणून 
तू नेसवलेस मला 
तुझे जन्माचे वस्त्र 
भरलास मळवटी  
तुझ्या जगण्याचा भंडार 

कविते 
तुझ्यासाठी मागते आहे 
तुझा जोगवा 


----कविता 

Monday, 20 October 2014

दीप

दीप 

अंतस्थ बहिस्थ 
तुझे सावळे रूप 

वाजवितो तू पावा 
तू दूर तू समीप 

तुझ्या अंगणी 
माझे अंगण 

अनंता अनंती 
तू एकला दीप 


----कविता 

दर्शन

दर्शन 

प्रेम द्रुष्टी आंधळी भरड भरड
जीव पाखड पाखड
जीव कष्टी दीप उजळ उजळ
प्रेम नितळ नितळ
जीव प्रेम द्वैत अद्वैत अद्वैत
दृष्टीतीत द्रुश्य दर्शन

----कविता 

प्रेमभंगाचे दुःख

प्रेमभंगाचे दुःख 


"सॉरी मला तुझ्या भावनांचा आदर आहे पण मी तुझा नाही विचार करू शकणार ,तुला माझ्यापेक्षा चांगला जोडीदार मिळेल ,मी देवाकडे खूप प्रार्थना करेन तुझ्यासाठी ,पण मी तुला कोणत्या कारणासाठी नाही म्हणालो विचारू शकतेस तू मला "
"नाही ,मी नाही विचारणार " आवाजातली थरथर किंचित कमी करत ती म्हणाली 
"चल मी घरी सोडतो तुला " तो म्हणाला
" नाही नको मी जाईन एकटी ,तसेही आपण या जगात एकटेच असतो " किंचित शून्यात नजर लावून ती म्हणाली 

रात्रीच्यावेळी शहरात उंच असणाऱ्या दिव्यातून पडलेला प्रकाश अंगावर झेलत जाण तिला नेहमी आवडायचे ,निर्जन रस्त्यावर ती पावलांची झपझप कमी जास्त करून चालत रहायची तर घोड्यांच्या टापांचा आवाज करणारा घोडेस्वार त्या सिमेंटच्या रस्त्यावरून तिच्यापुढे जायचा .त्या घोड्याचा दूरवर शुभ्र ठिपका होईपर्येंत ती त्याकडे एकटक पहात रहायची . तिच्या मनातली एकेक छटा दूर व्हायची . तीच हृदय सावळस होऊन जायचे ती नेहमी घरी याच मंद क्षणाच्या आकाशातून पोहोचायची . आज तिला हे संथपण नकोसे वाटले . ऑटो पकडून ती घरी पोहोचली . रात्रीचे अकराचे ठोके टणटण वाजू लागले . ठीक बारा तासापूर्वी तिची स्वप्न निराळी होती आणि ठीक बारा तासानंतर स्वप्न पाहण्यासाठी तिला डोळेच नव्हते . डोळ्यातून पाणी ओघळत चालले होते . घर घराच्या भिंती ,भिंतीवरची राधाकृष्णाची पेटिंग डोळ्याच्या पाण्यात विरघळत चालले जणू अस्तित्व संपले होते प्रत्येकाचे . काहीवेळाने तिला रडता येईनासे झाले उसासे ओंजळीत भरू लागली . उसासे रिकामे ओंजळही रिकामी . गुढघा पोटात घेऊन बसून राहिली कित्येकवेळ आणि गार फरशीवर निजून गेली तशीच गुढघे पोटात घेवून ,जणू गर्भाच्या वाटेकडे तिचा प्रवास चालला होता . तिला नवा जन्म हवा होता 

ठीक बारा तास उलटून गेले सकाळचे अकरा वाजले होते . तिला हलक्याश्या जडपणाने जाग आली . दुःख विसरण्याचा एक मार्ग सापडला झोप घ्यायची भरपूर तिने स्वतःला धीर दिला . तिने मोबाईलकडे मोठ्या आशेने पाहिले त्याचा मेसेज मिसकॉल काहीच नाही . पुन्हा एक दुखरी कळ उठली . दाराजवळ लावलेली फेन्शुई आवाज करत राहिली किणकिण . तिने पिझ्झा ऑर्डर केला आणि टी व्ही सर्फिंग करत बसली कित्येकवेळ . टी व्ही वर आमिर खान म्हणत होता "सत्यमेव जयते ,सच्चा है प्यार मेरा " आमिर खान दुसऱ्या वाहिनीवर गाणे म्हणत होता "पेहला नशा पेहला खुमार " बातम्यांच्या गर्दीत टेलीमार्केटिंग सुरु होते . दुसऱ्या वाहिनीवर खुनाचा तपास सुरु होता . तिचे मन कुठेच रमेनासे झाले . देवाला विनवण्या करू लागली ,मी बोललेले सगळे नवस फेडेन पण तो माझ्या प्रेमाचा स्वीकार करू दे . बेल वाजली म्हणजे मनात आलेली इच्छा पूर्ण होते ती स्वतशीच हसली . पिझ्झावाला पिझ्झा देऊन गेला .

गच्चीतून येणारी जाणारी माणस निहाळत राहिली . बसस्टोपवर उभारून एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून बोलणारी जोडपी दिसली तिला एकाचवेळी त्यांचा राग आला आणि अपूप वाटले . तिने विचार केला काल त्याने म्हंटल होत "मी का नाही म्हणालो " कारण विचारू शकतेस . विचारायला हवे होते . कदाचित त्याचा काहीतरी प्रश्न अडीअडचणी असू शकतात . मी दूर करू शकले तर तो हो म्हणेल माझ्या प्रेमाला . पण कोणते कारण असावे ? उत्तराचा थांग लागत नव्हता . हा डोह दिसतो तितका साधा नाही खोल आहे अतिशय खोल आहे .मी वाकून पाहते तर माझे प्रतिबिंब दिसते . डोह म्हणतो प्रतिबिंब तुझेच आहे पण तू "ती" नाहीस . तू माझी नाहीस . मी तुझा नाही . मी याआधीच त्याच्यावर जीव ओवाळला आहे . त्याचे होकाराचे उत्तर मिळावे म्हणून पुन्हा ? त्याच वेदनेच्या गावावरून अनवाणी चालत जायचे ? नाही शक्य नाही . त्याच माझ्यावर प्रेम नाही .  पण त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल ?बसमधून जाताना त्याच तासनतास माझ्याकडे पाहण विसरू शकत नाही मी . रात्री रस्त्यावरून बाय walk चालत येताना शांत सहवासाच्यावेळी त्याने विचारलेले प्रश्न "प्रेम म्हणजे काय ? तू कधी केले आहेस कुणावर ? हे सार कस विसरू मी ? हे सारे क्षण म्हणजे एका आयुष्याने दुसऱ्या आयुष्यात धरलेली ओंजळ होती .

 प्रत्येक दहावीस मजली इमारतीच्या मागून मावळतीचे टोक गाठणाऱ्या सूर्याकडे ती पाहू लागली . कातरवेळ हुरहूर न सांगता घेवून येते . दरदरोज संध्याकाळ शिशिराचे ऋतू घेऊन येते शुभ्र मेघ झडून गेलेल्या पानासारखे आकाशात पाचोळा गर्दी करतात . जीवन गोठूनच जाते मग ही हूरहूर तरी कशी मागे राहते ? तिला मिळत असेल का पुनर्जन्म ? पुन्हा भाबडा आशावाद . काय हरकत आहे त्याचे कारण जाणून घ्यायला . त्याच्या फोनची रिंग वाजत राहिली उत्तर आले नाही . तिने पुन्हा फोन केला उत्तर आले नाही . त्याच्या मोबाईल वर पंधरा ते वीस मीस कॉल आले होते . त्याने मेसेज केला I am on bike call u later . तिला हायसे वाटले You call me later अस लिहिता आले असते त्याला पण त्याने स्वतहून फोन करतो असे सांगितले . पुन्हा कुठेतरी आशेचा किरण तिच्या मनात डोकावता झाला . 

त्याचा फोन आल्यावर तासभर बोलत राहिली आवडलेल्या पुस्तकांबद्दल ,चित्रपटाबद्दल गाण्याबद्दल तिने पुन्हा त्याला कारण विचारलेच नाही . तिला कधी माणसात जाण आवडायचेच नाही हरवली तर पुस्तकाच्या घरात हरवून जायची . तिथे हातातला लामण दिवा घेवून शोधत रहायची भिंतीवर रेखाटलेली माणसे . या घराला कधी पोफडे येत नसत वाळवी लागत नसे . खऱ्या माणसांपेक्षा ही माणसे भावनांनी ओतप्रोत भरलेली वाटायची . या कुणाच्यातरी मनातल्या कल्पना म्हणजे कुठेतरी अवतरलेले वास्तव असते याची बिचारीला जाणीव नसायची .कथा कादंबर्यातले प्रेम तिला खऱ्या जगण्यात आणायचे होते . त्याच्याशी फोनवर कथेतले पात्र समजूनच बोलत राहिली . काहीवेळाने फोन ठेवून दिला . आभाळात चांदणे भरून आले होते एव्हाना . कितीतरी दिवसात आपण भरतकाम केले नाही ,तिच्या लक्षात आले . सुई दोरा घेऊन भरतकाम विणू लागली . निळ्या रंगाचा पक्षी आणि त्याची निळी सावली . भरतकाम करता करता कितीदा सुई बोटात टोचली गेली अंदाजच नव्हता . आकाशही क्रोशाचे ढग घेऊन चांदणे विणत बसलेले 

हा आजचा दिवस बुडाला ती मनाशी म्हणाली तिने दिवे मालवले पण हाच दिवस ती कित्येक महिने जगत राहिली नोकरीला कधी आठ दिवसांची कधी पंधरा दिवसाची आणि आता तर महिन्याभराची सुट्टी घेतली . तिचे रुटीन ठरलेले होते रात्री अकराच्या ठोक्याला झोपायचे सकाळी अकराच्या ठोक्याला उठायचे हॉटेलचे जेवण मागवायचे चित्रपट पहायचा पुस्तक वाचायचे संध्याकाळी त्याला न चुकता फोन करायचा सहजच केला म्हणायचे . कसा आहेस छान ना असाच आनंदी रहा सहजच फोन ठेवून द्यायचे रात्रीच्या जेवणावर फुली भरतकाम करत रिते मन भरत रहायचे .

एकदिवस अचानक खूप पाऊस पडला तिने तिच्याजवळच्या सर्व कागदांच्या होड्या केल्या . वाहत्या पाण्याऐवजी वाहत चाललेल्या होड्यांनी दृश्य सजून जाते . ती मनाशी ठरवते खूप झाले दुःख साजरे करणे . जगात कधी कुणी प्रेमच करत नाही का ? एकदा प्रेम केले म्हणजे पुन्हा प्रेम करता येत नाही का ?त्याच्या न मिळालेल्या प्रेमासाठी आपण आपल्या आयुष्याहून का वेगळे व्हायचे . जिथे कवडसा दिसेल तिथे पाऊल ठेवता आले पाहिजे . मोगरीच्या सुगंधाला देखील लय असते ती पकडता आली पाहिजे .मला उथळ जगणे कधीच आवडत नाही पण हा निराशेचा गर्त तरी का कवटाळायचा  ?मी हा कोश ओलांडला पाहिजे .मला माझ जगण जगायचे आहे .पाऊस ओसरून गेला  . पाऊस थांबून खूपवेळ झाला होता ती अतिशय कमालीची शांत झाली होती . गेल्या कित्येक दिवसात अशी शांतता मनाला लाभली नव्हती . तिने दिवे मालवले बऱ्याचश्या लवकर निजून गेली

 पहाटे लवकर उठून मंदिरातल्या घंटेचा नाद ऐकला . गच्चीतल्या तिच्या आवडत्या फुलांशी गुजगप्पा केल्या . आवडता नाष्टा उडीद डाळ घातलेले उप्पीट केले . तिचा आवडता हिरवा रंग त्या रंगाचा ड्रेस घातला . केस भुरूभुरू उडविले आणि दुचाकीवर मस्त वेग अनुभवत चालली . सगळ्या बाजारपेठा पालथ्या घातल्या आणि पुष्कळ खरेदी केली . घरासाठी स्वतःसाठी . नवीन ज्वेलरी नवीन ड्रेस नवीन हेअरस्टाईल सगळ काही बदलून गेले क्षणात . कॉफीतला चमचा गोल ढवळत ठेवत ती विचार करू लागली . छान असत अस कधी कधी स्वतःच स्वतःला भेटण . त्या मॉलमधून ती बाहेर पडू पाहत असतानाच टरो कार्ड रीडरने तिला बोलावले आणि भाकीत केले तुम्ही लवकरच प्रेमात पडणार आहात . ती आनंदून हातातल्या पिशव्यांचे ओझे घेऊन सरकत्या जिन्यावरून खाली येतानाच तिला तो दिसला तो दुसऱ्या बाजूस जिना चढून वर जात होता . ओळखीचे हसू संभाषणाचा हलवता हात दोघांनी केला . ती त्याला थांब म्हणाली नाही आणि ती थांबली देखील नाही . ती खाली येऊन पोहोचली तो वरच्या मजल्यातून तिला पाठमोरी निहाळत राहिला . त्याने आपल्याला नकार का दिला ? विचारायचे राहूनच गेले .ती मनाशी म्हणाली . तिने भूतकाळाकडे पाठ केली आणि टरो कार्ड रीडरचे भविष्य मनाशी गुंफवू लागली  मी पुन्हा प्रेमात पडणार . स्वतःशीच वेडे हसू लागली आणि घरी परतली तिच्या आवडत्या उंच दिव्याच्या प्रकाशातून चालत . तिच्यामागून येणाऱ्या शुभ्र घोड्याला ठिपका होईपर्येंत पाहू लागली अनासक्त चांदण्यासारखे 


-------कविता मोकाशी 

कथा पात्र संवाद

कथा पात्र संवाद 


कथेतल्या एकेक सगुण मनाच्या पात्राला ती बोलावते
सारी पात्रे जमतात ,अवतीभवती बसतात तिच्याजवळ
तिला म्हणू लागतात 'आम्हाला मिळाली आहे मुक्ती '
कथेच्या प्रदेशातली जीर्ण शरीरे टाकून दिली आम्ही

भावावस्थेच्या अर्धनिद्रिस्थ स्वर्गात आहे आमचा प्रवेश
तुझे शब्द हाक ध्वनी पोहोचणार नाहीत त्या अवकाशात
तेव्हा पुनः पुन्हा वाजवू नकोस संवादाचे चामडे
नाद उठतील आणि संपतील तुझ्या हलकल्लोळात

ती स्पर्श करू पाहते एकेक पात्राला ,पात्रे अदृश्य होतात
अदृश्य झालेल्या पात्रांच्या रित्या कथाचे रितेपण
गोल फेर धरून खेळ खेळते तिच्या एकटेपणाशी
"खुर्ची का मिरची ,खुर्ची का मिरची जाशील कैशी ?"


------कविता

Friday, 17 October 2014

चैतन्याचे मृगजळ

चैतन्याचे मृगजळ 


तुझ्या बगीच्यातील फुलाने गिळले अरण्य 
संचिताची जाणीव संपली, भास मनाला 

कुठेतरी काठोकाठ भरले आहे एकटेपण 
तुझा पाय लागुन ओहळत का नाही भाबडे ?

तुझ्या सावलीत स्थापिले आहे माझे उन्ह 
चैतन्याचे मृगजळ तळमळ लावते जीवाला

चालत नाही वाटसरू रात्रीचा दिसतो तरू
तू लाव दिवा अथवा फुंक चांदण्याची रक्षा

-----कविता

तूझे दुःख

तूझे दुःख 



1

तुझ्याकडे आहे 
गत काळातल्या दुःखाची दुर्बिण 
तु पाहतोस त्या भिंगातुन
गिरकी घेणाऱ्या आयुष्याकडे  
भ्रमणाच्या गती चुकत नाहीत 
सम सापडते तुला जगण्याची 
गत काळातले दुःख 
जणु बाळकडू होते 
गात राहतोस तू जन्मभर 
तीच बडबडगीते 
दुःख सहन कर दुःख भजन कर 
पाठ होतात पाढे 
दुःख एक्के दुःख ,दुःख दुणे दुःख

2

तुझे दुःखाशी नाते होते 
माझे तुझ्याशी 
तुझे दुःख संपले 
तुझे देहमन पैलतीराशी 
मी उराशी कवटाळत राहते 
तुझे संपलेले दुःख

3

दुःखाला काळ नाही मन नाही 
अनादि आहे अथवा पुनः पुनःजन्मणारे
पाषाणाच्या प्रज्ञेप्रमाणे



----कविता 

कृष्णविवर

कृष्णविवर


तुझ्या 
विस्मरणाच्या 
कृष्णविवरात 
जगताना -

भूतकाळाच्या नात्यांचे कोरडे काष्ठ 
उगाळले अथवा जाळले जात नाही 
होऊन जाते नाविन्यपूर्ण  कलाकृती 
उर फुटेपर्येंत धावते काळजाचे हरीण 
अदृश्य सांधल्या नात्यांच्या अरण्यात  
निर्वाताचे कवच मंत्रित समुद्र वाळवंटी  
आतून बाहेर बाहेरून आत शून्य अवघे 

मी 
वावरत 
राहते 
तुझ्या 
विस्मृतितले 
नाट्य  
होऊन 

तुझ्या विस्मृतीच्या मानसपुजेत 
जोपर्येंत मला सापडत नाही 
माझ्या विस्मरणाचे कृष्णविवर 


------कविता 

Wednesday, 15 October 2014

बालपणीचा जादुगार

बालपणीचा जादुगार  



माझ बालपणच सगळ परिकथा जादूच्या कथा ऐकण्यात गेले . देव देवतांच्या गोष्टीमधील अचानक शाप वरदान यामुळे घटना घडवणारी एक अज्ञाताची जादू मनावर नेहमीच लहरत गेली तिचे अधिराज्य गाजवत गेली . ध्रुव बाळ तपश्चर्येला बसून अढळपद मिळवतो हि गोष्ट मनात  इतकी पक्की बसली गेली की घराच्या गच्चीवर आम्ही बच्चेकंपनी संध्याकाळी काही दिवस खेळण्याऐवजी तपाला बसून जोरजोरात नामस्मरण करायचो  ॐ नमः शिवाय ,श्रीराम जयराम जयजय राम ,दिगंबरा दिगंबरा आणि त्यावेळी वाटायचे जितके उंच स्वरात म्हणू तितके लवकर देवाला ऐकू जाईल आणि देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल तथास्तु . आमच्या देवाकडे तश्या डिमांड देखील फारशा नव्हत्या म्हणजे स्नेहलसारखे खोडरबर प्रियाला हवे असायचे तर प्रियासारखे दप्तर मला हवे असायचे आणि माझ्यासारखे पेन स्नेहलला हवे असायचे . आमच्या या देवाला प्रसन्न करून घेण्याच्या खेळात खेळता खेळता अचानक आकाशातून एखादा ढग सूर्याकडे जाणारा हवेचे झोके  घेत जायचा ,त्याकडे पाहून आमचा बालमित्र अंकुश म्हणायचा ए पहा देव प्रसन्न झालाय त्या ढगामधून विष्णू चालत आहेत . आम्ही सारे बच्चेकंपनी गच्चीच्या कठड्यावर थांबून हा विभ्रम आनंदाने अनुभवायचो 

याच निरागस आणि अल्लड वयात स्मॉल वंडर शक्तीमान अशा टी व्ही मालिकामुळे या जादुई जगताबद्दल वाटत राहणारी ओढ निरंतर कायम राहिली सिंड्रेला ,मधुमंजिरी, हेरी पॉटर ,अलिफलैला यासारख्या कॉमिकबुक मधून ,मालिकांमधून भेटणाऱ्या या प्रतिमांनी मनात उत्सुकता आणि त्यासोबत आपलेपणा निर्माण केला . जादू म्हणजे तरी काय ? अपूर्ण स्वप्नांची झालेली पूर्तता त्याचबरोबर भावना बुद्धी यांना चमत्कृत करणारी गोष्ट . पहिला बनवलेला चित्रपट, पहिले केलेले रेकोर्ड ,लोखंडी रुळावर धावणाऱ्या लोखंडी राक्षस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे ,तसेच विजेचे बल्ब वीजेवर चालणारी उपकरणे हे सारे प्रकार त्याकाळात जादुई आकर्षण म्हणूनच गणले गेले होते . तंत्र विकसित होत जाते आणि त्यामागची क्रिया प्रक्रिया समजू लागते आणि हे जादुई जगण सामान्य होऊन जाते . काव्यातील नऊ रसांपैकी अदभुत हा रस असाच सुंदर आहे जणू एखादी वल्लीच .शाळेत असताना या अदभुत रसाची शिकवलेली रचना अजून पाठ आहे

आटपाट नगरात दुधाचे तळे
तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे
नगरातले लोक सारेच वेडे
वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे
आंघोळीला पाणी घेतात दुधाचे
डोक्याला तेल लावतात मधाचे
फणसपोळीचे कपडे घालतात
सारे वेडे उलटे चालतात 

खरे तसे पाहता पाहण्यात येणारे चित्रपट ,वाचनात येणाऱ्या कथा कादंबऱ्या त्यातील घटना पात्रे संवाद मनात विस्मय निर्माण करतात . आणि या सावल्यांना आपण जवळून पहावे त्यांचा हात धरावा असे वाटत राहते . हे खूप सहज घडते ही एक प्रकारची जादूच नाही का ? अस म्हणतात की कलाकृती अनुभवण्यासाठी सूक्ष्मग्राही वृत्ती मार्मिकता असे गुण असणे गरजेचे असते . पण जादू अनुभवण्यासाठी मात्र निरागस मन आणि मनाची अबोधता गरजेची असते . जसे की संजू काका नेहमी पत्याची जादू करायचा माझ्या मनातले पान ओळखायचा . मला जसे समजत गेले मोठी होत गेले त्याच्याकडून पत्याची जादू शिकली . माझ्यापेक्षा लहान भाऊ बहिणी भाचेमंडळी यांच्यावर ती पत्याची जादू करून माझा ताईगिरीचा मुलुख मी गाजवायचे . या संजूकाका जवळ आणखी एक जादू होती म्हणजे लोटरीच्या तिकीटाची . ती मात्र त्याच्यावर कधी प्रसन्न झाली नाही . जर त्याला लोटरी लागली तर तो माझ्या उंचीची आपोआप चालणारी बाहुली आणणार होता  माझ बालपण अश्या जादुई स्वप्नांमध्ये गेले हे केवळ यासाठी नाही तर मला खराखुरा जादुगार भेटला होता

या जादुगाराची गोष्टच निराळी होती म्हणजे जय गंगे हर हर भागीरथी अस म्हणून प्रयोग करणाऱ्या रघुवीर जादूगारासारखा तो लौकिकाने जादुगार नव्हता . पण त्याच्या बासरीच्या सुरामध्ये जादू थिरकायची . मी त्याची बासरी तासनतास त्याच्यासमोर ऐकत बसे आणि त्याला म्हणायचे "किती मस्त वाजवतोस बासरी ते लहान मुलांचे गाणे वाजव की छान किती दिसते फुलपाखरू " मग तो जादुगार अर्थात शुभम दादा माझ चपट नाक ओढत म्हणायचा "बासरी आवडते काय तुला थांब आता तुझ्याशीच लग्न करतो " मग मी घुश्श्यात येवून म्हणायचे "ई जा बाबा नको तुझ्यासारखा नवरा " आणि लाजून पळत घरी यायचे तर शुभम दादा मागून ओरडायचा "अग ते तुझ गाण ऐकून जा ,मी धरू जाता येईना आता ,छान किती दिसते फुलपाखरू "

शुभम दादा कधी कधी माझ्या भातुकलीच्या खेळात कधी विषामृत तर कधी व्यवसायमालेच्या लिखाणासाठी  तर कधी कार्यानुभावातील प्रोजेक्टसाठी आजूबाजूलाच असायचा . त्याला आई बाबा बहिण कुणी होते का ठाऊक नव्हते तसा तो अवलीच होता. कुणी म्हणायचे तो घर सोडून पळून आला आहे ,कुणी म्हणायचे कुठल्यातरी गुन्ह्यातून भूमिगत झाला आहे . त्याच्याबद्दलच्या अशा अस्तित्वाचा कधीच माझ्यासाठी प्रश्न आला नाही . हनुमंतासारखे लहानाहून लहान मोठ्याहून मोठा असे होणे त्याला जमायचे .पत्ते बुद्धिबळ काय वाटेल ते खेळ त्याला जमायचे फक्त सापशिडी सोडून त्यात मात्र नेहमी मीच जिंकायचे . अशी त्याची जादू मनावर मुक्त चौफेर उधळत जातच होती पण ज्या प्रसंगाने तो माझ्यासाठी जादुगार झाला तो प्रसंग विसरणे शक्य नाही आणि आठवणे म्हणजे आयुष्याला अर्घ्य देण्यासारखेच आहे

त्या दिवशी माझ आणि प्रियाचे भांडण झाले .होते  तिच्याजवळची पेनशील मी चोरली असे तिला वाटत होते पण मी तिच्यासारखीच दिसणारी डिट्टो पेनशील मधु मावशीकडून हट्ट करून विकत आणली होती . प्रियाला कितीदा समजावून सांगितले तरी तिला ते पटेचना मग मी "आलगड्डी बालगड्डी बारा वर्ष बोलू नको लिंबाचे पान तोडू नको तुझी गड्डी फु म्हणून " तिच्यावर रुसवा टाकून आले . घरी जाऊन उगीच उगीच कढत कढत पाणी डोळ्यातून सांडू लागले आजी ओरडली "तुझे डोळे म्हणजे पाण्याच्या टाक्या काय ग " इतक्यात मला काहीसे सुचले आणि डोळे पुसून आजीला म्हणाले "आजी स्नेहलकडे जाते " स्नेहलकडे गेले तर प्रियाबाई तिथे आधीच उपस्थित होत्या आणि स्नेहल मला म्हणत होती "आजपासून प्रिया आणि मी तुझ्याशी खेळणार नाही " मी त्या दोघींना का प्रश्नही विचारले नाही मलाही राग आलाच होता त्या प्रियाचा ; खोटारडी मी चोरली म्हणे पेनशील . स्नेहलच्या घरातून चालत चालत निघाले . विचार करू लागले आता जर प्रिया आणि स्नेहल माझ्याशी खेळणार नाहीत तर मग कुणाशी खेळायचे ?  मला केवढा मोठा प्रश्न पडला होता . अचानक आठवले शुंभम दादाने सांगितलेले 'जर तुला कधी प्रश्न पडला तर आकाशाला विचार बघ तुला उत्तर मिळेल "

मी ठरवले आता आकाशाला विचारायचे . आकाश काही फार दूर नव्हते ते काय शंकराच्या मंदिराजवळ होते . मी चालत मंदिराजवळ पोहचले तर तिथे पुढे सपाट मैदान आकाश नाहीच . अजून पुढे आहे आकाश त्या डोळ्याच्या दवाखान्याजवळ आहे आकाश . दवाखान्याजवळ येवून पोहोचते तर पुढे पाण्याचा तलाव . अय्या हे काय या तलावाच्या पुढेच आकाश आहे आता तलावातून चालत जायचे . तलावातून चालत निघाले अव्वा हे काय पाणी घोटा गुडगा कंबर छाती नाकापर्येंत आले आकाश दिसेचना . आई मला कसतरी होते आहे माझ्या नाका तोंडात पाणी . जाग आली तर शुभम दादा आई बाबा आजी आजोबा सगळे गोल करून पाहत आहेत माझ्याकडे . त्या दिवशी नोकरीच्या बदलीच्या कामासाठी शुभम दादा गावाबाहेर गेला होता मी आकाश शोधण्याच्या नादात कधी नदीजवळ येऊन पोहोचले मला कल्पनाच नव्हती . त्याने नदीजवळ आरडाओरडा ऐकला कुणीतरी छोटी मुलगी पाण्यात बुडती आहे त्याने क्षणार्धात कसलाही विचार न करता नदीत सूर मारला आणि त्या मुलीला वाचवले ती छोटी मुलगी मीच होते . मला जाग आल्यावर आईने देवाचा अंगारा लावला . मग डॉक्टरकाकांना मी का नदीजवळ गेले ती गोष्ट सांगितली . माझी गोष्ट ऐकून आजीने तर तिच्या कपाळालाच हात टेकवला . मला भेटायला प्रिया स्नेहल दोघी आल्या होत्या आम्ही बट्टी केली . आई बाबा आजी आजोबा सगळेजणच शुभम दादाला कुरवाळत होते प्रेमाने जवळ घेत होते . मी शुभम दादाच्या कानाजवळ माझे तोंड नेले आणि बारीक आवाजात त्याला विचारले " आकाश कुठे भेटत ? तू म्हणाला होतास ना की तुला प्रश्न पडला कधी तर आकाशाला विचार " तर शुभम दादा खोखो हसत सुटला आणि म्हणाला "अग माझे अंबे जगदंबे तू काहीही लक्षात ठेवतेस काय ? आता यापुढे कधीही प्रश्न पडला तर आधी आई बाबांना विचारायचे प्रॉमिस कर मला "

शुभम दादाला मी प्रॉमिस केले . शुभम दादाचे बदलीच्या नोकरीचे काम झाले होते त्यामुळे तो लवकरच त्याच्या कामासाठी परराज्यात निघून गेला .त्याची बासरी विसरणे तर शक्यच नाही आणि ज्या क्षणापासून त्याची जादू मनावर ओथंबून गेली होती तेव्हापासून ते माझ्या जीव वाचवण्याच्या क्षणापर्येंत तो माझा जादुगार होता . पुन्हा कधी शुभम दादा भेटला नाही आणि मी ही त्याला शोधायचा प्रयत्न करणार देखील नाही जादू नेहमी अनुभवायची . जादूची ट्रिक समजली की जादू कळत नाही . आजही शुभम दादाला दिलेले प्रॉमिस लक्षात राहते अगदी गुगलला किंवा टोल फ्री नंबरला देखील प्रश्न विचारते तेव्हा प्रॉमिस आठवते  परिकथेत नाही का एखादा यक्ष वचन मागून निघून जातो आणि हातामध्ये रंगबिरंगी लोलक देतो . राजकन्या त्या लोलकाशी मन गुंफत राहते


-------कविता मोकाशी 

परप्रकाशी

परप्रकाशी 

फुलपाखराच्या रंगाचे जहाज 
वाळवंट आणि समुद्र रंगीबेरंगी 
दूरवर केशरी उन्हाच्या लाटा 
कैक स्वप्नांचा प्रवास रंगाचा 
 
गंधाच्या कुपीचे अवकाशयान 
अवकाशयानातून उतरतात 
सुंगधी माणसे सुगंधी देश 
कैक स्मृतींचे आयुष्य गंधाचे 

आदि अंत योजना परमसत्तेची 
अंतरिक्षामध्ये मिट्ट काळोख  
नाही रंग नाही गंध निर्वातात 
ग्रहगोल शब्द नुसते परप्रकाशी 



-----कविता 

तुझी होण्या

तुझी होण्या


मातीचे संस्कार | जोडव्याचे फुल
अंगणी पाऊले | कर्णिकेची
स्मृतीतले तोडे | स्वप्नाचे नर्तन
तदाकार वेली | देहमन
क्षितीज मेखला | भेट खुणगाठ
सृष्टीचे देवदुत | संगमरवरी
पर्णाचे बिलवर | पर्णाते मनोहर
मंद किणकिण | स्थितीची
कवडसा मुद्रीका | हृदयीचा मत्स्य
गिळे सुखवेदना | प्रीतीतली
सुराचा तन्मणी | प्राणाचे गंधर्व
गाताती वचन | नदीकाठी
नीलनिळे कुंतल | प्रतिभेचे जल
उभी पाठमोरी | शब्दकळा
तुझे आशीर्वचन | सौभाग्य भुषण
आले भेटावया | तुझी होण्या

----कविता

Tuesday, 14 October 2014

दार उघड बये

दार उघड बये


अचानक एकाएकी
एकटेपण
तुंग हिमालयासारखे

अश्रूतून वृक्ष 
ठायीठायी घेत जन्म
कोसळणारे

माझा प्राण
कुठल्याश्या प्राणाच्या
हलाहलात

या एकांताची
कातरवेळ
आली तुझ्या उंबरयावर

सूर्यास्ताकडे
मुख अथवा पाठ
आडवे अंधातरी
एकटेपण

बैरागी फिरतो दारोदार
मागत काळाची भिक्षा

काळांतकला काळ
भेटू दे
तुझ्या घरी

दार उघड बये sssss
दार उघड ssss


----कविता 

Monday, 13 October 2014

मिथ्याची माती

मिथ्याची माती 


१

परिस्थितीला आकार सापडतो 
परिस्थिती घडविते अनेक घट 
घटांमध्ये आकाश भरून जाते 
त्या आकाशात रममाण होतात 
न उडणारे पक्षी किंवा पक्ष्यांची नक्षी 
आकाश आभासी पक्षीही आभासी 
पण पायाला चिकटते माती मिथ्याची  
कारण घट खराखुरा असतो 

२

मन अवकाशस्थितीला पोहोचते 
नक्षत्रांचे देह धारण करते 
मनाची होते अंतरिक्ष अभिव्यक्ती 
या अवकाशपणातून 
मन उडता उडत नाही 
देहाची पालटत नाही स्थिती 
काळाच्या मुंग्या उभारतात  
नक्षत्रांच्या देहाभोवती वारूळ 
या वारुळात अनतांची गुंफा 
किंवा एक महान मिथककथा 


३

भविष्यात घर बांधून 
होईल की नाही होणार ?
उत्तर त्याला माहीत नाही 
भूतकाळात मात्र आहे त्याचे घर  
वडिलोपार्जित पूर्वापार मिळालेले 
पण भूकंपात गाडले गेलेले 
जोपर्येंत भूकंप होतील 
तोवर घर पडझडीत जाणार 
पण त्याच्याजवळ आहे भूतकाळ 
तोपर्येंत त्याचे घर असणार 
हे त्याचे आणि घराचे मिथ 
तो स्वतःही नाकारत नाही 

४

भूतकाळाचा देह न ओलांडणारी 
अवकाशस्थिती त्याच्या मनाला 
प्राप्त झाली आहे म्हणा 
आठवणीच्या नक्षत्रांभोवती 
उभे वारूळ त्याच्या भूतकाळाचे  

किंवा परिस्थितीने घडविला आहे 
त्याचा घट आणि भरले आहे 
त्यात न उडणारे आकाश 
न बांधता येणारे घर 
त्याला सापडावे म्हणून 



------कविता 

चांदणे

चांदणे 



श्वासाची घागर । समुद्र जागर 
फुंकर फुंकर । चांदणे 
अर्थाची नक्षी । शब्दाचा पक्षी 
दूरदूर अंबर । चांदणे 
बकुळ गजरा । स्मृती सोयरा 
माहेर सुंदर । चांदणे 

नभ कातळ  । मेघ सुमनजळ   
धूप कापूर । चांदणे 
तुझे वैराग्य । माझे भाग्य  
ब्रम्ह अक्षर । चांदणे 
स्वप्न ओंजळ । कल्पना मोहोळ  
सत्य मधुमधुर । चांदणे 

सृष्टी माथा । दृष्टी अक्षता 
दिशा स्वयंवर । चांदणे 
याचक दान । पसरला पदर 
उजेड मुठभर । चांदणे 
प्राचीन घरदार । जंगम स्थावर 
कल्पाचे तरुवर ।चांदणे 



-----कविता 

अखंड सौभाग्य

अखंड सौभाग्य 


कवितेचा जग घेवून नाचते आहे 
मागते आहे जोगवा कवितेचा 
अनंत युगासाठी 

काळ भिक्षा घालेल माझ्या मना 
काळाच्या हातून प्राशेन विषामृत  
निर्मिती क्षणाला 

तदनंतर सर्वत्र उपलब्धी कवितेची 
उपाधी अनुपाधी अवघी मी कविता 
अखंड सौभाग्य 



----कविता 

Wednesday, 8 October 2014

उतू नको मातु नको

कवितेइतकाच मला आवडणारा आणि जिव्हाळ्याचा साहित्य प्रकार म्हणजे कथा . कधी कधी मला वाटते  माणसाच अवघ भावविश्व कथेशी बांधले गेले आहे . लहानपणात चिऊ काऊच्या घासाबरोबर ऐकलेल्या परीकथा ,इसापनीती ,रामायण महाभारतल्या कथा हा क्षण आयुष्याच्या कितीतरी क्षणाची परीघ साकारत असतो . या कथा ऐकताना वाटते या कथांनी आपल्या मनावर पाण्याची ओंजळ धरली आहे आणि ती कधी रिती होतच नाही कारण भूतकाळातच संपलेल्या वाळूच घड्याळ मी अश्यावेळी उलट करून ठेवते खरोखर कथा ही वैश्विक आहे ,प्राचीनाच्या सृष्टीतली सारी गूढ रहस्ये कथेनेच उलगडली आहेत . बुद्धदेवांच्या आयुष्याला शिकवणीला आणि कार्याला या कथेने भारून टाकले आहे . ग्रीक पुराणे ,बायबल एक ना अनेक तत्वज्ञानाच्या पायथ्याशी ती आपले अस्तित्व व्यापून उभी आहे . मला कथेइतकीच कथेतील पात्रे मनात दीर्घकाळ रेंगाळणारी असतात . कथा आणि त्यातली पात्रे म्हणजे एकाचवेळी सात आठ खडे हवेतून उचलून टाकणारी सागरगोटे खेळणारी मुलगी दिसते . कादंबरीतल्या पात्रापेक्षाही कथेतली पात्रे लळा लावतात . कथेतली पात्र सहज आपलीशी होतात तर कादंबरीतील पात्रे आपल्याला ओढून दूर घेऊन जातात . त्यांच्या लाटांवर आपण आरूढ होतो पण समुद्र जितक्या वेगाने आपलेसे करतो त्याच वेगाने दूर नेऊन एकटेसे फेकून देतो तसे काहीसे कादंबरीतल्या पात्रामध्ये होते . मला कथा खरोखर खूप जिव्हाळयाची वाटते आईसारखे प्रेमाने हात कुरवाळणार्या सावलीसारखी भासते . आजीने रामायण सांगताना राम वनवासात गेला म्हणून रडलेली मी आठवते ,रत्नाकर मतकरींच्या कथेने भरदुपारी टाकलेली गूढता आठवते . हातात धरलेले पुस्तक न ठेवता येणारी शिरवळकरांच्या कथेतली उत्कटता आठवते . जी ए कुलकर्णीच्या कथेतली ग्रे शेड भाऊ पाध्येंच्या कथेतला लाल रंग दि बा मोकांशीच्या कथेतील तरलता मनाच्या साऱ्या दिशा या कथा व्यापून टाकतात मग मी प्रत्येक कथेचा फेर धरून नाचू लागते .खरोखर कथा अजराअमर असतात 


-------------------------------------------------------------------------------------


तू विचारलेला मार्ग जातो एकटेपणाकडे 
या मार्गावरून चालून जाणाऱ्यांना  
लाभले होते प्रतिभासंपन्न एकटेपण 
या मार्गावरून चालणारे 
समूह देखील एकटे पडतात 
तुला का जायचे आहे या मार्गावरून ?
माझा प्रश्न ऐकून  --
तिने ऐकवली मला तिची कथा 

अनादि काळापासून चालत आहेत 
स्थिर भासणारी माझी अस्थिर पावले 
मला जन्म देणारे कुणीच नव्हते 
मला सांभाळणारे कुणीच नाही 
मीच सांभाळत राहते अनाथ ब्रम्हांडाला  
काळाला मानले आहे मी माझा स्नेही 
तेव्हापासून काळही विलीन तल्लीन 
विश्वमोहिनी विश्वव्यापिनी विश्वकदंब 
या अवघ्या चर-अचर नाम रुपामध्ये   

सखी मी चालत राहते चालतच राहते 
अंत न सापडणाऱ्या अनंताच्या गुहेकडे  
कुणी मला माया म्हणते कुणी आई 
कुणी अन्य काही ना काही अभिधानात 
तू मला ओळखणार नाहीस 
मी आहे तुझ्या असण्याचे निमित्त 
आणि तुझ्या नसण्याचा भास 

सखी मला थांबता येत नाही 
गेले पाहिजे ,चालत राहिले पाहिजे 
अंतस्थ झाली आहे तुझ्या माझ्यात 
माझी करुणा आणि तुझी वेदना 
कुठल्याश्या प्राचीन गाभाऱ्यात 
ऐकु येतो आहे मंत्राचा नामघोष 
मी सांगितली आहे तुला माझी कथा 
उतू नको मातु नको 
घेतला वसा टाकू नको 

तिच्या कथेतले हुळहुळते दुःख 
मी सोडून दिले पाण्यावर 
सांजशकुनाच्या स्तब्धवेळी 
कथा ऐकवून ती निघून गेली 
मला गेले पाहिजे तिच्या सोबत 
तिच्या एकटेपणाचा दिवा 
विसरला आहे माझ्याजवळ 
दिव्यातुन दिवा प्रज्वलित झाला आहे  
गंगेच्या डोहात वितळली आहेत 
जणू लक्ष लक्ष तारांगणे  
ज्योतीच्या लोलकासम 
माझे मनही एकटे विश्वभर  

अंतिमचा दिवा केव्हा प्रज्वेल ?
तिच्या ओंजळीत केव्हा ठेवेन दिवा ?
या अनाम प्रश्नांची गोंदण 
माझ्या प्राक्तनावर कोरलेली 
आणि उत्तरे त्या सखीला ठाऊक 
जिने मांडला आहे प्रश्नाचा सारीपाट 
मला चालत राहिले पाहिजे 
जोपर्येंत वळून मागे पाहत नाही मी 
अन्यथा तिच्या कथेचे साकारते शिल्प 
विश्वकर्माने बांधलेल्या मंदिरात  
सखीने ऐकवली आहे कथा 
उतू नको मातु नको 
घेतला वसा टाकू नको 




------कविता मोकाशी 

------------------------------------------------------------------------------------------------------------