Pages

Tuesday, 25 June 2013

निमित्त

विचांराच्या गुढ जटील प्रकियेतल 
बुडणार किँवा तरंगणार 
तुझ्या श्वासांच गलबत

आयुष्याचा अर्ध्या वाटेवर
मैलाचा दगड होऊन बसणारी
तुझ्या भासाची लेणी

संधी समास सवय कोडे
काहीच न सोडवता गुरफटणारे
तुझ्या ध्यासाचे नकाशे

भेटायचेच म्हटल तर 

काहीही निमित्त पुरत
अगदी टाळाव्या वाटणारया
तुझ्या नजरेच्या धाकाचे



-----कविता

गिफ्टकथा

एकदा म्हणजे एकदाच माझ्या चुलत चुलत चुलत मैत्रिणीतील एक सख्खी मैत्रीण म्हणजे एकदमच सख्खी ती दूर म्हणजे खुपच दूर सात समुद्र ओलांडून परदेशी गेली होती . तर ती परत येणार म्हणुन तिच्यासाठी गिफ्ट खरेदीला शेजारच्या फाफे अर्थात फास्ट फ्रेँडला घेऊन गेले . मग अर्थातच दोघीँनी आपापल्या चौकस तिरकस आणि कुठले कस असतील त्या बुध्दीने सगळ्या गिफ्ट पाहुन घेतल्या . अखेर नजर स्थिर झाली म्हणजे एकदम स्थिर झालीच ती एका मेमोरीकडे पाहुन , तसे मधले मग पर्स घड्याळ फोटो फ्रेम यांचे पुल ओलांडुन त्या डेस्टिनेशन जवळ पोहोचले . काय सुंदर मेमोरी होती म्हणुन सांगु गेल्या दहा हजार वर्षात अशी मेमोरी पाहिली नाही पुढल्या दहा हजार वर्षात होणार नाही (अस कोण म्हणाले ओळखा पाहु ) .

तर दोन मुली निवांत होडीत बसलेल्या होत्या वल्ह तसच पडुन होत त्याला कुणी हाकत नव्हत ,अशी काहीशी ती मेमोरी होती . तर माझी सो कॉल्ड फाफे मैत्रीण पण तिथे आली आणि एक चार सुर एकाचवेळी लावावेत तशी म्हणाली
"हे घेणार आहेस तिला गिफ्ट "
"हो" मी म्हणाले
"तिच कुणी अस आहे का ? " फाफेचा प्रतिप्रश्न
आमच्या मैत्रीवर तसही खुप वर्षे ही फाफे जळते असा माझा अंदाज होताच अगदी बरोबर निघाला . सर्दी आलेल्या नाक डोळ्यासारख मिचकावत मी तिला म्हणाले
"कुणी कशाला हव मी आहे ना "
"कप्पाळ माझ" तिची उचकट का उत्कट काय ते तसली प्रतिक्रिया
मी परत पुन्हा मुढ अंजीर नाही नाही आपल ते काय असत की कवी विचारवंताच हां गुढ गंभीर तशी माझी मुद्रा
"अग म्हणजे आय मीन इज शी सिँगल ऑर कपल्ड " फाफेचा प्रश्न
"अग नाही आपल्यासारखीच ग सिँगल सिँगल "
"मग हे कशाला गिफ्ट "
"अग छान आहे ना हे दोन मुली नावेत बसल्या आहेत न हाकल जाणार वल्ह " माझे रेडिमेड उत्तर तिच्या रेडिमेड प्रश्नाला
मघाशीची अंदाजाची शिजलेली डाळ चांगलीच करपते आहे वाटतच होते मला ,ही आमच्या मैत्रीवर जळतेच
"अग कवे ती मुलगी नाही एक मुलगा आणि मुलगी आहे कपल आहे ते "फाफे म्हणाली
"अग मुलगा कसा असेल नीट बघ मुलगी आहे "
"अग कवे तो मुलगाच आहे तो हातात कबुतर काय शांततेच प्रतिक म्हणुन घेऊन उभा आहे का " फाफे विजयी
मी शरणांगत

आमच्या संवादाचे बीज संपुर्ण शॉपीपर पसरले होते माझ्या तो शॉपीचा मालक तर धुमारे फुटल्यासारखा तोँडावर हात दाबुन हसत होता . शेवटी त्याच्याकडे पाहिल तर शिँक गिळावी तशी हसु गिळला त्याच डोळ्यात पाणी चमकल त्याच्या . विचारणार होते त्याला काय माहेरची साडी पाहुन आलात डोळ्यात पाणी काढताय पण माहेरची साडी नावाचा पिकचर आहे का नाही याचा माझा कॉन्फीडन्स त्या मेमोरीतली मुलगी आहे का मुलगा इतकाच लुज झाला त्या कारणाने त्या शॉपीच्या मालकाचे हसणे मनावर घेतले नाही . एक झक्कास माशाच्या आकाराची पर्स गिफ्ट म्हणुन घेतली (माशाला झक म्हणतात म्हणे )आणि गिफ्ट शॉपीतुन बाहेर पडलो
तर अशी गिफ्टकथा कॉलेजच्या पारी ,कॅन्टीनच्या दारी , हॉटेलच्या साठी ,तुमच्या गाठी सफळ संपुर्ण .



----कविता मोकाशी

सदगती

भाबडा जीव भांबवलेली कथा
सार संसाररुपी काळजाच्या व्यथा

चंचल अचंचल निर्मळ डोळयातले पाणी
शब्द उदरात परी ओठावर श्वासाची गाणी

छंद शब्द ताल सुर छेदतात लयाला
क्षितीजास कुठे पळवाट ही आस भेदायला

आले तुझ्या दारी 
सुख दुखा लाभु दे सदगती
अनंत अमर्याद प्रवाही तू 
नेणती माझी प्रीती भक्ती

----कविता

राजा गुलाम झाला

शब्दांची फितुरी झाली ,फितुरीचे शब्द झाले
युध्द जन्मभुमी झाली ,जन्मभुमीवर युध्द झाले
दवंडीचे कौतुक झाले ,कौतुकाची दवंडी पिटली
वस्त्यांचे बाजार झाले ,बाजाराची वस्ती झाली
तुरुंगाचे घर झाले ,घरातुन तुरुंग माजला
-सरतेशेवटी राजा गुलाम झाला

मातीचा देव झाला ,देवाची माती झाली
जत्रेत सोँग भरली ,सोगांची जत्रा झाली
नवसाचे अध्यात्म झाले ,अध्यात्माचे नवस झाले
उपकारांचे ओझे झाले ,ओझ्याचे उपकार मानले
सगुणातुन निर्गुण झाला ,निर्गुणातुन सगुण झाला
-सरतेशेवटी राजा गुलाम झाला

पोकळ होती ती वाद्य झाली
कागदाची कविता झाली
मयखान्यात तहान शमु लागली
नदी नाले आटु लागले
घोडे निव्वळ नाचु लागले
भुकेने जग मरुन गेले
विचार झाला आचार झाला
तह झाला शह झाला
-सरतेशेवटी राजा गुलाम झाला


----कविता

अढळ ध्रुवपद

अढळ ध्रुवपद

रजेचा अर्ज टाकुन ती झोपुन टाकली दिवसभर .

लहान असताना कधी आजीने सांगितलेली 
ध्रुव बाळाची गोष्ट आठवत राहिली
अशा सत्वहीन वाटणारया वेळेत
बालपण का आठवाव ?
तिच तिलाच नवल वाटलं
जड धुपट्यातल्या ओझ्यात 
उबदार वाटणारया स्वतःच्या कुशीत
स्वतःलाच ओढुन घेतल
शिँपल्यात मोती मिटावेत तसे आपलेच तळहात 
आपल्याच चेहरयाला लावले
ऐकत राहिली पंडितजीची बागेश्री बहार
अहमद फराजची गझल
कुसुमाग्रजांच्या कविता
जग सुंदर केलेल्यांचे आभार मानत राहिली
पाऊस कोसळला ओसरुन गेला
पुन्हा तेच तिचे अढळ ध्रुवपद
तिच्या साम्राज्यातले
कुंकुभरला मळवट
शिजणारी डाळ
सकाळचे डबे
रात्रीची सिरीयल
आणि गार बर्फासारखी थंड दुपार

----कविता

Friday, 14 June 2013

बोलायचे नाही

बोलायचे नाही 



ठरवल तर होतच तस खुप काही

बोलायचे नाही सांगायचे नाही
वाट चुकला रस्ता
तरी कोणाला विचारायचे नाही
चालत रहायचे एकाच दिशेने
त्या दिशेच्या टोकापर्यँत
मौन सुटले
शपथ घातली शब्दांनी
समजुन उमजुन चुकले डोळ्यांना
न पाठवलेली पत्र
आभाळात उडाली
पाचोळ्यासारखी

धीर सुटला 
पत्याचे बांधलेले घर कोसळले
पेनाची रिफील 
बदलुन ठेवली मी इतक्यात
आता सापडलीच पत्रे तुला
तरी पाठमोरे न्हाहाळ कागदांना
उत्तर नकोच आहे
नकोच होते
पण पुन्हा प्रश्न पाठवु नको
माझ्या उतरांवर

ठरवल तर होतच तस खुप काही
बोलायचे नाही सांगायचे नाही


-----कविता 

पण मावळत नाही

दिवस उगवतो पण मावळत नाही 
बदलत राहतात शिफ्ट
बदलत जातात वेळा
सुर्य तळपत राहतो तसाच माध्यान्हाला

भुक लागते तहान लागते
उचकी येते ठसका लागतो
दमा भरतो श्वास थकतो
हसु येत रडु येत
भागत काहीच नाही
साठत राहतात यांची गुणोत्तर
कोडिँग डिकोडिँग करत

हात हलवत राहतात
शहरभर पसरलेले दिवे
दिपस्तंभासारखे
दाखवतात हजार वाटा
एकाही वाटेवर असत नाही उन्ह
नसते सावलीही

दाटुन येतो अश्यात उमाळा
भरतात आठवणीँचे ई कल्लोळ
होतात ई गप्पा
पुढच्या हळव्या क्षणापर्यँत
साठल जाते अधांतरी दुरचे जगणे
गजबज होते एकटेपणाच्या शहरात
पण शहर एकटे सोडत नाही

भिँतीला असावा कोनाडा
हायवेला असावा फुटपाथ
तसे असते घर या जगण्याला
दिवस उगवतो पण मावळत नाही


---------कविता

कसे कायकी

बोबड आयुष्य बोबड्या व्यथा
बोबडा प्राण बोबडी कथा

किँवडी भिँत किँवडा कान
किँवडे सत्कार किँवडा मान

आंधळा पैसा आंधळी सिध्दी
आंधळा व्यापार आंधळी बुध्दी

पांगळा देव पांगळा भक्ती
पांगळा आचार पांगळी मुक्ती

रडके छंद रडकी कला
रडके व्यसन रडकी मधुशाला

तरीही
आयुष्य सुंदर आहे
कसे कायकी 
कोणास ठाऊक


------कविता 

तुला भेटल्यावर

वेंधळ्या वाटेवरी ठेवले 
परतीचे लाख दिवे 
पानापानातून डोकावतो आहे 
गहिरा कापरा सूर्य 

अर्ध पान वहीवरभरून 
चुकलेत नकाशे 
परडीभरून सांडली आहेत 
अबोल हळवी फुले 

मीच येणार खरतर 
शोधायला तुला 
पण विसरले आहे मी 
माझ्या घराचे रस्ते 
तुला भेटल्यावर

----कविता 

ओठांची मिठी

ओठांची मिठी

चांदणे दुधाळ गव्हाळ

जणु रेशीम पाखरे
शब्द मिठ्ठास खट्याळ
लाडिक नाजुक नखरे

रंग फिरता अबोल
दर्पण आतूर बिँब
गंध फिक्का कवडसा
पाऊस फितूर चिँब

माझे मला मी पाहिले
तृप्त तृषेतल्या दिठी
बंद पापण्यात मिटली
तुझ्या ओठांची मिठी

-----कविता 

नकुषा

आदरणीय बाई
शि सा न वि वि

सुरुवात कुठुन करु कळत नाही पत्र लिहायला कारण देखील सांगणे सुचत नाही . तस तुमच्याबद्दल नेमक काय वाटत हे ठरवण सुध्दा माझ्यासाठी खुप संभ्रमाचे आहे . वडीलांच्या कोर्ट कचेरी खटल्याचा राग मनात धरुन तुम्ही माझ्या नकळत्या वयात माझ्या मनाची कुचंबणा केलीत म्हणुन तुमच्यावर वैर धरु की तुमच्या मानसिक अस्वस्थतेने माझ्यासारख्या अनेक मुलीँचे ताकदीचे बळी गेले हे समजुन तुमच्यावर कीव करु समजत नाही . गेली अनेक वर्षे तुमच्यावर मी राग धरुन बसले होते आता तो देखील उरला नाही . तुमच्याशी बोलण टाळत आले खरतर तुम्हीच बोलण सोडलत माझ्याशी . तुमच्याबद्दल वाटणारा आदर अगदी संपुन गेलाय बाई तुम्ही माझ्या कोण होतात मी तुमची कोण होते ठाऊक नाही . माझ्या घराची जागा अपुरी पडायची म्हणुन तुमच्या घरी केलेला अभ्यास ,काळ्या फरशीवर खडूनी आपण मिळुन लिहलेले पाढे सोडवलेली गणित ,घरी जाताना गरम तुप घातलेला शिरा खायला घालण्यारया तुम्ही आणि सारया वर्गात माझ्या दोन वेण्यांच्या रिबीनी ओढुन गालावर बोट ओढताना 'मी तुला अस मारलय अस घरी सांगितलस तर याद राख' अश्या धमकावणारया तुम्ही किती विरोधाभास हा बाई . तुमच्या आणि वडीलांच्या कोर्टाच्या मामल्यात माझा जुगार खेळलात तुम्ही ?

माझ अल्लड असणार वय शंका जिज्ञानेस वय तुम्ही तुमच्या प्रश्नांत पुरवुन टाकलतं माझ शाळेचे बालपण नासवलत तुम्ही . तुम्हाला कल्पना नसेल पण तुम्ही माझ्यावर केलेल्या हिँसेने हो हिँसाच म्हणणार मी एकही मैत्रिण जोडु शकले नाही .डब्यासाठी गोल रिँगण करुन बसलेल्या प्रत्येक गटात मी जायचे सारेच वगळायचे तुम्ही वर्गात रोज मला मारायच्या माझ्याबद्दल वाईट बोलायचात माझ्या वडिलांबद्दल वाईट बोलायचात कोणती मुलगी मैत्री करेल माझ्याशी . मी अबोलीच्या फुलझाडांशेजारी बसुन एकटीनेच डबा खाल्ला कितिदा . खेळाच्या सुट्टीत अख्ख मैदान मी एकटीच लंगडी घालायचे पण मी आऊट कुणाला करणार सांगा बाई कारण मी एकटीच खेळायचे . माझ चुकल इतकच मी कधीही यातल एकही अक्षर माझ्या आई बांबाना सांगितल नाही . सांगणार तरी कसे माझ्याजवळ फक्त माझी म्हातारी आजी आजोबा ,आई बाबा दूर खेड्यात रविवारी आई भेटायला आली की मनसोक्त रडाव वाटायच बाई पण रडू तरी कस सांगा ना कस ?

तुम्ही इथवरही थांबला नाहीत माझ्या आजी आजोबांशी डिप्लोमॅटिक वागत राहिलात फसवत राहिलात त्यांच्यासमोर मला कानातले डुल दे खेळणी दे . अस कस होऊ शकत बाई ? तुम्ही अभिनय करुन चित्र काढुन शिकवायचात तेव्हा किती प्रचंड प्रेम निर्माण झाले होते ते सारेच निथळुन गेले नंतर . मानसिक दबाव दडपण याव्यतिरिक्त तुम्ही मला काही दिल नाहीत बाई

तुम्ही माझ्या वर्गशिक्षिका असणार वर्ष संपल तुम्ही मुख्याध्यापक झालात तरीही तुम्ही मला भेटत राहिलात मारत राहिलात . तुम्हाला आठवतय बाई शाळाबाह्य मनाचे शंभर श्वोक पाठांतरात माझा विभागुन दुसरा नंबर आला त्यादिवशी तुम्ही दोन्ही गाल फोडुन काढलेत वडिलांवरुन मला बोललात केवढा सत्कार केलात तुम्ही माझा . वार्षिक परीक्षेच्या निकालातही अशीच योजना केली तुम्ही . कमी मार्क पडले म्हणुन मी बाबांचा पण मार खाल्ला पण एकही अक्षर बोलले नाही बाई तुमच्याबद्दल .

माझ दैव बलवत्तर म्हणुन या सारया घटना माझ्या घराशेजारी राहणारया मुलीकडुन तिच्या आईला आणि तिच्या आईकडुन माझ्या बांबाना समजल्या . मी शाळा सोडली शाळा बदलली खर सांगु माझी सुटका झाली . मला शाळेबद्दल प्रेम अभिमान अस काही वाटत नाही याला जबाबदार कोण कारणीभुत कोण हे पण मला ठरवायचे नाही . मी आधीच म्हणाले माझा तुमच्यावरचा राग संपला आहे . कधी या कटु आठवणी निघाल्याच तर चष्मा काढते आणि रुमालाने डोळे पुसते . असो पुन्हा पत्र लिहेन का नाही कोणास ठाऊक हे पहिले आणि शेवटचे पत्र तुम्हाला

तुमची विद्यार्थीनी
नकुषा

बर्म्युडा ट्रँगल

निष्कर्षाची बिजे
सिँध्दातांचे रोपटे

मी गतीहीन
मी मतीहीन

काळ परदेशी भूक मायदेशी
भुकेने घ्यावे पदरात
काळाने घ्यावे पोटात

अवकाश आकाश एक व्हावे
कुणीतरी इथे मध्येच लुप्त व्हावे
असमाधान समाधीवर त्रुप्त व्हावे

माझ्याआधी 
माझ्याशिवाय 
माझ्यानंतर 

बर्म्युडा ट्रँगल
बर्म्युडा ट्रँगल
बर्म्युडा टँगल
-----कविता 

आहे बोलायचे

सरळ साधे आहे बोलायचे
नाही पोच नाही बोच
शब्दाविना तुला गुणगुणायचे

उगाच नकळत आहे चालायचे
नाही वाट नाही घाट
चांदण्याविना तुला गाठायचे

निरोपाची कसली झालर
स्वप्न आज ना उद्या पहायचे
तेवढ्यासाठीच
डोळे आहेत मिटायचे

अलगद आपसुक आहे घडायचे
नाही फुल नाही वेल
गंधाविना आहे ओघळायचे
सहज साधे आहे बोलायचे

----कविता

जादुच कळाली नाही

जादुची ट्रीक समजली 
जादुच कळाली नाही 
तासतासभर वाट पाहण जमत गेल
तासांची वर्ष झाली 
नंतर नंतर सवय देखील झाली 

स्पर्शाची भाषा डोळ्यांना कळाली
डोळ्यांची ह्रुदयाला 
पण कळालीच नाही 
ओढ वेड अस्वस्थता
केवळ जादुची ट्रिक समजली 

न कळण्यापलीकडे काहीच उरले नाही 
म्हणूनच प्रार्थनेसाठी हात देखील जोडले नाहीत 
निरखले आपलेच तळवे भोग नशीब
मनासारखे होवूनही तथास्तु म्हणणारा
आवाज ऐकू नाही आला 
जादुची ट्रीक समजली 
पण जादुच कळाली नाही


-----कविता 

विरक्ती

विरक्ती 

पाचोळा तर उडून जातो

कागदासम उरते ठिणगी
अक्षरात धुमसते ज्वाला
ज्वालेत धुमसते लेखणी

आईविना पोर वाढते
पोरविना आई एकटी
दूर दूर पांगतात दिवे
अंधारात जागी झोपडी

पाचोळा तर उडून जातो
कागदासम उरते ठिणगी
ठिणगीसम 'मी' ही जळते
आरक्त होते विरक्ती माझी


-----कविता 

हुरहुर

भेटण्याआधी हुरहुर
भेटताना हुरहुर
भेटल्यानंतर हुरहुर

आधी स्वप्नांचे मग आठवणीँचे कागद घेऊन
अंकित करत रहायच्या कुंडल्या
भविष्याच्या 
एखाद्या चौकौनात
आपल भविष्य शोधण्यासाठी

मांडायचा सारीपाट
काचाकवड्या क्षण तुकड्यांचा
शोध पुन्हा तोच
तु तुरुगांत जाशील
तोपर्यँत मी घरी पोहचेन
की मी तुरुंगातुन सुटताना
तू घरी पोहचशील ?

टळत नाहीत या वेळा
या माध्यान्हीला सावलीच नाही
या हुरहुरीच्या जगण्याच 
आयुष्य तरी किती म्हणायच ?

भेटण्याआधी हुरहुर
भेटताना हुरहुर
भेटल्यानंतर हुरहुर
----कविता 

अबोली ssssss

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तिच्या नावात फुल होत ,फुलात तिच नाव होत
तिच्या तळहातावर त्याच नाव होत
त्याच्या ओंजळीत तिच्या नावाची फुले
अबोली ssssss


भेटायचे ते दोघे समुद्राकाठी समुद्र होऊन
समुद्राची गाज आळवायचा तो
ती बांधायची लाटेचे पैंजण
बेफाम होऊन घ्यायची गिरकी
गिरकीच्या बेटावर मुग्ध व्हायचे आकाश
तो रहायचा आळवीत तशीच गाज
घ्यायचा समेवर तिची दाद
ती मुक्त होत असताना अनावृत्त व्हायचा तो


त्याचे होते घर गारठलेल्या वस्तीत बर्फाळजागी  
तिचे होते घर वितळलेल्या उन्हाखाली  
मृगजळ होऊन यायचा तो तिच्या परसुदारी
ओंजळ करून हाताची पुढे म्हणायचा
तहान लागली ग बाई
ती व्हायची तहान जायची त्याच्या घरी
ओसंडून वाहायचे लोटा वाटका फुलपात्र
चिमुकला घास तिच्या ओठापुढे धरून म्हणायचा  
किती लांबून आलीस भूक लागली असेल तुला
जेवून जा ग बाई


सजण धजण नव्हत आवडत तिला
तरी टोचून घ्यायची पायात सोनेरी काटे
हसण रडण नव्हत जमत तिला
तरी फसायची बोलताना खोटे
तो काढायचा श्वासांची चित्रे
तिच्या ओठांच्या रेघोट्यावर
सजवायचा तिला गालाच्या मुखवट्यावर
हसण्या रडण्याआधी फक्त लाजायची ती
बोलायची त्याने वाचलेले मौन, तिला सुचलेले


अबोली ssssss

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खळखळत्या नदीच्या पुलावरुन रेल्वे धावते आहे ,नदीत ओवाळुन नाणी टाकावीत तसा म्रुदंगभरला आवाज ,न तुटणारया चंद्र चांदण्याच्या रेखीव कवडश्याला ,आणि विँडो सीट पकडुन अमोरासमोर बसलेले आपण ,अक्षय चाफेवेळा आणि भारलेले कोकीळेचे कुंजन ,खिडकीतुनच ऐकते आहे मी पैल पल्याड आणि तू कानात आयपॉड घालुन ऐकवतो आहेस गाणे
"कुणी जाल का सांगाल का सुचवाल का त्या कोकिळे रात्री तरी गाऊ नको"

खरतर मी दाखवले असते तुला मागे पडलेल्या गावाच्या वेशीवरचे चांदणे , क्षितीजावर राजहंसाचे आकारलेले ढग ,उडणारया रुईतुन आलेली आठवण ,रेल्वेऐवजी मनात रंगवलेली नौका अगदी पाकिजातल्या गाण्यासारखी ,दूर डोंगरावर बासरी वाजवणारा कुणी ,अस्ताव्यस्त अंधारात जागणारी पुर्व पहाट
सांगितले असते तुला

पण तू पुन्हा ओरडणार पुन्हा चिडणार अस काही नसते ग स्वप्न कल्पना खोटी असते ह्यांव आणि त्यांव .
हं तुझा वास्तववाद धावत्या रुळासारखा

नदीवरचा पुल ओलांडला आहे रेल्वेने आणि बदलले आहे आयपॉडवरचे तुझे गाणेही
"बगळ्यांची माळ फुले अजुनही अंबरात "

----------------------------------------------------------------------------------------------------------------------


सारया सुरेल माणसात सुरु होते सुरेल गाण
आरोह अवरोहाच
चांदण्या आकाशातुन
लंब होत जावेत कवडसे
तशी एकटक नजर देऊन
कोरली जात होती संध्याकाळ
अस्तरावर देहावर
काळजावर जगण्यावर
उंच कलश रोवल्याप्रमाणे
चढेल जाऊन पोहोचला सुर
दुर क्षितीजभरुन पोहोचली नजर
तितक्याच दूर पोहोचल्या
दोन सावल्या 
दोन हात
एकाच दिव्यापाशी
.
.
.
.
.
पुन्हा कधी भेटणार आपण असे ?


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


आपण भेटायचो ते ठिकाण
ती खिडकी त्या गप्पाटप्पा ते मेसेज
मधेच तुटणार इंटरनेट कनेक्शन
ते रेस्टॉरंट ते कॉफी शॉप
त्या कॉफीची दुधाळ कडू चव
तो पुतळा ,पुतळ्याखालचे बाकडे
त्याच्या खाली गोळा कचरा
भेळेच्या पुड्या
ते चुरगळलेले रुमाल ,
रुमालावरचे तुझे कॅपीटल नाव
तुझ्यानावाआधी माझ नाव
.
.
.
.
.
काही बदलल तर नाही ना ?
खर सांग ?

(यावेळी उत्तर नाही असु दे ,दहावीस तीस ,
भाग्यश्री या दोनपैकी एक मुठ उघड ग )

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


नितळश्या तळव्यावर झडावा एक बिँदु
तसे ओघळते आहे एकेक पान
निरागस आहे इथली शांतता
उत्कट आहेत तुझे भावचरण
समाधीस्थ आहेत वेली
जाग्या आहेत चाफेक्षण वेदना
निवांत आहे संध्याकाळ
औँदुबराच्या पाराखाली
प्राजक्ताच्या सड्याखाली
ऐलतीरावर आहेस तू
पैलतीरावर आहे मी
भोवताली आहे
तीच निरागस शांतता
नितळश्या तळव्यातली

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


मी अमुक अमुक एका टेन्शनने तमुक तमुक डिग्रीचा ताप आल्यासारखी भावुक होणार . भुकेने व्याकुळणार तहानेने पाझरणार फुलपात्र उपडे ठेवणार दरवाज्याला चमचा अडकवणार ,कढत कढत अश्रुंनी गालावर मुसमुसणार ,करुणेची संधी करुणेचा समास खोल खोल अंतरात उलगडेल आता काहीतरी ,अखेर मिनिट काटा तास काटा अगदी एक होतील तेव्हा राम क्रुष्ण जन्मासारखा तू येणार . मग पुन्हा ठरलेली प्रश्न गती असणारे दिशा नसणारे ,नक्षत्रांसारखे .

विचारांचे एक युग लोटल्याचा भास होतो ,तसे भेटून काही क्षण काही मिनिटे अगदी काही तास झालेले असतात एखाद्या युग प्रवर्तकासारखी या विचारांच्या निद्रेला जाग येते ,नजर ओवाळून आत घेणाऱ्या आरतीसारखी मी माझी माझीच परतून येते सावल्यांसह ,तू तुझ्याचजागी उभा असतो मी माझ्याजागी ,अगदी आरशासारखे
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


सुचु लागते बकुळीच्या अंगणाला आपले बालपण 
ऐकु येतात खुदुखुदु हसण्याचे आवाज 
चिखलगोळे लंगडी पळती लपंडाव 
मांडू लागतात भातुकलीचे खेळ 
तू परतून येणार असतो 
ओलांडून गेलेले सात समुद्र 
सात समुद्राचे जपलेले असते मी सात खडे 
खेळत राहते एकटीच आठवणीत 
एक्कल काजा दुग्गी राजा इराण भोजा 
ऐकत राहते तुझे आवडते शास्त्रीय संगीत 
रंगवत राहते रंग तरंग पटलावर 
तुझे आवडते छंद 
लिहीत राहते 
तुला आवडणारया तुझ्या कविता 
झुळुकीने बदलुन जाव गवताच पात 
तशी ऐकु येते तुझी हाक 
नमस्कार करतो वाकुन आईला 
विचारतोस 
अग अबोली कुठेय ? खुप बोलायचय आम्हाला 
रंग गिरकी घेतल्याप्रमाणे 
आकाश उंच उडालेल असत 
माझ्या खोलीवरच 
तु येतोस आणि ऐकु लागतो 
मंद आवाजात मी लावलेली सी डी 
भरभरुन तुझी दाद 
अरे वाह आसावरी तोडी ऐकते आहेस ? 
माझा आवडता राग 
तुला ठाऊक आहे याचा कोमल ऋषभ गळ्यात भिजला की 
अंतकरणाला थेट भिडतो ग 
क्या बात है 
तुझ्यामुळेच तुझ्यासाठीच 
ऐकत असते मी माझी मला 
गवसललेली असते मी माझी मला 
सांगायच असत अजुन खुप काही मला 
इतक्यात वाजते तुझ्या मोबाईलची रिँग 
ना है पाना ना खोना भी है 
तेरा ना होना जाने क्यु होना भी है 
अगदी हेच म्हणायच असत मला 
तुझा फोन संपतो 
तु बोलतोस 
तर आयुष्यात motivation असण खुप important असत अबोली 
अगदी हेच म्हणायच असत मलाही

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------