Pages

Saturday, 20 July 2013

वेदपुरुषा

वेदपुरुषा 



ज्यांना तू अपौरुष्य वाटतोस 
ज्यांना तू पौरुष्य वाटतोस 
त्या दोघांनाही माझा प्रणाम 
आणि तुलाही कोटी कोटी प्रणाम

तू वेद म्हणून जन्मलास की अवेस्ता म्हणून 
तू बायबलचा प्रणिता आहेस की कुर आनाचा 
ज्ञात अज्ञात सारे तुलाच ठाऊक
ज्ञानाच्या अज्ञानाच्या विज्ञानाच्या 
साऱ्याच आधी तू जन्मलास 

कुणी काळातीत तुला ठरविले
कुणी काळबाह्य तुला मानले 
तू म्हणजेच गीता तू म्हणजे तत्व 
तू म्हणजे रुक्ष तू म्हणजेच सत्व 
अशी सूत्रे अशा व्याख्या 
अशा समजुती मानणाऱ्या 
मिथिकांच्या देशातले 
तुझ्या उपनिषदांच्या भाषेत म्हणायचे तर
एक अव्यक्त ब्रम्ह विचारते आहे 

मान्य अमान्यतेने सिद्ध तत्वास अर्थ प्राप्ततो का ?
तू सिद्ध झालास काय किंवा असिद्ध झालास काय 
तू पवित्र झालास अपवित्र झालास
तू वंद्य झालास तू निंदनीय झालास तरी 
तू तोच असशील
निर्गुण सगुण साकार आकार ऊकार ओंकारात सामावलेला 
कदाचित या साऱ्या कल्पनातीत निराळा
की सांग तू अजून कोण आहेस ?
न उलगडणाऱ्या कोड्यातल्या
स्वतः स्वतात तल्लीन एकट्या विश्वासारखा 

तुझे अंतरंग मला ठाऊक नाही 
मी काया वाचा मनाने जाणते आहे तुझे 'भाषांतर'
म्हणजेच अनुभवला आहे 
बुद्धी भाव साक्ष यांच्यातला तरंगप्रवास 
मला जाणायचे आहे तुझे स्वस्वरूप 
तुझे आत्मरूप तुझे निजरूप 
मला तुला जाणायचे आहे 
कारण अकारण आणि निराकरणही
तू आजतरी वाटतो आहेस मला
प्राचीन अर्वाचीन आणि आधुनिकही

वेद म्हणजेच जाणणे 
म्हणूनच जाणायचे आहे तुला
जोवर माझे आयुष्य 
रामायणासारख्या महाकाव्यात गुंगून
श्वासांची माळ जपते आहे 
त्या माझ्या मलाच वाटणाऱ्या अखेरपर्येंत 

तू निज तू पर 
तू ब्रम्ह तू मोक्ष 
तू अर्थ तू धर्म 
तू सूत्र तू महत्व 
तू जीवन तू यज्ञ 
तू सुज्ञ मी मात्र अज्ञ
मी केलेली आस्तिक नास्तिक प्रार्थना स्वीकार 
ज्ञान दे मला ज्ञान वृद्धिगंत कर माझे
हे श्रुती स्मृती सार पुराणोक्त वेदपुरुषा 


-------कविता

Saturday, 13 July 2013

भरती ओहोटी

काचेच्या पेटीवरून सरकणारे एकेक दवबिंदू 
शिंपल्याचा आकार घेत घेत 
माझ्यापर्येंत पोहोचतात तेव्हा 
ओहोटीचे अनेक क्षय झालेले चंद्र 
पुन्हा काचेच्या पेटीवरून सरकत जातात 

पावलात पाऊल हातात हात
ठश्यात ठसे मिळवत 
आठवणीचे कोरे कागद 
झडून जातात 
लाटा रेंगाळतात 

इथून कुठेतरी चार हजार मैलावर 
पौर्णिमा आणि भरती असेल 
माहित आहे मला


-----कविता

सुवासावीण

सुवासावीण 


मन तळव्यावर पाणी रे
मन हळहळते गाणी रे
आयुष्याचा रंग कोरडा
सुवासावीण कुणी फुलले रे

गा जिवलगा गीत तू माझे
न्हा सख्या तू प्रीतीत माझे
जीव वेडा तुझ्यात जडला
परी कोंदणी रत्न पारखे रे

हवा नको मला भास तुझा
दिव्य दृष्टीने जग भरले रे
प्रेम आंधळे मी ही आंधळी
तुझ्याभोवती फिरले रे


मन तळव्यावर पाणी रे
मन हळहळते गाणी रे 


-------कविता

Saturday, 6 July 2013

भूल बळी आणि थाप

भूल बळी आणि थाप



अभय तसा सावध पवित्रा घेवूनच बसला होता . वास्तविक हे त्याच्या अंगवळणी पडले होते . तसा आज रविवार म्हणजे सुट्टीचा वार ,दवाखान्याला सुट्टी त्यामुळे कुणी येणार नाही हा ताळा अभयच्या मनात पक्का होता. साध पत्र पोस्ट तार देखील यायची नाही .दूधवाला पेपरवाला सकाळचेच येवून गेले आहेत . खणखणले तर फोनच पण रिसिव्हर त्याने आधीच बाजूला काढून ठेवला होता . आता तो मस्त बेडवर लोळत पेपर वाचत पडला . अचानक फोन वाजला त्या आवाजाने तो भलताच अस्वस्थ झाला आणि स्वतःवरच चिडला . फोन कट करण्यासाठी म्हणून तो हॉलमध्ये आला टीवी चालूच असल्याचे त्याच्या लक्षात आले .स्वतःवर जोरजोरात हसून टीवी रिमोटने बंद  केला आणि काढलेला फोनचा रिसिव्हर पुन्हा ठेवला पुन्हा बाजूला केला . आता त्याची खात्री झाली कुणीही चिटपाखरू इथे फिरकणार नाही . स्वतःच्याच धुंदीत गुणगुणत तो बेडवर पेपर वाचत लोळू लागला . कुणीतरी नजर रोखून आपल्याकडे पाहते आहे याची जाणीव त्याला हळूहळू होऊ लागली .लगेचच झटदिशी टी कॉर्नरवरचे वाळूचे घड्याळ त्याने उपडे केले .समोरच्या पाबलो पिकासोच्या पोर्टेटमधले जिवंतपण त्याला छळू लागले . त्या पोर्टेतमधल्या व्यक्तीचे डोळे आधी लाल मग हिरवे निळे तर्हेतर्हेचे भासू लागले . त्यानेही मग आपली नजर त्या डोळ्यांवर रोखून धरली . पोर्टेटच्या काचेकडे पाहून केस भांग ठीकठाक करत राहिला . एकूण हा रविवार फारसा चांगला नाही असे त्याचे त्यालाच वाटून गेले .पेपर तिथेच टाकून गरम कॉफी घेण्यासाठी तो स्वयंपाकघरात गेला . वातावरण इतक दमट होत काल आणलेल्या ब्रेडवर बुरशी चढली होती . खिडकीबाहेरच्या झाडाचे पान फुल काही हलत नव्हत त्यात फेन्शुई मंद वाजत राहिली त्याची त्यालाच गंमत वाटली . त्याच विचाराच्या नादात असताना खिडकीतून त्याला दुरून कुणीतरी चालत येत असल्याचे जाणवले . लक्षपूर्वक तो बाहेर पाहू लागला स्वतःशीच बोलला 
"कोण स्मिता ? ओह माय गॉड नॉट अगेन धिस ."

स्मिताने डोअरबेल वाजवण्याआधीच त्याने दरवाजा उघडला . तो तिला बस म्हणून सांगणार त्या आधीच ती बसली तिची खांद्यावरची पर्स तिने टिपोयवर ठेवली . आता तो काही तिला म्हणणार या आधीच ती बोलू लागली . एकूण ती खूपच घाबरलेली भेदरलेली होती असे त्याच्या लक्षात आले ती बोलू लागली"सोर्री डॉक्टर आज दवाखाना बंद असतो मला माहित आहे . तुम्ही अपोइन्तमेंट शिवाय भेटत नाहीत तरीही अगांतुकासारखी आले . खरतर मी फोन ट्राय करते आहे सकाळपासून ,पाहिलंत तुम्ही फोनही काढून ठेवला ,अर्थात तो तुमचा खासगी प्रश्न पण मी फोन ट्राय केला होता . नाही आधी माझ बोलण पूर्ण होऊ दे मग सांगा मला काहीही . माझ जगणंच कठीण होऊन बसलं आहे हो डॉक्टर . मला आताशा तो झोपेतही दिसतो . पूर्वी तो स्वप्नात झोपेत येत नसे म्हणून अधिक त्रास झाला तर झोपेच्या गोळ्या घेवून मी निजत असे . तो स्वप्नात येतो मला जागेपणी दिसतो .मी जेवताना खाताना माझ्याकडे एकटक तो पाहत राहतो . मी वेणीचा रबरबँड बांधताना आरशात पाहून माझ्याकडे तो हसतो . मी कुठेही गेले तरी तो मागे पुढेच राहतो बोलत नाही पण छळत राहतो मला . खरतर तो या जगातच नाही त्याचे माझे लग्न ठरले होते . लग्नासाठी वऱ्हाड येत असताना बस दरीत कोसळली त्यात चाळीस लोक ठार झाली वीस जखमी तो झुंजत होता मरणाशी दहा बारा दिवस अखेर गेला पण मला दिसतो डॉक्टर तो खरच दिसतो . मला वेड लागलंय अस बरळतात लोक"
बोलता बोलता तिला हुंदका लागला लहान मुलासारखी पदरात तोंड खुपसुन ती रडायला लागली .
"मिस स्मिता शांत व्हा ,मी समजू शकतो आणि तुम्हाला वेड वगैरे काही लागल नाही "
स्मिताच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवत अभय म्हणाला 
स्मिताच्या चेहऱ्यावर मंद स्मितरेघ उमटली ,तिच्या खांद्यावर ठेवलेला हात खूप थंड झाल्याचे अभयला जाणवले . त्याने हात झटकन बाजूला केले .दमट घामट झालेल्या त्याच्या अंगाला झुळूक बडवून गेली आणि अचानक स्मितादेखील झुळूक झाल्यासारखी एकदम त्याच्यासमोरून धुसर होत गेली . अभयला चक्कर येत असल्याची जाणीव झाली तो डोक्याला घट्ट हात धरून ओरडू लागला"तिला थांबवा कुणीतरी स्मिता sssss स्मिता sssss"
"काय झाले?" अभयची वृद्ध आई काठी टेकत एका खोलीतून बाहेर आली"आई ती स्मिता जिला ज्यादा भूल माझ्याकडून दिली गेली  असा आरोप केला होता ती स्मिता इथे आली होती . तिला अजूनही तो दिसतो . मला वाचवले पाहिजे तिला यातून तिला अडव जा थांबव तिला .........स्मिता sssss स्मिता sssss" अभय अस्वस्थ होऊन बोलत होता .
"कोण आले होते ? कुणी आले नाही ,सकाळपासून मी रामाचा जप करत इथे आतल्या खोलीत बसलेली आहे कोण आले नाही का गेले नाही ,तुला पुन्हा भूत पिशाच्चबाधा झाली आहे ,थांब मी दृष्ट काढते तुझी" अभयची आई कापऱ्या आवाजात म्हणाली 
"ओह ! स्टोप इट नॉनसेन्स मी एक डॉक्टर आहे " अभय त्याच्या आईवर जोरात ओरडला इतक्यात दारावर पुन्हा थाप पडली 
"स्मिताच असणार " अभय बोलला "श्युक sssss ......आवाज बंद ...तू गप्प इथेच पडून रहा ….मी बोलावल्याशिवाय तू यायचे नाहीस....त्या स्मिताला ज्यादा भूल दिलीस म्हणून पोलिस आले आहेत तुझी चौकशी करायला "अभयची आई त्याच्याशी बोलत बोलत लटपटत दार काढायला निघून गेली .

तोच डॉक्टर फडणीस आणि त्यांचा कंपाउंडर रामय्या आत येताना अभयला दिसले .अभय डॉक्टर फडणीसांची बोलू लागला 
"डॉक्टर ती स्मिता आली होती . हो ती जिवंत आहे .मी म्हणालो होतो ना ,मी तिला भूल ज्यादा दिल्याचा आरोप खोटा आहे ,आरोप आरोप ……आणि तुम्ही कसे आलात पोलिस भेटले का बाहेर तुम्हाला....आणि माझी आई कुठे आहे ? बोलते आहे का पोलिसांसोबत ? तिला सांगा घाबरू नको . स्मिता अजून जिवंत आहे तो आरोप खोटा आहे …डॉक्टर स्मिताला बोलावून आणले पाहिजे ती माझ्या बाजूने साक्ष देईल" नख चावत चावत अभयने बोलणे पूर्ण केले .खोलीतल्या घड्याळात दुपारचे तीन वाजल्याचे टोल पडले तीनदा 
"पाहिलंत तीन टोल पडले हे सत्य आहे" अभय वर आढ्याकडे पाहून बोलत होता 
."ते जाऊ दे , आई कुठे आहे " तो रामय्याला विचारत होता

रामाय्याने अभयच्या आईच्या फोटोकडे बोट केले . तसा अभय खवळला 
"कुणी हार घातला फोटोला ?" अभय जोरात ओरडला 
"कुल डाऊन अभय कुल डाऊन ...रामय्या तो हार काढ फोटोवरचा चटकन "डॉक्टर फडणीस बोलले 
" डॉक्टर फडणीस मला वेड तर नाही ना लागले " अभय विचारू लागला 
"काहीतरीच काय ?अभय कमॉन चिल माय बॉय ,ते वेड बीड विचार सोड . मी तुझ्या आवडत्या पाबलो पिकासोचे नवीन पेंटिंग आणले आहे " डॉ फडणीस बोलता बोलताच रामाय्याला काही इशारा देत होते .
रामय्याने अभयच्या दंडाला धरले . 

फडणीसांनी अभयच्या खोलीचे निरीक्षण केले .अभयने नखाने भिंतीवर कोरलेली काही चित्र त्यांना दिसली त्यांनी संदर्भ जुळवायाचा प्रयत्न केला पण काही निष्पन्न झाले नाही .फडणीस अभयला इंजेक्शन देऊन खोलीचे दार बंद करून निघून गेले . आता त्या खोलीत स्मिता नव्हती अभयची आई नव्हती पोलिस डॉक्टर फडणीस नव्हते रामय्या नव्हता . तो दिवाणखाना नव्हता बेडरूम नव्हती ,ते वाळूचे घड्याळ नव्हते स्वयंपाकघर नव्हते ,कॉफी नव्हती बुरशी आलेला ब्रेड नव्हता फेन्शुई नव्हती रिसिव्हर काढून ठेवलेला फोन न्हवता टीव्ही नव्हता .खरतर काहीच नव्हते अभयच्या मनातले त्या खोलीत , होता तो फक्त अभय झोपेचे इंजेक्शन घेतलेला आणि पाबलो पिकासोची जिवंत दोन पेंटीग्स एक जुने आणि एक नवे अभयने नखाने कोरलेल्या भिंतीमध्ये लावलेली .

------कविता मोकाशी 

Tuesday, 2 July 2013

तुझी माळ आणि बासरी

तुझी माळ आणि बासरी


अखेरचे पाण्यात पाय टाकुन बसले तेव्हाच स्म्रुतींचे तळवे इथे वाहुन गेले .

पुढच्या क्षणांचे अर्ध्य वाहण्यासाठी मी आणि माझी स्म्रुतीदेखील नव्हती
दुःखाचे कष्ट वाहुन मलुल होणारया फुलाकडे आणि वेदनेने जागलेल्या सुराकडे माझे लक्ष गेले
मी सुर निवडला फुल पाण्यावर सोडून दिले

वेदनेचा दुःखाशी काही एक धरबंध नसतो सुखाशीही नसतो .
असलीच तर व्याख्यातली जुळवाजुळव स्वल्प पुर्ण विरामाची चिन्हे असल्यासारखी .
सावलीवजा अंधारलेले मन कुंद थंड वाटले माझ्याच मनाच्या स्पर्शाला माझ्या समजुतीच्या वाक्याला
वलय झुळुक कवडसा कुणीच नव्हत सोबतीला तरीही 

अंधार पसरत चालला तसे टाकत राहिले एकेक खडेगोटे गारगोट्या नदीच्या पात्रात .
नदी भरणारी नव्हती ,मी ओसरणारी नव्हते ,तहानलेली नव्हते
पाण्याने हलणारे चंद्रपाणी प्याले ओँजळभर चांदण्याभरुन उगाळले चंदन
तरीही जाणवली नाही खंत काही गमावल्याची 

विसरली होती कि राहिली होती कोणास ठाऊक माझ्याकडे
तुझी माळ आणि बासरी



------कविता मोकाशी

ज्येष्ठागौर

ज्येष्ठागौर

वेळ जावा म्हणुन आणलेल लेज च पाकीट अजुनही संपत नव्हत . त्या चिप्सची चव तुरट की खारट कळत नव्हती . बहुधा खारटच होती . समोरच्या टीव्हीवरचा अमिताभ बच्चन त्याच्या खर्जात कुणाच्या तरी येण्याची वाट पहात होता . इतक्यात जाहिरात लागली आणि हातातल लेजचे पुडके संपले . एव्हाना त्याच तेलकट हाताने तिचे मिस कॉल रिसीव्ह कॉल पाहुन झाले होते .


पुन्हा एकदा दीर्घ शतपावली घातली या फ्लॅटफॉर्मपासुन त्या फ्लॅटफॉर्मवर आणि जागेवर येऊन बसली . काही टारगट मुल तिच्या पायाच्या पोटरयांकडे लक्ष देऊन आहेत अस तिला उगागच नाही खरतर ती पहातच होती . पटकन दोन्ही पाय उचलुन ती मांडी घालुन बसली . पर्समधल्या आरशात पाहुन डावीकडे झुकलेली टिकली उजवीकडे सरकवली .

या चौकशी विभागात जाऊन याव पुन्हा वाटल पण पुन्हा ते तीच वेळ सांगणार आणि हा आळशी तास काटा काही पुढे सरकणार नाही . नेहमी वेळेवर येणारी ट्रेन आज नेमकी उशीरा येणार . हे असच असत आपल्याबाबतीत म्हणटल की हे असच होणार हे एकच वाक्य दहादा मनात घोकुन झाले होते .

टिव्हीवरचा अमिताभ जाहिरातीतुन गायब झाला तो झालाच आता तिथे तुकयाचे अभंग लागले होते आवाज लताबाईँचा आणि चित्रीकरण वेगळ्याच नटीचे ती पण गुणगुणु लागली खेळ मांडियेला वाळवंटी ठायी नाचती वैष्णव भाई रे .

इतक्यात फोन वाजला पुन्हा तिला वाटले आईचाच नं न पाहताच बोलणार तोच तिच्या मुलीची लडिवाळ तक्रार

"आई आजी येणार ना तू प्रॉमिस केल आहेस मला ."

तिचे उत्तर "अग हो ग नानु पण मध्येच काहीतरी ट्राफिक प्रॉब्लेम झालेला दिसतोय आजीला किनई लेट होईल यायला तू आणि बाबा जेव बघु तोपर्यँत "

तिच्या प्रश्नाला पुन्हा प्रतिप्रश्न "आयडी तू कधी जेवणार थांब बाबा बोलतोय तुझ्याशी " 

इतक्यात पुन्हा अनाऊसमेँट झाली रेल्वे अजुनही चार तास लेट . तिला आता आईला फोन करायचा होता ती तिथुन आता घरी जाणार आणि नानुचे बाबा तिच्या आईला रिसीव्ह करायला थांबणार अस झालेल्या फोनवरुन ठरल होतं . आईँच्या फोनची रेँज ऑऊट ऑफ कव्हरेज अखेर फोन लागला आणि चार पाच तास वेळ लागणार हे पुन्हा कळाले . आता घर गाठायच्या गडबडीत ती लागली इतक्यात एक झिपरी पोरगी थाळीत देव ठेऊन तिच्यापुढे पुढे करत होती . दुसरी एक मुलगी तिची ओढणी ओढत होती तसे चटकन पर्समधले सुट्टे तिने ठेवले .

ती तो प्लॅटफॉर्मसोडुन निघाली रिक्षासाठी स्टॉपकडे जाणार तशी सहज नजर जावी तर शेजारच्या परगावी गेलेल्या साठेआजी दिसल्या . नातवाकडे धमाल मजा मस्ती केली त्याची शाळा सुरु झाली अशी काहीशी हकिकत चालु झाली त्यांच्या हातातली बॅग तिच्याकडे घेऊन दोघी एव्हाना रिक्षात बसल्या . ती परत परत म्हणत होती साठेआजी ती शुक्रवारची श्रावणातली कहाणी सांगा ना . तो गरीब ब्राम्हण मुले हट्ट करतात गौर आणा तो वाटेत भेटलेल्या आजीला घेऊन येतो . थांबलेल्या सिग्नलजवळ एकेक करुन वाहनाचा वेग कमी होत येत होता समोरचा सिग्नल सुटुन भरधाव वेगाने वाहने चालली होती आणि साठेआजीँची श्रावणातली गोष्ट सुरु झाली होती



-----कविता मोकाशी