Pages

Monday, 16 July 2012

भाऊबीज

भाऊबीज 


गेली पुनवेची रात 
आली भरात ग तीज 
चंद्र झोपडीत माझ्या 
ओवाळते भाऊबीज 

गोल गोल तबकात
रुपया सुपारी विडा 
छताविना कवडसे 
अंगणी चांदणसडा 

औक्षण भाऊरायाचे
दीपदानाचा सोहळा 
लावू तीट याला कशी 
चंद्र दिसतो सावळा 

किती किती माझ्यावरी 
याची ग आभाळमाया 
डोंगराआड राहुनी 
घरात धरतो छाया 

दे दे आता ओवाळणी 
रिकामेच माझे सूप 
पाखडले तसेच मी 
दुष्काळ पडला खूप 

वाहत्या घरात माझ्या 
वारा आभाळाचा नाही 
परी भावाची माया जी 
चिखलात माती नाही 

किती सुख किती सुख 
नको नको भाऊराया 
खोपते इवले माझे 
कशी सांभाळू ही माया ??


----कविता

No comments:

Post a Comment