Pages

Wednesday, 15 October 2014

बालपणीचा जादुगार

बालपणीचा जादुगार  



माझ बालपणच सगळ परिकथा जादूच्या कथा ऐकण्यात गेले . देव देवतांच्या गोष्टीमधील अचानक शाप वरदान यामुळे घटना घडवणारी एक अज्ञाताची जादू मनावर नेहमीच लहरत गेली तिचे अधिराज्य गाजवत गेली . ध्रुव बाळ तपश्चर्येला बसून अढळपद मिळवतो हि गोष्ट मनात  इतकी पक्की बसली गेली की घराच्या गच्चीवर आम्ही बच्चेकंपनी संध्याकाळी काही दिवस खेळण्याऐवजी तपाला बसून जोरजोरात नामस्मरण करायचो  ॐ नमः शिवाय ,श्रीराम जयराम जयजय राम ,दिगंबरा दिगंबरा आणि त्यावेळी वाटायचे जितके उंच स्वरात म्हणू तितके लवकर देवाला ऐकू जाईल आणि देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल तथास्तु . आमच्या देवाकडे तश्या डिमांड देखील फारशा नव्हत्या म्हणजे स्नेहलसारखे खोडरबर प्रियाला हवे असायचे तर प्रियासारखे दप्तर मला हवे असायचे आणि माझ्यासारखे पेन स्नेहलला हवे असायचे . आमच्या या देवाला प्रसन्न करून घेण्याच्या खेळात खेळता खेळता अचानक आकाशातून एखादा ढग सूर्याकडे जाणारा हवेचे झोके  घेत जायचा ,त्याकडे पाहून आमचा बालमित्र अंकुश म्हणायचा ए पहा देव प्रसन्न झालाय त्या ढगामधून विष्णू चालत आहेत . आम्ही सारे बच्चेकंपनी गच्चीच्या कठड्यावर थांबून हा विभ्रम आनंदाने अनुभवायचो 

याच निरागस आणि अल्लड वयात स्मॉल वंडर शक्तीमान अशा टी व्ही मालिकामुळे या जादुई जगताबद्दल वाटत राहणारी ओढ निरंतर कायम राहिली सिंड्रेला ,मधुमंजिरी, हेरी पॉटर ,अलिफलैला यासारख्या कॉमिकबुक मधून ,मालिकांमधून भेटणाऱ्या या प्रतिमांनी मनात उत्सुकता आणि त्यासोबत आपलेपणा निर्माण केला . जादू म्हणजे तरी काय ? अपूर्ण स्वप्नांची झालेली पूर्तता त्याचबरोबर भावना बुद्धी यांना चमत्कृत करणारी गोष्ट . पहिला बनवलेला चित्रपट, पहिले केलेले रेकोर्ड ,लोखंडी रुळावर धावणाऱ्या लोखंडी राक्षस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे ,तसेच विजेचे बल्ब वीजेवर चालणारी उपकरणे हे सारे प्रकार त्याकाळात जादुई आकर्षण म्हणूनच गणले गेले होते . तंत्र विकसित होत जाते आणि त्यामागची क्रिया प्रक्रिया समजू लागते आणि हे जादुई जगण सामान्य होऊन जाते . काव्यातील नऊ रसांपैकी अदभुत हा रस असाच सुंदर आहे जणू एखादी वल्लीच .शाळेत असताना या अदभुत रसाची शिकवलेली रचना अजून पाठ आहे

आटपाट नगरात दुधाचे तळे
तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे
नगरातले लोक सारेच वेडे
वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे
आंघोळीला पाणी घेतात दुधाचे
डोक्याला तेल लावतात मधाचे
फणसपोळीचे कपडे घालतात
सारे वेडे उलटे चालतात 

खरे तसे पाहता पाहण्यात येणारे चित्रपट ,वाचनात येणाऱ्या कथा कादंबऱ्या त्यातील घटना पात्रे संवाद मनात विस्मय निर्माण करतात . आणि या सावल्यांना आपण जवळून पहावे त्यांचा हात धरावा असे वाटत राहते . हे खूप सहज घडते ही एक प्रकारची जादूच नाही का ? अस म्हणतात की कलाकृती अनुभवण्यासाठी सूक्ष्मग्राही वृत्ती मार्मिकता असे गुण असणे गरजेचे असते . पण जादू अनुभवण्यासाठी मात्र निरागस मन आणि मनाची अबोधता गरजेची असते . जसे की संजू काका नेहमी पत्याची जादू करायचा माझ्या मनातले पान ओळखायचा . मला जसे समजत गेले मोठी होत गेले त्याच्याकडून पत्याची जादू शिकली . माझ्यापेक्षा लहान भाऊ बहिणी भाचेमंडळी यांच्यावर ती पत्याची जादू करून माझा ताईगिरीचा मुलुख मी गाजवायचे . या संजूकाका जवळ आणखी एक जादू होती म्हणजे लोटरीच्या तिकीटाची . ती मात्र त्याच्यावर कधी प्रसन्न झाली नाही . जर त्याला लोटरी लागली तर तो माझ्या उंचीची आपोआप चालणारी बाहुली आणणार होता  माझ बालपण अश्या जादुई स्वप्नांमध्ये गेले हे केवळ यासाठी नाही तर मला खराखुरा जादुगार भेटला होता

या जादुगाराची गोष्टच निराळी होती म्हणजे जय गंगे हर हर भागीरथी अस म्हणून प्रयोग करणाऱ्या रघुवीर जादूगारासारखा तो लौकिकाने जादुगार नव्हता . पण त्याच्या बासरीच्या सुरामध्ये जादू थिरकायची . मी त्याची बासरी तासनतास त्याच्यासमोर ऐकत बसे आणि त्याला म्हणायचे "किती मस्त वाजवतोस बासरी ते लहान मुलांचे गाणे वाजव की छान किती दिसते फुलपाखरू " मग तो जादुगार अर्थात शुभम दादा माझ चपट नाक ओढत म्हणायचा "बासरी आवडते काय तुला थांब आता तुझ्याशीच लग्न करतो " मग मी घुश्श्यात येवून म्हणायचे "ई जा बाबा नको तुझ्यासारखा नवरा " आणि लाजून पळत घरी यायचे तर शुभम दादा मागून ओरडायचा "अग ते तुझ गाण ऐकून जा ,मी धरू जाता येईना आता ,छान किती दिसते फुलपाखरू "

शुभम दादा कधी कधी माझ्या भातुकलीच्या खेळात कधी विषामृत तर कधी व्यवसायमालेच्या लिखाणासाठी  तर कधी कार्यानुभावातील प्रोजेक्टसाठी आजूबाजूलाच असायचा . त्याला आई बाबा बहिण कुणी होते का ठाऊक नव्हते तसा तो अवलीच होता. कुणी म्हणायचे तो घर सोडून पळून आला आहे ,कुणी म्हणायचे कुठल्यातरी गुन्ह्यातून भूमिगत झाला आहे . त्याच्याबद्दलच्या अशा अस्तित्वाचा कधीच माझ्यासाठी प्रश्न आला नाही . हनुमंतासारखे लहानाहून लहान मोठ्याहून मोठा असे होणे त्याला जमायचे .पत्ते बुद्धिबळ काय वाटेल ते खेळ त्याला जमायचे फक्त सापशिडी सोडून त्यात मात्र नेहमी मीच जिंकायचे . अशी त्याची जादू मनावर मुक्त चौफेर उधळत जातच होती पण ज्या प्रसंगाने तो माझ्यासाठी जादुगार झाला तो प्रसंग विसरणे शक्य नाही आणि आठवणे म्हणजे आयुष्याला अर्घ्य देण्यासारखेच आहे

त्या दिवशी माझ आणि प्रियाचे भांडण झाले .होते  तिच्याजवळची पेनशील मी चोरली असे तिला वाटत होते पण मी तिच्यासारखीच दिसणारी डिट्टो पेनशील मधु मावशीकडून हट्ट करून विकत आणली होती . प्रियाला कितीदा समजावून सांगितले तरी तिला ते पटेचना मग मी "आलगड्डी बालगड्डी बारा वर्ष बोलू नको लिंबाचे पान तोडू नको तुझी गड्डी फु म्हणून " तिच्यावर रुसवा टाकून आले . घरी जाऊन उगीच उगीच कढत कढत पाणी डोळ्यातून सांडू लागले आजी ओरडली "तुझे डोळे म्हणजे पाण्याच्या टाक्या काय ग " इतक्यात मला काहीसे सुचले आणि डोळे पुसून आजीला म्हणाले "आजी स्नेहलकडे जाते " स्नेहलकडे गेले तर प्रियाबाई तिथे आधीच उपस्थित होत्या आणि स्नेहल मला म्हणत होती "आजपासून प्रिया आणि मी तुझ्याशी खेळणार नाही " मी त्या दोघींना का प्रश्नही विचारले नाही मलाही राग आलाच होता त्या प्रियाचा ; खोटारडी मी चोरली म्हणे पेनशील . स्नेहलच्या घरातून चालत चालत निघाले . विचार करू लागले आता जर प्रिया आणि स्नेहल माझ्याशी खेळणार नाहीत तर मग कुणाशी खेळायचे ?  मला केवढा मोठा प्रश्न पडला होता . अचानक आठवले शुंभम दादाने सांगितलेले 'जर तुला कधी प्रश्न पडला तर आकाशाला विचार बघ तुला उत्तर मिळेल "

मी ठरवले आता आकाशाला विचारायचे . आकाश काही फार दूर नव्हते ते काय शंकराच्या मंदिराजवळ होते . मी चालत मंदिराजवळ पोहचले तर तिथे पुढे सपाट मैदान आकाश नाहीच . अजून पुढे आहे आकाश त्या डोळ्याच्या दवाखान्याजवळ आहे आकाश . दवाखान्याजवळ येवून पोहोचते तर पुढे पाण्याचा तलाव . अय्या हे काय या तलावाच्या पुढेच आकाश आहे आता तलावातून चालत जायचे . तलावातून चालत निघाले अव्वा हे काय पाणी घोटा गुडगा कंबर छाती नाकापर्येंत आले आकाश दिसेचना . आई मला कसतरी होते आहे माझ्या नाका तोंडात पाणी . जाग आली तर शुभम दादा आई बाबा आजी आजोबा सगळे गोल करून पाहत आहेत माझ्याकडे . त्या दिवशी नोकरीच्या बदलीच्या कामासाठी शुभम दादा गावाबाहेर गेला होता मी आकाश शोधण्याच्या नादात कधी नदीजवळ येऊन पोहोचले मला कल्पनाच नव्हती . त्याने नदीजवळ आरडाओरडा ऐकला कुणीतरी छोटी मुलगी पाण्यात बुडती आहे त्याने क्षणार्धात कसलाही विचार न करता नदीत सूर मारला आणि त्या मुलीला वाचवले ती छोटी मुलगी मीच होते . मला जाग आल्यावर आईने देवाचा अंगारा लावला . मग डॉक्टरकाकांना मी का नदीजवळ गेले ती गोष्ट सांगितली . माझी गोष्ट ऐकून आजीने तर तिच्या कपाळालाच हात टेकवला . मला भेटायला प्रिया स्नेहल दोघी आल्या होत्या आम्ही बट्टी केली . आई बाबा आजी आजोबा सगळेजणच शुभम दादाला कुरवाळत होते प्रेमाने जवळ घेत होते . मी शुभम दादाच्या कानाजवळ माझे तोंड नेले आणि बारीक आवाजात त्याला विचारले " आकाश कुठे भेटत ? तू म्हणाला होतास ना की तुला प्रश्न पडला कधी तर आकाशाला विचार " तर शुभम दादा खोखो हसत सुटला आणि म्हणाला "अग माझे अंबे जगदंबे तू काहीही लक्षात ठेवतेस काय ? आता यापुढे कधीही प्रश्न पडला तर आधी आई बाबांना विचारायचे प्रॉमिस कर मला "

शुभम दादाला मी प्रॉमिस केले . शुभम दादाचे बदलीच्या नोकरीचे काम झाले होते त्यामुळे तो लवकरच त्याच्या कामासाठी परराज्यात निघून गेला .त्याची बासरी विसरणे तर शक्यच नाही आणि ज्या क्षणापासून त्याची जादू मनावर ओथंबून गेली होती तेव्हापासून ते माझ्या जीव वाचवण्याच्या क्षणापर्येंत तो माझा जादुगार होता . पुन्हा कधी शुभम दादा भेटला नाही आणि मी ही त्याला शोधायचा प्रयत्न करणार देखील नाही जादू नेहमी अनुभवायची . जादूची ट्रिक समजली की जादू कळत नाही . आजही शुभम दादाला दिलेले प्रॉमिस लक्षात राहते अगदी गुगलला किंवा टोल फ्री नंबरला देखील प्रश्न विचारते तेव्हा प्रॉमिस आठवते  परिकथेत नाही का एखादा यक्ष वचन मागून निघून जातो आणि हातामध्ये रंगबिरंगी लोलक देतो . राजकन्या त्या लोलकाशी मन गुंफत राहते


-------कविता मोकाशी 

No comments:

Post a Comment