सफर आवडत्या गाण्याची --- नाट्यगीते (बालगंधर्व पूर्वार्ध )
शंभर वर्षाहूनही अधिक मराठी मनावर साम्राज्य गाजवणारे संगीत म्हणजे नाट्यसंगीत या ओळखीतच नाट्य संगीताची जादू आहे .नाटक आणि नाट्यगीते म्हंटल्यावर डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात ते म्हणजे बालगंधर्व त्यामुळे या सफरच्या गप्पा गंधर्वकालीन नाट्यगीते आणि गंधर्व उत्तरकालीन नाट्यगीते अशी करू . भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार नाट्य (अभिनय ) साहित्य (लेखन ) गायन वादन आणि नृत्य आदि पाच कलांचा महासंगम म्हणजे नाटक . विष्णूदास भावे यांनी स्थापन केलेल्या मराठी रंगभूमीची सुरुवात अशाच काही समृद्ध इतिहासाने झाली . काकासाहेब खाडीलकर जे की टिळकाच्या विचारांचे समर्थक म्हणून ओळखले जात तसेच राम गणेश गडकरी यांसारखे श्रेष्ठ कवी साहित्यिक आणि रंगकर्मी स्वतः गोविंद बल्लाळ देवल यांसारखे थोर नाटककार लाभले . गोविंदराव टेंबे ,मास्तर कृष्णराव खुद्द भास्करबुवा बखले यांसारखे संगीतकार तर बालगंधर्व, दिनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले ,बापूसाहेब पेंढारकर , असे एकाहूनही एक दिग्गज गायक आणि नट . एकूण तो काळ संगीताचा सुवर्णकाळ म्हणून वर्णन करता येण्यासारखा . तर अशा सत्तर दशकाहूनही जुनी असणारी गाणी ऐकण्याचे वेड अर्थातच वडिलोपार्जित . याचे कारण पु ल च्या भाषेत सांगायचे तर "माझ्या वडिलांनी बालगंधर्व ऐकले मी ऐकले आणि आजची तरुण पिढी देखील ऐकते तेव्हा कौतुक वाटते पण हा चमत्कार बालगंधर्वांच्या सुरांच्या कैवल्य स्वरूपाचाच " हे अगदी तंतोतंत खरे . मला नाट्यगीत ऐकण्याची सवय आवड वर म्हटल्याप्रमाणे माझ्या बाबांमुळे लागली ते स्वतः अनेकवेळा नाटकातील पद गाऊन बंदिशीची पद कशी होतात मग बंदिशीवरून राग कसा ओळखायचा त्या रागाचा अनुभव मूड अस सार काही ते सांगत अजूनही हि तालीम चालूच असते ,जसे की स्वयंवर नाटकातील अनृतचि गोपाला हे मल्हार रागातील पद मग मल्हार म्हणजे दुपारचा मालकंस अशा त्याला दिलेल्या सुंदर उपमेपासून तानसेन याने मल्हाराचा मिया मल्हार कसा केला अशा सुरांच्या देखण्या कथा वर्णन करून सांगताना या पदातील 'गोपाला ' म्हणताना बालगंधर्वांनी सुरांची गोलाई कशी आणली याची अगदी शास्त्रशुद्ध चिकित्सा अर्थातच माझ्या आवडत्या नाट्यगीतापैकी हे अधिक आवडते पद आहे
अनृतचि गोपाला मृत्यू आला, यश ना शिशुपाला ॥
कटु वार्ता ती ऐकता, हृदयी बोले सखा मज 'तुजला वरियले' ॥
या पदाला संगीत दिले आहे भास्करबुवा बखले यांनी , जुन्या बंदिशी मोडून तिला नाट्यपदाचे स्वरूप देऊन संस्थानिक राजे महाराजे यांच्या महालात शिक्षा भोगणाऱ्या या रागदारींना बखले गुरुजींनी मुक्त केले ,सामान्य लोकांपर्येंत अभिजात संगीत म्हणून ओळखले जाणारे शास्त्रीय संगीत पोहोचले पाहिजे त्यासाठी आधी मोठा श्रोतृवर्ग निर्माण होणे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि नाट्यसंगीतांच्या माध्यमातून त्यांनी मोठी सांगीतिक चळवळ उभारली . आता या पदाच्या गीतलेखनाबद्दल हे गीत कृष्णाजी खाडीलकर यांनी लिहिले आहे . काहीशी किचकट म्हणता येईल अशी शब्दांची मांडणी त्यांच्या अनेक गीत लेखनातून आढळून येते पण त्या वेळेच्या नाट्यगीतांची 'डिमांड' शब्दांची नसून सुरांची होती आणि बंदिशीचे मराठीकरण हा देखील मुद्दा होताच त्यामुळे हि क्लिष्ट शब्दांची गुंफण हाच या लेखनाचा स्थायीभाव असावा . आणि या गाण्याला आवाज दिला आहे तो बालगंधर्वांच्या रुक्मिणीने बालगंधर्व यांच्यानंतरही अनेकांनी त्यांची पदे गायली त्यापैकी माणिक वर्मा यांच्या आवाजातही हे पद खुलून दिसते . वर म्हंटल्याप्रमाणे यातील शब्दांकडे लक्ष फारसे न जाता सुरांकडे मन ओढले जाते ,याच नाटकातील जोगीया थाटातील 'मम मनी कृष्ण सखा रमला ' आणि भीमपलासातील 'स्वकुलतारक सुता ' अशी दोन पदे आवडतातच पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात त्यापैकी स्वकुलतारक सुता पाहू
स्वकुल तारक सुता, सुवरा वरुनि वाढवी वंश वनिता ॥
सुखविला नच जनक, न माता, ऐशी कांता नरकरता ॥
स्वगृही जी मुलगी तिच्या मात्यापित्यांना सुखी ठेवत नाही ती सासरी तरी कशी गृहकृत्यदक्ष स्त्री म्हणून ओळखली जाईल अशा प्रकारचा प्रश्न रुक्मिणी तिच्या वडील भावाला अर्थात रुक्मिला विचारते आहे
बालगंधर्वांच्या प्रसिद्ध आणि गाजलेल्या भामिनी सुभद्रा सिंधू रुक्मिणी कान्होपात्रा या भूमिकांपैकी सर्वाधिक लोकांच्या मनावर ठसा उमटवणारी संयमी समंजस प्रेमळ आणि मृदू स्वभावाची रुक्मिणी अधिकाअधिक लोकप्रिय झाली होती . कित्येकवेळा एकच प्याला नाटकातली सिंधूची भूमिका पार पडल्यावर त्यांना त्याच गावी त्या प्रेक्षकांसमोर रुक्मिणीचे स्वयंवर देखील रचावे लागे . पुण्याच्या बालगंधर्व नाट्यमंदिरात याच भूमिकेतील मोठे तैलचित्र लावलेले दिसून येते . अर्थात थोर कलावंताच्या भूमिकांमध्ये असे फरक करणे योग्य नाही . तरीही रुक्मिणी आणि सिंधू या सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या हे तितकेच खरे . आता या पदाच्या रागाबद्दल थोडेसे भीमपलास म्हणजे बालगंधर्वांच्या आवाजाला चढलेला साज बहुतेक रागांची सुरुवात षड्जापासून होते तर भीमपलासाची निषादपासून ,मैफिल फारशी रंगत नाही हे गायकाच्या लक्षात आले की तो भीमपलास गातो अशी या रागाची ओळख आहे , एकूण मोठा जादुई राग आहे आणि अशा रागाला पुन्हा आपल्या आवाजाने मोहित केले आणि प्रेमात पाडले ते गंधर्वांनी . नी सा ग म प नी सा या सरगममधील निशादाला गंधर्व पोहोचतात तेव्हा आपण खरच काही अलौकिक ऐकत आहोत हे हृदयाला कळाल्यावाचून राहत नाही इतके मधुर सुरांचे चांदणे मनावर अभिषेक करत राहते . उस्ताद अल्लाहदिया खान जे कि भास्करबुवा बखले यांचे गुरुवर्य हे एकदा गंधर्वांचे स्वयंवर नाटक पाहण्यास आले होते तेव्हा याच गंधर्वांच्या पदाने ते भारावून गेले आणि त्याच भारावलेल्या अवस्थेत त्यांनी रंगमंचावर येऊन गंधर्वांची गळाभेट घेतली मग पुन्हा सारे भानावर आले आणि नाटक पुढे गेले स्वतः अल्लाहदिया खान त्यांच्या एका मुलाखतीत म्हणतात परमेश्वराशी अनुसंधान साधण्याचे सामर्थ्य गंधर्वांच्या गाण्यात आहे आणि मला वेळोवेळी याचा प्रत्यय आला आहे त्यांच्या भीमपलासातील एका पदाने अक्षरशः मला सुरांनी नाहू घातले आणि तेव्हापासून मी त्यांचा चाहता आहे . अशीच गंधर्वांच्या सुरांची मोहिनी पडलेली सौभद्र मानापमान शारदा एकच प्याला संत कान्होपात्रा नाटकातली अनेक रसातील पदे आहेत ती आता एकेक करून पाहू
खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ॥
नभि जनहितरत भास्कर तापत
विकसत पहा नलिनी ॥
पिडित जन देखता, स्वसुखा त्यागी दया ।
जनभयहरण हेचि सुख, सदया देवराया ।
दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेमलहरी
गुणरसपान हेचि सुख, प्रेम तया नाव जनी ॥
स्त्रियांचे सौंदर्य श्रेष्ठ कि पुरुषाचे कर्तुत्व हा तसा सनातन चालत आलेला वाद आहे . सौंदर्य तसे शास्त्र कि कला हा प्रश्न मलाही नेहमीचा पडणारा प्रश्न तरीही सौंदर्य हे प्रासादिक असल्यास ते हृदयाला अधिक भावते त्यामुळे सौंदर्य ही कलाच होय असे म्हणणे इष्ट ठरेल . तर असे हे सौंदर्य आणि या अशा सौंदर्याला सहज जिंकून घेणारे धैर्यधर याचे कर्तुत्व अशा पार्श्वभूमीवर असणारे हे नाटक यातील नायिका भामिनी हे पद गाते आहे सौंदर्य असो वा कर्तुत्व जर अधिष्ठान प्रेमाचे असेल तर या दोन्हीची काय कथा हेच भामिनी तिच्या सुरातून सांगते आहे . 'खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ' खरे प्रेम कशाचीच अपेक्षा लोभ धरत नाही . पिडीत दुःखी लोक पाहून जे स्वसुखाचा त्याग करते ते प्रेम अगदी प्रेमाची विश्वात्मक व्याख्या सांगणारे हे पद मला आता या क्षणी वि स खांडेकर यांच्या लघुकथेतील एक वाक्य स्मरते आहे . "प्रेम म्हणजे मोह नव्हे प्रेम म्हणजे भोग नव्हे प्रेम म्हणजे योग तारुण्यपणी रामाने राज्याचा आणि पत्नीचा त्याग केला तो काही उगाच नाही " अर्थात या पदाला भामिनीचा तसा जिव्हाळ्याचा सूरदेखील लाभला आहे . मघाशीच म्हटल्याप्रमाणे गंधर्वाच्यानंतर माणिक वर्मा हिराबाई बडोदेकर जयमाला शिलेदार कुमार गंधर्व भीमसेन जोशी अनेकांनी त्यांची पद पुन्हा गायली त्यापैकी अलीकडील आवाज म्हणजे आनंद भाटे यांचा गोड गळ्याची तान आणि मधुर आवाज यामुळे गंधर्वशैलीची ते त्यांच्या आवाजातून नेहमीच आठवण आणि त्याचे यथार्थ दर्शन घडवून आणतात पैकी त्यांचे ठायीमधील 'धनराशी जाता ' आणि 'जोहार मायबाप जोहार तसेच वरील पद खरा तो प्रेमा मी पुन्हापुन्हा ऐकत राहते
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली ।
वाटतें दुजा सुदाम मज दिसेल त्या स्थळीं ।
गंधर्वांनी त्यांच्या अल्पवयात नव्याने साकारलेली भूमिका असे शारदेचे वर्णन करता येईल संगीत गीत आणि दिग्दर्शन असे त्रयींचे सूत्रधार असणारे देवल मास्तर यांच्या संगीत शारदा नाटकातील भीमपलास रागातील हे पद बलसागर तुम्ही वीर शिरोमणी ,मूर्तिमंत भीती उभी यासारखी अनेक पदे निव्वळ गंधर्व यांच्यासाठी लिहिली आणि संगीतबद्ध केली आणि त्यांच्या नावे ती अजराअमर झाली . भीमपलास बागेश्री मल्हार जोगिया तोडी या रागातील गंधर्वाची पदे ऐकणे म्हणजे मोठी पर्वणीच . सदरचे पद मूर्तिमंत भीती उभी गंधर्व गाताना अक्षरश भीती समोर उभी रहायची असे प्रेक्षक आणि नाटकाचे वादकही सांगत असत . पैश्याच्या हव्यासा पोटी सोळावयीन मुलीचे लग्न तिच्या वयाहून दुप्पट तिप्पट असणाऱ्या जरठ म्हातारयाशी लावून दिले जाते ,तेव्हा तिच्या मनाची होणारी घालमेल तिच्या किशोरवयीन स्वप्नांचा होणारा चुराडा अशी तिच्या भावनाची प्रत्यक्षदर्शी भूमिका शारदा नाटकात लिहिली गेली आहे साकारली गेली आहे . स्वातंत्रपूर्व काळात भारतात अनेक सामाजिक सुधारणा घडून आल्या घडवून आणल्या त्याचेच चित्रण करणारे एक सामाजिक नाटक म्हणून याची नोंद घेता येईल ( सांगलीचे सरकार चिंतामणराव पटवर्धन यांच्यावर हे नाटक लिहिले गेल्याचे सांगितले जाते म्हणून सांगलीत या नाटकावर बंदी उठवण्यात आली होती असे ऐकिवात आहे ) . हे नाटक प्रथम मिरजेच्या नाट्यगृहात सादर झाले या भूमिकेतून नटी म्हणून रंगभूमीवर पहिल्यांदाच पदार्पण करून बालगंधर्व गायले ते पद असे होते
अजुनि खुळा हा नाद पुरेसा कैसा होइना ।
नाटक झालें जन्माचें मनिं कां हो येइना ॥
व्यसनें जडली नवीं नवीं, कुणि तिकडे पाहिना ।
नांव बुडविलें वडिलांचे कीर्ति जगीं माइना ॥
प्रोपर्टी विकून त्या काळात लोकांनी नाटक पाहिल्याचे सांगितले जाते ,त्यामुळे नाटक पाहणे हे व्यसन आणि निषिद्ध देखील मानले जाऊ लागले अर्थात यात गोऱ्या साहेबाला आवडत नाही म्हणून आपणही पाहायचे नाही असा भाग होताच पण या व्यसनाच्या पुढेही या कलेची महनियता दडली आहे . गंधर्वांनी गायलेले हे पहिले पद त्यांच्या आयुष्याचे गाणेच होऊन राहिले "नाटक झाले जन्माचे " हा सुदैवी म्हणावा कि दुर्दैवी म्हणावा पण योगायोग खरा ठरला . सदर लेखात बालगंधर्वाच्या रुक्मिणी भामिनी आणि शारदेबद्दल लिहिले पुढील लेखात कान्होपात्रा सिंधू सुभद्रा आणि सयुंक्त मानापमान याबद्दल बोलूया . त्याव्यतिरिक्त दिनानाथ मंगेशकर तात्या लोंढे बापूसाहेब पेंढारकर मास्तर कृष्णराव यांच्याही नाट्यपदाविषयी स्वतंत्र लेखनाचा विचार आहे आणि तो मनात तसाच रुजवते गंधर्वांच्या गाण्याचा पूर्वार्ध संगीत विद्याहरण नाटकातील देवयानी भूमिकेसाठी गंधर्वांनी गायलेल्या बागेश्रीच्या पदाने करते .बागेश्री नेहमीच चांदण्यात आरंभ करून उत्तरोउत्तर रंगत जाते रंगवत जाते तशीच ही सफर घडत जावो अशी नटराजच्या चरणी प्रार्थना तर "आता राग देई मना "
आतां, राग देई मना शांततेला, वीर हा असुरसंहार झाला ॥
कोप दुर्गचि खरा दुर्बला जाहला, विजयदायक मला, बंदी याला ॥
-----कविता मोकाशी

धन्यवाद
ReplyDelete