भूल बळी आणि थाप
अभय तसा सावध पवित्रा घेवूनच बसला होता . वास्तविक हे त्याच्या अंगवळणी पडले होते . तसा आज रविवार म्हणजे सुट्टीचा वार ,दवाखान्याला सुट्टी त्यामुळे कुणी येणार नाही हा ताळा अभयच्या मनात पक्का होता. साध पत्र पोस्ट तार देखील यायची नाही .दूधवाला पेपरवाला सकाळचेच येवून गेले आहेत . खणखणले तर फोनच पण रिसिव्हर त्याने आधीच बाजूला काढून ठेवला होता . आता तो मस्त बेडवर लोळत पेपर वाचत पडला . अचानक फोन वाजला त्या आवाजाने तो भलताच अस्वस्थ झाला आणि स्वतःवरच चिडला . फोन कट करण्यासाठी म्हणून तो हॉलमध्ये आला टीवी चालूच असल्याचे त्याच्या लक्षात आले .स्वतःवर जोरजोरात हसून टीवी रिमोटने बंद केला आणि काढलेला फोनचा रिसिव्हर पुन्हा ठेवला पुन्हा बाजूला केला . आता त्याची खात्री झाली कुणीही चिटपाखरू इथे फिरकणार नाही . स्वतःच्याच धुंदीत गुणगुणत तो बेडवर पेपर वाचत लोळू लागला . कुणीतरी नजर रोखून आपल्याकडे पाहते आहे याची जाणीव त्याला हळूहळू होऊ लागली .लगेचच झटदिशी टी कॉर्नरवरचे वाळूचे घड्याळ त्याने उपडे केले .समोरच्या पाबलो पिकासोच्या पोर्टेटमधले जिवंतपण त्याला छळू लागले . त्या पोर्टेतमधल्या व्यक्तीचे डोळे आधी लाल मग हिरवे निळे तर्हेतर्हेचे भासू लागले . त्यानेही मग आपली नजर त्या डोळ्यांवर रोखून धरली . पोर्टेटच्या काचेकडे पाहून केस भांग ठीकठाक करत राहिला . एकूण हा रविवार फारसा चांगला नाही असे त्याचे त्यालाच वाटून गेले .पेपर तिथेच टाकून गरम कॉफी घेण्यासाठी तो स्वयंपाकघरात गेला . वातावरण इतक दमट होत काल आणलेल्या ब्रेडवर बुरशी चढली होती . खिडकीबाहेरच्या झाडाचे पान फुल काही हलत नव्हत त्यात फेन्शुई मंद वाजत राहिली त्याची त्यालाच गंमत वाटली . त्याच विचाराच्या नादात असताना खिडकीतून त्याला दुरून कुणीतरी चालत येत असल्याचे जाणवले . लक्षपूर्वक तो बाहेर पाहू लागला स्वतःशीच बोलला
"कोण स्मिता ? ओह माय गॉड नॉट अगेन धिस ."
स्मिताने डोअरबेल वाजवण्याआधीच त्याने दरवाजा उघडला . तो तिला बस म्हणून सांगणार त्या आधीच ती बसली तिची खांद्यावरची पर्स तिने टिपोयवर ठेवली . आता तो काही तिला म्हणणार या आधीच ती बोलू लागली . एकूण ती खूपच घाबरलेली भेदरलेली होती असे त्याच्या लक्षात आले ती बोलू लागली"सोर्री डॉक्टर आज दवाखाना बंद असतो मला माहित आहे . तुम्ही अपोइन्तमेंट शिवाय भेटत नाहीत तरीही अगांतुकासारखी आले . खरतर मी फोन ट्राय करते आहे सकाळपासून ,पाहिलंत तुम्ही फोनही काढून ठेवला ,अर्थात तो तुमचा खासगी प्रश्न पण मी फोन ट्राय केला होता . नाही आधी माझ बोलण पूर्ण होऊ दे मग सांगा मला काहीही . माझ जगणंच कठीण होऊन बसलं आहे हो डॉक्टर . मला आताशा तो झोपेतही दिसतो . पूर्वी तो स्वप्नात झोपेत येत नसे म्हणून अधिक त्रास झाला तर झोपेच्या गोळ्या घेवून मी निजत असे . तो स्वप्नात येतो मला जागेपणी दिसतो .मी जेवताना खाताना माझ्याकडे एकटक तो पाहत राहतो . मी वेणीचा रबरबँड बांधताना आरशात पाहून माझ्याकडे तो हसतो . मी कुठेही गेले तरी तो मागे पुढेच राहतो बोलत नाही पण छळत राहतो मला . खरतर तो या जगातच नाही त्याचे माझे लग्न ठरले होते . लग्नासाठी वऱ्हाड येत असताना बस दरीत कोसळली त्यात चाळीस लोक ठार झाली वीस जखमी तो झुंजत होता मरणाशी दहा बारा दिवस अखेर गेला पण मला दिसतो डॉक्टर तो खरच दिसतो . मला वेड लागलंय अस बरळतात लोक"
बोलता बोलता तिला हुंदका लागला लहान मुलासारखी पदरात तोंड खुपसुन ती रडायला लागली ."मिस स्मिता शांत व्हा ,मी समजू शकतो आणि तुम्हाला वेड वगैरे काही लागल नाही "
स्मिताच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवत अभय म्हणाला स्मिताच्या चेहऱ्यावर मंद स्मितरेघ उमटली ,तिच्या खांद्यावर ठेवलेला हात खूप थंड झाल्याचे अभयला जाणवले . त्याने हात झटकन बाजूला केले .दमट घामट झालेल्या त्याच्या अंगाला झुळूक बडवून गेली आणि अचानक स्मितादेखील झुळूक झाल्यासारखी एकदम त्याच्यासमोरून धुसर होत गेली . अभयला चक्कर येत असल्याची जाणीव झाली तो डोक्याला घट्ट हात धरून ओरडू लागला"तिला थांबवा कुणीतरी स्मिता sssss स्मिता sssss"
"काय झाले?" अभयची वृद्ध आई काठी टेकत एका खोलीतून बाहेर आली"आई ती स्मिता जिला ज्यादा भूल माझ्याकडून दिली गेली असा आरोप केला होता ती स्मिता इथे आली होती . तिला अजूनही तो दिसतो . मला वाचवले पाहिजे तिला यातून तिला अडव जा थांबव तिला .........स्मिता sssss स्मिता sssss" अभय अस्वस्थ होऊन बोलत होता .
"कोण आले होते ? कुणी आले नाही ,सकाळपासून मी रामाचा जप करत इथे आतल्या खोलीत बसलेली आहे कोण आले नाही का गेले नाही ,तुला पुन्हा भूत पिशाच्चबाधा झाली आहे ,थांब मी दृष्ट काढते तुझी" अभयची आई कापऱ्या आवाजात म्हणाली
"ओह ! स्टोप इट नॉनसेन्स मी एक डॉक्टर आहे " अभय त्याच्या आईवर जोरात ओरडला इतक्यात दारावर पुन्हा थाप पडली
"स्मिताच असणार " अभय बोलला "श्युक sssss ......आवाज बंद ...तू गप्प इथेच पडून रहा ….मी बोलावल्याशिवाय तू यायचे नाहीस....त्या स्मिताला ज्यादा भूल दिलीस म्हणून पोलिस आले आहेत तुझी चौकशी करायला "अभयची आई त्याच्याशी बोलत बोलत लटपटत दार काढायला निघून गेली .
तोच डॉक्टर फडणीस आणि त्यांचा कंपाउंडर रामय्या आत येताना अभयला दिसले .अभय डॉक्टर फडणीसांची बोलू लागला
"डॉक्टर ती स्मिता आली होती . हो ती जिवंत आहे .मी म्हणालो होतो ना ,मी तिला भूल ज्यादा दिल्याचा आरोप खोटा आहे ,आरोप आरोप ……आणि तुम्ही कसे आलात पोलिस भेटले का बाहेर तुम्हाला....आणि माझी आई कुठे आहे ? बोलते आहे का पोलिसांसोबत ? तिला सांगा घाबरू नको . स्मिता अजून जिवंत आहे तो आरोप खोटा आहे …डॉक्टर स्मिताला बोलावून आणले पाहिजे ती माझ्या बाजूने साक्ष देईल" नख चावत चावत अभयने बोलणे पूर्ण केले .खोलीतल्या घड्याळात दुपारचे तीन वाजल्याचे टोल पडले तीनदा
"पाहिलंत तीन टोल पडले हे सत्य आहे" अभय वर आढ्याकडे पाहून बोलत होता
."ते जाऊ दे , आई कुठे आहे " तो रामय्याला विचारत होता
रामाय्याने अभयच्या आईच्या फोटोकडे बोट केले . तसा अभय खवळला
"कुणी हार घातला फोटोला ?" अभय जोरात ओरडला
"कुल डाऊन अभय कुल डाऊन ...रामय्या तो हार काढ फोटोवरचा चटकन "डॉक्टर फडणीस बोलले
" डॉक्टर फडणीस मला वेड तर नाही ना लागले " अभय विचारू लागला
"काहीतरीच काय ?अभय कमॉन चिल माय बॉय ,ते वेड बीड विचार सोड . मी तुझ्या आवडत्या पाबलो पिकासोचे नवीन पेंटिंग आणले आहे " डॉ फडणीस बोलता बोलताच रामाय्याला काही इशारा देत होते .
रामय्याने अभयच्या दंडाला धरले .
फडणीसांनी अभयच्या खोलीचे निरीक्षण केले .अभयने नखाने भिंतीवर कोरलेली काही चित्र त्यांना दिसली त्यांनी संदर्भ जुळवायाचा प्रयत्न केला पण काही निष्पन्न झाले नाही .फडणीस अभयला इंजेक्शन देऊन खोलीचे दार बंद करून निघून गेले . आता त्या खोलीत स्मिता नव्हती अभयची आई नव्हती पोलिस डॉक्टर फडणीस नव्हते रामय्या नव्हता . तो दिवाणखाना नव्हता बेडरूम नव्हती ,ते वाळूचे घड्याळ नव्हते स्वयंपाकघर नव्हते ,कॉफी नव्हती बुरशी आलेला ब्रेड नव्हता फेन्शुई नव्हती रिसिव्हर काढून ठेवलेला फोन न्हवता टीव्ही नव्हता .खरतर काहीच नव्हते अभयच्या मनातले त्या खोलीत , होता तो फक्त अभय झोपेचे इंजेक्शन घेतलेला आणि पाबलो पिकासोची जिवंत दोन पेंटीग्स एक जुने आणि एक नवे अभयने नखाने कोरलेल्या भिंतीमध्ये लावलेली .
------कविता मोकाशी
No comments:
Post a Comment