१
गोड मानाव्या लागणाऱ्या कथेचा शेवट ठरलेला . निर्णायक किनारे या दिशेला उधाणून यायचे देखील नाहीत पण हा मध्य कि शेवट कि पुन्हा आरंभ हे न कळण्याइतकेच अशक्त मनगटाला बांधलेले घड्याळ किंवा काळाशी बांधले गेलेले मनाचे अश्व . हे विश्व सत्य आहे की आभासी हे त्या अश्वाच्या गतीस ठाऊक . ब्रम्हासारखे परब्रम्ह असेल तर या कथेसारखीच परिकथा कुठेतरी जन्मली असावी किंवा तिथल्या जगाच्या क्रूर नियतीने आणि दयाळू म्हणून वर्णन केलेल्या निष्काम परमात्म्याने तिचा घुसमटलेला जीव आकाशाएवढा विशाल केला असेल . क्षणभराची आयुष्ययात्रा त्या कथेने उलगडून घेतली असेल लुप्त झाली असेल ती सीतेसारखी किंवा सरस्वतीसारखी . यज्ञधुनीत सतीसारखी तिने ऊडीदेखील घेतली असेल . पण मुळात ही कथा अभिमानी नव्हतीच . मृत्युंजय मंत्रासारखी अमर नव्हती . कल्पांताच्या समयी ब्रम्हदेवाला ती सुचली असावी म्हणून तिचा शेवट गोडच मानावा लागत असावा . तिचे तपोचरण भंगले नव्हते तिचे अस्तित्वच जणू लोपले होते शब्दांच्या मेखल्यात ,पात्राच्या सुसंवादात ,तिच्या तिच्याचपणात . ती स्थिर होती अंतर्बाह्य घडवलेल्या शिल्पासारखी ,वाचणाराच जीव तिच्यात ओतत असे त्याच्या रसाळ वाणीने ती त्याची होवून जातसे .
२
अभेद्य वाटणाऱ्या एका तटबंदीवर एक द्वारपाल उभा होता . त्याच्या हातातले भाल्याचे टोक आणि गवताचे पाते एकसारखेच मानणारा तो सज्जन त्या राजवाड्याचा अनभिषिक्त सम्राट होता . जग पादाक्रांत करून त्याची कीर्ती त्रिलोकात डामडौलाने फडकत होती . कुरूप वाटाव्या अशा एका तिन्ही सांजेस तो पाषाणी पोलादी राजा भविष्याचे निर्बंध तोडून भूतकाळात उलटा क्षीण वाटणारा तरंग प्रवास करू लागला . परतीच्या वाटेवर नसलेले अर्ध्ये झेंडे त्याचाच मार्ग अनुसरु लागली तो मार्ग पाण्यातल्या चंद्राइतकाच चंचल झाला आणि कलेकलेने लोप पावू लागला . न सांगून येणाऱ्या सूर्यास्ताच्या वेळेस तो गर्भरुप झाला आणि असीम असणारे आकाश क्षितिजाच्या बंधनात राहते तसे चोहीकडेच त्या अंधारल्या वेळेला सारे काही बंधनात बद्ध होते किंवा चोहीकडेच मुक्त होते अभेद्य तटबंदीसारखे . या बंधनाबाहेर तीच मुक्तता आणि त्या मुक्ततेबाहेर तेच बंधन . एकूणच सारे निरर्थक त्याला वाटू लागले तेव्हा याच गोड मानाव्या लागणाऱ्या कथेचा शेवट त्याला उमजला .
३
तर ऐका कमळपात्रात बंदिस्त असणारया भ्रमरांनो तुमची कहाणी ,शंभूनाथाच्या वेलीवर विराजमान असणाऱ्या बेलश्रीनो ऐका तुमची कहाणी . विराट वाटणाऱ्या पर्वतानो ऐका तुमची कहाणी ,चंद्रमास पाहून उचंबळणार्या रत्नाकरा ऐका तुमची कहाणी . फार पूर्वी तुमची कुणी कहाणी रचली नव्हती . म्हणून कहाणीला शेवट नव्हते . पर्वतांना पोखरून त्याची भुयार झाली आकाशाला हात टेकवून उंच इमारतींची झाड झाली . गोंगाट करणाऱ्या रहदारीत चिमण्यांची चिवचिव हरवून गेली तेव्हा या कथा उपजल्या तुमच्या जन्मकथा कुण्या कवींनी संतानी संशोधकांनी शोधल्या आता तुमच्या पश्चात याच्या दंतकथा होतील . तेव्हा या कथांना शेवट नसेल आणि असलेच तर गोड नसतील
४
एकूणच मी माघार घेतली ,पुढचा काळोख आणि मागचा उजेड हातात फक्त मुठबंद कवडसा तो देखील उन्हाच्या झुल्यावरून कधी उडून जाणारा ,सारेच ठाऊक होते . न बदलणाऱ्या परिस्थितीची बंद पापणी तिचा एक छोटासा केस माझ्या मुठीवर पिसासारखा अलगद उडून आला असता तर माझ्या मिणमिणत्या स्वप्नापुढे दिवा तेवता राहिला असता अगदी अंधातरी . पण आंधळेपण स्वप्नांना नव्हते परिस्थितीला होते . गाभार्यातली घंटेची किणकिण आणि पैंजणातले घुंगरू यांचे न तुटेलपण देवदासी इतके कुणाला कळणार ? देवाच्या अंतरंगास देखील कळले नसावे . अशाच एका अतृप्त ओढीने जन्मलेली आर्त करुणा अखेर विलीन झाली तल्लीन झाली आयुष्याच्या जगण्याच्या तत्वज्ञानाशी तेव्हाच निपजली ती गोड मानून घाव्या लागणारी कथा . या कथेचे आयुष्य तितकेच तेवढेच
-------कविता मोकाशी
अशक्य भारी!! जबरदस्त!! _/\_
ReplyDeleteधन्यवाद हेमंत .... दुर्गाबाईंनी अनुवादिलेल्या बाणाच्या कादंबरीचा इफेक्ट वाचनानंतर तसाच उरला हेच ते :)
Delete__/\__