इष्ट देव
अपूर्ण इच्छांच्या बळी चढवल्या गेलेल्या
अपूर्ण इच्छांच्या बळी चढवल्या गेलेल्या
आयुष्याच्या हरेक क्षणाची मुंडी
त्या मुंड्या पातकांची माळ गळ्यात घालून
जन्मला आहे माझा इष्ट देव
अबोध न उलगडलेले मन पुजते आहे त्याला
स्वप्नांचा देव होवून तो अधिराज्य गाजवतो
मनाच्या सात कप्प्यात देहाच्या नऊ प्राणात
दुखाशी नाते सांगत नाही माझा इष्ट देव
भातुकलीच्या खेळासारखाच
त्याच्यापुढे मांडते डाव मी नवसाचा
तो मुर्तीभर गाभारभर अंगार बनून राहतो
तो शक्तिशाली पण त्याच्यावाचून मी दुर्बल
ज्यांनी मातल्या आहेत माझ्या इच्छा
त्यांचा कसा असेल इष्ट देव कुणास ठाऊक
असेल समन्वय साधणारा की लोककथेत
खाऱ्या मांसाचा माणसाचा नैवेद्य खाणारा
ईश्वरी इच्छा ,प्राप्त परिस्थितीचा स्वीकार
अनुसरत नाही माझा इष्ट देव
प्रतिकार करत नाही त्याच्या दगडी अस्त्राने
एक स्वप्न तुटले म्हणून त्याचे तुकडे मोजून
पुन्हा गणती करतो तश्याच तुटणाऱ्या स्वप्नाची
तरीही पृथ्थक होत नाही मन आणि बुद्धी
घडवित नाही चमत्कार हाच साक्षात्कार
सांगत राहतो माझा इष्ट देव
स्वप्नाच्या प्रतीकात आभासाच्या प्रतिमेत
-----कविता
*अर्थातच टीका मुर्तीपुजेवर प्रतिकांवर देवावर नसून ,भविष्याचा वेध घेवून केवळ रंजन करून आत्मिक बल न वाढवता ,परिस्थितीला सामोरी न जाणाऱ्या अबोध मनाला उद्देशून लिहिले आहे .
No comments:
Post a Comment