Pages

Friday, 8 August 2014

नेति नेति

नेति नेति 



खोलीतले विश्व निर्माण होण्यापूर्वी 
चैतन्य जडत्व आस्तिक नास्तिक  
अणुवाद रेणुवाद तत्वज्ञानाचे गूढ 
असे काहीच नव्हते अस्तित्वात 
नेति नेति
असलीच तर होती 
"निराशा" 
निराशेची संस्कृती 
संस्कृतीच्या प्राचीनत्वाचे गर्भ 
गूढघ्यात माना खुपसलेले 
उदार उदासीनतेची बाललीला   विश्व 
रडण्याचे नव्हते धैर्य तेव्हाही   तरीही जीव 
इच्छाही नव्हती 
दुखाचे शीर कापून आणले 
त्याचेच वॉलपीस होते शोभून  
शेवाळलेल्या भिंतीवर 

कुणीच नव्हते सखे सोबती 
या प्रदीर्घ आजारपणात 
नात्याची उबळ 
ठसका यायचा जीवघेणा 
गेला नाही जीव तरीही  
हुंदक्यांनी भरलेल्या दरीत 
देहावर लाटा थडकायच्या नुसत्या 
देहही ओंडका होऊन 
मनाच्या वाळवंटात 
मॉडर्न आर्ट म्हणवून घेत 

अखेर देह थकला सुरकुतला 
भिंतीचेही पोफडे निघू लागले 
महतप्रयाण संकेत मिळाला 
ज्या तत्त्वातून जन्मलो 
त्याच तत्वात विलीन 
निराशेने घर बदलले 
खोलीने तिचे जग 
घरमालकानेच घेतली जागा 
वसवणार आता तेथे 
रो हाऊसेस 
एकासारखेच एक दिसणारे 
तेच भिन्नत्व एकत्वाचे  
तेव्हा ओळखता येईल 
निराशेला ?
तिचा गतजन्म 
पुनर्जन्म ?

इडा पिंगला 
आठवतीलही तो जन्म 
स्मृती नुसतीच 
जीर्ण ग्रंथासारखी 
पान पलटाच 
माती क्षणार्धात 

खोलीतले विश्व निर्माण होण्यापूर्वी 
काहीच नव्हते अस्तित्वात नेति नेति  


-----कविता 

No comments:

Post a Comment