मनी उन्मनी जागणारे स्वप्न
स्वप्नांचा चुरगाळलेला कागद
कागदाचे ओरिगामी पक्षी
पक्षी गातात झाडावर गाणे
गाण्यातून ओहोळतो पाऊस
पावसातून निथळते कथा
विव्हळत राहते दुख
दुखाला नाही नाद हुंकार
कोसळता गंध रंग उजेडाचा
थरथरत्या सावल्यांचे भय
निजत्या अस्पर्शाच्या वेली
काळाची निद्रागुंफा
अजानुबाहू रेखाचित्रे
जन्मखुणाची अबोध नक्षी
नक्षीतले हिरवे गोंदण
गतजन्मीचा वंचित उःशाप
पहाडावर भग्न मंदिर
पायथ्याशी आर्त वेदना
वेदनेस तहान भूक तहान
अश्रुंचे निळे गंभीर विवर
विवरामध्ये खोल खोल
हृदयाची व्याकूळता
एकटेपणाचे अंकुर
एकटेपणाचे अबोल झाड
ना सावल्या ना कवडसे
पानात जळते झाड
आगीत पेटल्याविना
समुद्राच्या तळाशी
हरवलेला शंख
समुद्राची गाज
शब्दांच्या लाटेवर
असंख्य परीघ
न ओलांडता येणाऱ्या शपथा
काजळडबीला लाव तीट
महाकाव्याची दीर्घ मोहिनी
चित्रातले शिल्प
कळते आकळते
सजीव संजीवन
चिरंतन समाधी
समुद्राच्या तळाशी
हरवलेला शंख
श्वासभरुनी देह
देहाची थडगी
थडग्यात बसून
आठवणींचे सावळे रूप
ध्यानस्थ मौनस्थ
फासून रक्षा अंगाला
अंगाभोवती
थडग्याचे वारूळ
-----कविता
No comments:
Post a Comment