Pages

Sunday, 3 March 2013

पन्नाशी गाठलेल्या आईला

पन्नाशी गाठलेल्या आईला


पन्नाशी गाठलेल्या आईला
हळुहळु जमु लागले आहे
डोळ्यांत पाणी न आणता
तिच्या माहेरहुन येणे
उरलेल्या भाताचे 
अंदाज चुकले म्हणुन
न हळहळता
त्याला फोडणी देणे
हळुहळु जमु लागले आहे
पन्नाशी गाठलेल्या आईला

आता आई सांगत नाही गोष्ट
माझ्या आधी जन्मलेल्या मुलीची
तिला आठवतही नाही
तिचे ते अदमुर बाळंतपण
तरी फुटू लागतो पान्हा
आठवू लागतात तिला
दोन वेण्या घातलेल्या दोन मुली
परकराच्या ओच्यात
बकुळ गोळा करणाऱ्या
आता आई सांगत नाही गोष्ट
माझ्या आधी जन्मलेल्या मुलीची

आताशा आई चिडत रागवत
ओरडत नाही कुणावरच
दिसतात तिला घरभर
अस्ताव्यस्त पसारे
सुरुकुतलेले कंटाळलेले निजलेले
अनुक्रमे पंचावन पंचवीस वीस वयाचे
आवरत नाही आई कोणताच पसारा
कुलूपबंद करते
शिस्त तक्रारी काळजी जबाबदारी
ठेवते किल्ली जागेवर
तिघांनाही सापडावी अश्या जागेवर
आताशा आई चिडत रागवत
ओरडत नाही कुणावरच



-----कविता 

No comments:

Post a Comment