Pages

Wednesday, 19 November 2014

पहिले दुसरे आणि सावत्र

पहिले दुसरे आणि सावत्र 




राजाला होत्या दोन राण्या 
पहिली झाली नावडती 
दुसरी आवडती झाल्यापासून 
पहिली रहायची डोंगरावर 
दुसरी रहायची पायथ्याशी 
पहिलीच्या सावलीस नव्हते उन 
दुसरीच्या उन्हास नव्हती सावली 
पहिलेने वाचवले राजाचे प्राण 
दुसरीने दिले राजास प्राण 
पहिली ऐकवायची कथा 
दुसरी व्हायची स्वतः कथा 
दोघी होत्या राजाच्या राण्या 



दुसरीची व्यथा पाहिलीस 
कळणारी नव्हती 
तरीही दुसरी एकटीच 
पहिली नेहमी पहिलीच 
समुद्र मात्र भोगत रहायचा 
प्रत्येक लाटेचे सावत्रपण 



एक होते धड त्याला होती 
दोन शिरे दोन मन 
दुसरे होते शीर त्याला होते 
दोन धड दोन शरीरे 



सख्ख चुलत सावत्र 
कुणीच नाही तिचे जगात 
तिचा होता एक उगम 
तिचे होते दोन शेवट 
सगळ्या जगासाठी 
ती सावत्र ती पवित्र 
तिच्यासाठी सगळे जग 
सावत्र आणि पवित्र 
ती नदी सनातन 



एका योग्याच्या तपातून 
जन्माला आले ज्ञान 
सांसारिकाच्या मुक्तीसाठी 

दुसऱ्या योग्याच्या शापातून 
जन्माला आले कर्म 
सांसारीकांच्या बद्धतेसाठी 

मुक्त आणि बद्धतेच्या 
चक्रात अडकलेल्या 
सांसारिकाच्या प्रवासातून 
जन्माला आला पुन्हा योगी 

तो असेल पहिल्यासारखा 
की दुसऱ्यासारखा 
उत्तर ठाऊक नाही 
मायेचे सांसारिक सांभाळत आहे 
त्याचे नवजात ब्रम्ह अर्भक 
सावत्र मनाने आपले होऊन 



भरले आभाळाचे शब्द मळवट 
नेसली क्षितिजाचा अस्मानी शालू 
जरतारी भाव भक्ती भावनेचा 
बुडविले कुंकवाक्षरात बोटे 
ल्याली सावत्रपणाचा वसा 
बुडविले तिने तिचे महाकाव्य 
महासागराच्या काव्यात 

तिचे पहिले काव्य ती स्वतः 
दुसरे काव्य तिचा महासागर 



------कविता 

No comments:

Post a Comment