कवी आणि संन्यासी
कवीचा जन्म कुणाचे मागणे असू शकणार नाही .त्याचा जन्म त्या सुखी जोडप्याच्या संसाराला आशीर्वाद म्हणून लाभलेला होता .ज्या वंशात कवी जन्मला त्या कुळात काव्य निषिद्ध मानले जाई . या वैरभावाला परस्पर सुयोग्य किंवा अयोग्य कारणही होते . त्या वंशाचा मुळपुरुष मोठ्ठा लढवय्या सेनापती ,त्याच्या युद्ध कसबावर राजाची भारी मर्जी ,या मर्जीपायीच त्याने एका प्रतिभावंत कवीला राजबंदी करून नजरकैदेत ठेवले आणि स्वतःचा जीव गमावला .शत्रूदेशातील प्रगल्भ कवीने राजाच्या स्वार्थपरायणावर दीर्घ काव्य लिहिले होते . हातात कधी चिपळ्या कधी डफ घेऊन कवी दारोदार काव्य गात भिक्षा मागत असे .कवीची कीर्ती दूरवर पसरली .राजाने स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी कवीला बोलावणे धाडले .राजा हुशार साम दाम दंड भेद साऱ्या नीतीकला त्यास अवगत होत्या . राजाने प्रस्ताव मांडला माझ्यावर लिहिलेले काव्य जाळून टाक माझा स्तुतीगौरव करणारे काव्य लिही मी तुला धनाढय करेन तुला भिक्षा मागावी लागणार नाही . कवीने त्यास उत्तर दिले 'तुझ्या धनाच्या भिक्षेपेक्षाही मला अन्नाची भीक प्रिय आहे ,मला ठावूक आहे तू माझ्या उत्तराने मला बंदी करशील पण तुझे राज्य कैद करण्याची ताकद माझ्या काव्यात आहे ,बंदी झालाच तर तुझा तुरुंग होईल पण मी तुझे स्तुतीगौरव करणारे काव्य लिहिणार नाही .
घटनेचा क्रम कवीला सेनापतीला राजाला किंवा अन्य कुणालाही बदलता आला असता तर भविष्याचे चित्र वेगळे दिसले असते . पण पाण्यात पडलेले निर्जीव चेहरे झाडावरून ओघळणाऱ्या पानांनाही बांधता येत नाहीत . जे घटीत होते ते घडले कवी बंदी झाला सेनापतीने त्याला नजरकैदेत ठेवले . कवी त्याचे काव्य गात राहत असे त्याची शिक्षा त्याच्या पाठीवर चाबकाचे वळ उठवीत असत . अंधाराच्या खोलीत उजळून निघणारे त्याचे अनाथ पोरके शब्द तिच्यातल्या प्रेमाला हाकारत आहेत असे तिला वाटे . सेनापतीची शूर कन्या कवीवर पाळत ठेवण्याच्या आज्ञेला बांधील होती . न्याय वगळता तिला जगात कुणीही प्रिय नव्हते . कवीच्या जीवघेण्या सुरांनी तिचा छळ मांडला होता . याच छळातून सुदैवी कपट जन्माला आले . त्या दिवशी कवीच्या आर्त सुरांनी त्याला कुठल्या प्राचीन काळात ओढून घेतले होते त्याच गर्तात शूरकन्या बुडाली . कवीच्या पायाशी लोभ मिठी घालून रडू लागली . तिने तलवारीच्या धारधार पातीवरून अंगठा फिरवला आणि रक्ताचा टिळा कवीच्या मस्तकास लावला 'तुझी सुटका करेन ". तदनंतर कवीला सोडवून शूरकन्या निघाली कवीच्या पाठीत बाणाचे पूर लोटले शूर कन्येच्या छातीवर नाचरे तलवारीचे वादळ .सेनापतीचा घोडा मरून पडला सेनापतीचे धड कवीच्या तलवारीने शिरावेगळे झाले . ते शीर कवीला उद्देशून बोलत होते "तूझ्या काव्याने तू राज्य कैद करणार होतास पण तलवारीने माझे धड कापलेस ? हा कुठला न्याय ? मी तुझ्या शब्दांचा धनी नसलो तरीही गुलाम होतो . मरणोन्मुख माणूस खरा बोलतो हा कवीचा समज होता . कवीने त्याचे शीर धड एकत्र जोडले आणि कविता गाऊ लागला कवीच्या डोळ्यातले निर्मळ पाणी सेनापतीच्या डोळ्यात पडले . कवीच्या संजीवन शब्दांची राख सेनापतीच्या पुनर्जन्माचे अग्नीकण साधत राहिली . सेनापती जिवंत झाला तो आता कवीला ठार मारणार एवढ्यात शूर कन्येने या युद्ध यज्ञात उडी घेतली शूर कन्या सती गेली त्याचक्षणी सेनापतीही पुन्हा ठार झाला . कवी जोहार करून मरून गेला .
या पूर्वजन्मीच्या कथा त्याला जो तो ऐकवत असे म्हणून त्या कुळात काव्य निषिद्ध झाले होते . पण चंद्र बिलवर हृदय कडांना या सत्याचे कितीही लेप उगाळले तरी तो कवीच राहिला . घराण्याच्या पूर्ववंशाची गोष्ट तो उकलुन नुकलुन सांगत असे . तो पूर्वजांची गोष्ट प्रत्येकाला समजावून सांगतसे "कवीचे काव्य हे ज्ञानाचे प्रतीक आहे ,सेनापतीचे शौर्य हे कार्याचे तर शूर कन्या हे प्रीतीचे प्रतिक आहे जगण्याच्या या तीन पदरात एक पदर असून अदृश्य राहतो या अदृश्याच्या ध्यासापायीच माणसाला जगणे गवसत जाते हरवत जाते . मी तर मुळातच करुणेने भारलेला आहे . करुणादेवीच्या निद्रेत असताना एक अश्रू ओघळला त्याचा बालक झाला तोच रांगता जन्माला मी आलो .नदीकिनारी एका निपुत्रिक जोडप्याला मी सापडलो आहे .तुम्ही ज्या वंशाची गोष्ट सांगत आहात त्याचाच मी आदिपुरुष आहे माझ्या जन्मा नंतरचे अनेक जन्म मला स्मरत आहेत म्हणूनच मी उमजलेली गोष्ट पुन्हा सांगतो आहे . ज्ञान कर्म भक्ती या तीनही अवस्थापलीकडे असणारे संन्यस्थ क्षितीज मला बोलावते आहे . राजा केवळ सत्ताधीश मी आहे विश्वनियंता म्हणून मला सर्वस्व देणारे स्त्री हृदय तिच्या मधुर भक्तीने मला बोलावते आहे . कवीचे दीर्घ काव्य मला ऐकू येते आहे . इतके बोलून त्याने पूर्ववंश जन्म उलगडणाऱ्या स्वतः रचलेल्या काव्याची सांगता केली आणि तो वनाकडे चालता झाला . निर्मनुष्य तळ्याजवळ तो पाणी पिऊ लागला . या हालचाली श्वापदाच्या समजून मृगयेसाठी आलेल्या राजाने त्यास बाणाने घायाळ केले तो कवी संन्यासी पूर्वजन्मीचा सेनापती मरून पडला . आपल्याच शवाकडे त्याने करुणेने पाहिले आणि पुन्हा जन्माच्या काळ प्रतीक्षेत राहिला
--------कविता मोकाशी
No comments:
Post a Comment