मृत्यूची प्रेयसी
१
चालत येते आणि चालत जाते
मृत्यूची प्रेयसी मृत्यूला शोधण्यास्तव
तिच्या प्रियकराने तिला दिली आहे भेट
दोघांच्या दृढ अलिंगनाचे झाड
ते वचनस्थ झाड मोठे उंचपुरे होईल
तेव्हा त्याच झाडाखाली भेटणार आहे
तिला तिचा 'मृत्यू' प्रियकर
सखी उसवत राहते काजळाच्या डबीतले
अश्रू ओघळणारे काचमण्याचे प्रेम
सखा निघून गेला आहे निर्मनुष्य देशात
संन्यासाचा वेश धारण करून
२
तिच्या प्रियकर आहे भोळा
त्याला चढला आहे विस्मृतीचा ज्वर
या ज्वराने तो फणफणला आहे
त्याला पाहिजे आहे भाळावर हात
त्याच्या भयभीत प्रेयसीचा
विसरला आहे नाव गाव तिचे
खुणगाठीशी नाही त्याच्या
शंकुतलेसारखी एखादी अंगठी
अश्वत्थाम्यासारखी खोप
उपरे झाले आहे त्याचे अस्तित्वं
धूळभरल्या घरात निळ्या मनात
त्याला पाहिजे आहे वारा फुंकर
प्राण प्राणाला ओढणारा
प्रेयसीचे चुंबन
३
त्याला सापडला आहे विवस्त्र देह
तो नाही त्याच्या प्रेयसीचा
पण जळतो आहे त्याच्यासवे
जगण उडून गेलेले अत्तर
त्याच्या मनगटावर
त्या विवस्त्र देहाचे
आणि देवापुढे शांत कापूर
४
आलिंगनाचे वचनस्थ झाड
वाढलेच नाही प्रेयसीजवळ
झाडावर पक्षी आला उडून गेला
झाडाला गाणे सापडले
पक्ष्याला त्याचे प्रेम
झाड गात राहिले पक्ष्याचे गाणे
झाड जळून गेले पक्षी जळून गेला
झाड वाढलेच नाही प्रेयसीजवळ
अनवाणी पावलाने अनावृत देहाने
चालत येते आणि चालत जाते
मृत्यूची प्रेयसी मृत्यूला शोधण्यास्तव
-------कविता
No comments:
Post a Comment