Pages

Tuesday, 27 November 2012

प्रिय आभाळा


प्रिय आभाळा 

 

तुझे नाव गाव मला मुळीच ठावूक नाही .
तू माहित असूनही तुझा पत्ता  मला माहित नाही .
तरीही जीवाला तुझी लागणारी आदिम ओढ 
सुखाच्या शोधात फिरते आहे 
कि दुखाला गुणगुणते आहे ठावूक नाही . 

संध्याकाळच्या मंद तळाशी 
तुझ्याशी संवाद साधणारे ओंजळीतले निळे सोनेरी पाणी 
तुझी खुशाली मला नेहमी सांगते 
पण मी मेघाच्या कागदावरून लिहिलेल्या 
तरंगणाऱ्या ओळी तुला मिळतात का ? 
चांदण्याची अक्षर जमवून कधी वाचतोस का ? 
क्षितिजाच्या रेघेवर मी टेकलेले माझे ओठ 
तुला स्मरतात का ? 

असे किती किती सारे प्रश्न तुझ्यापुढ्यात टाकून 
मी उत्तरामागे धावते आहे . 
वाऱ्याची अलवार फुंकर 
तुझा गहिरा डोह हलवीत आहे .
सारे सारे तुला कळते आहे 
बासरीच्या सुरावर श्वासाचे संगीत व्हावे 

तसे तू दुरून चित्र काढतो आहेस 
सात सुराच्या लहरीमधून 
सात रंगाचे तरंग लहरत आहेत 
या क्षितिजापासून त्या क्षितीजापर्येंत .

तुझ्या आभाळहातानी तू दररोज हि संध्याकाळ 
जशी काल होती तशीच आज देतोस 
ओंजळीतून पाणी निसटावे 
तशी रोजच हि हुरहूर तू देतो आहेस 
त्याच ओंजळीत माझे अश्रू आले कि 
त्यावर चांदण्याची फुले ठेवून 
तू पांथस्थ होतो आहेस 

अश्रू पुसणारे हात तुझेच व्हावेत 
म्हणून जळत्या संध्याकाळच्या दिव्याशी 
माझेच हात धरते आहे 
सारे तुला उमजूनही न उमजाल्यासारखे 
कोणास ठावूक ?

मी देखील आता असेच आंधळे होवून 
ठेचकाळत राहायचे ठरवले आहे 
जिथवर तू जाशील तिथवर 


-------तुझी आभाळ सावली  (कविता )

No comments:

Post a Comment