क्षितीजदिवा
स्वप्नामागून येणाऱ्या सावल्या कुठेतरी हृदयाच्या आडोशाला उभ्या झाल्या सारख्या वाटत आहेत . अन मग वाटत तो दाराआड लपला आहे किंवा माझ्याच पाठमोरी आकृतीकडे निहाळत आहे .त्याचे डोळे नेहमी माझ्या बंद डोळ्यानाही जाणवतात जणू त्याचा श्वास अलगद जपून येतो आहे मोरपिसासारखा .विस्मृतीला चिन्ह नसत हे अधिक कटू सत्य .आज अमावस्या आहे चंद्र आभाळात येणार नाही आणि पापणीच्या अर्धरेषेत तो लपणारही नाही . दर अमावास्येला क्षितिजाचा अर्धचंद्र पाहून सुखावते . दूरवर हक्काने जळणारा दिवा दिसला कि काळजावर आलेली काजळी देखील अलगद बाजूला सरकते . पण रात्र थोडी निष्ठुर होवूनच येते . जगवत नाही मारत नाही . मंगळसूत्राचे काळे मणी हिरावून घेईल इतक्या भीतीचा फक्त कडेलोट करत राहते . मी देखील तिच्यापुढे हार मानणारी नाही . तिच्या सर्वंकष अनुभूतीचा साक्षात्कार मला ठावूक आहे . ती खिडकीबाहेरच्या समुद्राला देखील असाच ओढण्याचा प्रयत्न करते निर्जीव किनारा त्याला जाऊ देत नाही . मी देखील मंगळसूत्र तिला घाबरून काढणार नाही . उलटपक्षी आज मी तिला आव्हानच केलंय माझ्याशी लढण्याच . वेणीमोकळे केस आणि गंधमोकळे फुल मी चढवले आहे . भांगेत कुंकू भरणारा रेशीम किरण आल्याखेरीच मी द्रौपदीचे केस बांधणारही नाही . रात्र माझी वैरीण आहे अस नाही पण काळाच्या बदलत्या अंतराने तिला माझ्यापासून दूर केल आहे . मी आजही तिची क्षमा मागायला तयार आहे पण ती आहे आंधळी अन बहिरी . तिच्या काळोखाचे दुख तिला ठावूक आणि माझ्या उन्हाचे दुख मला ठावूक . टेबलावरची कवितांच्या कागदाची राख त्याच उन्हाने जळून गेली . त्याच्याशिवाय नखशिखांत आज नटले त्याच्याच आठवणीत त्याच्याशिवाय रमणार तरी कसे ?अन चांदण्याची आरास करून आरशापुढे जाऊन उभी राहिले . विज्ञानाचे नियम विसरलेच माझ्या कवितांचे कागद आणि त्याचा आरसा यावर मी धरलेलं विराणीच उन्ह कागद जळत राहील त्याचीच ती राख टेबलावर . एक फुंकर मारली तर उडून जाईल . मी ती जपणार आहे . तिचे मी काय करेन मला नाही माहित आजच्या दिवशी तरी मला ती टाकून द्यावीशी नाही वाटत . कारण त्या कागदावर लिहिलेल्या स्पष्ट ओळी आठवत आहेत
पाऊस झडतो पाचोळा उडतो
मोत्याच्या दिवा पाण्यात जळतो
तडकते सावली तडकते बिंब
उन आले घरी पाऊस दारात चिंब
पाऊस दारातच आहे तसे ठीकच . मागे एकदा अत्तरथेंब चुरगाळनारा स्पर्श मी अनुभवला होता अन कापऱ्या देहात निळे काजवे उतरले होते . जणू कात टाकलेल्या सर्पिणीला तिच्याच विषाने तिला हलके हलके मरण देत जावे . तो ओलेता स्पर्श ओला गंध त्याचा न संपणारा हृदय प्रवास तरीही ओढ लावणारा त्याचा दुरावलेला सहवास नकोच पाऊस दारात आहे तसे ठीकच . पण त्याचा संदेश मला ऐकायला हवा तो आज कोणती गोष्ट सांगेल कि अनवट राग गाईल ते ऐकायला हवे . कारण तो आवाज फक्त पाण्याचा नाही पावसाचा आहे . हळव्या मिठीत येणाऱ्या भांबावल्या क्षणाचा आहे .पण आज पाऊस मोठा गंभीर वाटतो आहे .वठलेल्या झाडासारखा गंभीर तितकाच एकटा .कदाचित तो दुखी आहे असेच सांगतो आहे हा पाऊस कि माझ्याच मनाचे हे खेळ . नाही नाही हा खेळ नाही . वारयाचे अबोल आवाज थांबले आहेत . झाडा पानावर निथळनारी जाणीव ते ओलेपण ते रितेपण काहीच साठत नाही सार काही पुरात वाहून जाते आहे . तो दुखी आहे . मी मघाशीपासून अनुभवते आहे ते केवळ त्याच्याच दुखाचे प्रतिबिंब .प्रतिमा आभासही असते माझे दुख या चांदण्यासोबत आभाळात विरून जाईल त्याचे दुख काय सांगते आहे . मला ऐकायला हवा पावसाचा आवाज त्याचा खर्जातला षडज. तानप्रवाही वीजीची गती झेप घेते आहे . त्या मागे उरणारा सूर तसाच घुमत राहील कितीतरी वेळ . पाऊस एकटाच बोलतो आहे त्याला माझा आवाज ऐकू नाही येत . माझे हुंदके उसासे त्याला नाही कळत . मी वाट पाहते आहे पावसाच्या खांद्यावर धीराचा हात ठेवण्याची .आता पाण्यात पडणारे माझे स्वप्न मी पुसून टाकले आहे तसेच त्याचे दुख इथूनच मला पुसायचे आहे .पावसा माझ्या कवितेच्या पानाची कागदी होडी वल्हव आणि जा जाऊन सांग त्याला .....
फिरून वेदनांना अंती
जगणे मरणे तुझ्यात
विरले आहेत सूर मागे
विरले चांदणे नभात
आजची काजळपाणी गोठवणारी रात्र त्याचीही आहे आणि माझीही . म्हणून संदेश पावसाकडून पाठवला अन्यथा त्याला मी फोन केला असता लगेच . त्याच्या ठायी वाळवंट आहे पण चंद्रभागा नाही पताका आहे पण वीणा नाही जयघोष आहे पण टाळ नाही त्याच्या हाती आहे ती बंदूक आणि सरहद्द .देशा देशाने आखलेल्या सीमारेषा पार करून मी त्याच्या माझ्या नात्यासाठी एखाद नव क्षितीज शोधण्याच स्वप्न तरी कस पाहू ? रक्षण करणाऱ्या किनार्यानेच ठरवलं समुद्र जीवानिशी ओढून आणायचा तर प्रलयाचे दुसरे नाव आणखीन काय असेल . आज मी तुझ्या कर्तव्याचे अधिष्ठान बाजूला सारून फक्त मला पाहत राहिले तुरुंगाच्या दोन दिसणार्या सळ्या फक्त मला दिसल्या अन वाटले मीच भोगते आहे कारावास त्यापलीकडचा तुझा चेहरा दिसलाच नाही असावे भरून गेली डोळ्यात . जे तुझ आहे ते माझ विसरून गेले . आपल्या जन्मखुणा वेगळ्या असल्या तरी मरणखुणा एकाच आहेत हि मी घेतलेली शपथ देखील विसरले .तुझी खूप मोठी गुन्हेगार ठरेन मी या गुन्हाचे धागेदोरे सकाळच्या रेशीम किरणा आधीच पुसले पाहिजेत कारण गुन्हा मी कबूल केला तरी गुन्हेगार तू स्वतःला ठरवशील . न्याय आंधळा असतो हे हि तितकेच खरे .नदीबदलाच्या प्रवाहाने बदलेली गावे आता स्थिर दिसत आहेत .तुझ्या नावाची ठुशी नथ जोडावी एखाद्या पवित्र मंदिरासारखी वाटते आहे . अन माझ्या नावापुढे तुझे जोडलेले नाव म्हणजे माझी न संपणारी उदंड आयुष्याची संपती वाटते आहे . कारण का ठावूक आहे प्रेमाचेच दुसरे नाव समर्पण आहे हे तुझ्यातल्या सैनिकानेच मला शिकवले आहे . विजयाचे प्रतिक घेवून पूर्व रथावर स्वार झालेला अरुण देखील मला हेच सांगत आहे . अमावास्येच्या अंधारानंतर आलेली प्रकाशाची वाट मला दैदिप्यमान तेजाकडे नेत आहे . तुझ्या ध्येयाकडे तुझ्या आकांक्षांकडे ......
गर्भाळले तेज
प्रकाश चाहूल
आत्म्यास भूल
माझी असे
-----कविता मोकाशी
No comments:
Post a Comment