Pages

Monday, 7 January 2013

रूप ,अरूप आणि कैवल्य


रूप ,अरूप आणि कैवल्य



आठवणी चार अक्षरी शब्द कुठेही ऐकला ,पाहिला कि पहिल्यांदा आठवते ते माझे आजोळ . दूर डोंगर वस्ती सोडून एका पठारावर छोट्याश्या तळ्याकाठी वसलेलं एक पिटुकले आणि धीटूकले खेडे . हे खेडे पिटुकले तर होतेच ,अंदाजे २०० घरांचे पण धीटूकले का म्हणाले याची गोष्ट पुढे ओघाने येतेच आहे . तर या गावाला वस्ती विशेष नव्हती तशीच तुरळक तुरळक झाडे अगदी माणसासारखी . पण माझ्या आजोळच्या परसूदारी मात्र खूप सारी बकुळ सोनटक्का जास्वंद स्वस्तिक कर्दळ गुलाब तगारी अशी फुलझाडे होती शिवाय जाईचा मांडव ,मोगऱ्याचा ताटवा देखील होता .या फुलांना देखण्या स्त्रियांना शोभावे तशी काही उंच झाडे होती ,नारळाचे जांभळाचे पेरूचे आवळ्याचे गोरख चिंचेचे . यापैकी जांभळाचे झाड आजोबांच्या वयाचे होते . आजोबा जन्माला आल्यावर त्यांच्या आईने ते झाड लावले असल्याची गोष्ट ते नेहमी सांगत . जांभूळ आवळा चिंच असली झाडे परसात अजिबात असू नयेत त्याने आमवाताचा त्रास वाढतो असे आजीचे बौद्धिक आजोबासोबत चालायचे पण या पैकी एकही झाड तोडायचे नाही अशा विजयी वाक्याने आजोबा आजीची वाक्ये परतवून लावायचे . ही सगळी झाडे म्हणजे माणसे असल्याचा ठाम विश्वास आजोबांना असायचा ते त्यांना पाठीराखे म्हणायचे  . आजीच्या या परसूत अजून दोन लळा लावणाऱ्या गोष्टी होत्या पहिली म्हणजे तुळस आणि दुसरी म्हणजे काळ्या डगल्याचा कोट घातलेली म्हैस . आजोबांचा जितका झाडावर जीव आजीचा तितका या म्हशीवर .तिची रोज न चुकता तिन्हीसांजेच्या आत आजी धार काढायची आणि ती पट्ठी देखील तशीच आज्जीशिवाय कोणाकडून धार काढून घेत नसे . या दोघींनी एकमेकींवर फार फार लळा लावला होता . एका वसुबारस सणाला मी आजोळी होते तेव्हा भल्या पहाटे आज्जीने तिला आरतीने ओवाळलेले आठवते . मी तेव्हा म्हणाले  होते अग आजी आज गायीला आणि वासराला ओवाळतात तू हिला का म्हणून ओवाळते . आजी म्हणाली असू दे गुणाची आहे माझी पोर ती . त्या म्हशीच्या मोठ्या डोळ्याकडे पाहून आजीने तिला मनभर कुरवाळले .तर हि झाली परसूदाराची कथा

.....परसूदारापुढे स्वैपाकघर त्याच्यावर जोथा माजघर मग सोपा तिथे कर कर आवाज करणारा लाकडी झोपाळा त्यापुढे पडवी आणि पुन्हा अंगण अशी भली घराची आगगाडी होती . या वाड्याच्या तटबंदीला मोठा बुरुज होता . तो शिवकालीन असल्याचे आजोबा सांगत त्यामुळे असे ते पिटुकले असणारे माझे आजोळ धीटूकले देखील होते . आणि आजोबांचा वाडा जुन्या बांधणीचा हाळ मातीचा होता .
या घरात लंपडाव खेळायला खूप मज्जा यायची . जिन्याखाली जोथ्याखाली वरच्या माडीत पडवीत एक ना अनेक ठिकाणे आम्ही सारे नातवंड मिळून इथे खेळायचो . दुपारच्यावेळी आजीच्या कापूसवेळा व्हायच्या ती तीच्या वाती फुलवाती करत करत आमच्या खेळात यायची मग बैठे खेळ सुरु व्हायचे काचाकवडी ,पगडीपट्ट , पत्ते ,आमचे पत्यातले खेळ आम्ही आजीला शिकवायचो आजी पगडीपट्ट कसा खेळायचा ते शिकवायची मग त्यातूनच शंकर पार्वती हा डाव खेळताना पार्वती हरते आणि रुसून जाते हि गोष्ट आख्यायिका आजी पुन्हा पुन्हा सांगायची . यावेळी आजोबा मात्र शेतातून आलेल्या शेंगाचे पोते सोडवून त्यातला शेंगा सोलत . त्यांनी सोललेल्या शेंगात खाण्यासाठी हात घातला कि आधी आजोबांचा मार खावा लागे मग हळूच पोत्यातल्या शेंगा काढून देत आणि म्हणत "हं आपल आपण सोलुन घ्या आणि खावा वाटेल तेवढ "

आजोळची पहाट घरापुढे असणाऱ्या सिद्धेश्वरच्या मंदिरातल्या आरतीच्या सुंदर कवनाने व्हायची . चढ्या आवाजातील सूर ब्रम्हावर ध्यानस्थ असणारा देवळातला औदुंबर वृक्ष त्याच्यावर येणाऱ्या सोनेरी किरणामुळे जटा असणाऱ्या एखाद्या हटयोगी वाटायचा . त्याच्या आजूबाजूला पडलेली उंबर रुद्राक्षासारखी वाटायची . मग आजोबा आणि आम्ही सारे नातवंडे मिळून या देवदर्शनाला दररोज पहाटे जायचो. मग तिथले एखादे वयस्कर जुने गृहस्थ  आमच्यापैकी एकाच नाक कान धरून चिंगीची लेक काय तू आणि हा पिंकीचा वाटत ....तुमची आई तुमच्यापेक्षा लहान होती तेव्हापासून यायची या मंदिरात अशा सुराचे काही धाकाचे अधिकाराचे संवाद व्हायचे . त्यापूर्वी पाणी भरणे हा एक रोजचा उद्योग तिथे करावा लागे . तांब्या पितळेच्या जड जड घागरी घेऊन अर्धा किलोमीटर जावे आणि यावे लागे . घरापुढे आणि पाठीमागे अशा दोन विहरी होत्या पण दोन्ही विहरी ओस ...इतकेच काय आजूबाजूच्या कोणत्याच वाड्यात विहीर असून पाणी न्हवते साऱ्या कोरड्या ठणठणीत . आजी म्हण्याची चार दिवस चार रात्र अखंड पाऊस पडला तर या दोन्ही विहरीना पाणी येईल . अशा प्रकारे रोज पाणी भरायचा व्याप आजीला व्यापून असायचा . आम्ही सारी नातवंडे मिळून छोट्या किटल्या छोट्या बरण्या घेऊन जाऊन आजीला मदत करायचो .पहाटे सहावाजता हा कार्यक्रम सुरु होई आणि सात वाजता संपे या साऱ्याला सोबत आजोबांचा रेडीओ असे महिषासुरमर्दिनी स्त्रोत्राचे रेडिओचे सूर ऐकून बाहेर पडू तोवर बाहेर मंदिरातली कवने ऐकू येत . या शांत वातावरणात कुणीच कोणाशी फारसे बोलत नसे . हा सारा सात वाजता कार्यक्रम संपला कि आजी न्हाहारीच्या तयारीला लागे आणि आजोबा देवपूजेसाठी परसातून फुले घेवून येत . न्हाहारीला गरम गरम धिरडी आणि सोलकढी बहुतेकवेळा आजीचा ठरलेला मेनू असायचा . आजीच्या स्वैपाकघरातल्या शिंकाळ्याचे मला आणि शेजारच्या मनी माऊला दोघांना आकर्षण वाटायचे . मनीला त्यावरच्या दुधाचे असायचे मला मात्र ते शिंकाळे आवडायचे .स्टूलवर चढून त्याला लोंबकळाचे आणि आजीच्या हातचा एक धपाटा खावा लागे . इतक सारे असले तरी सुट्टी सुट्टी सारखी नसायची . न्हाहारीनंतर आजोबांच्या सोप्यात पाखरांची शाळा भरायची . पाढे शुद्धलेखन बारा महिने सात वार सहा ऋतू सत्तावीस नक्षत्रे सारे म्हणाल्याशिवाय आजोबाच्या शाळेची घंटा वाजायची नाही . आणि हा वर्ग संपला कि आजीचा होम सायन्स तास सुरु व्हायचा एकीला ताक घुसळायला लावायची ,एकीला तांदूळ निवडायला द्यायची ,आम्हीं लहान आहोत ना आज्जी किती काम लावतेस आम्हाला असे तक्रारीचे सूर आम्ही लावले कि तुमच्या आयांना या सगळा स्वैपाक शिकावला होता मी ....पोरीच्या जातीला स्वैय्पाक आलाच पाहीजे असे म्हणत तिचे भाकरीचे पीठ मळणे चालू रहायचे . सोप्यातून आजोबा आत येत आणि गाण्यातल्या सुरात आम्हा सगळ्या मुलींना म्हणत "आजीच्या कामाला मदत करा ....ताक घुसळून लोणी काढा " आणि मग हळूच शब्दकोडे सोडवलेल्या पेपरमध्ये कुठेही आमच्यापैकी आमच्या गावांपैकी कुणाचे नावं आले असेल तर त्याला निळ्या पेनाने कंस करून ठेवत आणि आम्हाला दाखवत ....जसे कि मिरज येथे कविता वाचनाचा कार्यक्रम संपन्न अशी बातमी असेल तर कविता आणि मिरज अशा दोन्ही शब्दांना निळे कंस ....त्यांना याची भारी गंमत वाटे आणि आम्हाला आनंद .....त्यांना याची भारी गंमत वाटे आणि आम्हाला आनंद ....आलेली पत्र त्यातील आवडलेले मजकूर ...आवडत्या पुस्तकातील आवडते वाक्य ...उखाणे कोडी सुविचार सार काही आजोबांनी एका डायरीत जपून ठेवले होते ...आम्हा छोट्या मुलांना ती वाचायला देखील देत भारी मज्जा वाटत असे .....आजी चेष्टेने म्हणे तुमच्या आजोबांची प्रोप्रटी म्हणजे कागद आणि पेन ....


यानंतर मात्र आजीच्या सुग्रास जेवणाची घाई होई . तिचे फुलपात्र वाटका असे गमतीशीर शब्द ऐकून हसायला येई तेव्हा . भरलेले वांग ,भरलेली मिरची दहीभात खमंग पिटले ,ताक मट्टा रसभरीत जेवणाने आमची पंगत बसे सगळ्यात शेवटी एकटी आजी बसे तिला आजोबा आम्ही सगळे मिळून वाढत . जेवल्यावर सारे खरकटे उष्टे सावडून घेवून शेणाने रोज जमीन सारवायची ....ई आज्जी शेणाचा किती वास येतो ...कसा हात लावतीस तू ...वात्रट कार्ट्या मेल्या म्हणून आम्हा सगळ्या पोरीना हुसकून लावत . मग आजीकडे भांडी धुणी करायला एक वयस्कर "फुला आजी " यायची ....राखेने एकेक भांडी लखलख उजळून टाकायची ...आजी तिच्याशी गप्पा मारत परसात बसून रहायची ...आम्ही पण आजीच्या मागे मागे ...इतक्यात रोज एक मोर अंगणात यायचा ...आजी म्हणायची वरच्या माडीत कांदे वाळत टाकलेत त्याच्या वासाने येतात म्हणे मोर ....अचानक असा मोराला पाहून भीती आनंद कुतुहूल सारे सारे एकवटून यायचे तो मोर थोडया वेळाने निघून जायचा त्याची पडलेली पीस आजी गोळा करायची आणि सगळ्यांना एकेक वाटायची . हि पीस तुमच्या वहीत जपून ठेवा याचा डोळा नंतर मोठा होतो बर . बकुळीची जुईची पडलेली फुल आणि तशात हि मखमली मोरपीस सार वातावरण कस आजोबांच्या डायरीतल्या कवितासारखे काव्यात्मक वाटू लागायचे .आजी दुपारी जेवण आटोपली कि जात्यावर दळायची कोणत्या ओव्या वैगरे गायची नाही पण तो जात्याचा दगडी षडज हुंकार तो देखील एखाद्या ओवीपेक्षा कमी नव्हता . मग तिन्हीसांजेपर्येंत पुन्हा तिच्या फुलवाती आमचे खेळ सुरु व्हायचे . या खेळानंतर लाकडी झोपाळ्यावर बसून जोरजोरात हिंदी चित्रपटातली गाणी सुरु होत ....आमची गाणी ऐकून आजोबा म्हणत यां घरातल्या तुळई कडेपाट कौल साऱ्यांना गाण येत ....तुमच्या आया पण तशाच तुम्ही पोर पण तशीच ....एवढ्यात एक सोंगवाला ,माकड मदारी किंवा अस्वलवाला यायचा ...त्यांना पाहून पटकन आम्ही आजोबांच्या मागे लपायचो ...आजोबा सांगायचे अरे घाबरू नका ...ते बघा पैसे टाकल्यावर माकड कसे नाचते .....भीती कुठल्या कुठे पळून जायची ....

संध्याकाळी मात्र खूप उदास उदास वाटायला लागायचे . जमिनीवर आकाशात दोन्हीकडे नुसती लाल धूळ दिसायची ...ट्यूबलाईटचा शुभ्र उजेड तिथे नसायचा ....पिवळ्या जड बल्बच्या उजेडात फार उदास उदास वाटू लागे कधी कधी आईची आठवण येते आहे असे वाटायचे ...असे काही आजीच्या कानावर घातले ...उदास वाटते आहे वैगरे ती चटकन मीठ मोहरीची दृष्ट ओवाळून टाकत असे आणि साऱ्या एका सुरात रामरक्षा म्हणायला बसवे ....त्याचवेळी मस्त कुरडया पापड सांडगे याच्या वासाचा सुगावा लागल्याने राम रक्षेचा वेग वाढत वाढत जाई ...   आणि रात्रीच्या चांदणी भोजनाची तयारी चालू होई ....कोण चोर घास खाताना पकडेल तो राजा होई आणि त्याच्या आज्ञेने गाण्याच्या गावाच्या नावाच्या भेंड्या सुरु होत ....चांदण्याच्या मंद उजेडासारखा अख्खा दिवस मंद होवून जाई .....आणि चांदण्यानच मोगऱ्याचा सुगंध आल्यासारखा भास होई ....दिवसभर पळून पळून दमलेले हात पाय हळूच अंथरुणाची रजई ओढत ....मग आजोबा त्यांच्या आवाजात दोन अंगाई गीत ...."पत्र लिहितो तुजला ...पत्ता तुझा ठाऊक नाही ग ...." आणि "गुणी बाळ असा" ही अंगाई गात थोपटत प्रत्येकाला निजवत ,.....यातून कुणी अंथरुणातून उठली की म्हणत "ते बघा त्या बाहुलीला स्प्रिंग बसवली आहे ...झोपवल कि उठून बसते ...खूप वेळ हशा पिकायचा ...आणि हसत हसतच आम्ही सगळे निजून जायचो .....पहाटे रोज येणारा वासुदेव कानाशी पावा वाजवत रहायचा ....

हाळ मातीच्या घरातल्या भिंतीवर शिंतोडे उडवावेत आणि मातीचा गंध मनभर पसरत जावा ....तसे काहीसे आजोळच्या बालपणीच्या आठवणीने होते ...आणि मग मी वहीत दडवलेली मोरपीस मोठी झाली आहेत का ? ते पहात राहते ....मग कधी मन सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन बसते ...कधी सोप्यातल्या लाकडी झोपाळ्यावर बसते ...अंगण माडी सोपा अंधारी माजघर सार साऱ्यात मन गुंतत राहते ...सोप्यात आजीने भरतकाम केलेला ध्यानस्थ बुद्ध दिसतो   ....मग आजी आजोबा या जगात नसल्याची उणीव खंत भरू येऊ पाहते .....आणि पुन्हा पुन्हा आठवणींच्या दिशेने मन वेगाने धावू लागते .....या साऱ्याच गोष्टीना रूप अरूप या पलीकडे कैवल्याचे तेज असल्याची साक्ष ....आठवणीत विरघळले अश्रुंचे चांदणे देत राहते ....आठवणी म्हंटल कि फक्त आजोळ हा शब्द आठवतो



--------कविता मोकाशी

No comments:

Post a Comment