Pages

Monday, 16 July 2012

सांज संध्या

सांज संध्या 



पानात लपला ग सूर्य कोवळा 
उजळला चंद्र भाबडा भाबडा 
परसुदारी कोण ग आली बाई 
सायंकाळी आरवतो कोंबडा 

ये ग ये ग माझी माय माऊली 
नेसवू तुला कोणती सावली ?
रंगउधळण माझ्या अंगणदारी 
बिलवर पाटल्या सोनसोनेरी 

अशी कशी आज आलीस माय 
थबकला माझा उन्हात पाय 
लोळते सुख माझ्या संसारात 
दुख धाकटे होते आभाळात 

पती आहे माझा ग लेकुरवाळा 
लावतो मेघाचे भस्म कपाळा 
बैसला ध्यानस्थ लेवून शेला 
शिरी त्याच्याच रवी लोपला 

उंबर्यात माझ्या ग नक्षत्रथवा
चिवचिव पाखरे रोज खेळ नवा 
हळूच भुरकन उडते आकाश
तुझी आठवण येते सावकाश 

नको करू काळजी जा तू माय 
दुधावरी करपून जाईल साय 
संध्या सरली झाली ग रात्र 
संधिप्रकाश अजून आहे मात्र 




----कविता

No comments:

Post a Comment