Pages

Monday, 16 July 2012

कुठे हलकीच सर

कुठे हलकीच सर



कुठे हलकीच सर तुझे दूर घर 
घे घे सखे जपून थोडासा पदर 
डोंगर मेघाचे डवरते तुझ्यात 
थेंबथेंब पावसास लागे निवांत

चिंब चिंब पान झुलवते रान 
शहारयास आले अलगद भान 
थर थर पापणी भुवई कमान 
झुकले अंबर क्षितीज उधाण 

कशी झरे माती आभाळ नाती 
अंग अंग झाली गवताची पाती
निळाईत तुझ्या तूच वेल्हाळ 
हुळहुळ पैंजणात श्रावणमाळ 

गार गार वाऱ्यावर येते लहर
कधी कुठे गुंजारव करती भ्रमर ? 
टप टप टपोरा नदीस ग भर 
तुझ्या काळीजात कोण मनभर ?

गर्द गर्द घनात मिटले आभाळ 
काळ्याभोर वनात पावले दुधाळ 
भेट भेट तुझी सारतो दूर क्षण
जन्म घेते नव्याने तुझ्यात मन 

नकोनको इतक्यात नकोच जाऊस 
खेळु दोघे जरासा पाऊस पाऊस 
कशीकशी आभाळाने बदलली कूस 
तुझ्या गावी अजून पडतो पाऊस





......कविता

No comments:

Post a Comment