Pages

Monday, 16 July 2012

पारिजात

पारिजात 




बहरला मंद मंद 
पारिजात तुझ्या अंगणी 
तेवती त्यात चांदण्यांच्या ज्योती 
बघ मी घेवून आले तुझ्यासाठी 
ओंजळीतल्या मोगरीची 
......अतूट प्रीती .........!!

तुझ्याचसाठी ....तुझ्यासाठीच .....
ल्याले मी चंद्राच्याही अंगकळा 
लोपल्या हलकेच तेव्हा 
अबोलीच्या अबोल कळ्या 
नेसले इंद्रधनू मी अन 
जगून गेले तुझी सांजछाया 
गर्द गर्द सावलीत 
तुझी काळी माया .......!!

तुझ्यासवे आता 
जाहले रे मी बेभान 
जागवित गेले मधुगंधाचे रान 
कुजबुजणारी पाखरे 
चाहुलीचे पान पान 
हृदयातून ओसांडले 
यमुनेचे पूर 
अंतरी तुझ्या मी चूर चूर .......!!

अशीच अशीच मी 
तुझ्यात होत गेले अथांग 
उफाणलेल्या लाटा साऱ्या 
परतीची नव्हती वाट

जशी होते आले तशीच राहिले 
तुझ्या परसात ......!! 
तू फुलविलेस विश्वाचे अंगण 
.......अन मी झाले ....
तुझ्या दारीचा ..... 
पारिजात .....पारिजात .........!




----कविता

No comments:

Post a Comment