Pages

Monday, 16 July 2012

जोगिया

जोगिया

पुरीयेचा षडज कुण्या
गंधर्वाने लावला होता
संध्येच्या नेत्रात
कुण्या यक्षाने
दीपमाळ ठेवीत
दीप विनवला होता .....

अन माझा जीव
निरांजनाच्या वातीत
त्याच्यासाठी
घुटमळत होता .....
तो येणार होता
खरच तो येणार होता...

चांदण्यांना शिंपाया
चाफ्याशी बोलाया
वाऱ्यासवे डोलाया
माझा मल्हार ...
येणार होता ..
आणि तो आला

सखे तो आला
माझा मल्हार आला
हाय कानडा घेवून
अडाणा आळवीत आला ....
तो अनाम अडाणा झाला

मल्हार अंबरातच होता
पण तो आला होता
सये तो आला होता
नयनांच्या कोंदणात
मृगाचा तुषार होवून
तो आला होता सखे

बघ तो आला होता
कुण्या किन्नराने
माझ्या विणेवरी आता
जोगिया आळवला होता
जोगिया जोगिया जोगिया


-----कविता

No comments:

Post a Comment