Pages

Tuesday, 28 October 2014

कर्मकहाणी

कर्मकहाणी


तिच्या विचारांच्या साम्राज्यात
आला आहे पारधी
पारध्याच्या हातात आहेत पिंजरे
पिंजरयात आहेत
त्याने पकडलेली सावज ,
हरेक सावजाच्या आहेत
कर्मकहाण्या

प्रतिभेच्या कोकिळेला
ठाऊक नाही तिचे घरदार
म्हणूनच की काय ठाऊक
सुराला दैवीपणाचे
'कोंदण आकाश'  
तिच्या अस्तित्वाचा असतो
अज्ञात प्रवास
ती प्रतिभेला पोहोचते
तेव्हा होते 'कोकिळा '

कल्पनेच्या गरुडाला
जुना आकाशदेह विटंबला आहे
त्याला पाहिजे आहे
निर्वात करणारे नवे वादळ
नव्या वादळाआधी त्याला विस्मृती
जेथ जेथ विस्मृती तेथ नवा जन्म

आठवणींच्या घारीला
सापडते राहते नेहमी नवे आकाश
पोटीची नवजात अर्भके
जन्म घेऊ देत नाहीत तिला
जन्मभर घार हिंडत राहते
आठवणींच्या संसारात
संसाराच्या आकाशात

स्वप्नांचा मोर फुलतो
नाचत राहतो दिशांच्या अंगणात
काळाची लय देखील
बांधू शकत नाही त्याचे नर्तन
स्वप्नांचे उन सुरेख सुंदर असते
स्वप्नांच्या सावल्या कुरूप असतात
उन सावल्याच्या खेळात रडतो मोर  
पण नाचत राहतो स्वप्नांचा मोर
जोपर्येत त्याला दिसणार नाही  
त्याचे दृष्टीचे आंधळेपण  

इच्छांची फुलपाखरे
उडतात जगतात आणि मरतात
त्यांचा आहे पुनर्जन्मावर विश्वास
ब्रम्हदेवाकडे मागतात जन्मवेणा
त्यांची सूरवंटे होतात कोशातून

सुखदुखाची कबुतरे
समागम करत राहतात
जन्मणारे कुणीच नाही
विश्वमौनाच्या यज्ञात
दोघांच्या होतात समिधा
उग्र शिळारसाच्या वाफेने

बुद्धीचा ससाणा विवेकाचा हंस
सारेच रमले आहेत
सहा महिने दिवस सहा महिने रात्र
असणाऱ्या शुभ्र निळ्या
काजवेपणात प्रदेशात
अस्वस्थतेचे घुबड पाहते  
रात्ररात्र यांच्या जगण्याला
घुत्कार करते घुं घुं ऐकू जात नाही
अरण्यातल्या बहिऱ्या कानांना
पेटत जातो झाडातून वणवा
हंस ससाण्याचे सांगाडे सापडतात
त्यांचे देह जमिनीखाली खोल
शोध घेत सनातन शुभ्रपणाचा  
सहा महिने दिवस सहा महिने रात्र

ती ऐकते पारध्याकडून
प्रत्येकाच्या कर्मकहाण्या
तिला विकत घ्यायचे आहे
पिंजर्यातील पक्षांना
पारध्याच्या मनात काही वेगळेच
तो शिकवतो तिला
देहरुपांतरणाच्या कला
आता कधी ती गरुड होते
कधी मोर कधी घार

आता पारधी ऐकवतो
तिची कर्म कहाणी  
ती आहे फिनिक्स पक्षी
जन्मते जगते मरते जन्मते
पारधीच्या कहाणी पिंजऱ्यात
अखंड अविरत चालू आहे
तिची कर्मकहाणी
तिच्या विचारांच्या साम्राज्यात


------कविता

No comments:

Post a Comment