Pages

Wednesday, 8 October 2014

उतू नको मातु नको

कवितेइतकाच मला आवडणारा आणि जिव्हाळ्याचा साहित्य प्रकार म्हणजे कथा . कधी कधी मला वाटते  माणसाच अवघ भावविश्व कथेशी बांधले गेले आहे . लहानपणात चिऊ काऊच्या घासाबरोबर ऐकलेल्या परीकथा ,इसापनीती ,रामायण महाभारतल्या कथा हा क्षण आयुष्याच्या कितीतरी क्षणाची परीघ साकारत असतो . या कथा ऐकताना वाटते या कथांनी आपल्या मनावर पाण्याची ओंजळ धरली आहे आणि ती कधी रिती होतच नाही कारण भूतकाळातच संपलेल्या वाळूच घड्याळ मी अश्यावेळी उलट करून ठेवते खरोखर कथा ही वैश्विक आहे ,प्राचीनाच्या सृष्टीतली सारी गूढ रहस्ये कथेनेच उलगडली आहेत . बुद्धदेवांच्या आयुष्याला शिकवणीला आणि कार्याला या कथेने भारून टाकले आहे . ग्रीक पुराणे ,बायबल एक ना अनेक तत्वज्ञानाच्या पायथ्याशी ती आपले अस्तित्व व्यापून उभी आहे . मला कथेइतकीच कथेतील पात्रे मनात दीर्घकाळ रेंगाळणारी असतात . कथा आणि त्यातली पात्रे म्हणजे एकाचवेळी सात आठ खडे हवेतून उचलून टाकणारी सागरगोटे खेळणारी मुलगी दिसते . कादंबरीतल्या पात्रापेक्षाही कथेतली पात्रे लळा लावतात . कथेतली पात्र सहज आपलीशी होतात तर कादंबरीतील पात्रे आपल्याला ओढून दूर घेऊन जातात . त्यांच्या लाटांवर आपण आरूढ होतो पण समुद्र जितक्या वेगाने आपलेसे करतो त्याच वेगाने दूर नेऊन एकटेसे फेकून देतो तसे काहीसे कादंबरीतल्या पात्रामध्ये होते . मला कथा खरोखर खूप जिव्हाळयाची वाटते आईसारखे प्रेमाने हात कुरवाळणार्या सावलीसारखी भासते . आजीने रामायण सांगताना राम वनवासात गेला म्हणून रडलेली मी आठवते ,रत्नाकर मतकरींच्या कथेने भरदुपारी टाकलेली गूढता आठवते . हातात धरलेले पुस्तक न ठेवता येणारी शिरवळकरांच्या कथेतली उत्कटता आठवते . जी ए कुलकर्णीच्या कथेतली ग्रे शेड भाऊ पाध्येंच्या कथेतला लाल रंग दि बा मोकांशीच्या कथेतील तरलता मनाच्या साऱ्या दिशा या कथा व्यापून टाकतात मग मी प्रत्येक कथेचा फेर धरून नाचू लागते .खरोखर कथा अजराअमर असतात 


-------------------------------------------------------------------------------------


तू विचारलेला मार्ग जातो एकटेपणाकडे 
या मार्गावरून चालून जाणाऱ्यांना  
लाभले होते प्रतिभासंपन्न एकटेपण 
या मार्गावरून चालणारे 
समूह देखील एकटे पडतात 
तुला का जायचे आहे या मार्गावरून ?
माझा प्रश्न ऐकून  --
तिने ऐकवली मला तिची कथा 

अनादि काळापासून चालत आहेत 
स्थिर भासणारी माझी अस्थिर पावले 
मला जन्म देणारे कुणीच नव्हते 
मला सांभाळणारे कुणीच नाही 
मीच सांभाळत राहते अनाथ ब्रम्हांडाला  
काळाला मानले आहे मी माझा स्नेही 
तेव्हापासून काळही विलीन तल्लीन 
विश्वमोहिनी विश्वव्यापिनी विश्वकदंब 
या अवघ्या चर-अचर नाम रुपामध्ये   

सखी मी चालत राहते चालतच राहते 
अंत न सापडणाऱ्या अनंताच्या गुहेकडे  
कुणी मला माया म्हणते कुणी आई 
कुणी अन्य काही ना काही अभिधानात 
तू मला ओळखणार नाहीस 
मी आहे तुझ्या असण्याचे निमित्त 
आणि तुझ्या नसण्याचा भास 

सखी मला थांबता येत नाही 
गेले पाहिजे ,चालत राहिले पाहिजे 
अंतस्थ झाली आहे तुझ्या माझ्यात 
माझी करुणा आणि तुझी वेदना 
कुठल्याश्या प्राचीन गाभाऱ्यात 
ऐकु येतो आहे मंत्राचा नामघोष 
मी सांगितली आहे तुला माझी कथा 
उतू नको मातु नको 
घेतला वसा टाकू नको 

तिच्या कथेतले हुळहुळते दुःख 
मी सोडून दिले पाण्यावर 
सांजशकुनाच्या स्तब्धवेळी 
कथा ऐकवून ती निघून गेली 
मला गेले पाहिजे तिच्या सोबत 
तिच्या एकटेपणाचा दिवा 
विसरला आहे माझ्याजवळ 
दिव्यातुन दिवा प्रज्वलित झाला आहे  
गंगेच्या डोहात वितळली आहेत 
जणू लक्ष लक्ष तारांगणे  
ज्योतीच्या लोलकासम 
माझे मनही एकटे विश्वभर  

अंतिमचा दिवा केव्हा प्रज्वेल ?
तिच्या ओंजळीत केव्हा ठेवेन दिवा ?
या अनाम प्रश्नांची गोंदण 
माझ्या प्राक्तनावर कोरलेली 
आणि उत्तरे त्या सखीला ठाऊक 
जिने मांडला आहे प्रश्नाचा सारीपाट 
मला चालत राहिले पाहिजे 
जोपर्येंत वळून मागे पाहत नाही मी 
अन्यथा तिच्या कथेचे साकारते शिल्प 
विश्वकर्माने बांधलेल्या मंदिरात  
सखीने ऐकवली आहे कथा 
उतू नको मातु नको 
घेतला वसा टाकू नको 




------कविता मोकाशी 

------------------------------------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment