Pages

Wednesday, 1 October 2014

मी कोण ?

मी कोण ?


माझे नाव अमुक तमुक 
राहणार पत्ता 
अमुक गल्ली तमुक बोळ 
माझे पूर्वज अमुक तमुक 
माझी पुढली पिढी 
अमुक एक तमुक एक 
मी अमुक अमुक 
मी तमुक तमुक 
सारी उत्तर मला ठाऊक 
अजून तरी 
गवसला नाही प्रश्न 
मी कोण ?
गवसले तरी उत्तर काय 

हा प्रश्न कशाच्या 
आधारावर ?
सत्यावर ? असत्यावर 
संकल्पनेवर 
कोणास ठाऊक ?
माझी लायब्ररीची पुस्तके 
नीटनेटकी कप्प्यात 
असेल उत्तर 
विवेकानंदाकडे 
अरिस्टोटल किंवा हॉकिंगकडे 

खोलीच्या उत्तर दिशेला 
ध्रुव
ध्रुव आणि माझ्यामध्ये घार 
घिरट्या घालीत 
सांभाळत तिच्या पिल्लांना  
ध्रुव मी घार 
एका सरळ रेषेत 
कोणाचे कोणाला ग्रहण ?
कुणाची कोणावर सावली 
सूर्योदयाला मिळेल उत्तर 

सूर्योदय कोंदट येथे 
कोंदट चैतन्य 
कोंदट ब्रम्ह 
माया वारा घालीत 
पंखा डोक्यावर 
नादब्रम्ह 
सृष्टीचक्रात अडकलेले 
धुलीकण 

गेले अनेक जन्म 
येथेच घेतला असावा श्वास 
पुढील काही जन्म 
येथेच असावा वास 
किती काळ उलटून गेला
निद्रेच्या गुहेत 
दर तासाने वाजते 
अलार्म क्लोक  
तहान भूक नाही 
दुःख वेदना नाही 
नाही जागी संवेदना 
मला येत नाही तरंगता 
बुडत जाते खोल खोल 
श्वास नाही अधेमधे 
सगळे जग पाण्याखाली 
जणु दिव्यावर जळतो पतंग 

या खोलीच्या गर्भाबाहेर आहे 
अवकाश 
या अवकाशाच्या गच्चीत 
कुणीच नाही 
काळोखाशिवाय 
इथे ऐकू येतो नाद 
पाण्याच्या थेंबांचा 
कोण रडते आहे ?
ऐकू दे त्याची कथा 

कथा आहे 
अमुक तमुक माणसाची 
एकपात्री प्रयोग 
येथे नाट्य नृत्य नाही 
गद्य पद्य नाही 
असलीच तर भूमिका 
न गवसलेल्या प्रश्नाची 
मी कोण ?


-----कविता 

No comments:

Post a Comment