Pages

Monday, 13 October 2014

मिथ्याची माती

मिथ्याची माती 




परिस्थितीला आकार सापडतो 
परिस्थिती घडविते अनेक घट 
घटांमध्ये आकाश भरून जाते 
त्या आकाशात रममाण होतात 
न उडणारे पक्षी किंवा पक्ष्यांची नक्षी 
आकाश आभासी पक्षीही आभासी 
पण पायाला चिकटते माती मिथ्याची  
कारण घट खराखुरा असतो 


मन अवकाशस्थितीला पोहोचते 
नक्षत्रांचे देह धारण करते 
मनाची होते अंतरिक्ष अभिव्यक्ती 
या अवकाशपणातून 
मन उडता उडत नाही 
देहाची पालटत नाही स्थिती 
काळाच्या मुंग्या उभारतात  
नक्षत्रांच्या देहाभोवती वारूळ 
या वारुळात अनतांची गुंफा 
किंवा एक महान मिथककथा 



भविष्यात घर बांधून 
होईल की नाही होणार ?
उत्तर त्याला माहीत नाही 
भूतकाळात मात्र आहे त्याचे घर  
वडिलोपार्जित पूर्वापार मिळालेले 
पण भूकंपात गाडले गेलेले 
जोपर्येंत भूकंप होतील 
तोवर घर पडझडीत जाणार 
पण त्याच्याजवळ आहे भूतकाळ 
तोपर्येंत त्याचे घर असणार 
हे त्याचे आणि घराचे मिथ 
तो स्वतःही नाकारत नाही 


भूतकाळाचा देह न ओलांडणारी 
अवकाशस्थिती त्याच्या मनाला 
प्राप्त झाली आहे म्हणा 
आठवणीच्या नक्षत्रांभोवती 
उभे वारूळ त्याच्या भूतकाळाचे  

किंवा परिस्थितीने घडविला आहे 
त्याचा घट आणि भरले आहे 
त्यात न उडणारे आकाश 
न बांधता येणारे घर 
त्याला सापडावे म्हणून 



------कविता 

No comments:

Post a Comment