Pages

Tuesday, 28 October 2014

आपकी पसंद

आपकी पसंद 





हातात क्रोशाची सुई घेऊन ती विणत बसली होती .दिवाळीनंतर येणाऱ्या ख्रीसमसला तिची नात परदेशाहून येणार होती . त्यादिवशी नातीला सांता भेटवस्तू देणार होता . त्यासाठी सांताला मोजे विणण्याचा आजचा बेत तिने आखला होता . रेडीओ वर आपकी पसंद गाण्याचा कार्यक्रम रंगत चालला होता . त्यावर विशीतला एक मुलगा त्याच्या प्रेमासाठी "एक लडकी को देखा तो " गाण्याची फर्माईश करत होता . निवेदक आलटून पालटून त्याच्या प्रेमाची गोड रहस्य उघडू पाहत होता तर तो मुलगा आढेवेढे घेत शेवटी त्या "एक लडकी"चे नाव सांगून गेला . या चाललेल्या गंमतीने ,ती मोठी मिश्किल हसू लागली होती . तिच हसण खोलीतल्या कपाटावरचा मोठ्ठा टेडी पाहत होता . अचानक तिच्या कानावर तिचे नाव आले . काहीसे विस्मयाने तिने रेडीओकडे पाहून volume मोठा केला तिचे नाव घेणारा आवाज तिच्या परिचयाचा . इतक्या वर्षानंतरही तोच आवाजातला खर्ज जाडा भरडा आवाज ,प्रत्येक शब्दावर भार देऊन बोलण्याची त्या आवाजाची लकब आणि कुणालाही संपूर्ण नावाने हाक मारण्याची या आवाजाची खासियत तिला आवडत असे . तिचे नाव अनघालक्ष्मी ,नवरा लक्ष्मी म्हणे सासू अनघा म्हणे इतर पाहुणे मंडळी अनु म्हणत . 'अनघालक्ष्मी' संपूर्ण नावाने तिला हाक देणारी ती एकटीच होती 'कृष्णा" . निकट परिचयानंतरही विध्यर्थी वाक्यरचना कृष्णा बोलत रहायची जस की अनघालक्ष्मीला तिला सांगायचे असेल कपाळावर टिकली तिरकी लागली आहे ती सरळ कर . कृष्णाचे सांगणे साधारण असे असायचे "अनघालक्ष्मी टिकली तिरकी झाली आहे सरळ करतेस का पहा ?" तिच्या या बोलण्यात परकेपणा नसायचा . एक स्थिर मनाची अवगुंठी तिच्या विचारांशी बांधलेली होती . कृष्णा निवेदकाला आपकी पसंद अनघालक्ष्मीसाठी असल्याचे सांगत होती . निवेदक या अनघालक्ष्मी कोण विचारत होता . कृष्णा सांगू लागली 

"माझ्या नवऱ्याची नोकरी ही बँकेची, स्थिरस्थावर असे जगणेच त्यामुळे जमले नाही . सतत बदल्या कधी कधी राज्याबाहेर तर कधी निसर्ग प्रतीकुल होईल अशा ठिकाणी . बँकेकडून रहायला जागा ,क्वार्टरस नेहमी मिळत . नवऱ्याने मात्र खाजगी जागा घेऊन राहणेच पसंत केले . त्यामुळे अशा किती घरात संसार थाटले आणि कित्येक वास्तूशी सुख दुःख जोडली गेली . जशी घरं असतात तशी माणस . काही घरांत मुळातच आपूलकीचा धूप दरवळत असतो . आजूबाजूच्या भिंती खिडक्या या धूप दरवळीमध्ये अदृश्य होत जातात आणि या घराशी आपसूक नाते जोडले जाते .नवऱ्याच्या या फिरत्या पेशामुळे अनेकविध माणस भेटली ,अनेक भाषा संस्कृती मी पहिल्या पण "अनघालक्ष्मीला " मी कधीच विसरले नाही .मला आठवणीमध्ये रमणे आवडत नाही हे अनघालक्ष्मीला मी अनेकदा म्हणत असे . पण तिच्या आठवणी काळाचे इतके तंतू उसवत राहतात मी भूतकाळाचा हात धरून अनघालक्ष्मीच्या घरात जाऊ लागते . मी तिची एवढी आठवण काढते आहे ,हे बिलकुल तिला पटणार देखील नाही . पण अनघालक्ष्मी माझ्या बोलण्यातला शब्द आणि शब्द खरा आहे .तू जेथे कुठे आहेस मला ऐकते आहेस मला ठावूक आहे . अनघालक्ष्मी बद्दल सांगाव अशी विशेष गोष्ट कोणती नाही . याच कारण अनघालक्ष्मीला साधेपणाची भोळी आवड होती . तिच्या वागण्यात बोलण्यात विचारात कमालीचा साधेपणा होता . तिचे नाव इतके खानदानी तीच्या नावाला शोभेल अशीच तिची वागणूक स्वतःसाठी आणि इतरासाठीही . मला अनघालक्ष्मीसाठी वक्त सिनेमातले आगे भी जाने न तू पसंद म्हणून कळवायचे आहे . 


आगे भी जाने ना तू ,पीछे भी जाने ना तू
जो भी है बस यही एक पल है

अनघाबद्दल भरभरून बोलाणारी कृष्णा आणि अनघासाठी तिने पसंद म्हणून कळवलेले गाणे ,त्या गाण्याचा आशा भोसलेंचा सूर याचा एकत्रित परिणाम असा झाला . रेडीओचा volume वाढवण्यासाठी आलेली अनघा तिच्या सगळा शरीराचा भार अंगठ्यावर टाकून उभी राहिली अनघा विचार करू लागली आठवू लागली . गाण्याच्या भेंड्यामध्ये क्रमांक अग्रेसर असणारे माझे आणि कृष्णाचे आवडते गाणे . आयुष्य हे क्षणभंगुर आहे या वाक्यापेक्षाही ,प्रत्येक क्षण आयुष्य जगल्यासारखा जगावा हि कृष्णाची फिलोसोफी . भावना आणि विचार यांचा अतिशय सुंदर समतोल तिच्या जगण्यात होता . तितकेच काळ या गोष्टीला महत्व तिच्या जगण्यात होते . काळ हा अखंडच असतो त्याला सुरुवात मध्य अंत नाही एखाद्या कवितेसारखा मला काळ असा भासायचा . त्याला माझ दैनदिन जगणेही होतेच काळाने ठरवून दिलेले . माझ्या परिवलन परिभ्रमणाच्या कक्षा ठरलेल्या देवापुढे तेवता नंदादीप लावावा . चार ते चार ठिपक्याची रांगोळी काढावी . चार शिट्याचा कुकर लावावा . दोन पोळ्या नवऱ्याच्या डब्यात दोन जेवायला उरलेल्या आठ घरात ठेवाव्या ,रोजचे अडीच लिटर दुध मांडावे . किराणामालाचा हिशोब मांडावा . सार काही तोलून मोजून मापून होत माझ्या जगण्यात पण काळ अखंडच भासायचा किंवा जवळपास तो नव्हताच माझ्या जगण्यात . कृष्णाला मात्र काळाचा दीर्घ परिचय असावा त्याचे तिला खंड पाडता यायचे . काळाच्या चौकटीबाहेर येवून तटस्थपणे तिला नाती माणस सुख दुख कळायची . म्हणूनच एक हा आयुष्य जगल्यासारखा जगता आला पाहिजे हे तिला समजले होते .


अनजाने सायो का राहो मे डेरा है
अनदेखी बाहो मे हम सब को घेरा है
ये पल उजाला है बाकी अंधेरा है
ये पल गवना ना ,ये पल ही तेरा है
जीने वाले सोच ले ,यही वक्त है कर ले पुरी आरजू

सासर घरच्या घर शेत जमिनी साऱ्याच्या वाटण्या झाल्या होत्या . घर मोठ्या दिराला दिले आणि जमीन माझ्या नवऱ्याला . मोठे दीर परदेशी राहायचे साहजिक जमिनीची जबाबदारी नवऱ्यावर आली . ते परदेशातून येतील तेव्हा घर त्यांच्यानावे करायचे पण माझ मन या साऱ्याला तयार होईना . या घरातल्या प्रत्येक कोपरा भिंत प्रत्येक दगड ,खांबाशी नाते जोडले होते . कितीतरी उत्सवाची सणाची उब आणि कितीतरी दुःख अज्ञाताच्या अंधारात विसरून जाण्याची ताकद या घराने मला दिली होती . ते घर माझ असावं हि सहज भावना माझी होती . या वाटणीला अगदी कडाडून नसला तरी माझा विरोध होता . तेव्हा कृष्णा या घरात आमची भाडेकरू म्हणून रहात होती .  माझ्या या प्रश्नावर कृष्णाची फिलोसोफी तयार होती . "अनघालक्ष्मी हा काळ अनंताच्या पटीत वाढणारा आहे त्याला आकार नाही कल्पना नाही या काळासोबत आपण घडत जातो . काळ हा एखादे सुंदर शिल्प करण्यात रममाण असणारा कलाकार आहे तुझ्या जन्माआधी असणाऱ्या तुझ्या वडिलांची आजोबांची पणजीची खापरीची पिढ्या त्याने घडवल्या आणि पुन्हा त्याच लयीत नाचत राहतो आहे कितीतरी माणसांच्या जगण्याचे चिखलगोळे तुडवत आहे . तुला हवेहवेसे वाटणारे घर नष्टही होऊन जाईल या काळाच्या मनोराज्यात . कृष्णाचे बोलणे मला फारसे आवडले नव्हते . काळ वगैरे मला समजले नव्हते पण तिच्या बोलण्याचे तात्पर्य मी घराला विसरावे असे होते . माझी उदास झालेली चेहर्यावरची रेघ तिला उमजली ती चटकन म्हणाली "जीने वाले सोच ले ,यही वक्त है कर ले पुरी आरजू " तिच्या या सुरेल ओळीमुळे दिर भावजयीला घराची वाटणी शेतातच घ्या असे माझे आणि नवर्याचे सांगायचे ठरले . कृष्णाने या एकाच प्रसंगामध्ये साथ केली असे नाही माझे भरकटलेले मार्ग पुन्हा आपले आयुष्याचे ध्येय गाठू लागले होते ते केवळ त्या दिवशी कृष्णा माझ्या सोबत होती म्हणून .


इस पल के जलवो ने ,महफ़िल सवारी है
इस पल की गर्मी ने धडकन उभारी है
इस पल से होने से ,दुनिया हमारी है 
ये पल जो देखो तो सदियो पे भारी है
जीने वाले सोच ले ,यही वक्त है कर ले पुरी आरजू

प्रियाचे माझ्या मुलीचे पत्र हातात पडले . तिने परस्पर एका ख्रिश्चन मुलाशी लग्न केले होते . तिच्या पत्रातील एकेक अक्षर वाचून माझे अवयव गोळा होऊ लागले कृष्णाने प्रियाला पाहिले नव्हते . कृष्णा भाडेकरू म्हणून गेली तीन साडे तीन वर्ष राहत होती आणि प्रिया पाचच वर्षापूर्वी तिच्या काकांच्या सल्ल्यानुसार  उच्च शिक्षणासाठी परदेशी गेली होती . कृष्णाला माझी घनदाट मैत्री खूप कमी वेळात झाली होती याला उत्तर तिच्या भाषेत म्हणजे तिच्या काळानेच ती गोष्ट योजली होती . मला काळ वगैरे कधीच समजला नाही . मला कृष्णाचे आणि कृष्णाला माझे मन उमजत होते . माझी कातर झालेली अवस्था तिच्या लक्षात आली पण तिच्या स्थिरबुद्धीने माझ्यावरचे हे दुःख ओवाळून टाकले कृष्णा म्हणत होती "अनघालक्ष्मी हे बघ एक गोष्ट पक्की कर तू प्रियाला जन्म दिलास वाढवलंलेस ते तिचे आयुष्य म्हणून तिच्या बाळबोध सावल्यांना तुझ्यासारख्या परिपक्व उन्हाची गरज होती . तिचे रुजणे सुरु आहे तिच्या आयुष्यात त्या सावल्यातून तू आता वेळीच वेगळे झाले पाहिजेस कारण तुलाही तुझे आयुष्य आहे तुझा रस्ता आहे या वळणावर झाड होऊन रहायचे आहे . आणि दुसरे असे ख्रिश्चन लोक माणूस नसतात का ? प्रियाच्या आयुष्याचा निर्णय तिने घेतला आहे . तिच्या निर्णयाचे स्वागत कर . आज उदास होशील बोलणे टाकशील तिच्याशी नाते तोडशील एखादे दिवशी काळ त्याची कल्पनेची कुपी उघडेल . तुला प्रियाला भेटावेसे वाटेल पण प्रिया तुझा निर्णय तेव्हा स्वीकारेल का ? अनघालक्ष्मी अग अनघालक्ष्मी " माझे दोन्ही दंड धरून कृष्णा मला गदागदा हलवत होती मी तिच्या कुशीत कितीतरीवेळ रडत राहिले . प्रियाचा निर्णय चुकला म्हणून नाही प्रियाचे मन मला ओळखता आले नाही . आमच्या मैत्रीच्या समेवर तेच गाण वाजत होते  "जीने वाले सोच ले ,यही वक्त है कर ले पुरी आरजू

इस पल के साये मे अपना ठिकाना है
इस पल के आगे फिर हर शय फसाना है
कल किस ने देखा है ,कल किस ने जाना है
इस पल से पायेगा ,जो तुज को पाना है
जीने वाले सोच ले ,यही वक्त है कर ले पुरी आरजू 

पुन्हा आता कृष्णाच्या नवऱ्याची बदली झाली होती . कृष्णा आमच घर गाव सोडून जाणार होती . मी माझ्या स्वतःच्या हाताने तिची bag भरली होती . मला कृष्णाची आठवण पुन्हा पुन्हा येणार होती कारण काळाची पेन्सील धरून कुठलेही चित्र काढणे कृष्णासारखे मला जमणारे नव्हते . कृष्णाला मात्र आठवणी का येतात आल्या तरी काळाच्या डोहात त्या आपले प्रतिबिंब कसे निरखून पाहतात एखादा वर्तमानाचा तरंग त्यावर उठला तर आठवणीचे बिंब कसे तडकते या साऱ्या प्रतिकात्मक गोष्टी तिला ठाऊक होत्या . मी माझी भेट म्हणून तिला सुंदर झोपाळ्यावर बसणाऱ्या दोन मुलीचे पेंटिंग दिले . तिने मात्र एक गंमतीशीर अट घालून चंदनाची भेटवस्तू दिली आणि म्हणाली जोपर्येंत ही चंदनाची वस्तू तुझ्याकडे आहे तोपर्येन्त आपले मैत्र टिकून आहे . पण तुझ्या आयुष्यात जेव्हा एखादा मोठा क्षण येईल ज्याला तुला कवेत घेता येणे शक्य नाही त्यादिवशी हे चंदन उगाळून घे . जर मी चंदन उगाळले तर आपली मैत्री ?मी प्रश्न केला कृष्णाला . तशी कृष्णा मला कडकडून मिठी मारून हळवी झाली . कदाचित कृष्णाला ठावूक होत तिने मला क्षणात आयुष्य जगणे शिकवले होते . तिला खात्री होती यापुढचा असणारा प्रत्येक क्षण मी माझ्या चिमटीत फुलासारखा पकडणार आहे "इस पल से पायेगा ,जो तुज को पाना है जीने वाले सोच ले ,यही वक्त है कर ले पुरी आरजू" गाण्यातली शेवटची ओळ संपली होती . कृष्णाच्या आठवणीने मात्र मुग्यांच्या रांगा लागल्या होत्या आणि मला दूर दूर कुठेतरी ओढून नेत होत्या . कृष्णाच्या भाषेत म्हणायचे तर काळ माझ्या मनाशी फुगडी घालत होता आणि मी त्याच्याबरोबरीने माझ्या भोवती फिरत होते .


-----कविता मोकाशी 

No comments:

Post a Comment